तत्त्वनिष्ठ नेता

विवेक मराठी    07-Aug-2021
Total Views |
@अरविंद जोशी 9370408926
 
गणपतराव देशमुख यांचे शुक्रवार, दि. 30 जुलै 2021 रोजी निधन झाले. तत्त्वनिष्ठा जपून विधायक राजकारण करण्याचा विक्रम करणारे फार कमी नेते महाराष्ट्रात आहेत. त्यांत गणपतराव देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. राजकारणात जी काही तत्त्वनिष्ठा टिकून राहिली आहे, तिच्यामागे गणपतराव देशमुख या नावाची प्रेरणा राहील, हे नक्की.

ganpatrao_1  H

राजकारण आणि तत्त्वनिष्ठा यांची फारकत होण्याचा हा काळ आहे. राजकारणातून तत्त्व आणि निष्ठा या दोन्ही गोष्टी परागंदा झाल्या आहेत. या काळात तत्त्वनिष्ठा जपून विधायक राजकारण करण्याचा विक्रम करणारे फार कमी नेते महाराष्ट्रात आहेत. त्यांत गणपतराव देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. तत्त्वनिष्ठा कसोशीने जपणारे नेते आता अपवादात्मकच आहेत, कारण आजकाल जवळपास सगळेच नेते राजकारणात यशस्वी होण्याचा मंत्र किंवा रहस्य सांगत असतात की, राजकारणात टिकायचे असेल तर तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतात, त्याशिवाय कोणताही नेता राजकारणात यशस्वी होत नाही. तत्त्वनिष्ठा गोंजारत बसणारे नेते निवडूनही येत नाहीत, अशी अफवा तत्त्वहीन राजकारण्यांनी सध्या पसरवली आहे. पण गणपतराव देशमुख यांनी ही अफवाच असल्याचे दाखवून दिले होते. तत्त्वांशी तडजोड न करताही एक-दोन वेळा नाही, तर 11 वेळा निवडून येता येते, हे त्यांनी या लोफर राजकारण्यांना दाखवून दिले होते. एवढेच नाही, तर तत्त्वे न सोडता चक्क निवडून येण्याचा जागतिक विक्रम करता येतो, हेही त्यांनी दाखवून दिले होते.

शेवटी त्यांनी नेमकी कोणती तत्त्वे जपली होती, हे त्यांना श्रद्धांजली वाहताना पडताळून पाहिले पाहिजे, तर आजच्या राजकारणात नेमक्या काय त्रुटी आहेत हे जनतेलाही कळेल आणि नेत्यांनाही उमगेल. गणपतराव यांनी निवडून येण्याचा केवळ विक्रमच केला होता असे नाही, तर एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षातून निवडून येण्याचा विक्रम केला होता. राजकारणात अनेक लाटा आल्या आणि गेल्या, पण त्यांना कधीही एखाद्या लाटेचा फटकाही बसला नाही आणि त्या लाटेचा फायदा घेऊन मोठे पद मिळवावे असा मोहही झाला नाही. त्यांनी पहिली निवडणूक शेका पक्षाचा उमेदवार म्हणून लढवली आणि शेवटची तेरावी निवडणूकही याच पक्षाचा उमेदवार म्हणून लढवली. दरम्यानच्या काळात त्यांच्या पक्षाला वाईट दिवस आले, पण म्हणून आपण हा पक्ष आता सोडावा आणि कोटकल्याण करून घ्यावे, असा विचार त्यांनी कधी केला नाही.
तरुण वयात ते शेका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करायला लागले. तसे सांगोला हे त्यांचे गाव नाही. पण त्यांनी वकिलीची सनद मिळवली, तेव्हा सांगोला तालुक्यातल्या काही प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मोबदल्याचे प्रकरण गाजत होते. गणपतराव देशमुख यांनी त्यांच्यासाठी वकिलीचा कोट अंगावर चढवला आणि शेतकर्‍यांना चांगला मोबदला मिळवून दिला. त्यामुळे ते सांगोल्यात लोकप्रिय झाले. या काळात ते शेका पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे सर्वांनी त्यांना विधानसभा निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह केला आणि त्यांना वयाच्या 34व्या वर्षी आमदार केले.

त्यानंतरच्या विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी तडाखेबंद भाषण केले. काँग्रेस पक्षाने त्या निवडणुकीत विजय मिळवला होता आणि पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडला होता. गणपतराव देशमुख यांनी या ठरावाला विरोध करताना, काँग्रेस पक्षाने ही निवडणूक कशी गुंडगिरी करून जिंकली आहे हे पुराव्यानिशी दाखवून दिलेे. त्या पहिल्याच भाषणाने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या यशवंतराव चव्हाण यांनी शेका पक्षातल्या गुणी नेत्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे सत्र सुरू केले. यशवंतराव चव्हाण यांचा तो सुप्रसिद्ध मैत्रीचा हात गणपतरावांच्याही खांद्यावर पडला होता. गणपतराव काँग्रेसमध्ये आले तर मागेपुढे मुख्यमंत्रीही होतील, असे आमिष त्यांनी गणपतरावांना दाखवले होते, पण गणपतरावांनी पक्षत्याग करण्यास नकार दिला. आपण ज्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहोत आणि ज्यांचे बोट धरून कार्यरत झालो आहोत त्यांना आपण धोका देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्या काळात महाराष्ट्राच्या सत्ताकारणात काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व होते, पण त्यांच्या तत्त्वनिष्ठेवर त्याचा कसलाही दबाव आला नाही.
 
एकदा या मतदारसंघाने आपल्याला आमदार केले आहे, तर या मतदारसंघाच्या समस्यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे, हे त्यांनी ओळखले आणि मग केवळ सांगोलाच नाही, तर महाराष्ट्राचा दुष्काळप्रवण भाग हा त्यांचा चिंतनाचा विषय झाला. स्थितीचा अभ्यास आणि विधिमंडळ कामाचे कौशल्य याच्या जोरावर ते विधिमंडळात जवळपास 52 वर्षे कार्यरत राहिले. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर ते शेका पक्षाच्या आमदारांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले. असे प्रशिक्षण आता तर बादच झाले आहे. पण या प्रशिक्षणातून त्यांना कामाची दिशा सापडली आणि त्यातून त्यांचा असा आदरयुक्त दरारा निर्माण झाला की, विधानसभेत गदारोळ सुरू असला, तरी गणपतराव बोलायला उभे राहिले तर सदनात शांतता पसरायला लागली.

विरोधी पक्षाचे सदस्य सदनात संख्येने कमी असले, तरी ते राज्यकारभारावर आपला प्रभाव टाकू शकतात, पण त्यासाठी लढाऊ बाण्याने सदनात काम करावे लागते, हा धडा त्यांना स्वत: बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाला होता. राजकारणात जे काही करायचे ते जनतेसाठी, हा त्यांचा बाणा होता. 1978 साली ते पुलोद सरकारात कृषी राज्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी एकाधिकार कापूस खरेदीतले शेतकर्‍यांचे पैसे कापसाचे माप झाल्यानंतर 24 तासांच्या आत दिले पाहिजेत, असा नियम केला होता. ते 54 वर्षांच्या आमदारकीच्या काळात सात वर्षे मंत्री होते, पण शेवटी त्यांचे घर साधे व तीन खोल्यांचेच होते. कारण जनतेची सेवा हाच त्यांच्या राजकारणाचा हेतू होता. त्यांनी सांगोल्यात दोन सहकारी सूत गिरण्या काढल्या आणि त्या अशा चालवून दाखवल्या की, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यवस्थापनाची अनेक बक्षिसे मिळाली. त्यातली एक सूत गिरणी ही केवळ महिलांनी चालवलेली आहे.
 
त्यांचा सांगोला तालुका ठार दुष्काळी आहे. पण या दुष्काळात डाळिंबाच्या बागा वरदान ठरतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपला तालुका डाळिंब बागांनी संपन्न केला. तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकासातून पाण्याचे दुर्भिक्ष निवारण्यासाठी धडपड केली. शिरपूर बंधार्‍यांनी पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, हे दिसून आल्यावर त्यांनी मोटारसायकलवर बसून तालुक्यातल्या मोठ्या ओढ्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय 88 वर्षे होते. ते मंत्री झाले तेव्हा लाल दिव्याच्या गाडीतून फिरले असतील; पण ज्या क्षणी त्यांचे सरकार कोसळले, त्या क्षणाला ती गाडी सोडून दिली आणि तिथेच खाजगी वाहनाने प्रवास सुरू केला. ते आमदार असताना अधिवेशनासाठी मुंबईला जात, पण ते एस.टी.ने बस आणि रेल्वेने प्रवास करत असत.
 
 
ते मंत्री असताना त्यांना मुंबईत राहावे लागले. खाण्यापिण्याची आबाळ व्हायला लागली. तेव्हा त्यांच्या काही मित्रांनी पत्नीला मुंबईत आणून मुंबईतच घर करण्याचा सल्ला दिला. पण गणपतरावांनी त्याला नकार दिला. बायकोला मुंबईत आणले तर तिला मुंबईच्या राहणीमानाची चटक लागेल, असे ते म्हणाले. आपण बायकोला दरमहा 500 रुपये घरखर्चासाठी पाठवत असतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
त्यांच्या जाण्याने राजकारणातली तत्त्वनिष्ठा संपून जाईल एवढा नकारात्मक विचार आपण करणार नाही. पण राजकारणात जी काही तत्त्वनिष्ठा टिकून राहील, तिच्यामागे गणपतराव देशमुख या नावाची प्रेरणा राहील, हे नक्की.