हिंदू हेरिटेज मंथ

विवेक मराठी    24-Sep-2021
Total Views |
‘विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका’ (व्हीएचपीए) या संस्थेने इतर अनेक हिंदू संघटनांच्या सहकार्याने ऑक्टोबर महिना हा हिंदू संस्कृतीची ओळख करून देणारा ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाबद्दल समजून घेण्यासाठी आधी इथल्या भारतीय आणि हिंदू समाजाबद्दल थोडे समजून घेऊ या.

hindu_2  H x W:

अमेरिकेत हिंदूंची जनसंख्या एक टक्क्याहून कमी आहे. त्यात पहिल्यांदा आलेल्या भारतातील स्थलांतरितांची जशी पिढी आहे, तसेच इथे जन्माला आलेल्यांची अथवा लहानपणी येऊन वाढलेल्यांची दुसरी आणि काही प्रमाणात तिसरी पिढीसुद्धा आहे. जसे भारतातील हिंदू आहेत, तसेच कॅरिबियन, आफ्रिकन देशातील स्थलांतरितसुद्धा आहेत, ज्यांनी पिढ्यानपिढ्या भारताबाहेर राहूनही हिंदू धर्म सांभाळला आणि आता अमेरिकेत येऊनदेखील हिंदू धर्म आपआपल्या पद्धतींनुसार पाळत आहेत आणि सांभाळत आहेत. त्याव्यतिरिक्त येथे मुळातले नेपाळी नागरिक आहेत आणि भूतान सीमेवरून गेल्या काही वर्षांत निर्वासित म्हणून आलेले नेपाळीसुद्धा आहेत. हिंदू नसलेले असे भारतीयदेखील, अमेरिकन अथवा इथल्या कोणाही अभारतीयाच्या नजरेत समानच दिसतात.
या सार्‍या हिंदू आणि भारतीयांचे वैशिष्ट्य असे आहे की जरी लोकसंख्येच्या प्रमाणाने अल्पसंख्य असले, तरी त्यांचा प्रभाव सर्व क्षेत्रांत दिसून येतो. त्यात जसे माहिती आणि तंत्रज्ञान आहे, तसेच वैद्यकीय, औषधी, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र, कला, वाणिज्य, शैक्षणिक, खाजगी उद्योग, सरकारी, सेवाभावी संस्था, न्यायालये अशी अनेक क्षेत्रे आहेत. आज अनेक प्रमुख खाजगी उद्योगांचे प्रमुख भारतीय आहेत, तसेच बायडेन सरकारमध्येदेखील अनेक भारतीय चांगल्या पदांवर दिसतात. तरीदेखील हे सर्व काही एका रात्रीत घडलेले नाही.
 
70-80च्या दशकात हिंदू समाज संख्येने आणखीनच कमी होता. इतर जनतेला हिंदू या शब्दासंदर्भातच खूप कमी माहिती होती आणि तीदेखील बर्‍याचदा चुकीची असायची - उदाहरणार्थ, योगविद्या (योगा) म्हणजे काळे चेटूकविद्या आहे इथपासून ते भारतीयांच्या जेवणाबद्दल नापसंती असायची. त्या काळात कुंकू लावलेल्या हिंदू स्त्रियांवर न्यू यॉर्कमध्ये, न्यू जर्सीमध्ये हल्ले झाले होते. डॉट बस्टर म्हणून त्या घटना आता लक्षात राहिल्या आहेत. पण आता त्या संदर्भातला काळ बदलला आहे. भारतीय उपाहारगृहे आता अभारतीयांनीदेखील भरलेली दिसतात. विशेषत: शहरांमध्ये भारतीय पेहरावातील स्त्री-पुरुष पाहून आश्चर्य वाटत नाही. ‘इंटरनॅशनल डे ऑफ योगा’ सर्वत्र साजरा होताना दिसतोच, तसेच अगदी इथल्या हिंदू स्वयंसेवक संघाने (एचएचएसने) आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार यज्ञाला अभारतीयसुद्धा उत्साहाने हजर राहून सूर्यनमस्कार घालतात. गेली पंधरा वर्षे एचएचएसने चालवलेल्या राखीबंधन मोहिमेमुळे अनेकदा पोलीस, अग्निशमन दल तसेच कधीकधी राजकीय पुढारीदेखील वाट बघतात आणि आनंदाने हातावर राख्या बांधून घेतात. वर म्हटल्याप्रमाणे, हे सर्व एका रात्रीत घडलेले नाही. व्हीएचपीए, एचएचएस आणि इतर अनेक हिंदू संघटनांनी अनेक वर्षे सातत्याने केलेल्या कामाचा तो एक परिणाम आहे.
नवीन देशात अशी आपली माणसे सहज समरस झालेली असतानादेखील, हिंदू धर्मीयांवरील द्वेष ठरू शकतील असे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात व्यक्तीवरील हल्ले, देवळांवरील हल्ले वाढलेले आहेत. हे हल्ले कुणा एखाद्या व्यक्तीकडून झालेले आहेत. अशा वेळेस सभोवतालचा अमेरिकन समाज कायम पाठिंबा देत आलेला दिसला आहे. असा पाठिंबा देण्यात जशी सामान्य जनता असते, तसेच कायदा-सुव्यवस्था यंत्रणेतील अधिकारीसुद्धा दिसतात.
मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यात एखाद्या संघटित गुन्हेगारीसारखी भर पडलेली दिसते, ती बहुतांशी भारतीयच असलेल्या डाव्या आणि त्यांना हिंदूविरोधात समर्थन करणार्‍या हिंदू नसलेल्या व्यक्तींची आहे. यांची पद्धत वैचारिक अधिक असते. त्यात मग हिंदू धर्माच्या आणि धर्मीयांच्या विरोधात नवीन विचार तयार करणे आणि अत्यंत हळुवार पद्धतीने हिंदूंबद्दल गैरसमज करून ते दृढ होतील असा प्रयत्न करणे यावर भर असतो. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात झालेली हिंदू विरोधातील ऊळीारपींश्रळपस ॠश्रेलरश्र कळपर्र्वीीींंर ही हिंदूविरोधी चळवळ्यांनी आयोजित केलेली परिषद. या संदर्भात आधीदेखील बरेच लिहून आले आहे. पण ही परिषद झाली, तेव्हा एक गोष्ट पूर्ण प्रकाशात आली, ती म्हणजे हिंदू धर्मविरोध. हिंदुत्व हे हिंदू धर्मापेक्षा वेगळे आहे असे म्हणत चालू केलेले आख्यान शेवटी प्रत्यक्षात हिंदू धर्मच कसा विसर्जित करायचा, या मुद्द्यावर येऊन थांबले.
कुठल्याही हिंदू संस्थेसाठीच नाही, तर इथल्या संपूर्ण हिंदू समाजासाठी, आत्ताच्या तसेच भावी पिढ्यांसाठी अशा वैचारिक द्वेषाचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात, याचा व्हीएचपीए आणि इतर हिंदू संघटनांनी एकत्रित विचार केला आणि दिवाळीच्या सुमारास म्हणून ऑक्टोबरमध्ये हिंदू संस्कृतिक महिना देशभर साजरा करायचा ठरवले. यासाठी व्हीएचपीएने हिंदू संघटना, उद्योग, संस्था आदींना सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. सहभागी होणार्‍या संस्थांनी हिंदू धर्मातले आणि संस्कृतीतले वैविध्य कुठल्याही पद्धतीने दाखवून साजरे करावे, असा सहज उद्देश आहे. त्यात संस्कृतिक कार्यक्रम असू शकतात, वेबिनार्स असू शकतात, कोविडसंदर्भातील स्थानिक मर्यादा सांभाळून हिंदू धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, याचे दर्शन होईल, इतरांना ओळख होईल असे कुठलेही कार्यक्रम यात होऊ शकतात.

hindu_1  H x W: 
 
हा कार्यक्रम जरी नुकताच जाहीर झाला असला, तरी त्याला हिंदू समाजातून मिळणारा प्रतिसाद जसा दिसत आहे, तसाच इथल्या सरकारी नेतृत्वांमधूनसुद्धा दिसू लागला आहे. गेल्या आठवड्यात फ्लोरिडा राज्याच्या गव्हर्नर ठेप Ron DeSantisने अध्यादेश काढून ‘ऑक्टोबरमध्ये हिंदू हेरिटेज मंथ साजरा होणार असून त्याला पाठिंबा द्या’ असे संपूर्ण फ्लोरिडा राज्यातील नागरिकांना जाहीर आवाहन केले होते. या आठवड्यात आता टेक्सास आणि न्यू जर्सी या दोन राज्यांच्या गव्हर्नर्सनीदेखील असेच जाहीर केले आहे. या पाठिंब्यामधून स्थानिक हिंदू जनतेवरचा विश्वास दिसतो, हे इथे नमूद करावेसे वाटत आहे.
 
हा कार्यक्रम हिंदूविरोधी वैचारिक कार्यक्रमांप्रमाणे नकारात्मक नसून आपण कोण आहोत हे सकारात्मक दृष्टीने दाखवण्याचा हेतू आहे. म्हणूनच अशा कार्यक्रमातून अभारतीय अथवा हिंद्वेतर अमेरिकन समाजास हिंदू धर्म-संस्कृतीतले वैविध्य समजून घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते. त्याचे परिणाम समरसता वाढण्यात होऊ शकतात आणि एकूणच अमेरिकन समाजाला आणि जिथे जिथे असे कार्यक्रम होतील तिथल्या स्थानिक हिंदू समाजाला हा सगळ्यात मोठा फायदा आहे, असे वाटते.
Pew या विविध विषयांवर सामाजिक नस जाणून घेणार्‍या प्रतिष्ठित संस्थेने 2008मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुसंख्य अमेरिकन समाजाला धार्मिक आणि पांथिक वैविध्याची आणि व्यक्ती विविध मार्गाने अध्यात्मप्राप्ती करू शकते अशी झालेली जाणीव लक्षात आली. अमेरिकन जनतेची ओढ religiousnessपेक्षा म्हणजे पांथिकतेपेक्षा आध्यात्मिकतेकडे spiritualityकडे हळूहळू अधिक होऊ लागली आहे, असेदेखील लक्षात आले आहे. असे पांथिकतेकडून अध्यात्माकडे सहज जाता येणे अवघड असते. अशा वेळेस असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही की जगात फक्त हिंदू धर्म (पंथ नव्हे) असा आहे, जो आध्यात्मिक मार्ग कुणालाही दाखवू शकतो.
हिंदू धर्म तत्त्वज्ञानाबद्दल आणि वैश्विक शांतीसाठी त्याच्याकडून असेलेल्या अपेक्षा आपण अनेक थोर भारतीय विचारवंतांच्या भाष्यातून ऐकत आलो आहोत. पण असेच वाटणारे अनेक पाश्चात्त्य विचारवंतदेखील आहेत. 70च्या दशकात ब्रिटिश इतिहासकार अरनॉल्ड टॉयनबी (Arnold J. Toynbee) याचे एक सुप्रसिद्ध विधान आहे,

It is already becoming clear that a chapter which had a Western beginning will have to have an Indian ending if it is not to end in self-destruction of the human race. At this supremely dangerous moment in human history, the only way of salvation is the ancient Hindu way. Here we have the attitude and spirit that can make it possible for the human race to grow together in to a single family.

 
थोडक्यात, स्वनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगास वाचवण्याची क्षमता केवळ हिंदू धर्म तत्त्वज्ञानातच आहे, असे त्याचे म्हणणे होते. जे 70च्या दशकात काळजी करण्यासारखे वाटणारे जग होते, त्यापेक्षा आज अनेक आव्हानांनी जगाला घेरले आहे. अशा वेळेस ‘हिंदू सांस्कृतिक महिना’सारखे उपक्रम साजरे करून, ‘आपणासी जे जे ठावे, ते ते दुसर्‍यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन’ हे कर्तव्यबुद्धीने करण्याची संधी अमेरिकन हिंदू समाजाने तयार केलेली आहे, हा यावरून निष्कर्ष निघतो.
 
vvdeshpande@gmail.com