दु:खमुक्ततेकडे नेणारा बौद्ध धम्म (भाग - 1)

विवेक मराठी    03-Aug-2021   
Total Views |
तथागत गौतम बुद्ध हे आनंदी जीवन जगण्यासाठी मानसिक प्रशिक्षण देणारे आचार्य आहेत. आपण स्वत:ला जाणू शकतो, आपल्या आंतरिक स्वभावाची ओळख करून घेऊ शकतो, विधायक, उपयोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो हे त्यांनी प्रयोग करून मांडले. त्यासाठी प्रशिक्षणाचे नियमबद्ध मार्ग तयार केले. या मार्गाचा परिचय करून देणारा लेख दोन भागात देत आहोत.

bhakti_1  H x W
बौद्ध धर्मसंस्थापक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म शाक्य वंशात झाला. उत्तर बिहारमध्ये कपिलवस्तू येथे शाक्य वंशाचे राज्य होते. राजा शुद्धोदन व राणी मायावती यांच्या पोटी सिद्धार्थचा जन्म झाला. गौतम हे त्याचे गोत्र नाम होते.

सिद्धार्थ गौतमाचे बालपण अत्यंत लाडाकोडात व ऐश्वर्यात गेले. राजपुत्राला उचित असे शिक्षणही त्याला प्राप्त झाले. योग्य वयात यशोधरा या राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला.

वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी छन्ना या सारथ्यासह राज्याभिषेकाच्या आधी राज्यदर्शन घेण्यासाठी युवराज सिद्धार्थ निघाला. त्याला वाटेत जर्जर म्हातारा, महारोगी, प्रेतयात्रा आणि विरक्त संन्यासी असे चार प्रकारचे दर्शन झाले. त्यानंतर दुसर्‍या रात्री सिद्धार्थ गौतम राजवाड्याच्या बाहेर पडले. आत्मशांतीच्या शोधासाठी निघाले. आलारकालाम या गुरूंकडे त्यांनी काही काळ साधना केली. नंतर राजगृह येथील उद्रकरामपुत्र या गुरूंकडे साधना केली. या साधनांसाठी त्यांनी पराकोटीचे शारीरिक कष्ट घेतले, मात्र त्यांना आत्मज्ञान, शांती व समाधान मिळू शकले नाही. नंतर बोधिवृक्षाखाली स्वचिंतनाने त्यांना बोध प्राप्त झाला. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले.

तेव्हापासून वयाच्या ऐंशीव्या वर्षीपर्यंत समस्त प्राणिमात्रांचे दु:ख दूर व्हावे म्हणून बुद्धांनी आपल्या मतप्रणालीचा प्रसार केला. ही शिकवण साधी सरळ सोपी होती. नैतिक आचरण हा तिचा पाया होता. कोणतेही कर्मकांड, विधी यांचे अवडंबर त्यात नव्हते. लोकभाषा पालीमधून बुद्ध सर्वांना हे तत्त्व सांगत असत. बुद्धांनी स्त्री-शूद्रांना, सर्वांनाच आत्मज्ञानाचे दरवाजे उघडून दिले. आपल्या बौद्ध संघासाठी त्यांनी आचारसंहिता निर्माण केली. वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

बुद्धपूर्व काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थिती

बुद्धपूर्व काळात वैचारिक घुसळण मोठ्या प्रमाणात सुरू होती. देशात संन्यासी, वैरागी यांचे प्रमाण लक्षणीय झाले होते. उपनिषदांनी सुरू केलेल्या वैचारिक क्रांतीच्या वृक्षाला फळे लागू लागली. उपनिषदांनी वेदांमधील बाजूला पडलेल्या प्रश्नांवर काम करणे सुरू केले. संसारातील सुखोपभोग, यज्ञाने देवतांना संतुष्ट करणे, भरपूर काम करणे, स्वर्गप्राप्ती, आनंद, आयुष्याची कामना करणे, दुधातुपाने समृद्ध असणे या वैदिक काळातील समृद्धीच्या कल्पना उपनिषदांमध्ये कालानुक्रमे विकसित आणि भिन्न होत गेल्या. अभ्युदयाबरोबरच नि:श्रेयसाचा जन्म झाला. दैनंदिन जीवन सुखकर असेल तरच मनुष्याला चशींरहिूीळलरश्र बाबी सुचतात. अशा अनेक विषयांची पुरचुंडी उपनिषद्कारांनी मानवाला दिली, ज्यामुळे मानवी संस्कृती विविधांगांनी बहरत गेली.

बुद्धपूर्व कालखंडात समाजात दोन प्रकारच्या मान्यता होत्या - एक म्हणजे यज्ञाला इष्ट म्हणून वैदिक धर्मपालन करणारे लोक. हे लोक देवदेवतार्चन करून पुरोहिताला दक्षिणा देऊन आपला गृहस्थाश्रम चालवीत होते. परंतु जे लोक यावरच संतुष्ट नव्हते, त्यांनी विविध प्रकारे धर्म शोधण्याचा प्रयत्न केला. दिघनिकायाच्या साम्फल सुत्तात याचे वर्णन मिळते. हे प्रकार पुढीलप्रमाणे होते -
अक्रियावाद - पुरण कश्यप याचा हा मार्ग. पापपुण्य काही नसते, असे त्याचे प्रतिपादन होते.
दैववाद - मक्खलीघोषाल याचा मार्ग. पुरुषार्थ वगैरे गोष्टींना नियतीपुढे काही महत्त्व नाही, जग बलहीन आहे, स्वभावाने सर्व चालते, असे त्याचे प्रतिपादन होते.

उच्छेदवाद - अजित केशकम्बली याचा हा मार्ग. मनुष्य तेज वगळून इतर चार महाभूतांनी तयार झालेला आहे. मरणानंतर तत्त्वे पुन्हा स्वस्थानी जातात. पंडित आणि मूर्ख यांची गती शेवटी एकच असते. या मताला जडवाद असेही म्हणतात.

अकृतांतवाद - पकुध कात्यायन याचा हा मार्ग. मनुष्य स्वत: काही करत नसतो. समजा, कोणी धारदार शस्त्राने कोणास मारले तरी हत्या होत नाही, कारण तो फक्त शस्त्राने घेतलेला अवकाशाचा वेध ठरतो, असे त्याचे मत होते.

अनिश्चिततावाद - संजय बेलठ्ठीपुत्त याचा हा मार्ग. यात कोणत्याही गोष्टीचे प्रतिपादन ठाम नाही. कर्मफळ असेलदेखील, नसेलदेखील. परलोक असेल किंवा नसेल; मनुष्य मेल्याशिवाय तो जाणू शकत नाही किंवा मेल्यावर परत काही सांगू शकत नाही असे विक्षिप्त प्रतिपादन हा पंथ करीत असे.
निगंठनागपूत्त याचा सर्वमतप्रमाण मार्ग - हा जैन आचार्य वरील सर्वांना समर्थन देत असे. याचा स्वतंत्र संघ होता.

एकीकडे औपनिषदिक ज्ञानमार्ग शोधणारे विरक्त साधक, दुसरीकडे जैनांचा त्यांच्यापुरता श्रमण मार्ग, तर तिसरीकडे यज्ञीय हिंसा आणि पुरोहितवादाचे प्राबल्य असा कोलाहल होता. तो कमी की काय, म्हणून असे लहान-मोठे संप्रदाय उदयाला येत होते. सामान्य माणसाला शांती, सुखसमाधान देणारा धर्म मात्र मिळत नव्हता. अशा परिस्थितीत बौद्ध धर्माची स्थापना झाली.

भारतात आणखी एक वेगळा आत्मसाधक वर्ग होता, ज्याला समन किंवा श्रमण म्हटले जात असे. हा वर्ग सरस्वती नदीप्रमाणे अखंड वाहत होता. हे समन विरागी होते, परंतु वैदिक परंपरेतील नव्हते. जगाचा त्याग करून आत्मशांती मिळवू पाहणार्‍यांचा हा स्वतंत्र वर्ग होता. भ. गौतम बुद्ध या परंपरेचे पाईक होते.

माणसाचे दैनंदिन जीवन शांत व समाधानी व्हावे, म्हणून बुद्धाने धम्म दिला. या धम्मक्रांतीच्या माध्यमातून, जगातील एक तृतीयांश भागाला भारतमातेच्या सुपुत्राने धर्म दिला. केवळ करुणेच्या माध्यमातून हा धर्म प्रसार पावला. ना सेवेचा देखावा, ना पैसा, ना तलवार! या अद्वितीय क्रांतीमुळे भारतभूमी आजूबाजूला असलेल्या राष्ट्रांची धम्मभूमी झाली! आम्हा सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

मानवाला दु:ख भोगावे लागते, तो असमाधानी असतो व यातून तो मुक्ती इच्छितो हे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी जाणले! या समस्येवर सर्वांसाठी उपयुक्त असे उपाय त्यांनी शोधले. त्यांनी वर्षानुवर्षे उग्र तप केले, विविध प्रयोग केले.. शेवटी त्यांनी अंतर्विश्वात प्रवेश केला. समस्येचे स्वच्छ स्वरूपात दर्शन घेतले आणि ती समूळ नष्ट करण्याचे उपाय शोधले.

प्रथम स्वत: बुद्धदेव दु:खमुक्त झाले. नंतर त्यांनी उर्वरित आयुष्य मनुष्याला स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग दाखवण्यात घालवले. त्यांनी स्वत:ला कधीच प्रेषित अगर देवदूत म्हणवून घेतले नाही. त्यांच्यात असणारे गुण कोणासही प्रयत्नांती मिळू शकतात, हे ते सांगत असत. ते स्वत:स पूर्ण विकसित मनुष्य, शास्ता, तथागत म्हणू देत असत. मात्र देव किंवा प्रेषित होणे त्यांनी नाकारले.

 
संयुक्तनिकायात त्यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. मी पंथ, तत्त्वज्ञान, विशिष्ट श्रद्धा यांची शिकवण देत नाही असे त्यांनी त्यात सांगितले आहे. आपल्या शिक्षणास ते धम्म म्हणतात. धम्म म्हणजे नियम होत. दु:ख म्हणजे काय आणि त्याचे निराकरण कसे करायचे, याचा मी शोध लावला आहे असेच ते म्हणतात. आपणास मिळालेले ज्ञान, सत्य कोणाच्याही कृपाप्रसादाने मिळालेले नाही. ते स्वप्रयत्नाने मिळाले आहे असे भ. बुद्ध स्पष्ट करतात.

अंगुत्तरनिकायात कालामांना केलेला उपदेश हा मानवाची परंपरेतून, पोथीनिष्ठेतून व त्यामुळे त्याच्या मानेवर असलेल्या अदृश्य जोखडातून केलेली सुटका आहे.

ते म्हणतात, माझ्याप्रमाणे अगर थोड्या वेगळ्या मार्गाने, पूर्वीही अनेकांना सत्य मिळाले होते. अंतिम सत्यावर कोणाचीही मक्तेदारी नाही.

कोणत्याही गोष्टीच्या दिखाऊपणावर जाऊ नका. केवळ धर्मग्रंथात सांगितले म्हणून त्याविषयी मान्यता ठेवू नका. मान्यवर व्यक्तीने सांगितल्या म्हणून गोष्टींचा स्वीकार करू नका. प्रत्यक्ष अनुभवाने जी तत्त्वे अंगीकारल्यामुळे दु:ख होते हे जाणाल, त्यांचा त्याग करा. जी तत्त्वे अंगीकारल्यामुळे आपले मंगल व कल्याण होते आणि इतरांचे अहित होत नाही, त्यांचा स्वीकार करा. कोणतीही शिकवण फक्त स्वानुभवाच्या कसोटीवरच तपासून घ्या.

धम्मपदातील यमक वग्गात तथागत म्हणतात, ‘ग्रंथांची नुसती घोकंपट्टी केली आणि त्या बाबी व्यवहारात आणता येत नसतील, तर आपण दुसर्‍याच्या मालकीच्या गायी मोजत बसणार्‍या गुराख्याप्रमाणे ठरणार!’

सत्याच्या स्पष्ट अनुभूतीचा मार्ग म्हणजे स्वत:च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. आपण आयुष्यभर मनाला बहिर्मुख होण्याची सवय लावली आहे. बाहेर घडणार्‍या घडामोडींचाच आपण मागोवा घेत आलो आहोत. दुसरे लोक काय करतात याबद्दलच आपण जागरूक आहोत. फार कमी वेळा आपण अंतरंगात डोकावतो. त्यामुळे आपणच आपल्याला अपरिचित, अनोळखी राहिलो आहोत. त्यामुळेच आपण अंत:प्रेरणेचे गुलाम होत जातो!

तथागत गौतम बुद्ध हे आनंदी जीवन जगण्यासाठी मानसिक प्रशिक्षण देणारे आचार्य आहेत. आपण स्वत:ला जाणू शकतो, आपल्या आंतरिक स्वभावाची ओळख करून घेऊ शकतो, विधायक, उपयोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो हे त्यांनी प्रयोग करून मांडले. त्यासाठी प्रशिक्षणाचे नियमबद्ध मार्ग तयार केले.

आत्मा, ईश्वर, मोक्ष, परलोक, गुरू, वर्ण या अध्यात्मामध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या बाबींना बुद्धाने मौनाने थोपवले. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक मार्ग सोपा सुटसुटीत असा झाला. त्या मार्गातील महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे परियत्ती, पटीपत्ती, पटीवेध या होत. त्यासाठी प्रत्यक्ष साधना म्हणजे समथ, विपस्सना आणि सत्तीपठ्ठान होय!

आधुनिक शिक्षणातील learning the doctrineआणिpractising the doctrine म्हणजे बौद्धिक समज व प्रत्यक्ष कृती याप्रमाणेच बौद्ध धम्म साधना पद्धती आहे.
(क्रमश:)