राष्ट्र सेविका समितीची निष्ठावान सेविका

विवेक मराठी    03-Aug-2021
Total Views |
 
@नलिनी गजानन जोशी
 
दि. 29 जुलै 2019 रोजी आमची आई - म्हणजे नलिनी गजानन जोशी स्वर्गवासी झाली. मी तिला श्रद्धांजली म्हणून राष्ट्र सेविका समितीची सेविका म्हणून तिने केलेल्या कामाचे स्मरण, एक आढावा घेत आहे.


RSS_1  H x W: 0
शाळेत असल्यापासून आईला - नलिनीताईंना समितीची ओळख आणि आवड निर्माण झाली होती. फक्त चूल आणि मूल न करता त्या बरोबरीने संघ, जनसंघ, महिला मंडळ यात सहभागी होत असे. तेव्हाच समितीच्या एक ज्येष्ठ सेविका उषाताई लोंढे यांच्या संपर्कात ती आली आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही राहत आहोत त्या विभागात तिने समितीची शाखा सुरू केली. संघ समितीच्या कामात मुरलेल्या नागपूरहून बोरिवलीला राहायला आलेल्या मंगला नातू यांच्या सहकार्याने बोरिवली पूर्वमध्ये समितीचे उपक्रम सुरू झाले.

समितीच्या उपक्रमातील एक उद्योग मंदिरातील वस्तूंची विक्री आमच्या विभागात आईने आमच्या घरी करावयास सुरुवात केली. दर वर्षी ती तीनशे तीनशे किलो तिखट, हळद आणि इतर वस्तू आणून त्याची एकहाती विक्री करीत असे. त्यातून तिने अनेक माणसे जोडली. येणार्या स्त्रियांना समितीच्या उपक्रमांची माहिती सांगायची. समितीचे पाचही उत्सव आमच्या येथे होत असत. प्रशिक्षण वर्गासाठी मुलींना तयार करून पाठविणे, त्यांना सुखरूप घरी आणणे, वर्गावर मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा वर्ग बघण्यासाठी येथून स्त्रियांना आपल्याबरोबर नेणे ही आईची कामे मला आठवतात.

समितीच्या कामातील एक भाग म्हणून काही विषय तयार करणे आणि शाळा, मंडळे, वेगवेगळ्या संस्था येथे जाऊन तो विषय मांडणे व सोबत समितीची माहितीही सांगणे हे आई उत्साहाने करायची. संभाजी महाराज, जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांची चरित्रे व कार्य आईने अनेक ठिकाणी जाऊन सांगितले आहे.

तिच्या कामातील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरची दहा वर्षे, बोरिवलीच्या पुढे डहाणूपर्यंत तिने केलेले समिती संपर्काचे काम होय. आईच्या आधी माई वैद्य या सेविका हे काम करीत असत. बोरिवलीच्या पुढील प्रत्येक गावात रोज रेल्वेने जाऊन तेथील समितीच्या सेविकांना भेटणे, त्यांना नियोजित कामाची माहिती देणे, वर्षभरात करायचे ठरलेले कार्यक्रम सांगणे, त्यांच्या कामाचा आढावा बैठकीत देणे, तसेच शहर आणि ग्रामीण भाग यांच्यात समन्वय साधण्याचे काम आईने केले आहे. वाणगावच्या भट बाई, पालघरच्या पंडित बाई, दांडेकर बाई, मनोरच्या चंपानेरकर बाई अशा प्रत्येक गावातील समितीच्या सेविका आईच्या मैत्रिणी झाल्या. वर्ष 1993 ते 2003 ही 10-11 वर्षे अशा ठिकाणी रोज जाणे - जेव्हा फोन, रेल्वे गाड्या यांची सुलभ सुविधा नव्हती, हे निश्चितच आव्हानात्मक होते. यातून आईला अनेक अनुभव येत गेले व सेविका म्हणून ती जास्त समृद्ध होत गेली.

प्रकृतिअस्वास्थ्यामुळे जेव्हा प्रवास करणे अशक्य झाले, तेव्हा रोज फोनवरून सेविकांशी संपर्क ती ठेवत असे, कामाची माहिती करून घेत असे. समितीची प्रार्थना व सर्व गीते ती रोज अखेरच्या दिवसापर्यंतही तिने म्हटली आहेत. निगर्वी, मनमिळाऊ, मृदू स्वभाव आणि सतत दुसर्याचा विचार आधी करणारी, समोरच्याची चांगली बाजूच बोलताना नावाजणारी अशी आमची आई, हाडाची समितीची सेविका होती. स्वावलंबी, स्वत:च्या वस्तूंची, समितीच्या कागदपत्रांची निरवानिरव आधीच करून अत्यंत शांतपणाने तिने या जगाचा निरोप घेतला. एक चांगला आदर्श तिच्या रूपाने आपल्यासाठी राहिला आहे

 
- वर्षा विजय लिमये
9987306580