पंजाबमधला नेतृत्वबदल बंडखोरीचा सुप्त ज्वालामुखी

विवेक मराठी    24-Sep-2021
Total Views |
काँग्रेस श्रेष्ठींनी कथित धाडसाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमध्ये नेतृत्वबदल केला. पण मुख्यमंत्री बदलूनही काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष अकाली दल-बसप युतीशी लढण्याच्या तयारीत नसेल, कारण त्या पक्षापुढे कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मोठे आव्हान बनून उभे ठाकलेले असतील. काँग्रेसला आधी कॅप्टनसाहेबांशी लढावे लागेल आणि नंतर ताकद उरलीच तर अकाली-बसप युतीशी लढायचा विचार करावा लागेल. पंजाबच्या पुढच्या सहा महिन्यांच्या राजकारणाचे हे भविष्य आहे आणि ते सांगायला कोणा ज्योतिषाशी गरज नाही.

panjab_1  H x W

असे म्हणतात की प्रवाहात नावेचा नावाडी बदलू नये, अन्यथा नाव बुडू शकते. पूर्वसुरींनी काही विचार करून दिलेला हा सल्ला काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धुडकावत पंजाबमध्ये काँग्रेसच्या नावेचा नावाडी नुसत्या प्रवाहातच बदलला आहे असे नाही, तर काँग्रेसची नाव किनार्‍यावरच्या चिखलात अडकल्यानंतर नावाडी बदलला आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांना बदलून बरेच राजकीय विचारमंथन करून त्यांच्या जागी चरणजीतसिंग चन्नी यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. यामागे काँग्रेसचे काय तर्कट आहे, हे समजायला फार मोठ्या राजकीय बुद्धिमत्तेची गरज आहे, असे नाही. कारण नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्वत:च ट्वीट करून राहुल गांधींनी मोठ्या धाडसाने पंजाबला दलित मुख्यमंत्री मिळवून दिल्याचे जाहीर केले आहे. पण या तर्कटाचा पुरता घोळ झाला आहे.

 
कारण आधी मायावती यांनी आणि नंतर भाजपाने काँग्रेसच्या दलित मुख्यमंत्री करण्यातली हवा काढून घेतली आहे. काँग्रेसला कायमस्वरूपी दलित मुख्यमंत्री नेमायचे दिसत नाही. तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यांनी दलित व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाची संधी देऊन ढोल वाजवला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर ते त्या मुख्यमंत्र्यांच्या माथ्यावर फोडतील. प्रत्यक्षात यामध्ये दलितांचे हित काही नाही, अशा शब्दांत मायावतींनी राहुल गांधी यांच्या तथाकथित धाडसाचे वाभाडे काढले आहेत. पंजाबच्या राजकारणात सध्यातरी काही स्थान नसलेल्या भाजपानेही याच मुद्द्यावर काँग्रेसची खिल्ली उडवून घेतली आहे. एवढे होऊनही काँग्रेस श्रेष्ठी मात्र आपल्या या आयडियेच्या कल्पनेतील राजकीय खेळीवर प्रचंड खूश आहेत. ते स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहेत. पण चरणजीतसिंग चन्नी यांनी शपथ घेऊन बहात्तर तास उलटूनही पंजाबमध्ये मंत्रीमंडळाचा पत्ताच नाही, याची काँग्रेस श्रेष्ठींना जाणीवही नाही!
 
अर्थात पंजाबमध्ये काँग्रेस श्रेष्ठी आपल्या राजकीय संस्कृतीनुसार वागले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण कॅप्टन अमरिंदरसिंग मात्र स्वत:होऊन बाजूला होऊन काँग्रेस श्रेष्ठींना नवे आव्हान देण्याच्या मूडमध्ये आहेत.. किंबहुना वयाच्या 79व्या वर्षी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना काँग्रेस श्रेष्ठी त्यांचे राजकीय उपद्रवमूल्य दाखवून देण्यास भाग पाडत आहेत.
 

panjab_2  H x W 
 
वास्तविक कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पंजाब निवडणुकीच्या आधी फक्त तीन ते पाच महिने बदलून काँग्रेसने असा कोणता तीर मारला आहे किंवा काँग्रेसचे नवे मुख्यमंत्री असे कोणते तीर मारणार आहेत? हे प्रश्न आता सोशल मीडियावर काँग्रेसला टोचून विचारले जात आहेत. हे टोचणे काँग्रेस श्रेष्ठींनी स्वत:होऊन ओढवून घेतले आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी त्यांच्यापुढे असलेला कोणताही राजकीय पर्याय निवडला, तरी एक मात्र निश्चित असेल की कॅप्टनसाहेबांना काँग्रेस श्रेष्ठींना स्वत:चे राजकीय उपद्रवमूल्य दाखवून द्यावेच लागेल, किंबहुना अत्यंत शांतपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आणि मुलाखती देताना त्यांनी हे व्यवस्थित सूचित केले आहे.

 
राजकारणातून त्यांनी बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही. एका अर्थाने मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांना नव्याने काही मिळवायचे शिल्लक राहिलेले नाही, किंबहुना ते त्यांचे वयदेखील नाही. तरीदेखील त्यांच्यासारखे 50 वर्षे राजकारणात राहिलेले आणि साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते आपला अपमान झाला असे उघडपणे म्हणतात, तेव्हा तो काँग्रेस श्रेष्ठींना इशारा असतो आणि तो इशारा स्वत:साठी काही मिळवण्यासाठी दुसर्‍या पक्षात जाण्याचा किंवा स्वत:चा पक्ष उभा करण्याचा नसतो, तर काँग्रेसला स्वत:चे उपद्रवमूल्य दाखवण्याचाच इशारा असतो. त्यामुळेच काँग्रेस श्रेष्ठींनी इतक्या आयत्या वेळेला कॅप्टनसाहेबांना झटका देऊन आपल्यासाठी नजीकच्या भविष्यातला मोठा झटका तयार ठेवलेला आहे, हेच यातून लक्षात येते.

कॅप्टनसाहेबांचे प्रहार काँग्रेस कसे झेलणार?
 
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी जेवढा आवाज काढला नाही, तेवढा आवाज काल काढून घेतला आहे! त्यांनी एका फटक्यातच राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना लपेट्यात घेऊन आपण पंजाब विधानसभा निवडणुकीपर्यंत काय काय करू शकतो, याची झलक दाखवून दिली आहे.
 
टायमिंगचा शॉट मारण्यात तर कॅप्टनसाहेबांचा कोणी हातही धरू शकत नाही. त्यामुळे त्यांनी बरोबर मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा एकदा शॉट मारून घेतला आहे आणि त्याच्यातच त्यांनी सोनिया गांधींना काही बोलून घेतलेले नाही, पण राहुल आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना सोडलेले नाही!
राहुल, प्रियांका तर आपल्या मुलांसारखे आहेत म्हणून त्यांनी कुरवाळून कुरवाळून त्यांना ठोकून काढले आहे. पण नवज्योतसिंग सिद्धू यांना कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रिपद मिळूच देणार नाही हा जो पण कॅप्टनसाहेबांनी केला आहे ना.. तिथेच पंजाबच्या पुढच्या राजकारणाची खरी मेख आहे.

कॅप्टनसाहेब हे काँग्रेसच्या राजकारणात लोणच्यासारखे मुरलेले आहेत, हे नवज्योतसिंग सिद्धू यांना कळण्यासाठी बरीच वर्षे जावी लागणार आहेत. कॅप्टनसाहेबांचा प्रश्न फक्त येत्या विधानसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाही. तिथे काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय तर ते राहणार नाहीतच, पण काँग्रेसच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिस्पर्ध्याला पुरते संपवून टाकणे, हे ते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या बाबतीत करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. पाच महिन्यांसाठी का होईना, पण सिद्धू यांना मुख्यमंत्रिपद मिळू दिले नाही, यातून त्यांनी याची झलक दाखवली आहेच.

पण कॅप्टनसाहेबांची खरी राजकीय खेळी त्याच्या पुढची असणार आहे. काँग्रेसमध्ये अनेकांच्या कारकिर्दीत कशा संपल्या, ते कसे अडगळीत पडले याची उदाहरणे नवज्योतसिंग सिद्धूंनी बघितलेली नाहीत. पण कॅप्टनसाहेबांनी आपल्या 50 वर्षांच्या राजकारणात बरीच अनुभवली आहेत. येत्या पाच महिन्यांनंतर नवज्योतसिंग सिद्धू यांना नेमका हाच अनुभव आणून दिल्याशिवाय ते राहणार नाहीत, हेच त्यांच्या ताज्या मुलाखतीतून स्पष्ट होताना दिसते आहे.
 

आणि नेमका इथेच भाजपा आणि काँग्रेस यांच्या राजकीय संस्कृतीतला भेद दिसतो. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रीमंडळ बिनबोभाट बदलले जाते. नाराजीच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरतात. पण उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची कोणाचीही हिंमत होत नाही आणि इकडे साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते उघडपणे आपला अपमान झाल्याचे पत्रकारांना सांगतात. मुलाखती देतात. याचा अर्थच काँग्रेस श्रेष्ठींची खेळी करण्याची वेळ चुकल्याचे स्पष्ट होत आहे. क्रिकेटमध्ये जसे जीव खाऊन उंच मारलेला फटका सीमारेषेच्या आत झेलला तर षटकार जाण्याऐवजी फलंदाज झेलबाद होतो, तसाच राजकीय टायमिंग चुकलेला फटका त्या पक्षाला पराभवाच्या खाईत नेतो, हा इतिहास आहे आणि तो नजीकच्या भविष्यात काँग्रेस श्रेष्ठींपुढे वाढून ठेवलेला असेल.


panjab_3  H x W
 

यासाठी नवे मुख्यमंत्री चरणजीतसिंग यांच्यापेक्षा नवज्योतसिंग सिद्धू हेच जबाबदार असतील. कॅप्टन अमरिंदरसिंग त्यांना हे दाखवून देतील. पण मुळात कॅप्टन अमरिंदरसिंग हे आता काँग्रेस श्रेष्ठींनाच आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळेच ते आता अत्यंत शांतपणे पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना दिसले आहेत. या त्यांच्या शांततेत उत्तरे देण्यामागे मोठ्या बंडखोरीचा ज्वालामुखी दडला आहे. येत्या तीन ते सहा महिन्यांमध्ये काँग्रेस श्रेष्ठींना त्याचा परिणाम भोगावा लागेल, हे नक्की.
पंजाबमध्ये काँग्रेस श्रेष्ठींनी जे मुख्यमंत्री नेमलेत ना.. त्यांना नीट राज्य करू देणे हे कॅप्टन अमरिंदरसिंग घडू देणार नाहीत. कॅप्टनसाहेबांची मर्जी डावलून काँग्रेसचे मुख्यमंत्री तिथे राज्य करू शकणार नाहीत. काँग्रेस श्रेष्ठींनी आपल्या मर्जीतला मुख्यमंत्री पंजाबमध्ये जरूर लादलाय. पण राज्य चरणजीत चन्नी या मुख्यमंत्र्यांना करायचे आहे. जरा त्यांचे नव्याचे नऊ दिवस संपू द्या, मंत्रीमंडळ बनून राज्य करायला त्यांना सुरुवात तर करू द्या, मग आपण एकीकडे नवज्योतसिंग सिद्धू आणि दुसरीकडे कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कात्रीत अडकल्याचे त्यांच्या लक्षात येईल.. आणि तिथेच काँग्रेस श्रेष्ठी कमी पडताना येत्या काहीच दिवसांत दिसतील. आजचे काँग्रेस श्रेष्ठी म्हणजे काही इंदिरा गांधी नव्हेत की नुसत्या नजरेच्या जरबेत राज्यातल्या नेत्यांना ठेवून आपल्याला हवे ते राज्यामध्ये घडवून घेऊ शकतील. आजच्या काँग्रेस श्रेष्ठींची राजकीय उंची फारच बेताची आहे.
किंबहुना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसची परंपरा तोडून जाता जाता उघडपणे जे सांगितलेय ना, त्यातूनच काँग्रेसच्या सध्याच्या श्रेष्ठींचे राजकीय तोकडेपण उघडे पडलेले दिसले आहे!
 
 
@विनायक ढेरे
9284539978
  
संपादक, thefocusindia.com