मिझोराममधील चकमक समाजविघातकांची खेळी

विवेक मराठी    09-Aug-2021   
Total Views |
26 जुलै रोजी घडलेली ही घटना मिझोंच्या आसामी भूभागावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याची एकमेव घटना नाही. बराक खोर्‍यात अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत. हिमंता सरमांना ‘अकार्यक्षम मुख्यमंत्री’ म्हणून बदनाम करण्याच्या प्रयत्नांतील ही एक खेळी आहे. परंतु मुख्यमंत्री सरमांनी अत्यंत संयत भूमिका घेत मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांशी शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सतत संपर्क ठेवलेला आहे.

mizoram_2  H x
 
26 जुलै या दिवशी आसाम-मिझोराम सीमेवर आसाम राज्य पोलीस आणि मिझोराम राज्य पोलीस यांच्यात जोरदार चकमक झाली आणि मशीन गन्सच्या फैरी झाडल्या गेल्या. या गोळीबारात सहा आसाम पोलीस मारले गेले, हे तर आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. त्या सगळ्या प्रसंगाचे विविध फोटोज, व्हिडिओज दोनही बाजूंनी व्हायरल केले जात आहेत. आसाम-मिझोरामचे मुख्यमंत्री एकमेकांशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करीत आहेत.

आसामच्या सीमा ईशान्य भारतातील अरुणाचल, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर या राज्यांशी आणि बांगला देश, नेपाळ या देशांशी सामायिक आहेत, हे आपण जाणतोच. ईशान्य भारतातील अडचणी, इथले तंटे समजून घ्यायचे, तर या भूभागाचा, इथल्या जनजातींचा इतिहास समजून घेणे, इथल्या भूगोलाचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे.

इथे गेली हजारो वर्षे वसणार्‍या विविध जनजाती, त्यांच्या परंपरा, आचरणपद्धती, त्यांच्यातील एकमेकांत झालेले तंटे, करार, विविध गटांच्या महत्त्वाकांक्षा, इथले राजकारण, सामाजिक ताणेबाणे इत्यादी शेकडो गोष्टींचे ग्रिड समजून घ्यायला सुरुवात केली की प्रश्नाचे खरे स्वरूप आपल्याला जाणवू लागते.

आता वैरांग्टे-लैलापूर सीमेवर जिथे ही चकमक झाली, त्या भागात काही प्रमाणात तरी शांतता प्रस्थापित झाली आहे असे चित्र दिसू लागले आहे. दोन्ही बाजूंना सीआरपीएफच्या जवानांना मोठ्या प्रमाणात तैनात केले गेले आहे. पण ही वादळापूर्वीची शांतता असावी अशी भीती तज्ज्ञांना वाटते आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सूचना येऊनही, अजूनही दोन्हीही बाजूंच्या राज्य पोलिसांनी आपापल्या जागा सोडल्या नसल्याचे समजते. आसाम सरकारने मिझोराम पोलीसमधील सहा एसपी पदाधिकारी पोलिसांवर जनतेला हत्यारे, बंदुका, स्फोटके देऊन भडकवल्याचे आरोप करून केसेस दाखल केल्या आहेत. यातले अनेक नागरिक दहशतवादी गटांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना शस्त्र चालवण्याचे शिक्षण मिळालेले आहे आणि ही अतिशय काळजी करण्यासारखी बाब आहे.

सध्यातरी या सीमेवरून दोन्ही राज्यांतर्गत दळणवळण पूर्णपणे थांबवले गेले आहे. आसामी जनतेला मिझोराम सीमेत न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिझोराम हे राज्य दळणवळण वाहतुकीसाठी आसामवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अन्नधान्य, पेट्रोल, इंधन आणि जीवनावश्यक सर्वच वस्तूंची वाहतूक आसाममार्गेच मिझोराममध्ये होत असते. मणिपूर आणि त्रिपुरातून मार्ग आहेत, पण ते खराब आहेत, अंतरही फार लांबचे आहे. तिथून सामान आणणे फार खर्चीक होते. त्यामुळे आसामने दळणवळण बंद करून मिझोरामची आर्थिक कोंडीच केली आहे. ज्या मार्गाने अंमली पदार्थ, सुपारी, सिगरेट्स, खते, गुरांचा अवैध व्यापार आणि अशा अनेक वस्तूंची तस्करी चालते, त्या मार्गाने अन्नधान्य पुरवठा होऊ शकत नाही अशी ताठर भूमिका ‘नेडा’चे अध्यक्ष आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी घेतली आहे, असे दिसते.
 
कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मिझोराममधील काही विघ्नसंतोषी, ड्रग रॅकेट्स चालवणार्‍या टोळ्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणला आहे. गेल्या दोन महिन्यांत ड्रग ट्रॅफिकिंगच्या 916 केसेस रजिस्टर झाल्या आहेत. 1500हूनही अधिक लोकांना या प्रकरणांत आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या क्रॅकडाउनदरम्यान 20 किलोहूनही अधिक हेरॉईन मिळाले आहे. मिझो विद्यार्थी संघटना - मिझो झिरलई पॉल, यंग मिझो असोसिएशन इत्यादी डाव्या विचारसरणीच्या संघटना मिझोराममध्ये चांगलाच जम बसवून आहेत. मिझोराम राज्य सरकारच्या नाड्या त्यांच्या हातात आहेत. स्वाभाविकच मिझो पोलीसही त्यांच्या आज्ञा झेलतात. त्यांंनी भडकवल्यामुळेच हा झगडा उत्पन्न झाला आहे आणि त्यात सहा आसामी पोलीस मारले गेले, 70 लोक जखमी झाले, असे आसाम सरकारचे, खासदारांचे म्हणणे आहे. अर्थात यात काही तथ्य असावे असे लक्षात येईल, असे पुरावेही मिळू लागले आहेत.

mizoram_1  H x
या संघटनांना वाचवण्याचे प्रयत्न विविध स्तरांवर होताना दिसत आहेत. सोशल मीडिया साइट्सवर आसाम सरकार, केंद्र सरकारविरोधात गरळ ओकण्याचे भयंकर कारस्थान अमेरिकेतून खेळले जात आहे. हिमंता सरमांविरुद्ध जी ट्वीट्स होत आहेत, त्यातील कमीत कमी 43% ट्वीट्स अमेरिकेतून केली जात आहेत. याचाच अर्थ असा की सोशल मीडियावर जे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सगळी ताकद लावून केला जात आहे, त्यात आणि वास्तव हकीकतीत प्रचंड तफावत आहे.

आसाम सरकार, हिमंतो सरमा, 200 आसाम पोलीस इत्यादी लोकांवर मिझो राज्य सरकारतर्फे एफआयआर टाकण्यात आल्या आहेत. मिझो मुख्यमंत्री झोहराम थांगा यांच्या मते, आसाम पोलिसांनी लाइट मशीन गन्सचा वापर करून सर्वप्रथम गोळीबार सुरू केला. त्यांनी मिझो हद्दीतील पोस्ट्स आपल्या ताब्यात घेतल्या. याला प्रत्युत्तर म्हणून मिझो पोलिसांनी जो गोळीबार केला, त्यात हे मृत्यू झाले.

यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे लुशाई हिल्स आणि कछार जिल्ह्यातील जंगलाचा. इथले बरेच जंगल लाकूडचोरांनी तोडून साफ केले आहे. ती जागा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करवून घेण्याचे प्रयत्न तर चालू आहेतच, पण आसाम हद्दीत जे जंगल वाचले आहे, ते आपल्याला ओरबाडायला मिळावे यासाठी जंगलतस्कर प्रयत्नशील आहेत. या भागातून राष्ट्रीय महामार्ग जातो, जो विविध प्रकारे महत्त्वाचा आहे.
 
ईशान्य भारताचे विविध काळांत, राजकीय, प्रशासकीयदृष्ट्या विविध प्रकारचे भौगोलिक व्यवस्थापन होते. त्यामुळे आजची जी राज्यव्यवस्था आणि सीमाव्यवस्था आहे, ती अनेक लोकांना, गटांना, जनजातींना विविध कारणांसाठी न पटणारी आहे. परिणामी सीमाप्रश्न उपस्थित होणे अनिवार्य आहे. आपल्या सोयीचे ऐतिहासिक दाखले देत प्रत्येक जण आपल्या सीमा ठरवतो आहे.

26 जुलै रोजी घडलेली ही घटना मिझोंच्या आसामी भूभागावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याची एकमेव घटना नाही. बराक खोर्‍यात अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत. हिमंता सरमांना ‘अकार्यक्षम मुख्यमंत्री’ म्हणून बदनाम करण्याच्या प्रयत्नांतील ही एक खेळी आहे. परंतु मुख्यमंत्री सरमांनी अत्यंत संयत भूमिका घेत मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांशी शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सतत संपर्क ठेवलेला आहे.

एकंदरीत नाक दाबल्याने होणारा मिझोराममधील समाजविघातक लोकांचा त्रागा आणि तडफडाट या चकमकीद्वारे जगापुढे आला आहे.

या सगळ्या घडामोडींवर केंद्रीय गृह मंत्रालय बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु त्यांच्याकडून अजून तरी काही भूमिका स्पष्ट झालेली नाही.