एका संघ सेनापतीचा अस्त

विवेक मराठी    23-Sep-2021
Total Views |
यशवंतराव काजरेकर संघसमर्पित, स्वयंसेवक, एक देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. दादरा-नगरहवेली मुक्त करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. यशवंतरावांचे वर्णन एका शब्दात करायचे झाले, तर ‘सेनापती’ हे एकच विशेषण त्यांना शोभून दिसेल. आणीबाणीमध्ये 19 महिने येरवडा तुरुंगामध्ये ते मिसाबंदी होते.त्याच्या जाण्यामुळे एका संघ सेनापतीचा अस्त झाला.

nashik_1  H x W
 
यशवंतराव काजरेकर गेल्याचे नुकतेच समजले. सातारा संघशाखेमध्ये कुटुंबेच्या कुटुंबे संघाशी जोडली गेलेली अनेक घरे होती. त्यापैकी एक काजरेकरांचे घर. सर्व भाऊ संघाचे स्वयंसेवक, तर आईसुद्धा राष्ट्रसेविका समितीचे काम करीत असत. यशवंतराव अशा एका कुटुंबातील होते.

ते सातारला आले. वेस्टर्न इंडिया ट्रस्टी कंपनीमध्ये आणि एल.आय.सी.मध्ये नोकरी केली. पुढे नंतर नोकरीतील बढतीमुळे पुणे येथे स्थायिक झाले.

 
सातारला आल्यापासून त्यांचा संघाशी संबंध आला. त्या वेळी आमच्यासारख्या तरुणांचे ते आदर्श होते. यशवंतरावांचे वर्णन एका शब्दात करायचे झाले, तर ‘सेनापती’ हे एकच विशेषण त्यांना शोभून दिसेल.

उंची सहा फुटांच्या आसपास. शरीरयष्टी दणकट आणि पिळदार, धारदार नाक आणि रुबाबदार मिश्या यामुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसे. या रुबाबदारपणामुळे ‘जाणता राजा’ या नाट्यात राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

एका वेळी 1000 जोर किंवा 1000 सूर्यनमस्कार हा दिवसाचा व्यायाम सहज करीत. दर शनिवारी मारुतीला बुक्कीने नारळ फोडणे हा प्रयोग आम्ही पाहत होतो. अशा या बळकट शरीरयष्टीमुळे आणि शारीरिक कष्ट करण्याच्या सवयीमुळे सज्जनगडावर यात्रेच्या वेळी जेवणाची मोठमोठी पातेली वाहून आणणे आणि हजारोंच्या पंक्तीत वाढप करणे हे सहजतेने करीत.

1967 साली कोयनानगरला झालेल्या भूकंपाच्या वेळी पायी चालत जाऊन त्यांनी अनेक गावांत मदतीचे कामही केले होते. त्यांना व्यायामाबरोबर पोहण्याचीही आवड होती. त्यांनी अनेक तरुणांना पोहण्याचे शिक्षण दिले होते. एकदा सातारा येथील तलावात एक लहान मुलगा बुडाला. सर्वांनी तर आशा सोडली होती. पण यशवंतराव पाण्यात उतरले आणि तळाशी जाऊन त्या मुलाला त्यांनी उचलून आणले. नाकातोंडातील पाणी काढल्यावर त्याला पूर्ण श्ाुद्ध आली. आज तो मुलगा सातारला प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ झाला आहे.

यशवंतरावांचा हा साहसी स्वभाव होता. यामुळेच सातारा शहरातील एका मुस्लीम कुटुंबाच्या घराला आग लागली होती, अशा आगीतही त्यांनी घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींंना वाचवले होते.

दादरा-नगरहवेली मुक्त करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. नाना काजरेकर, यशवंतराव आणि वसंतराव हे एकाच कुटुंबातील तिघे जण या संग्रामात सहभागी होते. आणीबाणीमध्ये 19 महिने येरवडा तुरुंगामध्ये ते मिसाबंदी होते.
यशवंतराव अनेक गुणांचा समुच्चय होते. संघकार्य हा त्यांचा ध्यास होता. शाखेवर हुतुतू, द्वंद्वयुद्ध या खेळांत ते निष्णात होते. घोषपथकामध्ये ते उत्कृष्ट शंखवादक होते. संघातील तरुणांमध्ये साहसी गुण निर्माण व्हावेत म्हणून ते अनेक उपक्रम चालवीत. इतर छंदांमध्ये ते जादूचे प्रयोग करीत असत.

निवृत्त आयुष्यात त्यांनी मसाज करण्याची कला शिकून घेतली. आज त्यांच्या मसाजमुळे अनेक व्यक्ती व्याधिमुक्त झालेल्या आहेत. येरवडा तुरुंगामध्ये असताना त्यांनी पूजनीय बाळासाहेब देवरस यांनाही मसाज करण्याची सेवा केली होती.
असे संघसमर्पित, स्वयंसेवक, एक देशभक्त स्वातंत्र्यसैनिक यशवंतराव काजरेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
त्याच्या जाण्यामुळे एका संघ सेनापतीचा अस्त झाला.
- अशोक वाळिंबे
। 9423261790