एकात्म मानव दर्शन पंडित दीनदयाळ उपाध्याय

विवेक मराठी    23-Sep-2021   
Total Views |
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार केवळ एखाद्या राजकीय पक्षापुरते सीमित नव्हते, तर संपूर्ण मानवतेसाठी कल्याणाचे मंत्र होते. ‘इंटिग्रल ह्युमिनिझम’ अर्थात एकात्म मानव दर्शन हे त्यांच्या दर्शनाचे शीर्षक आहे. वैश्विक एकता, सर्जनात्मकता आणि सहकार हाच विकासाचा मार्ग आहे, संघर्ष किंवा संहार नाही, हे सौम्य स्वरात आपल्याला दीनदयाळजी या दर्शनातून समजावतात. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची 25 सप्टेंबर रोजी जयंती आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याला उजाळा देणारा लेख.


pandit_1  H x W
आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य खंडित होते. परंतु कमीत कमी आपण आपल्या भूमीवर का होईना, आपली प्रगती साधू शकतो, या आशादायक विचाराने देश पुढे निघाला. देशाच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण काळ होता.

स्वातंत्र्यसंग्राम चालू होता, तोपर्यंत केवळ स्वातंत्र्य प्राप्त करणे हाच एकमेव हेतू होता. मात्र जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा तो कोणत्या मार्गाने चालावा, याबाबत विविध लोकांची विविध मते होती. ज्या स्वदेशीच्या आंदोलनाला स्वातंत्र्याचे अधिष्ठान मानले गेले होते, ते कुठेतरी अदृश्य होऊन गेले. आता पाश्चात्त्य राहणीमानाला आणि आचारांना कसे देशात मध्यवर्ती आणता येईल याची शर्यत लागली होती. त्यांची राजनीती, अर्थनीती, त्यांची जीवनमूल्यधारणा यांना आधुनिक आणि स्वीकारार्ह समजले जाऊ लागले. ते घेऊनच देशाची नीती निश्चित होऊ लागली. या विचित्र वेळेला एक सौम्य स्वभावाचा मनुष्य या देशासाठी कशी नीती असली पाहिजे यावर बोलत होता. त्याच्याकडे कोणतीही जन्मजात राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तसेच त्याच्याकडे मोठे जनमतही नव्हते!
आपले मौलिक विचार तो आपल्या निवडक साथीदारांशी बोलत राहिला. ज्याप्रमाणे वाहणारे पाणी आपला मार्ग स्वत: निर्माण करते, त्याप्रमाणे हा छोटा झरा हळूहळू पुढे जात राहिला. भारतीय संस्कृतीच्या शाश्वत मूल्यधारेचा हा झरा होता. या व्यक्तीचे नाव होते पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि त्यांच्या विचारधारेचे नाव होते एकात्म मानव दर्शन.

दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म राजस्थानमध्ये दि. 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला. अतिशय लहान असतानाच त्यांचे आई-वडील कालवश झाले. त्यांच्या आजोळी ते लहानाचे मोठे झाले. शालांत परीक्षेमध्ये अजमेर बोर्डामध्ये ते सर्वप्रथम आले. त्यानंतर कानपूरमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला. हा बुद्धिमान, गंभीर, मितभाषी युवक उत्तर प्रदेशामध्ये संघ प्रचारकाच्या भूमिकेतून काम करू लागला.

1952मध्ये संघटनेने त्यांना राजकीय क्षेत्राची जबाबदारी दिली. निरलस, निर्मम स्वभावाच्या दीनदयाळजींनी भारतीय जनसंघाचे दायित्व स्वीकारले. आपली नीती आणि सिद्धान्त कसे असावेत या विषयावर दीनदयाळजींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर अनेक बौद्धिके दिली. त्यांचे विचार केवळ कोणत्या राजकीय पक्षापुरते सीमित नव्हते, तर संपूर्ण मानवतेसाठी कल्याणाचे मंत्र होते. ‘इंटिग्रल ह्युमिनिझम’ अर्थात एकात्म मानव दर्शन हे त्यांच्या दर्शनाचे शीर्षक आहे. वैश्विक एकता, सर्जनात्मकता आणि सहकार हाच विकासाचा मार्ग आहे, संघर्ष किंवा संहार नाही, हे सौम्य स्वरात आपल्याला दीनदयाळजी या दर्शनातून समजावतात.

 
दीनदयाळजी राजनीतितज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते. चिंतक होते. उत्तम वक्ते होते. त्यांचे विचार सूत्रमय असत. मात्र दुर्दैवाने आपले विचार ग्रंथबद्ध करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. 19 फेब्रुवारी 1968 रोजी मुगलसराय रेल्वे स्टेशनात त्यांचा गूढ देहान्त झाला.
 
त्यांनी दिलेल्या बौद्धिकांमधूनच त्यांच्या दर्शनाची सूत्रे मिळतात. आधुनिक काळामध्ये आपल्या देशाला विकासाच्या दृष्टीने दिशादर्शक अशी तत्त्वे या सूत्रांवरून आपल्याला लक्षात येतात. आपल्या देशाची विकासनीती कशी असावी, याचे पथप्रदर्शन ही सूत्रे करतात. विकासाची भारतीय संकल्पना म्हणजेच एकात्म मानव दर्शन!!

राष्ट्रजीवनाचे सूत्र

स्वातंत्र्यानंतर आपल्या राष्ट्राची दिशा काय असावी, हा यक्षप्रश्न होता. काही लोकांच्या मतानुसार आपल्याला फक्त ब्रिटिशांपासूनच स्वातंत्र्य मिळाले नव्हते, त्याआधी एक हजार वर्षे आम्ही परतंत्र राष्ट्र होतो. तिथून जो सुटलेला धागा आहे, त्याला धरूनच नवी सुरुवात करावी लागेल असे त्यांचे मत होते. दीनदयाळजींचे मत या बाबतीत थोडे वेगळे होते. त्यांच्या मते वेगवेगळ्या कालखंडात परकीय राज्यव्यवस्थांनी आमच्या राष्ट्रजीवनाच्या गतीमध्ये अडथळे आणले हे खरे, आमच्यामध्ये काही बदल झाले हेही खरे, परंतु प्रत्येक बदलणार्‍या वेळेला आम्ही आमच्या जीवनपद्धतीमध्ये मौलिक सूत्रांचे जतन सातत्याने करत गेलो. मानवी जीवन आणि समष्टीचे एकत्रित चिंतन ही आमच्या संस्कृतीची वैशिष्ट्ये आम्ही कधीही सोडली नाहीत. परकीय शासनतंत्र असले, तरीही सांस्कृतिक वारसा त्यामुळे बदलला नाही, तसेच खंडितही झाला नाही.

आपण स्वातंत्र्य एवढ्यासाठीच मिळवतो कारण आपल्याला प्रकृतीनुसार जीवन जगता यावे. जशी व्यक्तीची एक विशिष्ट प्रकृती असते, तसेच राष्ट्राचीही एक विशेष प्रकृती असते, असे दीनदयाळजी त्यांच्या दर्शनात सांगतात. परकीय शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला आपल्या राष्ट्राच्या प्रकृतीनुसार विकास करता येत नाही, म्हणूनच जनमानसात स्वातंत्र्याची इच्छा जागृत होते. स्वतंत्र राष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रीय स्वभावाला अनुकूल असे विकासकार्य आपण करू शकतो. प्रत्येक राष्ट्राचा आपला स्वभावधर्म असतो. जसा प्रत्येक मनुष्याचा एक आत्मा असतो, त्याप्रमाणे राष्ट्राचाही एक आत्मा असतो. त्यांच्या दर्शनामध्ये राष्ट्राच्या आत्म्याला ते ‘चिती’ असे म्हणतात. ती संकल्पना नेमकी काय आहे, ते आपण समजून घेऊ.

राष्ट्र चिती

एखादा भूभागाला आपण राष्ट्र म्हणतो, ते कोणत्या अनुषंगाने? तर संस्कृती, परिवेश, ऐतिहासिक-सामाजिक परंपरा या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून. त्यावरून त्या भूभागाचे मूलभूत व्यक्तित्व तयार होते. या मूलभूत व्यक्तित्वालाच ‘राष्ट्राची चिती’ असे म्हटले जाते. येथील समाज त्या चितीबरोबरच जन्म घेतो. राष्ट्राच्या चितीशी अनुकूल जे आहे, तेच केवळ राष्ट्रामध्ये स्वीकारले जाऊ शकते. या स्वभावधर्माबरोबर न्याय करणार्‍या गोष्टीच येथे स्वीकारल्या जाऊ शकतात. तरच येथील समाज प्रगती साधू शकतो.
आपल्या समाजाचा जो आंतरिक स्वभाव असतो, त्याच्या विपरीत जर विकास केला जाऊ लागला, तर ज्याप्रमाणे शरीराच्या बाहेरून जंतू हल्ला करून शरीरामध्ये अनारोग्य निर्माण करतात, त्याप्रमाणे राष्ट्राच्या प्रतिकूल विकासाच्या मार्गाने राष्ट्राची हानी होऊ शकते. राष्ट्रदेखील आजारी पडू शकते!

आपण आपला आहार-विहार जसा प्रकृतीला अनुकूल ठेवतो, त्याप्रमाणेच राष्ट्राच्या चितीला अनुकूल अशी राज्यरचना आवश्यक असते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आमच्या देशातील विद्वानांनी पाश्चात्त्य राजनीती, त्यांची जीवनमूल्ये यांना आणि त्यांच्या अन्य गोष्टींना आधुनिक समजून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना वाटत होते की त्यांची भौतिक प्रगती झालेली आहे, तशीच आपल्या देशाचीही भौतिक प्रगती व्हावी. त्यांच्या या सर्व आयामांमुळे त्यांची प्रगती झालेली असणार, म्हणून ते सर्व आयाम आपणही आता अंगीकारले पाहिजेत, असे आमच्या विद्वानांना वाटत राहिले.
 

pandit_1  H x W 
 
त्यांच्या भौतिक ज्ञानाबरोबरच त्यांची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्थादेखील आधुनिक व प्रगत मानली गेली आणि त्यामुळे ती आपण स्वीकारली पाहिजे असे आपल्या सुशिक्षित विद्वानांना वाटले. परंतु त्यामुळे एका चुकीच्या दिशेने आपल्या देशाच्या प्रगतीचा, विकासाचा मार्ग निश्चित झाला, जो आपल्या चितीच्या अत्यंत विरोधात होता आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत.
मानवाचे स्वरूप केवळ आर्थिक मानव कसे असू शकेल? मनुष्याचा संपूर्ण विकास हा त्याच्या संपूर्ण व्यक्तित्वाचा विकास असला पाहिजे. या व्यवस्थेमध्ये हे होऊ शकत नाही. येथे स्पर्धा केंद्रस्थानी आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक व्यक्ती असमाधानी असणेच या विकासाच्या मार्गाला मान्य आहे. या आधुनिकतम अशा पश्चिमी विकासाच्या अनेक मर्यादा आहेत. त्या दीनदयाळजी आपल्याला पुढीलप्रमाणे समजावतात.
 
 
पाश्चात्त्य चिंतनाच्या मर्यादा

पाश्चात्त्य जीवनपद्धती आणि विचार एका विशिष्ट परिस्थितीमुळे जन्माला आले. ते सार्वलौकिक नाहीत. विश्वाच्या प्रत्येक कोपर्‍यात त्यांच्यानुसार राज्यव्यवस्था चालू शकत नाही. पाश्चात्त्य देशांचे राष्ट्रीय उद्देश, त्यांची प्रकृती, त्यांची संस्कृती ही भारतापासून तर खूपच भिन्न आहे. पाश्चात्त्य राजकारण, त्यांचा राष्ट्रवाद, त्यांची लोकशाही, त्यांच्या समाजवाद आदींच्या व्याख्या हे सर्व आपल्यापासून वेगळे आहेत. विश्वशांतीची आणि विश्वएकतेची त्यांची कल्पना ते लोकांसमोर ठेवतात. लीग ऑफ नेशन्स, युनायटेड नेशन्स असे प्रयोगही त्यांनी केले. तरीही ती सर्व राष्ट्रे कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रसित असलेली आणि एक-दुसर्‍याशी सातत्याने संघर्षरत असलेली आपल्याला दिसून येतात.

 
या आधारावर आपल्या विकासाची इमारत उभी करणे हा आत्मघातकी मार्ग आहे. पाश्चात्त्य समाजामध्ये गरजांची आणि इच्छांची निरंतर वृद्धी आवश्यक आणि योग्य मानली जाते. तिला कोणतीही मर्यादा घालण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. त्याची परिणती विनाशामध्ये होऊ शकते. लोकांच्या मागण्या वाढवायच्या, त्यांच्या गरजा वाढवायच्या म्हणजेच आधुनिक अर्थशास्त्रानुसार विकास होय. निसर्गाच्या समतोलाचे थोडेदेखील चिंतन यामध्ये केले जात नाही.
 
 
आजची अर्थव्यवस्था आणि उत्पादनशैली नैसर्गिक संतुलनाला पूर्णपणे बिघडवून टाकणारी आहे. यालाच पाश्चात्त्य देश राष्ट्राचा विकास म्हणतात. पश्चिमी चिंतकांनी स्पर्धेला व संघर्षाला विकास मानले. स्पर्धा हेच तेथे जीवनाचे मूलभूत केंद्र मानले जाते. मनुष्य मुळातून स्वार्थी आहे, पृथ्वीवरील प्राणी आणि निसर्ग त्याच्या उपभोगासाठी आहेत, या प्रकारचे द्वैतमूलक, विखंडित विचार पश्चिमी राष्ट्राची आधारभूत तत्त्वे आहेत.
 
त्यामुळेच मागच्या काही शतकांमध्ये ज्या आर्थिक संरचना उभ्या केल्या आणि त्यांच्या आधारे ज्या समाजरचना उभ्या केल्या गेल्या, त्यामध्ये व्यष्टी, समष्टी आणि सृष्टी सार्‍यांचेच प्रचंड नुकसान झाले. या व्यवस्था नेमक्या काय आहेत? भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद म्हणजे नेमके काय? त्याला भारतीय पद्धतीने एकात्म मानव दर्शन हे कसे उत्तर ठरू शकते, हे पुढील भागात पाहू या.


pandit_2  H x W
आजच्या सदोष व्यवस्था -
भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद
सध्याचा जगामध्ये साधारणपणे तीन प्रकारच्या व्यवस्था आढळतात, त्या म्हणजे भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद. या प्रत्येकच व्यवस्थेचे असे म्हणणे असते की आम्हीच मानवाला अधिकाधिक सुखी समृद्ध करू शकतो आणि व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतो. या तिन्ही व्यवस्था अर्थकेंद्रित आहेत. अर्थात देशकालपरत्वे या तिन्ही व्यवस्थांच्या बाबतीत कमी-अधिक बदल असतातच. परन्तु ढोबळमानाने त्यांचे स्वरूप आपण समजून घेऊ.
 
यातील भांडवलवादी व्यवस्था तर मनुष्याला एक आर्थिक एककच समजते.

भांडवलवादी व्यवस्थेमध्ये मनुष्याच्या आर्थिक स्तरावरून त्याची ओळख होत असते. सारे निर्णय नफा, तोटा आणि भौतिक संपदा यावरच आधारित असतात. यात मनुष्य केवळ एक आर्थिक घटना होऊन बसतो. जास्तीत जास्त उत्पादन, अधिकाधिक संपत्ती ,जास्तीत जास्त फायदा हेच त्याच्यासाठी जीवन होऊन बसते. तेवढ्यासाठीच तो जगू लागतो. जीवन म्हणजे एक स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेमध्ये जे दुर्बल असतात ते मागे राहतात आणि केवळ ताकदवान लोकच पुढे जातात. ते आपल्या आर्थिक सामर्थ्याच्या आधारावर एकाधिकार स्थापन करतात. या व्यवस्थेमध्ये ग्राहकाची आवश्यकता असते. पण ती त्याच्या क्रयशक्तीवर आधारित असल्याने दारिद्री आणि धनवान यांच्यात एक मोठी दरी निर्माण होते. धनवान व्यक्तीकडे अधिकार एकवटतात. केंद्रीकरण आणि एकाधिकार हीच या व्यवस्थेची मुख्य ओळख आहे. भांडवलवाद जेथे असतो, तेथे अधिकतर लोकशाही राज्यव्यवस्था प्रचलित असते. राज्यव्यवस्थेने प्रशासन, लोककल्याण, कायदे, न्याय, सुरक्षा, शिक्षण याकडे लक्ष द्यावे; उत्पादन, बाजारपेठ, मागणी-पुरवठा हे सारे भांडवलदार बघतील, अशी सर्वसाधारण विभागणी असते. ही व्यवस्था अत्यंत गरीब व्यक्तीच्या दैनंदिन आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी विशेष प्रयत्न करत नाही. कल्याणकारक योजना राज्यव्यवस्थेने राबवाव्यात असे गणित असते.
 
या भांडवलशाहीला पर्याय म्हणून मग समाजवादी व्यवस्था पुढे येते. परंतु व्यक्तीच्या प्रतिष्ठेला पुन:स्थापित करण्यासाठी समाजवादी व्यवस्थेलादेखील कुठेही विशेष यश मिळालेले नाही. उत्पादन साधनांचे स्वामित्व विशिष्ट व्यक्तींकडे न राहता राज्याकडे हस्तांतरित होणे, याला समाजवाद म्हटले जाते. राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष आणि असंख्य निर्बंधांनी आणि नियमांनी बांधलेली एक संस्था असते. त्यामुळे समाजवादी व्यवस्था तत्त्वानुसार राबवणे अत्यंत कठीण असते. भांडवलवाद मनुष्याला आर्थिक मानव मानतो, हे खरे. मात्र त्याच्या बाकीच्या जीवनामध्ये या व्यवस्थेचा हस्तक्षेप नसतो. प्रत्येक मनुष्याला आपली भौतिक प्रगती करण्याला तिथे पूर्ण वाव असतो. समाजवादी व्यवस्थेत सारे काही शासनाच्या अथवा नियमन समित्यांच्या ताब्यात असल्याने, व्यक्तीला स्वतंत्रपणे काही करण्याची प्रेरणा शिल्लक राहत नाही.

 
समाजवाद साम्यवादाची पहिली पायरी मानला जातो. यांच्यातील फरकाची रेष फार बारीक आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे देशकालानुरूप त्याच्या व्याख्येत बरेच भेदही आहेत. साम्यवादाचा कर्ता कार्ल मार्क्स याच्या मते भांडवलवादातील शोषणाचा स्वाभाविक परिणाम म्हणजे साम्यवाद आहे. मार्क्सने अपरिहार्य संघर्षाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्यानुसार वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे, कारण मालक आणि कामगार यांचा सबंध अहि-नकुलवत असतो. साम्यवादी व्यवस्था ही सतत संघर्षाचे वातावरण ठेवून व व्यक्तीला साधनमात्र मानून समाजात अशांतता उत्पन्न करते. भांडवलवादाला विरोध म्हणून असलेल्या या समाजवादी-साम्यवादी व्यवस्था म्हणजे ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ अशा आहेत, हे आजवर सिद्ध झाले आहे. मनुष्याला या व्यवस्था आर्थिक उन्नत करतात, परंतु मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तित्वाचे पोषण आणि त्याच्या भौतिकेतर आकांक्षांची पूर्ती करू शकत नाहीत. मनुष्याच्या एकात्मिक अंगाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे या व्यवस्थांमध्ये मनुष्य सतत असमाधानी राहतो. समाजालासुद्धा या व्यवस्था उचित न्याय देत नाहीत. यांची परिणती संघर्ष आणि शोषण व शेवटी विसर्जन, विनाश आणि संहार अशी होत राहते.
 
मग काय असेल उपाय? मनुष्याला सुखी, संपन्न आणि समाधानी असे एकाच वेळी राहता येईल का? याचे उत्तर एकात्म मानव दर्शन देते.
2.मनुष्याचे चार स्तर आणि विकास
 
 
दीनदयाळजी एकात्म मानव दर्शनात म्हणतात - ‘मनुष्याचे चार स्तर असतात. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा. या चारही स्तरांवरील सुखांची प्राप्ती हे मनुष्यजीवनाचे लक्ष्य आहे. या चारांमध्ये आत्मसुख सर्वोच्च आहे. मनुष्य पृथ्वीवरील अन्य जीवांपेक्षा अधिक विकसित जीव आहे. त्याच्या जीवनात केवळ प्राथमिक भौतिक आवश्यकतांची पूर्ती एवढेच कृतकर्म नसते. शरीर आणि शारीरिक क्रिया ही साधने आहेत, साध्य नाही. आत्म्याची अनुभूती हे त्याच्या जीवनाचे साध्य आहे. काही पश्चिमी विचारवंत आत्मा, ईश्वर यांचे अस्तित्वच अमान्य करतात आणि मानवी जीवन केवळ साधनसंपन्न असेल तरच सुखमय असते, असे मानतात. दीनदयाळजी या गोष्टीचे खंडन करतात. ते म्हणतात, “प्रत्येक मनुष्याला एकतेची अनुभूती येते आणि सृष्टीच्या पलीकडे असलेल्या सूक्ष्मतत्त्वाची अनुभूतीदेखील त्याला येत असते. या संपूर्ण जगताला व्याप्त अशा एका तत्त्वामुळे मनुष्याच्या अंतर्यामी एकात्मतेची भावना उदित होत असते. संपूर्ण सृष्टीची एकात्मता आणि तिचा साक्षात्कार हे मनुष्यजीवनाचे ध्येय आहे. प्रत्येक मनुष्य आपल्याला प्रकृतीनुसार त्याच एका दिशेने पुढे जात असतो.”
 
 
पश्चिमी देशात समृद्धी असूनही मनुष्य सुखी नाही, कारण तेथील जीवनपद्धतीत मोठी गफलत आहे. ही गडबड नेमकी कोणती, हे सांगताना दीनदयाळजी म्हणतात, “मानवी प्रगतीचा अर्थ आहे मनुष्याच्या शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चार आयामांची एकत्र प्रगती. पुष्कळ वेळा लोक असे म्हटले जाते की भारतीय संस्कृती केवळ आत्म्याचा विचार करते. परंतु हे पूर्णपणे खरे नाही. भारतीय संस्कृती आत्म्याचा विचार करते हे बरोबर आहेच, परंतु त्याचबरोबर शरीर, मन आणि बुद्धी यांचादेखील येथे तेवढाच विचार केला जातो. पाश्चात्त्य विचारधारेमध्ये केवळ शरीराचा विचार केला जातो, फारतर मनाचा केला जातो. परंतु आम्ही ‘शरीरम् आद्य खलु धर्मसाधनम्’ असे म्हणतो. आत्म्याच्या प्राप्तीसाठी शरीराचे महत्त्व येथे समजले जाते. परंतु शरीराला साध्य नाही, तर साधन म्हणून पाहिले जाते आणि त्या दृष्टीनेच शरीराचा विचार केला जातो. भौतिक गरजांची पूर्तता, त्यांचे महत्त्व याला आम्ही निश्चितच स्वीकारलेले आहे. परंतु तीच केवळ एक शेवटची गोष्ट आहे असे आम्ही मानत नाही. त्याला सारसर्वस्व मानत नाही. मनुष्याचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी, मनुष्याच्या विविध इच्छा-आकांक्षांच्या आणि कामनांच्या संतुष्टीसाठी, मनुष्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आमच्या संस्कृतीमध्ये व्यक्तीसमोर कर्तव्याच्या रूपात चार पुरुषार्थांची संकल्पना ठेवली आहे.


pandit_1  H x W

धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे हे चार पुरुषार्थ आहेत. या चार पुरुषार्थांवर आधारित भारतीय जीवनदर्शन हे विश्वातील सर्व समस्यांचे उत्तर आहे. हे असे जीवनदर्शन आहे, जे जीवनाचा विचार करताना त्याला तुकड्यातुकड्यांमध्ये विभाजित करत नाही, तर येथे जीवनाला एक एकक मानून विचार केला जातो.”

या विवेचनात पुढे दीनदयाळजी प्राचीन जीवनपद्धतीला युगानूकुल कसे करता येईल, याचे चिंतन मांडतात.
 
3. . .एकात्म मानव दर्शन - समरस,
परस्परपूरक
दीनदयाळजी आपल्या दर्शनात मनुष्यजीवनाबरोबरच समाजविचार आणि सृष्टिविचारदेखील करतात. भारतीय संस्कृतीचे पहिले वैशिष्ट्य हे आहे की त्यात मानवी जीवन आणि संपूर्ण सृष्टी यांचा एकत्रित विचार केला जातो. यालाच एकात्मवादी (इंटीग्रल) दृष्टीकोन म्हणतात. जीवनात अनेकता आणि विविधता आहे. परंतु जीवनाच्या मौलिक स्तरावर ऐक्यभाव आहे. सृष्टीमध्ये कोणत्याही दोन गोष्टी समान नाहीत हे खरे, पण म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे असे मानण्याचे काही कारण नाही. विविधता, अनेकता आहेच आणि ही विविधताच सृष्टीचे मूळ सौंदर्य आहे. त्यात कृत्रिमरित्या समानता आणण्याचा भाव शत्रुत्व आणि ईर्ष्या उत्पन्न करतो. म्हणूनच दीनदयाळजी म्हणतात, ‘भारतीय संस्कृतीत केवळ समानतेच्या नाही, तर आत्मीयतेच्या पायावर व्यक्तीचा आणि राष्ट्राचा विचार केला जातो. भारताच्या राष्ट्रवादाचा उदय स्वार्थासाठी नाही. परस्पर संघर्ष हा त्याचा आधार नाही, तर समन्वय आणि परस्पर अनुकूलता हा त्याचा आधार आहे. सामूहिक जीवनाची समान अनुभूती सर्वांच्या अंत:करणात उदित व्हावी, ही राष्ट्र म्हणून आमची कामना आहे. राष्ट्रजीवनाच्या आधाराने श्रेष्ठ मनुष्यता विकसित होऊ शकते. मानवी जीवनातील श्रेष्ठ गुणांची आराधना हे भारतीयत्वाचे वैशिष्ट्य आहे. सृष्टीच्या प्रत्येक अंगात एकता आहे. एकच तत्त्व भिन्न भिन्न रूप घेऊन प्रकट होत असते, यावर आमचा विश्वास आहे. या भिन्नतांमध्ये जो एक आत्मा बघू शकतो, तो श्रेष्ठ आहे आणि अशा श्रेष्ठ मनुष्यांच्या निर्मितीची जी व्यवस्था आहे, तिला आम्ही धर्म म्हणतो. विविध विचार, विभिन्न मते मानवी विकासाच्या एकाच रस्त्यावर चालतात, असे आम्ही मानतो व त्यांचा आदर करतो. विभिन्न रूपे, नाम आणि विभिन्न मार्ग ही निरोगी विकासासाठी अपरिहार्य आणि आवश्यक असतात. सगळ्या प्राणिमात्रांच्या कल्याणाची भावना हाच भारताचा राष्ट्रवाद आहे.

आमचे राष्ट्र जीवन विस्तृत भूप्रदेशावर स्थित आहे. यामुळे त्यात विविधता असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये सौंदर्याचे प्रकटीकरण होते. अनेक फुलांपासून जशी सुंदर माळ गुंफली जाते, त्याच प्रकारे वैविध्यामध्ये आम्ही समन्वय स्थापन करून आनंद मिळवू शकतो. आमचा जीवनविषयक आध्यात्मिक दृष्टीकोन हाच आहे. हीच आमच्या राष्ट्राची चिती आहे. हेच ‘एकात्म मानव दर्शन’ आहे.
 
4.प्राचीन उदात्त विचार व आजचे जग
 
प्राचीन भारतीय दर्शनांच्या उदात्त आणि भव्य अशा विचारांना दीनदयाळजींनी युगानुकूल केले. राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या समस्यांची माहिती घेऊन त्यावरील उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. जगभरातील विविध संस्कृतींचाही त्यांनी अभ्यास केला होता. मात्र प्राचीन शास्त्रांचा आधार घेताना त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती, ती म्हणजे पुरातन शास्त्राबरोबर अनेक रूढी-परंपरा जन्म घेतात. त्यातील काही निरर्थक, निष्प्राण असतात - उदा., भारतात वर्णभेद, जातीतील उच्चनीचता या बाबी आहेत, त्या कालबाह्य आहेत, त्या टाकून दिल्या पाहिजेत हेही दीनदयाळजी सांगतात.

 
भारतीय विचार सांगताना पश्चिमी राजकारणाला त्यांनी पूर्णपणे अस्वीकृत केलेले नाही. कारण हे सिद्धान्त मानवाच्या वैचारिक क्रांतीतून आणि सामाजिक संघर्षातून उत्पन्न झालेले आहेत. हे सिद्धान्त मानवी आकांक्षांची पदचिन्हे आहेत. त्यामुळे त्यांची अवहेलना करून चालणार नाही. त्यांचा स्वीकार करताना ते आमच्या संस्कृतीमध्ये कुठे चपखल बसतील, याचा विचार करून ते प्रतिष्ठित केले पाहिजेत. स्वराज्य हे राष्ट्राच्या अभिव्यक्तीचे साधन आहे, हे विसरू नये.
5.भारतीय असणे म्हणजे एकात्म मानववादी असणे

 
पाश्चिमात्य जड-सुखवादी भौतिक विकासप्रणालीने विसकळीत केलेल्या मानवसमूहाला पुन्हा एकदा व्यवस्थित कसे करता येईल? यावर काही उपाय आहे का? काय आहे ही विकासाची वेगळी संकल्पना? एखाद्या संकल्पनेचे ‘भारतीय’ असणे म्हणजे नेमके काय? हे दीनदयाळजी नेमकेपणाने सांगतात.
 
दीनदयाळजींचे हे सर्व विचार त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बौद्धिकांमधून सातत्याने मांडले. एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपल्या सहकार्‍यांसमोर असे वेगळे विचार मांडत होते! ते सौम्यपणे पुन:पुन्हा सांगत राहिले,
 
 
“शांती, सामंजस्य व परस्परपूरकता, पर्यावरणाच्या चैतन्याचे रक्षण व संवर्धन, जीवनाभिमुखता यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पूर्वेकडे जावे लागेल! पूर्वेतही ह्या विषयाला प्रत्यक्षात जगलेल्या भारतीय संस्कृतीकडे जावे लागेल.”
 
 
भारतामध्ये या विषयावर अनेक शतके ज्यांनी चिंतन केले, प्रयोग केले, विविध रचना उभ्या केल्या, त्या कालजयी ठरल्या, अनेक शतके सातत्याने चालवल्या गेल्या, त्या भारतीय चिंतन सृष्टीकडे पुन्हा एकदा गेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे आता लक्षात येत आहे. इंद्रियांपासून मिळणारे ज्ञान हेच खरे ज्ञान असे एकेकाळी मानणारे वैज्ञानिक आता आध्यात्मवादी विचारांनाही मान्यता देऊ लागले आहेत. त्यामध्ये नवे संशोधन होऊ लागले आहे. एकूणच विकासासाठी धावणारे जग एक क्षण थांबून पूर्वेकडे बघत आहे.