संघसमर्पित श्रीकृष्ण बळवंत उर्फ नाना नेऊरगावकर

विवेक मराठी    04-Aug-2021
Total Views |
@शरद जाधव  9422761699

 
पेठे विद्यालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल श्रीकृष्ण बळवंत उर्फ नाना नेऊरगावकर यांनी 3 ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी सव्वादहा वाजता शेवटचा श्वास घेतला. 28 ऑगस्ट रोजी त्यांनी 91व्या वर्षात पदार्पण केले असते. 90व्या वर्षातही तरुणांना लाजवतील इतके सामाजिक कामात ते अग्रणी होते. नेऊरगावकर सर सर्वांमध्ये ‘नाना’ म्हणून सुपरिचित होते.

नानांचे जीवनमान अत्यंत आदर्श असून सर्वांना प्रेरणादायक असे होते. लहानपणापासून संघाशी असलेला त्यांचा संबंध अंतिम श्वासापर्यंत अबाधित होता.

RSS_2  H x W: 0

ग्रंथपाल? नव्हे.. विद्यार्थी वाचक चळवळ प्रवर्तक
 
पेठे विद्यालयात ग्रंथपाल म्हणून त्यांनी सुमारे पस्तीस वर्षे सेवा केली. सेवेत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिकतेने पुस्तक वाटप कधीच केले नाही. प्रत्येकाची आस्थेने चौकशी करणार, घरची माहिती घेणार, पुस्तक वाचले का विचारणार, हो म्हटले की त्यात काय वाचले, हेही विचारणार. कोणाला थाप मारायची सोय त्यांच्याजवळ होत नसे. पुस्तक वाचले नसेल, तर का वाचले पाहिजे हे सांगताना परत पुस्तक वाचायला सांगणार. हे इतक्या प्रेमाने सांगणार की सर्व वाचनाचे प्रेमात पडणारच. इ. आठवीत गेल्यावर मराठी पुस्तकाबरोबर इंग्लिश पुस्तकेही वाचावयास देणार. त्यांच्यापुढे नाही म्हणण्याची सोय नाही. त्यांनी मुलांमध्ये मराठी व इंग्लिश वाचन चळवळ रुजवली वाढवली व जोपासलीही. असे प्रश्न फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, शिक्षकांनाही विचारणार. नवीन शिक्षकांना संदर्भ ग्रंथ वाचनास भाग पाडणार. नानांवरील प्रेमापोटी सर्व जण नानांचा आग्रह मोडत नसत. विद्यार्थी व शिक्षक या दोघांनाही शाखेत येण्याकरिता ते प्रयत्नशील असत.
शुभ्र पांढरा पायजमा आणि बंद गळ्याचा सदरा ही नानांची वेशभूषा. दिवसाची सुरुवात संघशाखेने होणार. शाखा झाली की शाखा वेशातच नाना फूलबाजारात फुले घेण्यास जाणार. नंतर शाळा. शाळा सुटली की परत सायम् शाखा, नंतर गणपती दर्शन, नंतर घरी. अत्यंत आखीवरेखीव दिनचर्या, त्यात चुकूनही बदल नाही.

संघ हाच श्वास

स्व. बाबा भिडे सांगत, “संघशाखा एक तासाची, मात्र संघस्वयंसेवक चोवीस तास!” नानांचे जीवन त्याप्रमाणे होते. संघ हा त्यांचा श्वास होता. जीवनभर संघाशिवाय दुसरा प्राधान्यक्रम नव्हता. रोजची शाखा व प्रार्थना याला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. शाखा व प्रार्थना कधीच चुकली नाही.
नाशिक शहराचे घोषप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी पार पाडली होती. उत्कृष्ट घोषवादक व घोषप्रमुख म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी अनेक घोषवादक घडवले होते. घोषाची कडवी शिस्त त्यांनी अंगीकारली होती. नाशिक शहराचा घोष व नाना हे एक समीकरण झाले होते. संपूर्ण नाशिक शहरात संघशाखेकरिता ते पायपीट करीत असत. पंचवटी भागात संघकाम करताना नाशिकचे लोकप्रिय खासदार स्व.डॉ. वसंतराव पवार यांनाही त्यांनी संघशाखेत आणले होते.

सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ कार्यकर्ता

‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ म्हणजे नाना नेऊरगावकर. संघाचा प्रचारक जाण्याची नानांची इच्छा होती. घरगुती परिस्थितीमुळे ते त्यांना शक्य झाले नाही. सेवानिवृत्तीनंतर संघाचा प्रचारक जाण्याचे त्यांनी निश्चित केले आणि अमलातही आणले. सेवानिवृत्तीनंतर लगेच डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात नाना वर्षभराकरिता प्रचारक म्हणून गेले. महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. प्रल्हादजी अभ्यंकर यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम केले. वर्षानंतर नाना प्रचारक म्हणून थांबले नाहीत, तर त्यांनी मोतीबाग कार्यालय, पुणे, विश्व हिंदू परिषद, पुणे व कौशिक आश्रम, पुणे येथील ग्रंथालय अद्ययावत केले. नंतर कौशिक आश्रमात माजी सरसंघचालक मा. रज्जूभैया यांच्या सेवेत राहिले. रज्जूभैयांना वाचून दाखवणे असे काम त्यांच्याकडे होते. रज्जूभैयांना संपूर्ण ज्ञानेश्वरी, दासबोध वाचून दाखवले. याच काळात नानांनी स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी व दासबोध लिहिले. नंतर नाना नाशिकला आले, मात्र घरी न राहता संघकार्यालयात राहून कार्यालयाची जबाबदारी पार पाडीत. या काळात संपूर्ण भागवताचे स्व-हस्ताक्षरात लिखाण केले, ज्याचे प्रकाशन माजी सरसंघचालक मा. सुदर्शनजी यांच्या हस्ते झाले होते.
 
नाशिक संघ कार्यालय - व्यवस्था

आयुष्यातील शेवटची सुमारे पंधरा वर्षे नेहरू चौकातील सोमेश्वर मंदिर संघ कार्यालयात त्यांचा मुक्काम होता. कार्यालयात असलेल्या शंकराचे मंदिरात त्यांची अखंड सेवा चालू होती. मंदिरातील महादेवाची पिंड झिजू नये, म्हणून त्याला तांब्याचे कवच करण्याचा त्यांचा मानस होता. त्याकरिता त्यांनी अथक परिश्रम घेतले. समाजातील सर्वांना त्यांनी या उपक्रमात सहभागी करून घेतले होते. घरोघरी फिरून त्यांनी तांबे गोळा केले होते. आपल्या हयातीत हे काम पूर्णत्वास जाते की नाही अशी शंका ते व्यक्त करत असत. मात्र त्यांची इच्छाशक्ती प्रचंड दांडगी होती. गेल्याच महिन्यात 118 किलो वजनाचे ताम्रकवच बसवण्यात आले.
त्याचा मोठा धार्मिक कार्यक्रम केला होता. नानांच्या इच्छेनुसार व आग्रहाखातर सदर कार्यक्रमास माजी अ.भा. सरकार्यवाह मा. भैय्याजी जोशी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यावर नानांना एक वेगळेच समाधान मिळाले होते. त्या समाधानात ते व्यतीत होते.
गोदाकाठावरील (गंगेवरील) खंडोबा मंदिरही अद्ययावत करण्याकरिता ते प्रयत्नशील होते. त्याकरिता अनेकांना ते भेटले होते. मात्र ते काम ते करण्यापूर्वी त्यांना थांबवावे लागले.

नाना अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज व गोंदवलेकर महाराज यांचे ते निस्सीम भक्त होते. गोंदवलेकर महाराजांचे विचार दर्शन हे पुस्तक अंतिम टप्प्यात असून लवकरच ते वाचकांच्या हाती येणार होते. ते काम मात्र अपुरेच राहिले आहे.RSS_1  H x W: 0

संघावरील तिन्ही बंदी त्यांनी अनुभवल्या होत्या. त्याचे अनुभव ते अनेक वेळा सांगत. तिसर्‍या बंदीच्या वेळेस बंदी उठल्यास अकरा गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प केला होता. बंदी उठल्यानंतर सलग अकरा गुरुचरित्र पारायण करून त्यांनी तो संकल्प पुरा केला होता. स्वत:साठी नव्हे, तर समाजाकरिता त्यांचे समर्पित असे जीवन होते.

संघ हीच जीवनगाथा असे त्यांचे सर्वांना प्रेरणादायक व आदर्श जीवन होते. वैयक्तिक जीवनात त्यांनी अनेक संकटाचा सामना केला होता. मात्र कधीच ते डगमगले नाहीत. दोघे भाऊ, बहिणी यांनी यापूर्वीच जगाचा निरोप घेतला होता. मात्र या सर्व संकटांस त्यांनी धीराने हाताळले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची पुतणी वर्षा व जावई श्रीकांत कानडे यांचे कोरोनाच्या आजाराने निधन झाले होते. पुतणीच्या वियोगाने ते कमालीचे खचले होते. तो धक्का ते सहन करू शकले नाहीत. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली होती. मृत्यूपूर्वी पाच दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. कधीही हार न स्वीकारणार्‍या नानांनी आज सकाळी हार स्वीकारली व ते परलोक प्रवासाला निघून गेले. त्यांचे आदर्श जीवन पुढील अनेकांना प्रेरणादायक व दिशादर्शक ठरेल. त्यांनी अंगीकारलेली जीवनपद्धती स्वीकारीत संघकामात सदैव राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

नानांच्या आत्म्याला सद्गती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. नानांच्या चरणी विनम्र अभिवादन.

नाना, अलविदा ......!