20 वर्षांचं वास्तव! निराशा, धूळफेक आणि पराभव!

विवेक मराठी    18-Sep-2021   
Total Views |
न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9/11ला झालेल्या भीषण हल्ल्याला गेल्या आठवड्यात 20 वर्षं पूर्ण झालीत. 20 वर्षांपासून अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत जी तालिबान दहशतवादी संघटना होती, तीच तालिबान आता अमेरिकन प्रशासनाच्या भाषेत 'Businesslike and Professional'झालीय! ह्या असल्या विश्वासघातकी धोरणांमुळे अमेरिकेने त्यांचं दहशतवादाविरुद्धचं युद्ध जिंकलं की नाही माहीत नाही, पण जागतिक महासत्ता आणि जगाचे तारणहार म्हणून त्यांचा जो तोरा होता, तो पूर्णपणे रसातळाला गेला, हे मात्र नक्की!

america_1  H x

असं म्हणतात की आग स्वत:च्या अंगणात आल्याशिवाय आगीचे चटके बसत नाहीत. 20 वर्षांपूर्वी जागतिक महासत्ता अमेरिकेला त्याच्याच अंगणात असेच आगीचे चटके बसले होते, नव्हे, ते चटके इतके भीषण होते की आज वीस वर्षांनंतर अमेरिकेच्या चेहर्‍यावर त्याचे व्रण आहेत, एव्हाना ते अधिक गडद झालेत. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9/11ला झालेल्या भीषण हल्ल्याला गेल्या आठवड्यात 20 वर्षं पूर्ण झालीत. होय, तब्बल 20 वर्षं! दोन दशकांनी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बुश ह्यांनी पुकारलेल्या आणि त्यांच्यानंतर आलेल्या 4 राष्ट्राध्यक्षांनी पुढे रेटलेल्या ‘दहशतवादविरोधी युद्धाची’ आजची परिस्थिती नेमकी काय आहे? ह्या युद्धात स्वत:ला जगाचा तारणहार म्हणवणार्‍या अमेरिकेची, पर्यायाने जगाची काय परिस्थिती आहे? ह्या युद्धात कुणाचा विजय झाला, कुणाचा पराभव झाला, ह्याचा ऊहापोह केला, तरच 9/11नंतर नेमकं जग असं काय बदललं आणि जगात काय दृश्य बदल झालेत, हे कळेल.

 
9/11पूर्वीची अमेरिका आणि 9/11नंतरची अमेरिका ह्यात वास्तववादी फरक आहे. 9/11पूर्वीची अमेरिका सगळ्या जगात हस्तक्षेप करायची, पण त्याचे चटके त्यांना सोसावे लागत नव्हते. 9/11ला ओसामा बिन लादेनच्या हल्ल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन भूमीवर रक्तपात झाला, अमेरिका होरपळून निघाली. शीतयुद्धाच्या रस्सीखेचीत रशियाला मात देण्यासाठी उभा केलेला मुजाहिद किंवा अतिरेकी नावाचा भस्मासुर त्याच निर्मात्याच्या डोक्यावर हात ठेवून मोकळा झाला होता. 2996 मृत्यू आणि 6000 जखमी लोकांची भळभळती जखम 9/11 अमेरिकेच्या माथ्यावर सोडून गेला. पण कुणीतरी हा विचार करतो का, की अमेरिकेने ‘दहशतवाद्यांविरुद्धची लढाई’ ह्या नावाखाली किती मृतदेह दफन केले? तब्बल नऊ लाख एकोणतीस हजार! होय, 9,29,000 आकडा थोडाथोडका नाहीय. दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाने 7 देशांमध्ये अप्रत्यक्ष (ड्रोन हल्ले वगैरे) आणि 2 देशांमध्ये तर प्रत्यक्ष सैन्य कारवाई करून इतक्या सामान्य नागरिकांचे जीव जाणार असतील, तर नेमका दहशतवाद तरी वेगळा काय आहे? त्यातही इतकेच, किंबहुना थोडे कमीच मृत्यू झालेत की! बरं, ही इतकी सगळी मेहनत करून दहशतवादाचा तरी बिमोड झालाय का? ज्या तालिबान, अल कायदा ह्यांचा बिमोड करण्याचा पण 4-4 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केला, तेच तालिबान आज अफगाणिस्तानात हुकमत ताब्यात घेऊन बसलेत. फक्त हुकमत ताब्यात घेऊन नव्हे, तर अत्यंत घिसडघाई करून आपली अत्यंत उच्च दर्जाची सैन्य उपकरणं, हेलिकॉप्टर्स, काही मालवाहक किंवा सैन्य विमानं, काही महत्त्वाचे दस्तऐवज हे सगळं मागे ठेवून अमेरिका अफगाणिस्तानातून चक्क बुडाला पाय लावून पळून गेलीय. इराकमध्ये सद्दाम हुसेनची सत्ता उलथवून लावल्यानंतर तिथली अवस्था तरी वेगळी काय आहे? येमेनमध्ये, काही आफ्रिकन देशांत, मध्यपूर्व आखात आणि आशिया भागात तरी परिस्थिती काय वेगळी आहे? दहशतवाद नियंत्रणात आलाय की नागरिकांचं जीवन सुसह्य झालंय? जर ह्या दोन्हीपैकी काहीही झाले नसेल, तर मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन ह्यांना अफगाणिस्तानातील फौजा पूर्णपणे मागे घेताना “आम्ही दहशतवादविरोधी लढा यशस्वीपणे पूर्ण केला” ही मल्लिनाथी का जोडावी लागली?
मुळात पाकिस्तान आज पूर्णपणे तालिबानला मदत करतोय, त्याचबरोबर पाकच्या भूमीतून दहशतवादाला खतपाणी मिळेल ही सोय केली जात असेल, तीही अमेरिकेच्या नावावर टिच्चून, तर अमेरिकेचा हा पराभव नाही? 9/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपींना 20 वर्षांनीदेखील अमेरिकन न्यायालयातून शिक्षा झाली नसेल, जवळजवळ 4 कोटी लोक आणि 3 हजार अब्ज (3 ट्रिलियन) डॉलर्स खर्च करून 20 वर्षं अफगाणिस्तानात बेस ठेवून आपल्या आणि आपल्या मित्रदेशांच्या हजारो सैनिकांचे प्राण देऊन बायडन म्हणतात तो बुश ह्यांनी सन 2000 साली सुरू केलेला ‘दहशतवादविरोधी लढा’ जमिनी स्तरावर कुठेच यशस्वी होताना दिसत नसेल, त्याचबरोबर चीनला शह देण्यासाठी उभारलेल्या ‘क्वाड’ समूहाबाबतदेखील अमेरिका उदासीन असेल, तर अमेरिकेवर - पर्यायाने तिथल्या नोकरशाहीवर, विशिष्ट लॉबीस्टिक राजकारण्यांवर आणि त्यांच्या हेतूवरच संशय घ्यावा, इतकी परिस्थिती नक्कीच आहे. एक म्हण प्रचलित आहे - - With great power comes great responsibilities. अमेरिका स्वत:ला जगाचा तारणहार किंवा जागतिक महासत्ता म्हणून पुढे ठेवत असेल, तर त्याची जबाबदारी आणि त्यामुळे येणार्‍या समस्या/परिस्थिती ह्याची जबाबदारीदेखील अमेरिकेचीच असावी, आहे. सध्याचे बायडन सरकार ह्या कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढणे सोडा, पण साधी जबाबदारी घेण्याससुद्धा टाळाटाळ करत आपलं अंग काढून घेतंय.


america_1  H x
 
20 वर्षं ज्या अफगाणिस्तानात 3 हजार अब्ज डॉलर्स खर्च करून, आपले हजारो सैनिक मृत्यूच्या दाढेत ढकलूनसुद्धा ह्याच अमेरिकन सैन्याने प्रशिक्षण दिलेले अफगाण सैनिक तालिबानसारख्या अव्यावसायिक मुजाहिदी टोळ्यांसमोर विना लढता, किंबहुना पद्धतशीरपणे दबावतंत्र वापरून कुठल्याही प्रतिकाराविना शरणागती पत्करण्यास भाग पाडले गेलेले असतील, तर अमेरिकेच्या "War On Terrorism' ह्या ब्रीदवाक्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहील! आणि अमेरिकन प्रशासन, तिथल्या प्रशासनात उच्च पदावर काम करणारे लिब्बू, बायडन सरकार आणि त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी ह्याला सर्वस्वी जबाबदार आहेत, असं चित्र उभं राहत असेल तर त्यात दोष कुणाचा? दोष कुणाचा हा प्रश्न विचारताना इराकमधील आणि अफगाणिस्तानमधील कोट्यवधी निर्दोष लोकांना अमेरिकेच्या युद्धाचे प्रत्यक्ष परिणाम भोगावे लागले. घरंदारं उघडी पडली, कुटुंबंच्या कुटुंबं रस्त्यावर आली, संपूर्ण देशाची वाताहत झाली. 20 वर्षांपूर्वी तालिबानच्या तावडीतून अफगाणिस्तानला सोडवताना अफगाणी नागरिकांना ‘तुमच्या देशात नवीन सूर्योदय झालाय’ हा आशेचा किरण दाखवणारी अमेरिका गेल्याच महिन्यात त्याच अफगाणी नागरिकांना ‘अमेरिकेने जगाच्या उद्धाराचा ठेका घेतलेला नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या’ असं सांगते. नेमकी कुठली अमेरिका खरी मानायची? अशाने जागतिक महासत्तेची विश्वासार्हता अफगाण, इराक, सीरिया, येमेन ह्या देशांना पटणार आहे? 20 वर्षांपासून अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत जी तालिबान दहशतवादी संघटना होती, तीच तालिबान आता अमेरिकेन प्रशासनाच्या भाषेत "Businesslike and Professional' झालीय! मग ते Businesslike and Professional आहेत, तर गेली 20 वर्षं त्यांच्याबरोबर युद्ध का सुरू होतं? होतंच, तर मग आता असा काय फरक पडलाय की ते सरकार स्थापन करून अमेरिकन प्रशासनाशी थेट सरकार म्हणून चर्चा करू लागलेत?
 
 
ह्या असल्या विश्वासघातकी धोरणांमुळे अमेरिकेने त्यांचं दहशतवादाविरुद्धचं युद्ध जिंकलं की नाही माहीत नाही, पण जागतिक महासत्ता आणि जगाचे तारणहार म्हणून त्यांचा जो तोरा होता, तो पूर्णपणे रसातळाला गेला, हे मात्र नक्की! वाचकांना प्रश्न नक्कीच पडू शकतो - मग 20 वर्षांचं वास्तव काय? वास्तव हेच - निराशा, धूळफेक आणि पराभव! निराशा आणि धूळफेक अफगाणी/इराकी नागरिकांची आणि पराभव जागतिक महासत्ता अमेरिकेचा! विजय नेमका कुणाचा? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र ज्याचं त्यानेच ठरवावं.