बंगालमधील भीषण हिंसाचाराचा वेध

विवेक मराठी    21-Sep-2021
Total Views |
2 मे रोजी पश्चिम बंगाल निवडणूक निकाल लागल्यानंतर हिंसाचाराची सुरुवात झाली, याचाच अर्थ हा हिंसाचार उन्मादातून झाला. बंगालमधील घडवून आणलेला अनियंत्रित हिंसाचार कसा उफाळत गेला आणि त्याला राजकीय-धार्मिक कंगोरे कसे लाभले, याचा आढावा घेणारा दस्तऐवज म्हणजे ‘रक्तरंजित बंगाल ’हे पुस्तक होय.
 
book_1  H x W:

“लोकशाही ही अशी व्यवस्था आहे, जेथे हिंसेशिवाय सरकार बदलता येते आणि घृणेशिवाय विरोध करता येतो” असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे एक वचन आहे. तथापि लोकशाहीच्या या संकल्पनेला अनेकदा गालबोट लागते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल मे महिन्यात लागले आणि तृणमूल काँगेसचे सत्तेत पुनरागमन झाले. मात्र त्यानंतर राज्यात हिंसाचार उसळला आणि भाजपा कार्यकर्त्यांसह तृणमूल-विरोधकांना लक्ष्य करण्यात आले, असे आरोप झाले. अगदी नुकताच भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी आपल्या 24 परगणा जिल्ह्यातील घरावर समाजकंटकांनी तीन बाँब फेकले, असा आरोप केला आहे आणि यासाठी तृणमूलला जबाबदार धरले आहे. निवडणुकोत्तर हिंसाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अरुण मिश्रा यांनी एक सात सदस्यीय समितीही स्थापन केली होती. या समितीने हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती आणि त्यानुसार आता कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुस्तका विषयी 
पुस्तकाचे नाव - रक्तरंजित बंगाल

संपादक - कल्पेश गजानन जोशी

ई पुस्तकासाठी संपर्क - 8275257137

प्रकाशक - विश्व संवाद केंद्र, देवगिरी (0240-2552265)

पृष्ठे - 124

पश्चिम बंगालमधील राजकारण हे अनेक वर्षे रक्तरंजित राहिले आहे. त्या राज्यात तीन दशके कम्युनिस्टांची सत्ता होती आणि गेली दहा वर्षे तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. कम्युनिस्टांना पराभूत करून तृणमूल काँग्रेस सत्तेत आली, तरी कम्युनिस्टांच्या हिंसक हातखंडा प्रयोगांना तृणमूलने अंगीकारले. आताही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला आणि तृणमूलचे विरोधक असा दावा करतात की या हिंसाचारामागे काही एक सूत्र होते आणि तो हिंसाचार राजकीय आणि धार्मिक होता. याचा अर्थ हिंदूंना लक्ष्य करणारा होता. त्या सर्व घडामोडींचा धांडोळा घेणारे एक पुस्तक विश्व संवाद केंद्र, देवगिरी यांनी तयार केले आहे. कल्पेश गजानन जोशी हे या पुस्तकाचे संपादक आहेत.
 
सुमारे सव्वाशे पृष्ठांच्या या पुस्तकात वीस छोटी छोटी प्रकरणे आहेत. 2 मे रोजी निवडणूक निकाल लागल्यानंतर हिंसाचारास सुरुवात झाली, याचाच अर्थ तो उन्मादातून झाला. हिरवा गुलाल उधळून देशी बाँबच्या आतशबाजीत जल्लोषाला सुरुवात झाली, असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. हुगळी, बांकुडा इत्यादी ठिकाणी भाजपा कार्यालये, भाजपा कार्यकर्त्यांची घरे यांना लक्ष्य करण्यात आले. तेव्हा वरकरणी हा हिंसाचार राजकीय वाटू शकतो; पण पुस्तकात जी उदाहरणे देण्यात आली आहेत, त्यावरून या हिंसाचाराला धार्मिक अंगही होते असे म्हटले जाऊ शकते. पुस्तकात आकडेवारी देण्यात आली आहे आणि त्यावरून या हिंसाचाराची तीव्रता लक्षात येईल. विश्व हिंदू परिषदेच्या दाखल्याने अशी माहिती देण्यात आली आहे की 11 हजार हिंदू या हिंसाचारात बेघर झाले आणि 142 महिलांवर अनन्वित अत्याचार झाले. जून महिन्याच्या अखेरपर्यंत भाजपाच्या चाळीस कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या, असा दावा भाजपाने केला आहे. या सगळ्या हिंसाचाराने बंगाल रक्तरंजित झाला आणि त्याचे पडसाद देशभरच नव्हे, तर जगभर उमटू लागले. चाळीस देशांतील हिंदूंनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध नोंदविला. त्याचाही आढावा पुस्तकात घेण्यात आला आहे. पुस्तकात नोंदविण्यात आलेली काही निरीक्षणे महत्त्वाची. बंगालमधील हिंसाचारात सर्वाधिक लक्ष्य झाले ते अनुसूचित जाती-जमाती. आणि याचे मुख्य कारण म्हणजे या वर्गाने भाजपाला मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते. तेव्हा हिंसाचारामागे काही सूत्र होते ते यावरून दृग्गोचर होईल. महिलांवर अत्याचार झाले. पूर्व मेदिनीपूर येथे तर एका साठ वर्षीय महिलेवर तिच्या नातवाच्या देखत अत्याचार करण्यात आले. अशी अनेक भीषण उदाहरणे पुस्तकात देण्यात आली आहेत आणि ती वाचून अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. अर्थात आता उफाळलेला हिंसाचार हा काही नवीन नाही. तृणमूल सत्तेत आल्यापासून तृणमूल-विरोधकांना असे पद्धतशीर लक्ष्य करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) ममताच्या राजवटीतील भ्रष्टाचार, हिंसाचार याबाबत जनजागृती केली, मात्र याचा परिणाम असा झाला की अभाविपच्या 363 कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. तेच राममंदिराचा प्रचार करणार्‍याच्या बाबतीत झाले. अर्थात गेली अनके वर्षे असा हिंसाचार घडतच आला आहे आणि त्या उदाहरणांचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

बंगालच्या गेल्या शंभर-दीडशे वर्षांच्या इतिहासाचा धावता आढावा पुस्तकात घेण्यात आला आहे आणि त्यामागचा हेतू हे निदर्शनास आणून देण्याचा आहे की बंकिमचंद्र, रवींद्रनाथ ठाकूर, महाकवी कृतिवास, चैतन्य महाप्रभू, राजा राम मोहन रॉय, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, जगदीशचंद्र बोस, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी प्रभृती महापुरुषांनी पावन झालेली भूमी अशा हिंसाचाराने का माखली आहे. कर्झनने केलेली बंगालची फाळणी, त्याला झालेला विरोध, 1946 सालच्या डायरेक्ट अ‍ॅक्शनदरम्यान कोलकत्यात हिंदूंवर झालेले अत्याचार, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या राजवटीत हिंसाचाराची झालेली पायाभरणी, बांगला देश युद्धात बांगला देशातून निर्वासित झालेले हिंदू, कम्युनिस्ट राजवटीतील हिंसाचार अशा अनेक विषयांना पुस्तकात स्पर्श करण्यात आला आहे. तृणमूल सत्तेत आल्यानंतर मंदिरांवर झालेले हल्ले असोत किंवा रामनवमी आणि हनुमानजयंती मिरवणुकांवर घातलेली बंदी असो, एकूण निवडणुकोत्तर हिंसाचाराची चर्चा झाली असली, तरी ते अगोदरपासून सुरूच असणार्‍या हिंसाचाराचे अधिक भयावह स्वरूप कसे होते, हे कथन करण्याचा या पुस्तकामागील हेतू.
 
पुस्तकात अनेक कात्रणे, छायाचित्रे, रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी 7 मे 2021 रोजी काढलेले पत्रक यांचा समावेश आहे. त्यात होसबळे यांनी लिहिले आहे - ‘या पाशवी हिंसाचारातील सर्वात दु:खद बाब ही आहे की शासन आणि प्रशासन यांची भूमिका केवळ मूकदर्शकाची आहे, असे दिसून येते..’ हा या हिंसाचारातील सर्वात चिंताजनक भाग आणि त्यामुळेच हा अनियंत्रित हिंसाचार कसा उफाळत गेला आणि त्याला राजकीय-धार्मिक कंगोरे कसे लाभले, याचा आढावा घेणारा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक होय.


@राहुल गोखले