रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे अधिनायक कल्याणसिंह

विवेक मराठी    27-Aug-2021   
Total Views |
 @सुधीर पाठक
कल्याणसिंह यांनी संघस्वयंसेवक व भाजपा कार्यकर्ता म्हणून मृत्यूला कवटाळले. त्यांच्या निधनाने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील एक महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाला दिलेले वचन न पाळणारा, पण प्रभू रामचंद्रांना मनोमन जपणारा मुख्यमंत्री म्हणून कल्याणसिंह यांची इतिहासात नोंद होईल.

bjp_4  H x W: 0

अयोध्येतील बाबरी ढांचा उद्ध्वस्त झाला तो एका लोकविलक्षण जनआंदोलनात, जनआक्रोशात, त्यात महानायकाची वा अधिनायकाची भूमिका पार पाडली ती उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी. त्यांनी या आंदोलनाच्या यशासाठी आपले संपूर्ण सरकार पणाला लावले. सर्वोच्च न्यायालयाला दिलेले अभिवचन पाळू शकलो नाही, हे सर्वोच्च न्यायालयात कबूल करताना त्यांनी स्पष्ट केले की, “नि:शस्त्र कारसेवकांवर गोळीबार करण्यासाठी अनुज्ञा मी दिली नाही. हा दोष असेल, तर त्यासाठी वाटेल ती शिक्षा मी सहन करीन.” आणि त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालय अवमानप्रकरणी ठोठावलेली एक दिवसाची शिक्षा त्यांनी सहन केली. असे हे त्या आंदोलनाचे महानायक, अधिनायक आज आपल्यात नाहीत. त्यांनी प्रदीर्घ आजारपणानंतर लखनौला संजय गांधी रुग्णालयात शनिवार 21 ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला.
कल्याणसिंह यांनी आपल्या राजकीय जीवनाचा, सामाजिक जीवनाचा पाया रचला तो रा.स्व. संघाचा स्वयंसेवक म्हणून. ते एक सच्चे, प्रामाणिक संघस्वयंसेवक होते. राजकारणात त्यांना मधल्या काळात भाजपा सोडावी लागली.. नव्हे, अटलजी व अडवाणीजी यांच्यावर जाहीर टीका केली, म्हणून भाजपाने त्यांना पक्षातून काढून टाकले होते. राजकारणात भाजपा हा जीवनश्वास घेणे अशक्य झाल्यावर त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढला. राष्ट्रीय क्रांती दल हे त्याचे नाव. पण त्या काळातही त्यांचे स्वयंसेवकत्व कायम होते. ते रा.स्व. संघ व संघ अधिकारी यांच्या संपर्कात होते. त्यांनी आपल्या स्वयंसेवकत्वाचा त्याग केला नाही. आपल्या त्या पक्षाच्या नावावर त्यांनी एक निवडणूकही लढविली, पण त्याचा फटका भाजपालाही बसला आणि त्यांना स्वत:लाही बसला. पुढे संधी मिळताच त्यांनी आपला पक्ष गुंडाळून पुन्हा भाजपात प्रवेश केला. मधल्या काळात त्यांनी काही वेळ समाजवादी पक्षाबरोबर जाण्याचाही प्रयोग करून पाहिला. पण त्याचा फायदा ना कल्याणसिंहांना झाला वा मुलायमसिंहांना झाला. त्यामुळे भाजपात पुन्हा प्रवेश झाला, त्या वेळी ते म्हणाले होते, “संघ व भाजपातील संस्कार माझ्या रक्तातील प्रत्येक थेंबात सामावलेले आहेत. त्यामुळे मी आयुष्यभर आता भाजपात राहणार आहे. आणि जो दिवस माझा शेवटचा असेल त्या दिवशी माझ्या देहावर भाजपाचा ध्वज गुंडाळला जावा.” त्यामुळे त्यांचा देह भाजपाच्या ध्वजात गुंडाळून काही काळ पक्षाच्या मुख्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला. कल्याणसिंहांचे अंत्यदर्शन घ्यायला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौला आले होते आणि त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी कल्याणसिंहांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर बुलंद शहरातील नरौरा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

अतरौली या लहानशा गावातून त्यांनी आपल्या राजकारणाचा प्रारंभ केला. वयाच्या 35व्या वर्षी 1969 साली अतरौली या विधानसभा क्षेत्रातून त्यांनी पहिली निवडणूक लढविली आणि उत्तर प्रदेश विधानसभेत त्यांचा प्रवेश झाला. 1980पर्यंत त्यांना अतरौलीतून आव्हानच नव्हते. ते निर्विवादपणाने विजयी होत. 1980 साली जनता पार्टीत फूट पडली. त्याचा फटका बसून ते पहिल्यांदा पराभूत झाले. 1977 साली उत्तर प्रदेशमध्ये राम नरेश यादव यांचे सरकार आले. त्यात कल्याणसिंह आरोग्य मंत्री झाले. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपाची स्थापना झाली व कल्याणसिंह यांच्यावर उत्तर प्रदेशच्या महामंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. भाजपा हा सवर्णांचा, उच्चवर्णीयांचा पक्ष आहे ही भावना जनमानसातून नष्ट करण्यासाठी कल्याणसिंहांनी जिवापाड प्रयत्न केले.


bjp_3  H x W: 0

बसपा नेत्या मायावती यांच्यावर विधानसभा निवासगृहात समाजवादी पक्षाच्या मंडळींनी हल्ला केला होता. त्या वेळी मायावतींना वाचविण्यात कल्याणसिंह यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यातूनच पुढे उत्तर प्रदेशात बसपा-भाजपा सरकार स्थापन झाले होते. कल्याणसिंह यांनी त्याचा कटू अनुभवही सहजतेने पचविला होता.
रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाले, त्या वेळी कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाला नवीन धार लाभली. 1990 साली लालजींची रथयात्रा निघाली होती. तिला बिहारमध्ये समस्तीपूरला अडविण्यात आले, तरीही कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. त्या वेळी मुलायमसिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अयोध्येत कुणी जाऊ शकणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पहिल्या कारसेवेत कल्याणसिंह यांना अटक करून अलाहाबादजवळच्या नैनी कारागृहात ठेवण्यात आले. नैनीलाच महाराष्ट्रातील कारसेवकही स्थानबद्ध होते. त्यात विद्यार्थी व महिलाही होत्या. त्यात कारसेवा झाली आणि मुलायमसिंह सरकारने नि:शस्त्र कारसेवकांवर गोळीबार केला. कोठारी बंधूंसारखे काही कारसेवक या गोळीबारात बळी पडले. ही बातमी नैनी कारागृहात पोहोचली आणि तेथील वातावरण अतिशय क्षुब्ध झाले. कारसेवक संतप्त झाले. प्रक्षुब्ध झाले. ते आता पोलिसांवर हल्ला चढवितात की काय, अशी स्थिती निर्माण झाली. गोंधळ टोकाला पोहोचला होता. कारागृहसेवक संपूर्णपणे सज्ज झाले होते. फक्त एका आदेशाची गरज होती. अधिकारिवर्गालाही कळत नव्हते काय करावे. त्यांनी दुसर्‍या बरॅकमध्ये असलेल्या आंदोलन प्रभारी कल्याणसिंहांना त्या बरॅकमध्ये नेले. कल्याणसिंहांनी आपल्या पहिल्या वाक्यानेच कारसेवकांना शांत केले. त्यांचे शब्द होते, “प्रिय रामभक्तांनो, आपल्याला रामजन्मभूमीसाठी जगायचे आहे. मरायचे नाही. जगून मंदिर झालेले आपल्याला बघायचे आहे. आपले लक्ष्य उत्तुंग आहे. आज तुम्ही येथे आंदोलन केले, कायदा हातात घेण्याचा प्रयास केला तर तुमचा सामना मृत्यूशी आहे. या नैनी कारागृहातून आजवर कुणीही तुरुंग फोडून पलायन करू शकलेला नाही. तुम्ही गैर वागलात, तर पोलिसांना नाइलाजाने कारवाई करावी लागेल. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. त्यांना कारवाई करण्याला भाग पाडू नका. येथे गोंधळ झाला, तर पोलिसांनाच जाब विचारला जाईल. आपला लढा पोलिसांशी वा प्रशासनाशी नाही. तो कारसेवेसाठी व राममंदिरासाठी सरकारशी आहे. प्रशासनातील अनेक जण आपापल्या परीने आपल्याला मदत करीत आहेत. त्यांना कारवाईला करण्यास भाग पाडू नका.”


bjp_2  H x W: 0
 
या भाषणाचा परिणाम असा झाला की, कारसेवकांचा क्षोभ शांत झाला. प्रशासनाला व कारसेवकांना त्यांच्यातील परिपक्व राजकारण्याचा परिचय झाला. फक्त कल्याणसिंह होते, म्हणून नैनी कारागृह शांत झाले होते. अयोध्या आंदोलन शांततापूर्ण होण्यासाठी कल्याणसिंहांनी केलेले प्रयत्न या निमित्ताने अधोरेखित झाले. राजकारण बदलत गेले. व्ही.पी. सिंग यांचे सरकार पडले. त्यांच्या जागी चंद्रशेखर यांचे सरकार आले. पुढे पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने त्यांची जागा घेतली. शंकरराव चव्हाण गृहमंत्री झाले. उत्तर प्रदेशातही सत्ता परिवर्तन झाले. मुलायमसिंहांऐवजी कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले.
अवघ्या दोन वर्षांत परिस्थिती पालटली होती. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवा करण्याचे ठरले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कल्याणसिंह सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. त्यांनी आश्वासन दिले की, बाबरी ढांचा व राममंदिर यांचे मी रक्षण करीन. तसे प्रतिज्ञापत्र सादर केले. सर्व बाजूंनी केंद्रावर दबाव वाढत होता तो कल्याणसिंह सरकार बरखास्त करण्यासाठी. पण नरसिंहरावांनी सांगितले, “नाही. कल्याणसिंह यांनी या वास्तूचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. ते काहीही होऊ देणार नाहीत.” पण सर्वोच्च न्यायालयाने कारसेवेला अनुमती देण्याचा विषय लांबणीवर टाकला. देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत जमा झाले होते. अचानक कारसेवक अनियंत्रित झाले आणि त्यांनी घुमटावर प्रवेश केला आणि बाबरी ढांचा उद्ध्वस्त करण्याला प्रारंभ केला. क्षणाक्षणाला तणाव वाढत होता. लखनौला कल्याणसिंहांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत होता. पोलीस व निमलष्करी दल कारसेवकांवर कारवाई करण्यासाठी अनुमती मागत होते. कल्याणसिंहांनी स्पष्ट सांगितले, “मी कारसेवकांवर गोळीबार करण्याला अनुज्ञा देणार नाही. कारसेवकांना अन्य काही मार्गाने समजविता आले तर समजवा. ते खाली उतरले की मी सरकारचा राजीनामा देतो. तत्पूर्वी राजीनामा देणार नाही.”


bjp_1  H x W: 0
बघता बघता संध्याकाळपर्यंत कारसेवकांनी तिन्ही घुमट (डोम) पाडले, जमीनदोस्त केले आणि मग कल्याणसिंह राजीनामा सादर करण्यासाठी राज्यपालांकडे जायला निघाले. नरसिंहराव सरकारने बाबरी पतन झाल्यावर कल्याणसिंहांचे शासन बरखास्त केले आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाली. एका कठोर प्रशासकाच्या अंत:करणातील मानवी भावनांचे, खंबीरपणाचे संपूर्ण जगाला दर्शन झाले.
 
 
पुढे सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रकरणी गुन्हेगार म्हणून त्यांना बोलविण्यात आले. कल्याणसिंह एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे नाही, तर एखाद्या अधिनायकाप्रमाणे ताठ मानेने सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. आपण बाबरीचे रक्षण करायला कमी पडलो, अशी त्यांनी कबुली दिली. पण नि:शस्त्र कारसेवकांवर गोळीबार करायला मी अनुज्ञा दिली नाही, ही जबाबदारीही स्वत: स्वीकारली आणि त्यापायी झालेली शिक्षाही तेवढ्याच उजळ माथ्याने स्वीकारली. सीबीआयचा खटलाही स्वत:वर ओढवून घेतला. त्यांनी एक प्रकारे प्रभू रामचंद्राला दिलेला शब्द, दिलेले वचन पाळले.
असे रामभक्त कल्याणसिंह हे उत्तम वक्ते होते. त्यांना आर्थिक प्रश्नांची जबरदस्त जाण होती. आर्थिक विषयावरील त्यांची भाषणे जनतेला आकृष्ट करीत. कल्याणसिंह हे अटलजींनंतर भाजपातील दुसरे असे वक्ते होते, ज्यांचे भाषण ऐकायला जनता तासनतास प्रतीक्षा करीत असे. पुन्हा राजकारणाने नवीन रूप घेतले. घोषित न करता कल्याणसिंह यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण होताच सक्रिय राजकारणातून, निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली. ते हिमाचल प्रदेशचे व राजस्थानचे राज्यपाल होते. 5 वर्षे हे पद सांभाळल्यावर ते निवृत्त झाले आणि आजाराने त्यांना घेरले. त्यांनी संघस्वयंसेवक व भाजपा कार्यकर्ता म्हणून मृत्यूला कवटाळले. त्यांच्या निधनाने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील एक महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाला दिलेले वचन न पाळणारा, पण प्रभू रामचंद्रांना मनोमन जपणारा मुख्यमंत्री म्हणून कल्याणसिंह यांची इतिहासात नोंद होईल. त्या महानायकाला विनम्र श्रद्धांजली.