‘केशव’ कुळीचा संत दादू

विवेक मराठी    20-Sep-2021
Total Views |

दादू दयाल हे नुसते वाचावीर नसून कर्मवीर होते. वयाच्या अठराव्या वर्षीच ते परम सत्याचा शोध घेण्यासाठी घरादाराचा त्याग करून देशाटनाला निघाले होते. संत दादू निर्भय होते. त्यांना त्या काळात समाजाचे प्रचंड जनसमर्थन होते.


sant_2  H x W:
ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे, असे सर्वच धर्मांचे अनुयायी मानतात. भारतीय संतांनी परमेश्वर हा एकच आहे आणि आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतो, असे सांगितले आहे. नंतरच्या काळात मात्र या परमेश्वराच्या लेकरांनी आपापसांनाही वेगवेगळ्या नावांनी संबोधायला सुरुवात केली आणि मग सर्वांच्यातच आम्ही एकमेकांपासून कसे वेगळे आहोत हे दर्शविण्याची आणि सिद्ध करण्याची चढाओढच लागली. आज हाच संतांचा उपदेश कोणी पुन्हा नव्याने सांगायला लागले, तरी लोक भ्रम आणि संभ्रम वाढविण्याचाच प्रयत्न करतात.

खरे म्हणजे, सर्व भारतीयांचे पूर्वज एकच आहेत आणि उपासनेची पद्धत बदलल्यामुळे कोणी एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. जेथे सर्व भारतीय मुळातच एक आहेत, तेथे नव्याने एकता निर्माण करण्याची काय गरज? गरज एवढीच आहे की काळाच्या ओघात पुसट होत चाललेले एकतेचे सूत्र पुन्हा ठळक करण्याची! संतांनीदेखील हेच कार्य केले.

भारतातील हिंदू आणि मुसलमान हे एक आहेत की वेगळे आहेत? असा कोलाहल सत्ताधीश अकबराच्या काळातही माजला होता. तेव्हा संत दादू दयाल यांनी ठामपणे सांगितले होते -
 
सब हम देख्या शोध कर, दूजा नाही आन।
सब घटै एकै आतमा, क्या हिंदू मुसलमान॥
दोनों भाई हाथ पग, दोनों भाई कान।
दोनों भाई नैन है, हिंदू मुसलमान॥
फुटीरतावादाची भावना फैलावण्याचे काम करणारे आणि त्यांच्या आहारी गेलेले लोक जेव्हा समोर आले, तेव्हा संत दादू यांनी त्यांना बजावले, “सर्व मनुष्यांना दोन हात आणि दोन पाय आहेत. सर्व मनुष्यांना दोन कान आणि दोन डोळे आहेत. त्यात उजवा आणि डावा असा भेद सांगितला गेला, तरी एका हातासारखाच दुसरा हात, एका पायासारखाच दुसरा पाय, एका कानासारखाच दुसरा कान आणि एका डोळ्यासारखाच दुसरा डोळा असतो. शारीरदृष्टीने त्यात कोणताच भेदभाव नसतो.”
 
 
एका गुरूने आपल्या शिष्यांना सेवेसाठी उजव्या पायाची व डाव्या पायाची वाटणी करून दिली होती. डाव्या पायाची सेवा करणारा शिष्य काही कारणाने बाहेरगावी गेला होता. त्याने परत आल्यावर पाहिले, तर उजव्या पायाची निगा दुसर्‍या शिष्याने व्यवस्थित राखली होती, पण दुसर्‍या पायाकडे त्याने दुर्लक्ष केले होते. गुरुदेवांना विचारल्यावर ते म्हणाले, “तो उजव्या पायाची सेवा करणारा असल्यामुळे डाव्या पायाची सेवा करणे ही त्याची जबाबदारी नाही, असे त्याचे मत आहे.” हे ऐकून तो शिष्य खवळला आणि रागाच्या भरात त्याने बाहेरून एक मोठा दगड उचलून आणला आणि त्या दगडाने गुरूचा उजवा पाय ठेचून काढला. एकूण या प्रकरणात गुरूचेच नुकसान झाले. त्यामुळे समाजात असे भेदभाव वाढवून आपण देशाचे तर नुकसान करीत नाही ना! यावर विचार करणे आज आवश्यक झाले आहे.
 
दादू दयाल हे नुसते वाचावीर नसून कर्मवीर होते. वयाच्या अठराव्या वर्षीच ते परम सत्याचा शोध घेण्यासाठी घरादाराचा त्याग करून देशाटनाला निघाले होते. परिभ्रमण करीत ते पुष्कर क्षेत्रात आले आणि या क्षेत्रापासून 12 किलोमीटरवर असणार्‍या करडाला (कल्याणपूर) पर्वताला त्यांनी आपले साधनास्थळ बनविले. तेथे राहून दादू ध्यानधारणा करायला लागले. त्या काळात त्या परिसरातील पीथा नावाच्या दरोडेखोराने मोठी दहशत निर्माण केली होती. तो अतिशय उलट्या काळजाचा होता. जेव्हा दादू दयाल यांच्याशी या दरोडेखोराचा सामना झाला, तेव्हा दादूंनी निर्भयपणे त्याला सत्याचा उपदेश केला. दादूंच्या उपदेशामुळे त्याचे मनपरिवर्तन घडून आले आणि त्याने प्रतिज्ञा घेतली की, “एक वेळ गंगा आणि यमुना या नद्या उलट वाहू लागतील किंवा पश्चिमेला सूर्य उगवेल, पण पीथा डाकू आपले गुरू दादू यांची शपथ घेऊन सांगतो की तो कधीच चोरी करणार नाही.”
गंग जमुन उलटी बहे, पश्चिम उगे भान।
पीथा चोरी न करै, गुरू दादू की आन॥
दादूंच्या तपश्चर्येचा आणि साधनेचा असा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच गेला. त्यांची कीर्ती दिगंत पसरली. त्यांच्या उपदेशाला समाजात मान मिळू लागला.
 
समाजातील अनेक लोक येऊन त्यांना विचारू लागले की, आमचा उद्धार कसा होईल? आम्हाला मोक्ष कसा मिळेल? संत दादू त्यांना उपदेश करू लागले -
किस सौं बैरी है रहन, दूजा कोई नांहि।
जिसके अंग थैं उपजे, सोई है सब मांहि॥
काहे को दुख दीजिए, घट-घट आतम राम।
दादू सब संतोषिए, यह साधु का काम॥
काहे को दुख दीजिए, सांई है सब मांहि।
दादू एकै आतमा, दूजा कोई नांहि॥
संतांची भाषा वेगळी असली, तरी वाणी एकच असते. संत तुकारामांनीसुद्धा हाच उपदेश केला आहे. ते म्हणतात -
तुका म्हणे एका देहाचे अवयव।
सुखदुःख जीव भोग पावे॥
पुण्य परउपकार पाप ते परपीडा।
आणिक नाही जोडा दूजा यासी॥
दुजे खंडे तरी। उरला अवघा तो हरी।
आपणाबाहेरी। न लगे ठाव धुंडावा॥
 
मुळात द्वैतभावच संपला, तर एकत्व निर्माण करावे लागत नाही. संत दादू हे विरक्त होते. त्यांना जातपात मुळीच मान्य नव्हती. पण लोक संतांचा पिच्छा सोडत नाहीत. आजही कुणी एकाने जागतिक महास्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर तो कसा आमच्याच जातीचा आहे, हे लोक उच्चरवाने सांगू लागतात अशी परिस्थिती आहे! अशा लोकांची जिज्ञासा संपुष्टात आणण्यासाठी संत दादू म्हणाले - ‘तुम्हाला आमचे कूळ जाणून घ्यायचे आहे तर ऐका, आम्ही सर्व केशव कुळातील आहोत. तुम्हाला आमचे गोत्र जाणून घ्यायचे असेल तर ऐका, सृष्टिकर्ता हे आमचे गोत्र आहे. तुम्हाला आमची जात जाणून घ्यायची असेल तर ऐका, सर्व जगाचा जो गुरू परब्रह्म परमेश्वर आहे, आम्ही त्याच्याच जातीचे आहोत. आमच्या घराण्याची चौकशी करीत असाल, तर त्या परमेश्वराचे जे कुटुंब आहे ते सर्व माझे कुटुंब आहे.’
 
 
दादू कुल हमारै केसवा, सगात सिरजनहार।
जाति हमारी जगतगुर, परमेश्वर परिवार॥
‘वसुधैव कुटुंबकम्’ या शब्दाची इतकी सोपी व्याख्या आपण आजवर कोठे ऐकली आहे का?
संत तुकाराम महाराज आपल्या गुरुदेवांविषयी असे सांगतात -
 
सापडविले वाटे जाता गंगास्नाना।
मस्तकी तो जाणा ठेविला कर॥
भोजना मागती तूप पावशेर।
पडिला विसर स्वप्नामाजि ॥
बाबाजी आपले सांगितले नाम।
मंत्र दिला रामकृष्णहरि॥
 
संत दादू असे सांगतात -
दादू गैब माँहि गुरुदेव मिल्या, पाया हम परसाद।
मस्तक मेरे कर धरया, दया अगम अगाध॥
दादू यांच्या गुरूंविषयी शोध घेतला असता, त्यांचे शिष्य जनगोपाल यांच्या ‘श्री दादू जन्मलीला परची’ या रचनेत असे आढळते की, जेव्हा दादू केवळ अकरा वर्षांचे होते, तेव्हा परमेश्वराने एका वृद्धाच्या रूपात त्यांना दर्शन दिले होते आणि त्यांना परीक्षा घेण्यासाठी एक पैसा मागितला होता. नंतर त्यांनी दादूंचे मस्तक कुरवाळले आणि आशीर्वाद दिला. दादू पंथी लोक ‘बूढन’ नामक अज्ञात संताला त्यांचे गुरू मानतात. संत दादू दयाल हेच दादू पिंजारी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत.
 
 
संत म्हटले की त्यांच्या संदर्भात अनेक चमत्कार आणि आख्यायिका सांगितल्या जातात. प्रत्येक चमत्काराच्या आणि आख्यायिकेच्या तळाशी काही तरी घटना घडलेल्या असतात. आपण चमत्कार म्हणून नव्हे, तर दादूंच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना जाणून घेणे आवश्यक आहे.
 
दादूंच्या उपदेशामुळे एका मुसलमान काजीला मोठा राग आला होता. तो दादूंना म्हणाला, “तुम्ही हिंदू अथवा मुसलमान यातील कोणत्याच एका धर्माचे नीट आचरण करीत नाहीत. तुम्ही केवळ आपल्या मनमर्जीनुसार वाटेल तसे वागता. त्यामुळे तुम्ही काफिर आहात.”
 
दादू म्हणाले, “जो खोटे बोलतो त्याला काफिर म्हटले पाहिजे.”
हे ऐकून काजीने महाराजांच्या श्रीमुखात भडकावली.
दादू म्हणाले, “माझ्या गालावर मारून जर तुम्हाला आनंद झाला असेल तर दुसर्‍या गालावरसुद्धा मारून पुन्हा आनंद घ्या.” या वाक्याला कोणी ख्रिस्ताचा अथवा एखाद्या महात्म्याचा उपदेश मानू शकतो. पण नंतर मात्र आक्रितच घडले. काजीने पुन्हा श्रीमुखात लगावण्यासाठी हात उचलला, पण तो लाकडासारखा ताठ झाला आणि अजिबात खाली येईना! त्याची हाय खाऊन तीन महिन्यात काजीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दादू महाराजांच्या वाटेला जाण्याचे धाडस करताना भले भले लोक कचरू लागले.
संत तुकारामांच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की, एकदा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले असताना मुसलमानांनी छापा मारला; पण त्यांना तेथे जिकडेतिकडे शिवाजी महाराज दिसू लागले आणि कोणाला धरावे याबाबत त्यांना संभ्रम निर्माण झाला. दादू महाराजांबाबत अशा अनेक आख्यायिका आहेत. दादू महाराजांच्या कीर्तनात विघ्न आणण्यासाठी काजींनी आणि मुल्लांनी विलंद खान खोजास सांगितले. त्यानुसार महाराजांना अटक करून अंधारकोठडीत डांबण्यात आले. पण बाहेर येऊन पाहतात तर महाराजांचे कीर्तन सुरूच होते. दादू महाराज कोठडीच्या आतही बसले होते आणि बाहेर उभे राहून कीर्तनही करीत होते. हे पाहून खानाने घाबरून महाराजांचे पायच धरले. महाराजांनी त्याला उदारपणे क्षमा केली. महाराजांचा महिमा वाढल्यामुळे एकाच वेळी सात ठिकाणी त्यांच्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आणि सातही ठिकाणच्या भक्तांना महाराजांचा उपदेश ऐकण्याचा लाभ मिळाला. पण नंतर महाराज नेमके कोणत्या उत्सवात गेले होते यावर भांडण जुंपले असता महाराज त्या काळात कोठेच गेलेले नसून आपल्याच आश्रमात ध्यानस्थ बसले होते, असे उघडकीला आले आणि भांडणाला पूर्णविराम देण्यात आला.


sant_1  H x W:
 
‘गोहत्याबंदी’ ही संत दादूंची इच्छा सत्ताधीश अकबराने मान्य केली.

महाराजांचे महत्त्व वाढत चालल्यामुळे जयपूरच्या एका वैष्णव महंताने महायोगी चांगदेवाप्रमाणे अहंकाराने आपल्या शिष्यांना दादूंकडे त्यांनी आपले अनुयायी व्हावे म्हणून ‘टिळा आणि माळा’ देण्यासाठी पाठविले होते. तेव्हा दादू महाराज म्हणाले, “माझे मन हीच माझी ‘माळ’ आणि माझ्या गुरूचा उपदेश हाच माझा ‘टिळा’ आहे.”
 
 
हे ऐकून त्या वैष्णव महंताने पुन्हा दर्पोक्ती केली, “आमेर राज्यात येऊन दाखवा, तुम्हाला माझा शिष्य व्हावे लागेल.” दादूंनी तेही आव्हान स्वीकारले आणि ते आमेर राज्यात दाखल झाले. तेथे तर प्रत्यक्ष आमेरचे महाराज आणि प्रजेतील मोठमोठे महापंडित दादू महाराजांचेच शिष्य झाले. दादू दयाल यांचा बहुचर्चित शिष्य रज्जब अली येथेच त्यांना शरण आला.

संत दादू दयाल यांच्या जीवनातील सर्वोच्च घटना म्हणजे त्यांचा सत्ताधीश अकबराशी झालेला संवाद होय. याची सुरुवात दादूंचे शिष्य माधवदास यांनी सीकरी येथील देवळात संत नामदेवाप्रमाणे भगवंतांच्या मूर्तीस दूध पाजण्याच्या चमत्काराने होते. समाजकंटक अकबराकडे तक्रार करून माधवदासांना भुकेल्या वाघाच्या पिंजर्‍यात टाकतात. पण तेथे तो वाघच माधवदासांच्या चरणी लीन होतो. तेव्हा माधवदासांचे गुरुदेव दादू दयाल यांना अकबराच्या दरबारात आणण्यात येते. तेथे त्यांचे स्वागत केले जात नाही आणि अकबर त्यांना प्रश्न विचारतो - ‘खुदाची जात कोणती? खुदाचे अंग काय? खुदाचे अस्तित्व काय? खुदाचा रंग कोणता?’
त्या वेळेस संत दादू दयाल अकबराला निर्भयपणे सुनावतात -
 
‘इश्क खुदा की जात है, इश्क खुदा का रंग।
इश्क खुदा-इ-वजूद है, इश्क खुदा का अंग॥
 
‘प्रेमभाव हीच खुदाची जात आहे, प्रेम हाच त्याचा रंग आहे, प्रेम हेच खुदाचे अस्तित्व आहे, प्रेम हेच खुदाचे अंग आहे. शुद्ध सात्त्विक प्रेम हाच आपल्या कार्याचा आधार आहे आणि आमच्या मनाच्या गाभार्‍यात तुम्हाला केवळ प्रेम आणि प्रेमच सापडेल. प्रेमभावनेनेच मनुष्यजात एकमेकांच्या जवळ येऊ शकते आणि सुखासमाधानाने एकत्र नांदू शकते. यामुळे प्रेमभाव हाच ईश्वर आहे.”
 
संत दादू यांचे सडेतोड भाषण ऐकून अकबराने पुढील संभाषण केले -
 
दादू नूर अल्लाह है, दादू नूर खुदाय।
दादू मेरा पीर है, कहै अकबर शाह॥
 
या गर्वहरणाला कारणीभूत होता संत दादू यांचा निर्भयपणा आणि त्यांना त्या काळात असलेले समाजाचे जनसमर्थन! समाजाच्या विरोधात जाऊन समाजावर सत्ता करता येत नाही, एवढे तरी सत्ताधीश अकबराला माहीत होते. त्यामुळे दादूंच्या लोकप्रियतेचा लाभ घेण्यासाठी तो नतमस्तक झाला, एवढेच नव्हे, तर त्याने संत दादूंची राज्यात ‘गोहत्याबंदी’ करण्याची इच्छाही मान्य केली. मात्र अशा घटनांकडे दुर्लक्ष करून एखादा सत्ताधीश ‘महान’ किंवा ‘ग्रेट’ ठरविण्याचा खटाटोप केला जात असतो, हे समाजाने आतातरी ध्यानात घेतले पाहिजे.