स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षपूर्ती विज्ञान भारतीचा दृष्टीकोन

विवेक मराठी    07-Aug-2021
Total Views |
@जयंत सहस्रबुद्धे
भारताच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी सुरू होत आहे. आधुनिक कालखंडात विकासाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला पाश्चात्त्यांकडून मिळाला असे सांगितले जाते. परंतु आपला भारत देश हा स्वतः अत्यंत समृद्ध देश आहे. जगाला (मानवजातीला) गौरवांकित ठरतील अशा अनेक विषयांचे संशोधन आपल्या पूर्वसुरींनी केले आहे. विज्ञान भारती आणि सा. विवेकच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार्‍या पाक्षिकांतून अशा महान संशोधकांचा परिचय करून देणार आहोत.

science_1  H x
 
अनेक शतकांच्या दास्याची प्रदीर्घ उदासवाणी काळरात्र संपली. 15 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी उगवत्या सूर्यनारायणाच्या आगमनाने स्वातंत्र्याचे कमलपुष्प उमलले. भारतमाता परकीयांच्या जोखडातून मुक्त झाली. त्याला आता 75 वर्षे झाली. दिवसामागून दिवस लोटले, वर्षामागून वर्षे! आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत. हा अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा शुभ क्षण आहे. जुलमी सत्तेच्या विरोधात केलेल्या तीव्र स्वरूपाच्या जोशपूर्ण आंदोलनाचे आदरपूर्वक स्मरण करण्याचा हा क्षण आहे. असंख्य संकटांना यशस्वीपणे सामोरे जात ही चळवळ कशी पार पाडली, ही चळवळ साकारताना असंख्य स्वातंंत्र्ययोद्ध्यांनी आपले जीवनसर्वस्व कसे समर्पित केले, स्वतंंत्र भारताचे त्यांचे स्वप्न कशा स्वरूपाचे होते, त्यांनी ही बहुआयामी चळवळ कशी साकारली, याचे स्मरण करणे आणि चिंतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भावी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून मौलिक मार्गदर्शन मिळेल.
 
 
आपल्या देशाला अनेक परकीय आक्रमणांना अनेक शतके वारंवार सामोरे जावे लागले. आक्रमकांच्या निर्दयी आणि राक्षसी जुलमांना सतत तोंड द्यावे लागले. आक्रमकांचे प्रमुख उद्देश होते त्यांचे धर्म आणि संस्कृती आपल्यावर लादणे व येनकेन प्रकारे संपत्ती गिळंकृत करणे. हे उद्देश साध्य करण्यासाठी अखेरच्या आक्रमक ब्रिटिशांनी तर वेगळेच मार्ग स्वीकारले. त्यांनी रचलेल्या अनोख्या कटकारस्थानांनी ते अधिक आक्रमक ठरले. त्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रभावी साधनांची योजना आखली. त्यातील एक अत्यंत घातक साधन म्हणजे विज्ञान. हे साधन वापरून त्यांनी भारतीयांवर सांस्कृतिक, मानसिक आणि शारीरिक आघात केले. त्यामुळे भारतीय आपले ‘स्व’त्व गमावून बसले. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शस्त्रामुळे त्यांनी भारतीयांवर आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले. भारतीयांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांना दुबळे करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सत्ताधार्‍यांनी अन्यायकारक व भेदभावमूलक सत्ता गाजवून सामाजिक सुधारणेच्या नावाखाली भारतीयांना प्रतिगामी, मागास आणि अंधश्रद्धेने पछाडलेले ठरविले. त्यामुळेच त्यांनी भारतीय आदिवासी जमाती व अंधश्रद्ध असून त्या जणू नरकवासच भोगत आहेत असे चित्र उभे केले. ही दडपशाही केवळ राजकीय स्वरूपाचीच नव्हती, तर ती समाजजीवनाची सर्व क्षेत्रे व्यापणारी अशी सर्वसमावेशक होती.
 
 
 
त्यांच्या या शस्त्रांमध्ये ‘विज्ञान’ या प्रभावी शस्त्रामुळे भारतीय जीवनाची सर्वच क्षेत्रे ढवळून निघाली. याची जाणीव होऊन ब्रिटिशांच्या निंदागर्भ अपमानास्पद वर्चस्वाला स्वातंंत्र्याच्या संग्रमाच्या रूपाने मिळालेला ‘प्रति आघात’ देशाच्या कानाकोपर्‍यातून उसळला. ब्रिटिशांच्या जुलमी वैचारिक मक्तेदारीला सामाजातील बुद्धिवंतांकडून आणि आत्मविश्वास असलेल्या विज्ञाननिष्ठ विचारवंतांकडून चौफेर आव्हान उभे राहिले. आपल्या अनेक वैज्ञानिकांनी स्वातंंत्र्यप्राप्तीचा मार्ग चोखाळताना विधायक आणि नावीन्यपूर्ण मार्गांचा अवलंब केला. चालू काळातील अत्यंत आव्हानात्मक सामाजिक समस्या निवडून त्यावर संशोधन करून त्या सोडविणे आणि त्यामार्गे उच्च व प्रगल्भ भारतीय बौद्धिक क्षमता प्रदर्शित करणे, भारतीय विज्ञानाचा जागतिक उच्च दर्जाचा शास्त्रशुद्ध इतिहास लिहिणे, भारताची समृद्ध ज्ञानपरंपरा प्रकाशात आणणे, भारतीयांनीच भारतीयांसाठी संशोधन संस्था व प्रयोगशाळा प्रस्थापित करणे, विज्ञानाधिष्ठित उद्योग, व्यवसाय स्थापन करून स्वत:च विज्ञानाचा विकास करणे आणि त्यातून भारताला स्वावलंबी बनविणे हे उद्देश साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे सारे प्रयत्न, ही सारी धडपड म्हणजे स्वातंंत्र्यप्राप्तीच्या चळवळीचे अभिन्न स्वरूप होते. मात्र आजही सर्वसाधारण समाज याबद्दल अनभिज्ञ आहे. त्याचे याविषयी सर्व स्तरांवर प्रबोधन करणे व ते वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे कार्य विज्ञान भारतीने येत्या वर्षासाठी योजले आहे.
 
 
यामागचा आणखी प्रमुख उद्देश म्हणजे भारतीय वैज्ञानिक विश्वातील वैज्ञानिक बंधुता अधिक दृढ करणे हा होय. विज्ञान क्षेत्रात या वैचारिक दूरदृष्टीने या उपक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. या उपक्रमांमुळे आमच्या देशबांधवांचे ऊर अभिमानाने भरले जातील. देशातील युवकांना विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून मातृभूमीची सेवा करण्याची प्रेरणा त्यामुळे मिळेल, यात शंका नाही.
 
 
प्रफुल्लचंद्र राय यांच्या आत्म्याला आपण सारे साद घालू या. त्यांनी असे म्हटले होते की, “मला प्राणप्रिय अशा विज्ञानाची कास धरताना माझ्या मनात एकच भावना आहे की, या विज्ञानाच्या माध्यमातून मी माझ्या मातृभूमीची सेवा करू शकेन.”
 
 
संदर्भ -
आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी श्रीमती बसन्ती देशी यांना 1921मध्ये लिहिलेल्या पत्रातील हे एक पत्र आहे.
बंगाली रसायनशास्त्रज्ञाचे जीवन हे अनुभव, खंड - 1 आचार्य प्रफुल्लचंद्र राय.
मूळ इंग्लिश लेख - जयंत सहस्रबुद्धे
(राष्ट्रीय संघटन मंत्री - विज्ञान भारती)
मुक्त अनुवाद - डॉ. हेमा क्षीरसागर, 9422770663