ऊब आजीच्या मायेची

विवेक मराठी    23-Aug-2021
Total Views |

संभाजीनगर येथील सुशीलताई प्रल्हादजी अभ्यंकर या आजीने विणलेले स्वेटर्स त्या लहान बाळांना आणि घरच्या लोकांना फारच आनंदाने भावुक करणारे होते. त्यातल्या कित्येकांनी असे स्वेटरच पहिल्यांदा पाहिले होते. आपल्याला स्वेटर असू शकतो, अशी तर कधी कल्पनाच केलेली नव्हती. ह्या पावसाळ्यातल्या गारठ्यात, नंतर येणाऱ्या थंडीत हा मायेचा स्पर्श, समाजाकडून मिळालेली आपुलकी त्यांना नक्कीच उब देत राहील. 

 
RSS_4  H x W: 0
 
संभाजीनगर येथे राहणार्‍या माननीय सुशीलताई प्रल्हादजी अभ्यंकर, राष्ट्र सेविका समितीच्या सेविका, पूर्वी समितीच्या अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून कार्यरत. वय अवघे ९२ पूर्ण!

आत्तापर्यंत त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. 'कॅलिडोस्कोपमधून रामायण', 'आम्ही बी घडलो' भाग १ व २, 'चार आश्रम, 'भारत की प्राचीनता और श्रेष्ठता', 'मातृशक्ती' ही त्यातील काही पुस्तकांची नावे.

समितीच्या कामाच्या निमित्ताने त्यांनी भारतभर प्रवास व बौद्धिक सत्रे केलेली आहेत. रामनवमीच्या वेळी रामायणावर सलग ९ दिवसांच्या अनेक प्रवचनमाला, अनेक वर्षे अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केल्या आहेत.

आता वयाच्या ९३व्या वर्षीदेखील आपले वाचन, चिंतन, लेखन ह्याबरोबर त्या विणकामदेखील सतत करत असतात. दिवसातला एकही क्षण वाया घालवायचा नाही, हे आयुष्यभर पाळलेले व्रत अजूनही चालूच असते.

आतापर्यंत भरपूर विणकाम करून झाले आहे व त्यातून आलेला निधी सामाजिक संस्थांना देऊन झाला आहे. ह्या वर्षी त्यांनी ठरवले की लहान बाळांचे (साधारण दोन-अडीच वर्षांपर्यंतच्या बाळांचे) स्वेटर विणून ते ज्यांना त्या स्वेटर्सचा खरेच उपयोग होईल अशा बाळांना भेट द्यायचे. विविध रंगांचे, प्रकारांचे, विणींचे स्वेटर्स विणायला सुरुवात झाली.

RSS_2  H x W: 0

मध्यंतरी महाड, चिपळूणमधील पुराच्या बातम्या आल्या. संपूर्ण घरात पाणी जाऊन घरातले सर्व सामान वाहून गेले असे फोटोही आपण पाहिले. अस्वस्थ तर आपण सगळेच होतो. मग महाडला श्री. शरददादा गांगल ह्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा वाड्यावस्त्यांवर चांगला संपर्क आहे. तिथे त्यांनी खूप कामही केलेले आहे आणि अजूनही करत असतात. त्यांना विचारल्यावर त्यांनी उत्साहाने ते स्वेटर्स योग्य ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी घेतली.

काल दि. २२ ऑगस्ट २०२१ला तिथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम होताच. त्या वेळी त्यांनी वस्ती, वाडी , पाड्यांवर जाऊन स्वेटर्स व खाऊ बाळांपर्यंत पोहोचवला.


RSS_3  H x W: 0 

असे नवे आणि तेही हाताने विणलेले स्वेटर्स आपल्याला एका आजीनी पाठवले आहेत, हे त्या लहान बाळांना आणि घरच्या लोकांना फारच आनंदाने भावुक करणारे होते. त्यातल्या कित्येकांनी असे स्वेटरच पहिल्यांदा पाहिले होते. आपल्याला स्वेटर असू शकतो, अशी तर कधी कल्पनाच केलेली नव्हती. ह्या पावसाळ्यातल्या गारठ्यात, नंतर येणाऱ्या थंडीत हा मायेचा स्पर्श, समाजाकडून मिळालेली आपुलकी त्यांना नक्कीच उब देत राहील.

सहसा स्वेटर हाताने विणण्याचे कष्ट घेतले जातात, ते आपल्याच मुला-नातवंडांसाठी. पण संपूर्ण समाज आपला आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही भावना कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रकट होण्याची अशी उदाहरणे खरोखरच सकारात्मक बळ देऊन जातात.

 
RSS_1  H x W: 0

गोष्ट इथेच संपत नाही! आत्ता ४० स्वेटर्स महाडला पाठवले होते. अजूनही असे स्वेटर्स करून इतर ठिकाणी पाठवण्याचा मा. सुशीलताईंचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे स्वेटर विणणे सुरूच आहे. वयानुसार थकलेले डोळे, दुखणारे अंग अशा बारीकसारीक अडचणींची मग काय बिशाद आहे त्या ह्या कामात अडथळा आणू शकतील!!

 

- वृंदा टिळक. ठाणे.