कोरोनानंतरच्या काळातील आरोग्यरक्षण आणि पंचकर्म उपचार

विवेक मराठी    30-Aug-2021
Total Views |
@वैद्य प्रवीण जोशी 9422289609
 
 
रुग्णालयातील कोविड रुग्णांच्या अनुभवानुसार कोरोनाच्या प्रत्यक्ष संसर्गानंतरच्या काळातही रुग्णांमध्ये विविध शारीरिक व मानसिक तक्रारी आढळून येतात. अशा रुग्णांना आयुर्वेद व पंचकर्म उपचार कशा प्रकारे मदत करू शकतील, याचा विचार करून धुळे शहरातील रा.स्व. संघ स्वयंसेवक आणि आयुर्वेद व्यासपीठाचा वैद्य समूह यांच्या सक्रिय सहभागाने पोस्ट कोविड रुग्णांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

Ayurveda_1  H x

  
कोरोना अर्थात कोविड-19.. मागील दीड वर्षाहून अधिक काळ या आजाराने संपूर्ण जगामधील आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. लॉकडाउन, सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध याबरोबरच घरोघरी आढळणारे कोरोना रुग्ण, बेडची उपलब्धता, तसेच योग्य उपचारांसाठी होणारी धावपळ अशी काहीशी स्थिती कमी-अधिक फरकाने संपूर्ण जगाने अनुभवली आहे. 
 
 
प्रचलित आरोग्यव्यवस्थेसमोरील अशा विविध आव्हानांच्या परिस्थितीमध्ये भारतात आणि विशेषत: आपल्या महाराष्ट्रात गावोगावी नागरिकांनी अ‍ॅलोपॅथी उपचारांच्या बरोबरीनेच आयुर्वेदीय उपचारांचा यशस्वी लाभ घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि एकूणच समाजाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यामध्ये आयुर्वेदीय उपचार मोलाचे योगदान देत आहेत.


आमच्या रुग्णालयातील कोविड रुग्णांच्या अनुभवानुसार कोरोनाच्या प्रत्यक्ष संसर्गानंतरच्या काळातही रुग्णांमध्ये विविध शारीरिक व मानसिक तक्रारी आढळून येतात. अशा रुग्णांना आयुर्वेद व पंचकर्म उपचार कशा प्रकारे मदत करू शकतील, याचा विचार करून धुळे शहरातील रा.स्व. संघ स्वयंसेवक आणि आयुर्वेद व्यासपीठाचा वैद्य समूह यांच्या सक्रिय सहभागाने पोस्ट कोविड रुग्णांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये येणार्‍या रुग्णांना आम्ही त्यांची दिनचर्या, दिवसभरातील खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांची प्रकृती या सर्व गोष्टींचा विचार करून आहार, औषध आणि पंचकर्म याविषयी मार्गदर्शन करतो. याबरोबरच पंचकर्मातील काही आवश्यक क्रियांच्या शास्त्रशुद्ध प्रक्रियांचे व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये त्याचादेखील प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही राबवत आहोत.

आयुर्वेदामधील या सर्व तत्त्वांचा रुग्णांना अतिशय उत्तम लाभ होताना पाहायला मिळत आहे. कोविडपश्चात काळामध्ये आपल्या भुकेचा, पचनशक्तीचा विचार करून आहार घेणे आरोग्यरक्षणासाठी अतिशय आवश्यक आहे, याचा विचार करून आम्ही रुग्णांसाठी वर दिलेला माहिती तक्ता तयार केला आहे


Ayurveda_3  H x
 
आहारविषयक या नियमांबरोबरच पाणी पिण्याविषयीसुद्धा काही नियम आयुर्वेदाने सांगितले आहेत.

भूक न लागणे/भूक कमी होणे/खाल्लेले न पचणे या प्रकारची लक्षणे असल्यास धने, जिरे, सुंठ, नागरमोथा या औषधांनी सिद्ध केलेले पाणी पिणे फायदेशीर ठरते. पाणी पिताना नेहमीच बसून, हळूहळू, घोट घोट प्यावे.

रुग्णांमध्ये योग्य आहाराला आवश्यक अशा आयुर्वेद व पंचकर्म उपचारांची जोड मिळाली की कोरोनानंतरच्या काळामध्ये आरोग्य सुधारण्यास अतिशय उत्तम लाभ होताना पाहायला मिळतो.

आयुर्वेदानुसार पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आपण पुढील पंचकर्म उपक्रम करू शकतो.

1. नस्य - प्रत्येकाने करायचे 2 वेळा 2-2 थेंब गाईचे तूप/ खोबरेल तेल/औषधी तेल नाकात टाकणे.

दिवसातून 4 वेळा आणि विशेषत: घरातून कामानिमित्त बाहेर पडताना नाकाला आतून तूप/तेल लावणे.


2. धुमपान - यामध्ये ओव्याच्या पुरचुंडीने नाकाने धुनी घेत तोंडाने सोडावी. यामध्ये घेण्याची खबरदारी म्हणजे नाकाने वाफ घेत तोंडाने सोडावी. सदर उपचार करत असताना आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी/नाक चोंदणे/नाक बंद होणे/घशात चिकटा असणे/खोकला इ. तक्रारींमध्ये याचा फायदा होतो.


Ayurveda_2  H x

3. गंडुष - कोमट पाण्यामध्ये काही औषधी चूर्णे घालून अथवा काढा तयार करून त्याद्वारे गुळण्या करणे. सर्दी/खोकला/घशात खवखवणे या लक्षणांमध्ये पाणी + ज्येष्ठमध चूर्ण यांनी उकळवलेल्या पाण्याच्या गुळण्या करणे. आवश्यकतेनुसार आपण दिवसातून 2 ते 3 वेळा या गुळण्या करू शकतो. घशाचे आजार, तसेच नाकातील व घशामधील सूज, बुरशीजन्य आजार यामध्ये त्रिफळा काढ्याने गुळण्या करणे आणि रात्री त्रिफळा + मध + हळद यांचे चाटण घेणे.


4. स्थानिक स्नेहन-स्वेदन - सकाळी अंघोळीच्या वेळी छातीला, बरगड्यांना, पाठीच्या मागच्या भागाला तिळाचे अथवा खोबरेल तेल + सैंधव + मीठ अथवा वैद्यांच्या सल्ल्यानुसार औषधी तेल लावून शेकावे. छाती कफाने भरल्याप्रमाणे वाटणे/ श्वास घ्यायला त्रास/दम लागणे/खूप खोकले असता अल्प कफ पडणे/कोरडा खोकला या कोरोनापश्चात उद्भवणार्‍या सर्व तक्रारींमध्ये अतिशय लाभदायक.


5. लेप - कोरोनानंतरच्या काळात अनेक रुग्णांमध्ये डोकेदुखी ही तक्रार आढळते. अशा वेळी वेखंड + जायफळ उगाळून + मुलतानी माती टाकून शिजवणे आणि तो लेप पातळ, सहन होईल एवढा गरम असताना कपाळाला लावणे. वाळल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या कापडाने पुसून घेणे. दिवसातून 1 ते 2 वेळा असा लेप घालू शकतो.
अशाच प्रकारे कोरोना रुग्णांमध्ये फुप्फुसात दीर्घकाळ इन्फेक्शन राहिलेले असल्यास आवश्यकतेनुसार वैद्यांच्या सल्ल्याने छातीच्या अथवा बरगड्यांच्या भागातसुद्धा आपण कोरोना काळात विविध लेप घालू शकतो.


6. षष्टिकशाली पिंडस्वेद - यामध्ये रुग्णांना विविध औषधी काढ्यांमध्ये शिजवलेल्या भाताची पुरचुंडी करून दुधामध्ये केलेल्या काढ्याच्या मदतीने शेक दिला जातो.


फुप्फुसांचे आणि श्वसनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी कोरोनापश्चात याचा उत्तम लाभ होतो. आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार आपण सदर उपचार करू शकतो.


7. शिरोधारा - या उपचारामध्ये कपाळावर विविध औषधी तेलांची धार सोडण्यात येते. अशाच प्रकारे अन्य उपचारांमध्ये शिरोभ्यंग - अर्थात डोक्याला हलक्या हाताने मालिश करून तेल जिरवणे अथवा शिरोपिचू - कापसाच्या बोळा तेलामध्ये भिजवून डोक्यावर (टाळू भरतात त्या भागामध्ये) ठेवणे यांचा समावेश होतो. अत्यधिक चिंता, ताणतणाव अशा मानसिक तक्रारींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सदर उपचारांचा उत्तम लाभ होतो


सदर पंचकर्म उपचारांबरोबरच श्वसनसंस्थेचे आरोग्य आणि मन:शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम आणि ॐकाराचा अभ्यास अवश्य करावा. मानसिक स्वास्थ्यप्राप्तीसाठी देवपूजा, मंत्रोच्चारण, ध्यान, धारणा यांचादेखील अतिशय उत्तम लाभ होताना दिसतो.


याबरोबरच सकाळ-संध्याकाळ घरामध्ये धूप करण्यानेसुद्धा वातावरण शुद्धी आणि श्वसनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. निंबपत्र + वचा + अगरू + गुग्गुळ + श्वेत राळ + गाईचे तूप व गोवरी जाळून घरात व बाहेर त्याचे धूपन करता येईल.
अशा प्रकारे आयुर्वेदानुसार योग्य प्रकारचा आहार, दिनचर्येचे पालन, आवश्यक ते औषधोपचार आणि याला पंचकर्म उपचारांची जोड दिल्यास कोरोनानंतरच्या विविध शारीरिक आणि मानसिक तक्रारींवर मात करण्यास निश्चितच मदत होताना अनुभवायास मिळत आहे.