किशोर नावरकर नि:स्वार्थी कार्यकर्त्याची एक्झिट

विवेक मराठी    23-Sep-2021
Total Views |
20 सप्टेंबर 2021ची सकाळ ही आम्हा मनमाडकरांसाठी दु:खाचे गडद सावट घेऊन आली. हे सावट होते मनमाडचे सुपुत्र किशोर नावरकर यांच्या अनपेक्षितपणे झालेल्या एक्झिटचे.

nashik_1  H x W
 
मनमाड ही जशी किशोरची जन्मभूमी, तशीच ती त्यांची कर्मभूमीही राहिली. रा.स्व. संघाच्या मुशीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले होते. मनमाडमधील अनेक सामाजिक शैैक्षणिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची गहिरी छाप दिसून येते. अनेक सामाजिक संघटनांतील सहभाग व स्वत:चे किराणा दुकान त्यामुळे किशोरचा प्रचंड जनसंपर्क होता. अत्यंत बोलका व मनमिळाऊ, पण कोणालाही उर्मटपणे न बोलणारा असा तो होता.
 
कोरोनासारख्या भयंकर आजारातून अनेक वयोवृद्धही कोरोनाला हरवून बाहेर पडले. परंतु किशोर कोरोनाला हरवू शकला नाही. त्याची कुठलीच पुण्याई या वेळेस कामास आली नाही, असे म्हणावेसे वाटते. किशोर व आबा दर वर्षी दिवाळीनंतर विठ्ठलाच्या दर्शनास पंढरपूरला जायचे. दर गुरुवारचे दत्तोपासक मंडळाच्या भजनास, तसेच ज्ञानेश्वर माउली समाधी सोहळ्यास त्यांची हजेरी असायची. किशोर घरातील कर्तासवरता होता. 85 वर्षे वयाच्या वडिलांना - म्हणजे आबांना पुत्रवियोगाचा मोठा धक्का सहन करावा लागत आहे. किशोरचा मुलगा महेश आताशाच हाताशी आलेला व फार मोठी समज नसणारा असा आहे. पांडुरंग किराणा दुकानावरून जाताना प्रत्येकाशी हात उंचावून बोलणार्‍या किशोरची प्रत्येकाला आठवण होते.

किशोर फक्त दुकान व घरदार यात रमणारा नव्हता, तर त्याला सामाजिक कामाची जाणीव व आवड होती. कॉलेजजीवनापासून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. त्याच्याकडे काही काळ शहर कार्यवाह म्हणूनही दायित्व होते. वाणी समाजबांधवांच्या संघटनेतही तो पदाधिकारी होता. अंमळनेरचे संत श्री सखाराम महाराज हे किशोरचे आध्यात्मिक क्षेत्रातील गुरू होते.

भाजपाच्या व्यापारी आघाडीचा सदस्य म्हणूनही किशोर काम करीत असे. किशोरचा व माझा खर्‍या अर्थाने सलोखा किंवा जवळीक निर्माण झाली ती म्हणजे रमाकांत मंत्री यांनी 25 वर्षांपूर्वी ‘संस्कृती संवर्धन समिती’ची स्थापना केली, तेव्हापासून. समितीच्या स्थापनेपासून मी, रमाकांत मंत्री व किशोर एकत्र होतो. संस्कृती संवर्धन समितीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून सर्व सदस्य मोठमोठ्या योजना आखून, समाजासाठी कल्पक कार्यक्रम करण्यासाठी उत्सुक होते. जुलैपासून किशोरही आमच्याबरोबर समितीचे वेगवेगळे कार्यक्रम, अध्यक्ष, सचिव यांच्या निवडीपासून ते ऑनलाइन स्पर्धेच्या तयारीसाठी हिरिरीने समितीच्या सर्व बैठकांमध्ये हजर राहत असे. संस्कृती संवर्धन समितीच्या विवेकानंद व्याख्यानमालेची पूर्वतयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू होत असे. तेव्हापासून किशोर उत्साहाने प्रत्येक मीटिंगमध्ये सहभाग घेत असे व नवीन तरुणांना प्रेरणा देत असे.
 
 
व्याख्यानाअगोदर संपूर्ण वंदे मातरम चालीत म्हणण्यासाठी किशोर सर्वात पुढे असे, नंतर त्याच्या सुरात आम्ही सूर मिसळीत असू.

मागील वर्षी सांगली, कोल्हापूर येथे महापूर आला असता त्या प्रचंड महापुरामुळे नुकसान झाले होते. तेव्हा पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यास किशोरने पुढाकार घेतला व त्यास मी व रमाकांत मंत्री यांनी साथ दिली. मनमाड शहरातून आम्ही जनकल्याण समितीसाठी 1,05,000/- रु. मदत गोळा केली.
 
 
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यपदीही किशोर 25 वर्षांपासून होता. नांदगाव तालुक्याच्या शालेय समितीच्या वाखारी शाळेवर किशोर दोन वर्षे अध्यक्ष असताना त्याने उल्लेखनीय काम केलेले आहे.

लॉकडाउनच्या काळात किशोर दर रविवारी प्रवीण व्यवहारे सर, डॉ. भागवत दराडे, योगेश सोनवणे, सिद्धांत लोढा यांच्याबरोबर ट्रेकिंगला किल्ल्यांवर जात असे. किशोरची प्रतिभा अचानक जागृत होऊन किशोर चांगल्यापैकी कविताही करू लागला होता. या त्याच्या छंदाची व आवडीची आम्हाला नव्याने ओळख झाली होती.

किशोरला लहानपणापासून जुन्या टपाल तिकिटांचा संग्रह करण्याची आवड होती. परंतु दुकानामुळे तो छंद काहीसा मागे पडला होता. या छंदाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जुन्या व नव्या तिकिटांच्या संग्रहाचा सुंदरसा अल्बम त्याने तयार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रौढांच्या सायम शाखेत किशोर उपस्थित राहत असे व सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर सदस्यांनाही शाखेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करत असे.
 
 
किशोरची आठवण तर आमच्या प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी असणार आहेच, त्याच्या विविध कार्यांच्या रूपात असणार आहे. त्याच्या ठिकाणी असलेल्या अनेकविध गुणांपैकी काही जरी गुण आम्ही आमच्या वाटचालीत आत्मसात करू शकलो, तर त्याला तीच खरी श्रद्धांजली ठरेल.
प्रमोद मुळे
9421509242