जन आशीर्वाद यात्रा यादगारही, यातनादायकही

विवेक मराठी    26-Aug-2021
Total Views |
@आनंद देवधर

भाजपाच्या केंद्रातील नवनियुक्त मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्टरस्ट्रोक ठरला. महाराष्ट्रातील चारही मंत्र्यांच्या यात्रांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक हृदयस्पर्शी क्षण या यात्रांनी अनुभवले. नारायण राणे यांच्या यात्रेला गालबोट लागले असले तरी त्या निमित्ताने शिवसेनेच्या सूडबुद्धीचेच पुन्हा एकदा दर्शन झाले.
 
bjp_5  H x W: 0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून साकारलेल्या जन आशीर्वाद यात्रा 16 ऑगस्टपासून देशभरात सुरू झाल्या. नवनियुक्त मंत्र्यांनी थेट लोकांमध्ये जाऊन, मोदींचा प्रतिनिधी म्हणून स्वत:ची ओळख करून देणे आणि लोकांचे आशीर्वाद घेणे असा यामागचा हेतू होता. महाराष्ट्रामध्ये चार मंत्र्यांच्या यात्रा निघणार होत्या, त्यापैकी नारायण राणे यांची एक यात्रा वगळता इतर पूर्ण झाल्या आहेत.
 
 
या यात्रांबद्दल जास्त माहिती गोळा करून त्यावर लिहावे, असे मनात आले. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. या यात्रांचे दृश्य, अदृश्य परिणाम शोधण्याचा, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर पडू शकणारा प्रभावाचे जमेल तसे आकलन करण्याचा हा प्रयत्न. यातील प्रत्येक यात्रा हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण त्यापेक्षा एकत्रित परामर्श घेणे जास्त योग्य वाटले. प्रथमदर्शनी एक महत्त्वाचा मुद्दा जाणवतो की जन आशीर्वाद यात्रा हा मोदींचा मास्टरस्ट्रोक ठरला आहे.
 
 
यात्रेचा हेतू सफल झाला की नाही, लोकांचा प्रतिसाद कसा होता, कोणत्या ठळक गोष्टी जाणवल्या याविषयी माहिती त्या त्या यात्रेशी संबंधित प्रमुखांशी फोनवरून संवाद साधून मिळवली.
 


bjp_2  H x W: 0 
 
पंचायत राज्य खात्याचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या यात्रेबाबत ठाण्यातील विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्याशी संवाद साधला. कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. त्यांनी काही लक्षवेधक गोष्टी सांगितल्या. कल्याण पूर्व, डोंबिवली या भागांमध्ये तृतीयपंथी या सदा दुर्लक्षित, कायमचा हेटाळणीचा विषय असणार्‍या समाजघटकातील प्रतिनिधींची भेट घेतली. देशाच्या इतिहासात बहुधा असे प्रथमच घडले असावे की एक केंद्रीय मंत्री तृतीयपंथी समाजातील प्रतिनिधींना भेटला आहे. भिवंडी आणि मुंब्रा या दोन अल्पसंख्याकबहुल भागामध्ये महिलांचा प्रतिसाद आणि सहभाग होता. ट्रिपल तलाक कायद्यामुळे फायदा झालेल्या महिला अत्यंत आपुलकीने भेटल्या. मोदी यांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले आणि कपिल पाटील यांना यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे व्हावे, म्हणून स्थापन झालेल्या संघर्ष समितीने कपिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. सर्वपक्षीय लोकांकडून या यात्रेचे स्वागत झाले, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
 
 

bjp_1  H x W: 0
 
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत रजत किशोर काळकर यांच्याशी बोललो. यात्रेचा मार्ग पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार इत्यादी जिल्ह्यांतून आखला होता. ही यात्रा प्रामुख्याने वनवासी भागातून मार्गस्थ झाली. त्या स्वत: वनवासी समाजातील आहेत. अत्यंत आपुलकीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यात्रेने 900 किलोमीटरचा प्रवास केला आणि एकूण 275 लहान-मोठे कार्यक्रम झाले. आपल्या समाजातील एक महिला केंद्रात मंत्री म्हणून काम करत आहे, याचा आनंद लोकांच्या विशेषत: महिलांच्या चेहर्‍यांवरून ओसंडून वाहत होता. पारंपरिक वेशभूषा करून त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. काही ठिकाणी तर ठेकाही धरला. भारतीताईंनी देवमोगरा येथील याहामोगी या वनवासी देवीचे पारंपरिक वेषात दर्शन घेतले. त्यांच्या या कृतीमुळे सर्व समाजांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. केंद्राच्या विविध योजनांचे लाभार्थी भेटून मोदी यांचे आभार मानत होते आणि त्यांची प्रतिनिधी म्हणून भारतीताईंना आशीर्वाद देत होते.
 
 
bjp_4  H x W: 0
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांचे यात्राप्रमुख मनोज पांगरकर यांच्या बोलण्यातूनच यात्रेचे यश जाणवत होते.वंजारी समाजातील नेते असलेल्या डॉ. कराड यांना आतापर्यंत कधी ग्लॅमर प्राप्त झाले नव्हते. यात्रेला कितपत यश मिळेल याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात शंका होती. परंतु यात्राप्रमुख, त्यांची टीम यांचे काटेकोर प्लॅनिंग आणि कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह यामुळे ती यात्रा अत्यंत यशस्वी झाली. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना इत्यादी जिल्ह्यांच्या ठिकाणी रात्री 11.30-12.00 वाजेपर्यंत लोक न कंटाळता उभे होते. अंगणवाडी आणि आशा वर्कर महिलांचे तुटपुंजे वेतन पंतप्रधान मोदींनी वाढवले, याची कृतज्ञ जाणीव त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. वाढ जरी छोटीशी असली, तरी ती मोदींमुळे प्रत्यक्ष हातात पडली याचे ऋण त्यांनी मानले. केंद्राच्या योजनेअंतर्गत 6000 रुपयांची रोख मदत मिळालेल्या गरीब शेतमजुराने त्याच पैशांच्या बचतीतून एक पारंपरिक सुंदर पटका भेट म्हणून दिला. “आठवणीने मोदींजींना तो द्या आणि त्यामागची भावना पोहोचवा” अशी विनंती केली. अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग होता तो. परभणी जिल्ह्यातील सेलू हे अत्यंत छोटे गाव. त्या गावातही एक असा उद्योजक आहे, ज्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे आणि अनेक देशांत निर्यात आहे. मोदींच्या धोरणावर तो संतुष्ट होता. त्यानेही कराड यांची आपुलकीने भेट घेतली. वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या कराड यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांतून पाठिंबा मिळत होता.
 
 

bjp_3  H x W: 0
 
केंद्रीय सूक्ष्म, लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेबद्दल त्या यात्रेचे सोशल मीडिया प्रमुख प्रसाद यादव यांच्याशी फोनवर, तसेच भाजपाचे राष्ट्रीय मंत्री सुनील देवधर यांच्या टीममधील श्रवण झा आणि राम यादव यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन बोलणे झाले. राणे यांची यात्रा तीन टप्प्यांमध्ये आता विभागली जाणार आहे. दोन दिवस त्यांनी मुंबई पिंजून काढली. परळ, लालबाग, दादर, माहीम या सेनेच्या बालेकिल्ल्यात, तर जोगेश्वरी ते दहिसर या पश्चिम उपनगरांत यात्रा पोहोचली. पाऊस पडत असतानासुद्धा रात्री उशिरापर्यंत लोक त्यांची वाट बघत होते. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आकर्षण तर होतेच, तसेच आदरही होता, आपुलकीही होती, त्यांना भेटण्याची उत्सुकताही होती. नारायण राणे यांनी एकूणच सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे. दुसरा टप्पा म्हणजे बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन रत्नागिरीपर्यंत. त्यानंतर जे काही झाले हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे. या दुर्दैवी घटनांनंतर दोन दिवसांची उरलेली यात्रा लवकरच पूर्ण केली जाईल, असे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
 
 
त्यांना वसई, विरार भागातील लघुउद्योजक भेटले. येथे स्टील इंडस्ट्रीशी संबंधित मोठी उलाढाल करणारे कारखाने आहेत. राणे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. कोळी, राजपूत आदी लोकांनी पारंपरिक वाद्ये वाजवून राणे यांचे स्वागत केले. मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी भेटून समाधान व्यक्त करत होते.
 
 
राणे यांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे आणि तो मुंबई, कोकण प्रांतात मिळत आहे. साहजिकच शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. काहीतरी निमित्त काढून अडथळा आणण्याचा प्रकार झाला आहे. यात्रेचा संपूर्ण फायदा भाजपाला होणार आहे, पण नारायण राणे यांना व्यक्तिश:ही होणार आहे. शिवसेनेचा आत्मविश्वास खचला आहे.
 
 
नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा एक सूडाचा प्रवास आहे.राणे यांना मोदींनी नुसते कॅबिनेट मंत्री केले नाही, तर शपथविधी समारंभात मानाचे स्थान दिले. आपल्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री पक्षत्याग करून भाजपामध्ये जातो आणि केंद्रात मानाचे स्थान मिळवत आहे, ही गोष्टच शिवसेनेच्या सहनशक्तीपलीकडची होती.सेनेच्या अस्थायी आक्रमकतेला त्याच भाषेत उत्तर देणारा माणूस म्हणून राणे प्रसिद्ध आहेत. त्यांना मिळालेले मानाचे स्थान, त्यांची लोकप्रियता, स्वत:ची ढासळती प्रतिमा या पार्श्वभूमीवर आपण त्यांचे काहीही बिघडवू शकत नाही या जाणिवेतून आलेले पराकोटीचे वैफल्य जनतेच्या नजरेसमोर येत आहे. त्यातूनच पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्याची हाराकिरी झाली आहे. शिवसेनेला भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील. असो.
 
 
या सर्व यात्रांच्या अनुभवातून काही गोष्टी निर्विवादपणे सिद्ध होतात. लोकशाहीत लोक केंद्रस्थानी असतात. संसदेत गोंधळ घालून मोदींना नवनियुक्त मंत्र्यांची ओळख करून देण्यापासून रोखले, म्हणून या यात्रा निघाल्या. मुळात केंद्रीय मंत्री आपल्या लहान गावात येतो, आपल्या लहानशा घरात येऊन चौकशी करतो, चहा पितो, भोजन करतो ही घटनाच त्यांच्यासाठी अनोखी आहे. यात्रा सुरू करताना मोदींनी जो उद्देश मनात ठेवला होता, तो प्रमाणाबाहेर सफल होताना दिसत आहे. चारही यात्रांबाबत चर्चा केल्यावर माझ्या मते चार समान मुद्दे लक्षात आले.