भातुकलीचे रंजक विश्व

विवेक मराठी    25-Sep-2021
Total Views |
@मानसी दातार 9975361172
बालपणीच्या भावविश्वात सोबती असणारी भातुकली. या भातुकलीच्या आणि त्यातील भांड्यांच्या आठवणी जागवणारे, विविध मान्यवरांच्या दृष्टिकोनातून तिचे वेगळेपण उलगडणारे हे पुस्तक आहे.
book_1  H x W:
 
‘खेळ मांडीयेला’ ह्या पुस्तकाच्या शीर्षकाच्या सुरुवातीला लेखिकेने - दीपाली केळकरांनी ‘गोष्ट भातुकलीच्या राजाची आणि मान्यवरांच्या भातुकलीची, भांड्यांची’ हे उल्लेखलेले वाक्य आणि विषयाला अनुरूप असलेले मुखपृष्ठ पाहूनच मन वार्‍याच्या वेगाने बालपणी खेळलेल्या भातुकलीच्या रम्य आठवणीत पोहोचले.

 
पुण्याच्या विलास करंदीकर यांच्या भातुकली आणि त्यांनी जपलेली - त्यांच्या संग्रही असलेली 3000 भांडी, ह्या सगळ्यांची त्यांनी भरवलेली 350 प्रदर्शने, या जगावेगळ्या छंदाची माहिती, त्यासाठी केलेली मेहनत, घेतलेले अथक परिश्रम, असलेली तळमळ हे सर्व वाचकांसमोर ठेवावे, अशा विचारांनी दीपालीताईंनी हे पुस्तक लिहिले आहे. ह्या विषयावर एवढे दोनशे पानांचे पुस्तक होऊ शकते, ह्याचे सुरुवातीला आश्चर्यच वाटले. एवढे काय दडलेय बरे ह्या भातुकलीच्या खेळाबद्दल! सुरुवातीला पुस्तक हातात घेऊन शेवटच्या पानापर्यंत ओझरती नजर टाकली.. मनात उत्सुकता निर्माण झाली आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली.
 
अगदी मुखपृष्ठापासून एकेक पान बघत, वाचत गेले, तसतसे अनुक्रमणिकेत उल्लेख केल्याप्रमाणे मान्यवरांच्या नजरेतून भातुकलीबद्दलचे त्यांचे विचार वाचले. सर्वांनी आपापले वैचारिक मुद्दे छान मांडले आहेत. त्यातले स्वाती चांदोरकर, प्रज्ञा कुलकर्णी, सुहासिनी कीर्तिकर, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, प्रवीण दवणे ह्यांच्या नजरेतली भातुकली विशेष भावली. ह्यातली डॉ. अनुपमा उजगरे यांनी भातुकलीला ‘बिनभांड्यांची भातुकली’ असे म्हटले आहे. अगदी समर्पक आहे. पण म्हणजे काय? ते जे वर्णन आहे, ते तंतोतंत पटते.
 
भातुकली विषयावर आणखी काही वेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा होऊ शकते, हेही वाचलं.
 
‘संतसाहित्य आणि भातुकलीचा तसेच इतर खेळ’ ह्या भागातले डॉ. रामचंद्र देखणे, अलकाताई मुतालिक, सीमा गोखले यांनी संतांच्या गाथा-ओव्यांमधून साध्या सोप्या भाषेत भातुकलीचा अर्थ समजावून सांगितला आहे. संतसाहित्यात आलेले भातुकलीचे संदर्भ आध्यात्मिकदृष्ट्या कसे आले आहेत, ह्याची चर्चा आहे.
 
 
याव्यतिरिक्त ‘डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून भातुकली’ हे शीर्षक वाचून थोडे आश्चर्यच वाटले. भातुकलीशी डॉक्टरांचा काय संबंध? परंतु ह्या प्रश्नाचे उत्तर लेख वाचल्यावर कळले की मनोविकास, बालविकास, व्यक्तिमत्त्व विकास होण्यामध्ये बालपणी खेळलेल्या भातुकलीची आणि त्याबरोबर खेळल्या जाणार्‍या खेळांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे त्यांनी काही दाखले देऊन सांगितले आहे.
 
 
त्यानंतर लेखिकेने मराठी साहित्यातले लेखक-लेखिका, कवी-कवयित्री यांच्या लेखांचा आणि कवितांचा संदर्भ देताना त्यासाठी किती सखोल अभ्यास केला आहे हे त्यांच्या लेखनातून जाणवते. खूपच सहजसुंदर, ओघवत्या, रसाळ शब्दांत भातुकलीचे भावविश्व उलगडून दाखवले आहे.
 
लेखिकेबद्दल सांगण्यासारखी आणखी एक खूप छान बाब अशी की सर्व मान्यवरांच्या लेखाच्या-डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या लेखांसह त्या त्या लेखाच्या समारोपाच्या शेवटी पुढच्या कोणत्या मान्यवराने कोणते वेगळे विचार मांडले आहेत ह्याची कल्पना सूचकपणे अगदी एका ओळीत दिली आहे. ही कल्पना खूपच आवडली. त्यामुळे वाचताना उत्सुकता निर्माण झाली.
मान्यवरांच्या शुभेच्छाही वाचनीय आहेत.

‘गाथा भांड्यांची’सुद्धा खूप छान प्रकारे मांडली आहे. विशेषत: भांड्यांचा नावासह फोटोत समावेश केला आहे, त्यामुळे त्याबद्दल स्पष्ट कल्पना येते. भांड्यांना त्या त्या प्रदेशानुसार असलेल्या नावांचा इतिहास कळला. उज्ज्वला ढमढेरे यांच्या 18 प्रकारच्या भातुकलीचेही फोटो छान आहेत. खूप छान मांडणी आहे.

 
ह्या पुस्तकाचा सर्वात आवडलेला भाग म्हणजे अगदी शेवटी परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेल्या रविप्रकाश कुलकर्णी यांचे मनोगत - ‘ठकी तू कुठे आहेस?’ खूपच रंजक आहे, तेवढेच हृद्यही आहे.
 
एकूणच पुस्तक छानच झाले आहे. लेखिकेचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
 
 
ह्या संदर्भात माझ्या आठवणी आहेत, त्याबद्दल थोडेसे सांगावेसे वाटतेय. मान्यवरांनी वर्णन केलेली भातुकली.. जणू काही माझ्याच भातुकलीचे वर्णन केले आहे असेच वाटतेय. भातुकली आणि त्याचबरोबरीने बैठे खेळ खेळायचे - म्हणजे बिट्ट्या, सागरगोटे, काचापाणी वगैरे वगैरे.. मीही माझ्या बहिणीबरोबर आणि मैत्रिणींबरोबर खूप खेळले आहे.
 
 
फोटोत असलेलली तांब्या-पितळेची, लाकडाची जवळजवळ सगळीच भांडी आमच्या घरी होती. याशिवाय चिनी मातीच्या बरण्या होत्या. त्यांना उचलायला कपासारखे एक किंवा दोन कान होते. वर्षभराची चिंच, आमसूल, खडेमिठाची साठवण करण्यासाठी - ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाई. ज्या मोठमोठ्या बरण्या होत्या, त्यांना फिरकीची झाकणे होती, तर लोणचे, मोरंबा वगैरेंची साठवण करण्यासाठी तुलनेने थोड्या छोट्या बरण्या होत्या, त्यांना साधीच नुसती गुंडीची झाकणे होती. साधी झाकणे असलेल्या बरण्यांना - म्हणजे लोणची, मोरंबा भरलेल्या बरण्यांना बुरशी लागून जिन्नस खराब होऊ नयेत, म्हणून आमची आई त्या झाकणांना सुती कापडाचे दादरे बांधून ठेवायची. याव्यतिरिक्त ताक-दह्यासाठी छोट्या बरण्या-सट वगैरेही आमच्या घरी होते. त्या त्या बरणीत ठरलेला ठरावीक जिन्नसच ठेवला जायचा. ही सर्व भांडी आम्ही वापरत होतो, त्याची आठवण झाली. मात्र आता कालपरत्वे स्वच्छता, कल्हई, महागाईच्या कारणांमुळे तांब्यापितळेची भांडी वापरणे बंद झाले.

 
अगदी एक गमतीशीर आठवण आहे, ती सांगण्याचा मोह आवरत नाही, म्हणून सांगते. वर उल्लेख केलेल्या चिनी बरण्यांच्या संदर्भात.
 
 
मी आणि माझी बहीण (आम्ही दोघी जुळ्या आहोत) लहान असतानाची ही गोष्ट. आठवतही नाही, पण आई आणि बहिणी यांच्या तोंडून बर्‍याचदा ऐकली आहे.
 
 
आईने मला आणि माझ्या बहिणीला “अगं मीना-मेधा, ती बरणी द्या बरं. कान धरून बरणी उचला.” असं सांगितलं. (पुढे आमच्या कृतीचं वर्णन वाचल्यावर ‘सांग काम्या ओ नाम्या’ ह्या उक्तीचा प्रत्यय येईल.)
 
 
झालं. आम्ही दोघी बहिणींनी काय केलं असेल? खाली वाकून आम्ही दोघींनी स्वत:चे दोन्ही कान हाताने धरले आणि दोन्ही कोपरांनी बरणी उचलायला लागलो..
 
 

 
पुस्तकाचे नाव : खेळ मांडीयेला
लेखिका : दीपाली केळकर
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, पालघर
पृष्ठसंख्या : 222, मूल्य : रु. 400/-