संत चोखोबा आणि परिवाराची संकलित अभंग गाथा

विवेक मराठी    21-Sep-2021
Total Views |
@डॉ. ओम् श्रीश श्रीदत्तोपासक 
विवेक व्यासपीठ आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येणार्‍या संत चोखामेळा आणि त्यांच्या परिवाराच्या उपलब्ध वाङ्मयाचा परिचय करून देणार्‍या गाथेविषयी माहिती देणारा लेख.
 
sant_1  H x W:
 
संत ज्ञानदेव-नामदेव यांच्या भागवत संप्रदायाने भगवद्भक्तीचा मार्ग सर्वसामान्य जनतेला सुलभ व सोपा करून दिला. कोणत्याही जातीच्या माणसाने येथे यावे, नामसंकीर्तनात न्हाऊन तृप्त व्हावे, पुण्यवंत होऊन जावे, मग जातीचा प्रश्न फारसा उरू नये, अशीच रीत यानंतरच्या काळात रूढ झाली. भागवतधर्मीय ज्ञानदेव-नामदेवांच्या या सामाजिक क्रांतीची व समत्वबुद्धीची सोनेरी पताका शोभून दिसते ती मंगळवेढे येथील अस्पृश्य जातीतील संत चोखोबांच्या खांद्यावर. पंढरीच्या वाळवंटातील नामदेवांची कीर्तने ऐकून चोखोबांचे कान तृप्त झाले. युगानुयुगे ज्या पारमार्थिक विचारांना चोखोबा व त्यांचा परिवार पारखा झाला होता, त्यांना ज्ञानदेव-नामदेवांनी समतेचा एक आदर्श दाखविला होता. ‘जाती तवचि वेगळालिया। जव न पवती माते॥’ हे ज्ञानेश्वरीमधील भगवंताचे आश्वासक वचन चोखोबांच्या रूपाने आकारास आले. स्वत:चा कामधंदा करीत असताना चोखोबा विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन असत. महाद्वारात संतजनांच्या चरणी लोटांगण घालण्याचे अवीट सुख चोखोबांनी अनुभविले. नामदेवांना गुरू मानून चोखोबांनी सर्व संतांत श्रेष्ठत्व मिळविले. पंढरपूर, विठ्ठल, पुंडलिक, नामस्मरण, संतश्रेष्ठ यांच्याविषयी चोखोबांना कमालीची प्रीती वाटत होती. विठ्ठलाच्या रूपावर ते मुग्ध होऊन गेले.
 
 
कर दोन्ही कटी कुंडल झळकती।
तेज हे फाकती दशदिशा॥
वैजयंती माळा चंदनाची उटी।
तिलक लल्लाटी कस्तुरीचा॥
 
 
असे हे रूप चोखोबांनी आपल्या हृदयाशी धरले होते. ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी।’ म्हणून त्यांनी ग्वाही दिलेली आहे. विठ्ठलाचा वेध त्यांच्या मनाला सतत असे. विठ्ठलाची भेट झाल्यावर ते कृतार्थतेचे उद्गार काढीत -
 
 
माझा शीणभाग अवधा हरपला।
विठोबा देखिला विटेवरी॥
नामदेवांच्या कृपेने चोखोबांना पंढरीत देव सुलभ झाला.
गाथेचे स्वरूप आणि पूर्वाभ्यास
 
 
शिक्षणाचा प्रसार, मुद्रणकला आणि प्रदीर्घ परंपरा यांच्या समुच्चयामुळे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, संत नामदेव व संत तुकाराम यांच्या अभंगगाथा, समर्थांचा दासबोध इत्यादी वाङ्मय मराठी माणसाच्या घरोघरी पोहोचले आहे. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड सर्वच मराठी संतांनी घातलेली आहे, हे त्यांच्या वाङ्मयातून कळून येते. संत चोखामेळा आणि त्यांच्या परिवाराच्या उपलब्ध वाङ्मयाचा परिचय मात्र फारच थोड्या मराठी मंडळींना आहे.
 

sant_3  H x W:
 
संत चोखामेळा यांचे अभंग संख्येने अल्प असले, तरी त्यातील विषयांत वैविध्य आहे. विषयानुसार जी विभागणी केली आहे, ती पुढीलप्रमाणे - विठ्ठलपर, पंढरीपर, आत्मनिवेदनपर, बालक्रीडा, ज्ञानपर, करुणापर, नामपर, उपदेशपर, भावपर, विटाळपर, भक्तवात्सल्यपर, सामाजिक वर्णनपर, विठ्ठल वियोगपर, नामदेव स्तुतिपर, ज्ञानेश्वर स्तुतिपर, जोहारपर, मागणे, प्रसादपर. चोखोबांची साहित्यसंपदा जतन करण्यामध्ये हेळसांड झाली असावी, त्यामुळे हे अभंग सलग आहेत असे वाटत नाही. तेराव्या-चौदाव्या शतकातील संतांचे अभंग एखादा लेखक लिहून घेत असे. चोखोबांच्या काळात मंगळवेढा किंवा पंढरपूर दरम्यान बिंदुमाधवाचार्य नावाचे मूळचे कन्नडभाषिक सद्गृहस्थ राहत असत. त्यांचा मुलगा अनंतभट्ट. त्यांचे मूळ नाव अनंतदेव. ते ब्राह्मण होते, म्हणून त्यांना भट या नावाने संबोधीत असत. त्यावरून अनंतभट किंवा अनंतभट्ट झाले. भाषेच्या दृष्टीने विचार करावयाचा तर चोखोबांच्या वाणीला शुद्ध रूप द्यावयाचे कार्य अनंतभट्टांनी केले असावे. चोखोबांच्या घराण्याशी अनंतदेव यांचा संबंध आला असल्याने सोयरा, बंका, निर्मळा यांच्या काव्यांचे लेखनही अनंतभट्ट यांनी चांगल्या स्वरूपात संपादित केले असावे.
 
 
आवटे संपादित सकल संत गाथेनुसार संत चोखामेळा आणि त्यांचा परिवार यांच्या अभंगांची संख्या साधारणपणे पुढीलप्रमाणे आहे -
 

sant_2  H x W:  
 
नंतर उपलब्ध झालेले अभंग ‘पुरवणी’ या सदरात समाविष्ट केलेले आहेत. संत चोखामेळा यांचे अभ्यासक डॉ. अप्पासाहेब पुजारी यांना नवीन अभंग उपलब्ध झाले, ते त्यांनी ‘श्रीसंत चोखामेळा समग्र अभंग गाथा व चरित्र’ या त्यांच्या पुस्तकात दिलेले आहेत. ‘अबीर गुलाल उधळीत रंग। नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग॥’ हा लोकप्रिय अभंग यात आढळतो. आवटे यांची प्रत प्रमाण मानून नंतर अनेक संपादकांनी व प्रकाशकांनी सकल संत गाथा एकत्रित किंवा स्वतंत्रपणे प्रकाशित केल्या. स.भा. कदम यांनी संपादित केलेले श्रीसंत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंग गाथा प्रामुख्याने आधारभूत मानली जाते. आळंदीचे ह.भ.प. श्रावणबुवा कांबळे या वारकरी संप्रदायातील हरिजन समाजाच्या भगवद्भक्ताच्या प्रेरणेने त्यांनी केलेले हे कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. कदम संपादित गाथेतील अभंगांचे वर्गीकरण अधिक विस्तृत आहे.
 
 
 
संत नामदेव अध्यासनातील माझ्या सहकारी डॉ. पद्मावती श्रीपाद श्रोत्रीय यांनी तत्कालीन अध्यासनप्रमुख डॉ. अशोक कामत यांच्या मार्गदर्शनाने ‘संत चोखामेळा आणि त्यांचा परिवार - एक विवेचक अभ्यास’ हा शोधप्रबंध पुणे विद्यापीठाला सादर करून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. कालांतराने प्रस्तुत प्रबंधही पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.
 
 
प्रस्तुत प्रकल्पाचे वैशिष्ट्य
 
 
साधारणपणे दोन वर्षांपूर्वी संत नामदेव अध्यासनाचे विद्यमान प्रमुख डॉ. सदानंद मोरे, संत तुकाराम महाराज अध्यासनाचे विद्यमान प्रमुख अभय टिळक, साप्ताहिक विवेकचे महेश पोहनेरकर, मंगळवेढा ते देहूगाव या समता वारीचे प्रवर्तक आणि संत चोखोबा अध्यासन केंद्राचे कार्यकर्ते सचिन पाटील, दीपक जेवणे आणि मी अशा सर्वांची एक अनौपचारिक बैठक झाली. संत चोखामेळा आणि त्यांच्या परिवाराची समग्र सार्थ गाथा प्रकाशित करण्याचा मनोदय सर्वांनी बोलून दाखविला. डॉ. मोरे, प्रा. टिळक यांनी या प्रकल्पाच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. संत चोखोबांची सेवा म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली.
अलीकडे गीता प्रेस, गोरखपूर यांनी प्रकाशित केलेली चोखोबांची गाथा संपादकांनी प्रमाण मानली. वास्तविक जुन्या आवटे गाथेचेच हे यथामूळ मुद्रण आहे. त्यात मुद्रणदोष नाहीत. नोंदविलेले अभंग क्रमांक याच प्रतीतील आहेत. अभंगांची संहिता, कठीण शब्दांचे अर्थ, जरूर तेथे स्पष्टीकरण अर्थ असा क्रम ठेवलेला आहे. प्रस्तावनेत त्यांचे चरित्र, अभंग याविषयीचे साक्षेपी विवेचन केलेले आहे. काही संदर्भ ग्रंथांची सूची, पाचही संतांची अकारविल्हे अभंग अनुक्रमणिका स्वतंत्र दिलेली आहे. वाचकांना हा अनुबंध सोपा वाटेल. डॉ. सदानंद मोरे यांचे अभ्यासपूर्ण शुभाशीर्वाद आहेतच!
 
 
संत नामदेव आणि संत चोखोबा यांचा अनुबंध सर्वविदित आहेच. या प्रकल्पाच्या रूपाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासन आणि संत चोखोबाराय अध्यासन या दोन अध्यासनांचा अनुबंधही जुळून आला, ही या प्रकल्पाची सर्वात मोठी फलश्रुती आहे, असे मला वाटते.