ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. पन्नालालजी नरुला

विवेक मराठी    25-Sep-2021
Total Views |
@सुरेश दत्तात्रय साठे 9822823653
देशाचे दुर्दैवी विभाजन 14 ऑगस्ट 1947 रोजी घोषित झाले, तरीही त्याअगोदर 1945च्या ऑगस्टपासूनच या भागात मुस्लिमांनी अनन्वित अत्याचार, जुलूम करीत पाकिस्तानच्या सीमा ठरवून घेऊन तेथून हिंदूंना आपली घरेदारे सोडून जीवे मारण्याच्या धमकावणीने निर्वासित होण्याची वेळ आली. या कठीण प्रसंगातून आपल्या समाजाला सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या स्वयंसेवकांमध्ये, नुकतेच निधन झालेले मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती पन्नालाल शेठ उर्फ बाबूजी नरुला यांचाही समावेश होता.

RSS_1  H x W: 0
 
पंजाबात (त्या वेळच्या पंजाबमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल, हरियाणा आणि दिल्लीचाही समावेश होता) 1946मध्ये सर्व प्रमुख शहरांमध्येच संघशाखा सुरू होत्या. सुमारे 400 स्थानी 1000च्या वर रोजच्या शाखा भरत. त्यांचे संचालन करणे, या शाखांना कार्यक्रम देणे आणि रोज कुरापती काढणार्‍या मुस्लिमांशी दोन हात करीत पूर्ण संयम राखून कार्य करणे ही त्या काळी फार कठीण कामगिरी होती. तेव्हाचे प्रचारक वसंतराव ओक, माधवराव मुळ्ये, राजपालजी पुरी, बलराजजी मधोक, ठाकूर रामसिंह हे अखंड प्रवास करून स्वयंसेवकांशी व्यक्तिगत संपर्क ठेवत. हिंदू-शीख समाजाबरोबर राहून या परिस्थितीचा धैर्याने मुकाबला करत शाखाविस्ताराचा आग्रह करीत होते. या ज्येष्ठ प्रचारकांना सर्वांनीच साथ दिली. अशाही देशाच्या विभाजनाच्या पूर्वीच्या गंभीर वातावरणात संघशाखा जोमाने चालू होत्या. 1947च्या जून-जुलैमध्ये पंजाबात फगवाडा व संगर या दोन स्थानी ओटीसी कॅम्प (संघ शिक्षा वर्ग) झाले. या कॅम्प्सना अनुक्रमे 1400 व 2300 स्वयंसेवकांची उपस्थिती होती. या वीस दिवसांच्या वर्गाला पूजनीय श्रीगुरुजी, भैय्याजी दाणी, बाळासाहेब देवरस यांनी भेटी दिल्या. देशाचे दुर्दैवी विभाजन प्रत्यक्ष 14 ऑगस्ट 1947 रोजी घोषित झाले, तरीही त्याअगोदर 1945च्या ऑगस्टपासूनच या भागात मुस्लिमांनी अनन्वित अत्याचार, जुलूम करीत पाकिस्तानच्या सीमा ठरवून घेऊन तेथून हिंदूंना आपली घरेदारे सोडून जीवे मारण्याच्या धमकावणीने निर्वासित होण्याची वेळ आली. माधवराव मुळ्यांच्या चरित्रात मी सविस्तरपणे दिले आहे.
 
या कठीण प्रसंगातून आपल्या समाजाला सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या स्वयंसेवकांमध्ये, नुकतेच निधन झालेले मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती पन्नालाल शेठ उर्फ बाबूजी नरुला यांचाही समावेश होता. मुस्लीम लीगचे नेते अल्पसंख्याकांची (मुस्लिमांची) संकल्पित पाकिस्तान भागात अदलाबदल करण्यासाठी त्यांच्या जनतेला चिथावणी देत होते. केवळ संघाचे स्वयंसेवकच याचा प्रतिकार करीत होते. पं. लेखराज शर्मा, भाई महावीर, चमनलालजी, ब्रह्मदेवजी, केदारनाथ साहनी, अशोक सिंघल, केवळ मल्कानी, जगदीशप्रसाद माथुर, यज्ञदत्त शर्मा, जगदीश अब्रील, डॉ. हरवंशलाल, मनोहरजी हरकरे, बलदेव प्रकाश, झमटमल वध्वानी, बलरामजी टंडन, श्रीचंद गोयल, ईश्वरचंद महाजन, डॉ. मंगल सेन आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह पन्नालालजीही अमृतसरमध्ये भाईजी महावीरांसह कार्य करीत होते. त्या संघर्षाच्या दिवसात प्रचारकांसह अनेक स्वयंसेवक झोकून पूर्ण वेळ देशकार्यासाठी झटत होते. वरील ज्येष्ठांचा यासाठी उल्लेख केला की, 1950नंतर हे सर्व जण संघपरिवाराच्या विविध संघटनांमध्ये पुढे अनेक वर्षे सक्रिय होते. काहींनी भारतीय जनसंघाचे कार्य केले. त्या त्या राज्यांमध्ये मंत्रीही होते.
 
 
दरम्यान सीमेवरील हिंदू-मुस्लीम कुटुंबांची स्थलांतरे सुरू झाली. पाकिस्तानात जाऊ इच्छिणार्‍यांना पाठविण्याचा सपाटा सुरू झाला. संघकार्यकर्त्यांनी त्याच वेळी हिंदू-शिखांना हिंदुस्थानात आणण्याची शिकस्त केली. काश्मीर-पंजाब-सिंध प्रांतातून लाखो हिंदू निर्वासित होऊन आपल्या देशात आले. सरकारने उर्वरित पंजाबात विविध ठिकाणी या विस्थापितांचे तात्पुरते कॅम्प्स उभे केले. संघाने एकूण 55 स्थानी अशा कॅम्प्समधून हिंदू कुटुंबांना सर्व प्रकारची मदत देण्याची शिकस्त केली. प्रत्येक कॅम्प्स (छावण्यांमधून)मधून चार-पाच हजार निराधार कुटुंबे सुमारे 2 वर्षेपर्यंत राहत होती. अगदी मर्दन, तक्षशीला, अटक, पेशावर, रावळपिंडी, सियालकोट, लाहोर, मियाँवाला, लायलपूर, मुलतान इ. भागातून ही हिंदू कुटुंबे अक्षरश: अनाथ होऊन, त्यातील काही जखमी अवस्थेत हिंदुस्थानात आली होती. पाकव्याप्त या भागातून त्यांना हुसकावून लावण्यात आले. कराची, उमरकोट, हैदराबाद, लखाना, खैरपूर या सिंध प्रांतातही हाच प्रकार घडला. तेथील हिंदूंना लुबाडून, स्त्रियांची अब्रू लुटून रिक्तहस्ते हिंदुस्थानात पळवून लावण्यात आले. राजस्थान, गुजरात सीमेवर त्यांचेही कॅम्प्स उभारले गेले. तेथेही पं. लेखराजजी शर्मा, राजपालजी पुरी, मनोहरजी हरकरे, झमटमल वध्वानी, लालकृष्ण अडवाणी इ. त्या वेळच्या प्रचारकांनी या सर्व विस्थापित कुटुंबीयांना सर्व प्रकारचा आधार दिला.
पंजाब, काश्मीर सीमेवरील बहुतेक निर्वासित दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल भागात जाऊन राहू लागले. सिंध कराची भागातून आलेल्यांनी ठाणे, मुंबई गाठली. यापूर्वी दुसर्‍या महायुद्धानंतर 1942मध्ये देशात कमालीची आर्थिक मंदी आली, रोजगार मिळेनासा झाला, तेव्हाही ग्रामीण भागातील कुटुंबे शहराकडे नोकरी-व्यवसाय शोधण्यासाठी मार्गस्थ झाल्याचा इतिहास आहे. त्याही वेळी मुंबईत बर्‍याच पंजाबी, सिंधी बांधवांचे येणे झाले. पुणे, नागपूरमध्येही काही स्थायिक झाले. मुंबईतील कफ परेड, पेडर रोड, नेपियन सी रोड, कुलाबा भागात त्यांनी वस्ती केली. त्यात इंद्र अडवाणी, मोहन मोटवाणी, राम बत्रा, भाईनी कामदार, सदाजीवत लालजी (पंजाबी चंदू हलवाई नावाने प्रसिद्ध), नारायणलाल बन्सीलाल पित्ती (शांग्रिला बिस्किट्सचे मालक), सोहनसिंह तीर्थदासजी तलरेजा, खानचंद गोपालदास इ. संघस्वयंसेवक होते. अल्पावधीत यांनी आपल्या व्यवसायाचे बस्तान स्थिर करून जमेल ते संघकार्यही केले.
 
पन्नालालजी व त्यांचे मोठे बंधू कुटुंबीयांसह 1949मध्ये अमृतसरहून मुंबईत आले. अमृतसरमध्ये झालेल्या दंगलीत त्यांच्यासह अनेकांची घरे आगीत भस्मसात केली होती. लाहोरबरोबर अमृतसरही मुस्लिमांना पाकिस्तानात हवे होते. त्यासाठी हा संघर्ष, दंगली इ. चालले होते. पण सरदार पटेलांनी खंबीर राहून ही कृती निष्फळ ठरविली. मुंबईत नरुलांचे मामेभाऊ सुखबिरसिंह उप्पल हे तेव्हा कापड व्यवसायात होते. त्यांनी या बंधूंना याच व्यवसायात लावून घेतले. प्रारंभी घाटकोपर, मुलुंड परिसरात सायकलवरून घरवस्तीत जाऊन बाबूजी पंचे-टॉवेल्स, बेडशीट्स इ. विकत असत. त्याच दिवसांत पंजाब-सिंधमधून आलेले राजपालजी पुरी, झमटमलजी वध्वानी, हिंगोराणी बंधू, रमणलाल बोधा, हशूजी अडवाणी, मंशारामाणी असे संघाचे कार्यकर्तेही व्यवसाय नोकरीच्या शोधात फिरत होते. सुदैवाने बहुतेकांना लहान-मोठा व्यवसाय मिळाला. पुढे अनेकांनी त्यात लौकिक संपादन केला.
सिंधमधून आलेल्या कुटुंबांना मुलुंडमधील निर्वासित कॉलनीत जागा मिळवून देण्यापासून छोटा जमेल तो व्यवसाय-नोकरी मिळवून देण्यासाठी संघकार्यकर्ते मोहनलाल बिदीचंदानी, मंगलरूपाणी इ. मन लावून काम करीत होते. राजपालजी पुरींच्या आग्रहावरून पन्नालालजी मुलुंडला गेले. तेथे कुटुंबासह कॅम्पात वास्तव्य करू लागले. कापडविक्रीचे लहानसे दुकान त्यांनी सुरू केले. त्यातून अनेकांशी संबंध आले. ठाण्याचे प्राप्तिकर सल्लागार संघकार्यकर्ते भगवानराव पटवर्धन, मुलुंडचे जनसंघाचे कार्यकर्ते बाळासाहेब धारप, तसेच लुधियाना वूलन मिल्सचे उप्पल यांच्या सहकार्याने पन्नालालजींनी प्रारंभी 5 पॉवर लूम्स सुरू केल्या. भिवंडीचे मखिजा (संघाचे संबंधित) यांनी आवश्यक ते माग व ते चालविणारे तंत्रज्ञही दिले. 1958मध्ये नरुलांनी स्वत:च्या छोट्याशा कापड गिरणीचा शुभारंभ केला. जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकरराव महाजन, हशूजी अडवाणी, विभाग संचालक वामनराव ओक (वकील) उद्घाटनासाठी आल्याचे पन्नालालजींनी सांगितले. व्यवसायात स्थिर होत असताना नित्य संघाची शाखा व अन्य प्रासंगिक कार्यक्रमांना उपस्थित राहत असत. ऑक्टोबर 1961मध्ये मुलुंड येथे महाराष्ट्र प्रांताचे दोन दिवसांचे शिबिर झाले. सुमारे 10 हजार स्वयंसेवक उपस्थित होते. यासाठी पूजनीय श्रीगुरुजी, मा. एकनाथजी रानडे, मा. माधवराव मुळ्ये इ. उपस्थित होते. तेव्हा या शिबिरासाठी नामदेवराव घाडी, रमणलाल बोधा, वसंतराव काणे, प्रेमजीभाई ठक्कर, भाऊसाहेब केळकर यांच्यासह पन्नालालजींनी बरेच काम केले. याशिवाय माधवराव मुळ्ये, मा. यादवराव जोशी यांचा मुक्कामही त्यांच्या घरीच होता.
 
पुढील 5-7 वर्षांत पन्नालालजींनी आपला कापड उद्योग विस्तारित केला. 1970मध्ये त्यांचे चार स्थानी पॉवर लूम्स व कापड उद्योग सुरू झाले. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण औद्योगिक वसाहतीत दोन कारखाने - चिपळूण टेक्स्टाइल व महाटेक्स उद्योग स्थापित करून परिसरातील 350 तरुणांना यात नोकरी मिळाली. फॅबिना फॅब्रिक्स नावाने कल्याण-भिवंडी रस्त्यावर सरवली औद्योगिक वसाहतीत असेच एक युनिट सुरू केले. तेथेही तीन शिफ्ट्समध्ये 150 स्थानिकांना रोजगार दिला गेला. मुलुंडला प्रसिद्ध एस.एच. केळकर कंपनीजवळ मुलुंड नाक्याच्या बाजूलाच बीना टेक्स्टाइल हा कारखाना होता. तेथे 80च्या वर कामगार होते. मुंबईत धोबीतलाव येथे मेट्रोसमोर मोठे ऑफिस असा एकूण व्याप नरुला कुटुंबीय सांभाळीत होते. दोन चिरंजिवांच्या मदतीने बाबूजी (पन्नालालजींचे व्यावसायिक सर्वश्रुत नाव) हे सर्व सांभाळत होते. महिन्यातून किमान दोन वेळा त्यांचे चिपळूणला येणे होई. उत्तम प्रतीचे कापड तयार करून स्थानिक बाजारपेठ तसेच काही प्रमाणात निर्यात असे वितरण केले जाई. सुमारे 30 वर्षे त्यांनी चारही कारखाने यशस्वीपणे चालविले. अनेकांना रोजगार दिला. शिवाय 15 अ‍ॅन्सिलरी युनिट्सना प्रोत्साहन दिले. 1985मध्ये त्यांना इंडियन मर्चंट्स चेंबरचा व महाराष्ट्र शासनाच्या या क्षेत्रातील मानाचा पुरस्कारही मिळाला. अरविंदभाई मफतलाल, रामकृष्णजी बजाज, त्या वेळचे कृषिमंत्री पी.के. सावंत, सरसंघचालक बाळासाहेब देवरस, मा. लालकृष्ण अडवाणी इ. मान्यवरांनी बाबूजींच्या उद्योगांना भेटी दिल्या. निर्वासित म्हणून पंजाबातून मुंबईत येऊन स्वत:चे भांडवल नसतानाही अल्पकाळात एवढा मोठा उद्योग विस्तार करून लौकिक मिळविल्याबद्दल सर्वत्र बाबूजींचे कौतुक होत होते.
1995मधील मुंबईतील गिरणी कामगारांचा संप, आर्थिक मंदी, तशात सुरत कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे स्थानिक मालाची कमी झालेली मागणी इ. कारणांनी बाबूजींना एकूण उत्पादनात घट यायला लागली. मागणी कमी होऊ लागली. उद्योगावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. पुढील 4-5 वर्षांत चिपळूणचे व सरवलीचे कारखाने बंद करावे लागले. त्यांचे धाकटे चिरंजीव अजय हे व्यवसायात मन लावून काम करीत, पण अगदी अचानक त्याचे (वय 50) निधन झाले. याही कारणाने फक्त मुलुंड कारखाना चालू ठेवून जमेल तेवढा धंदा करण्याची वेळ आली. वाढते वय व केवळ एका मुलाचा आधार यामुळे उत्पादनापेक्षा ट्रेडिंगमध्ये त्यांनी समाधान मानले.
 
 
पण या सर्व धावपळीत, तसेच उद्योगाच्या चढउतारात बाबूजींनी संघसमर्थन कधीही कमी केले नाही. अगदी जनसंघ - पुढे भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विद्या भारती इ. परिवारातील कामांना शक्य ती सर्व आर्थिक मदत केली. थोडीफार मिळवूनही दिली. रामभाऊ गोडबोले, वेदप्रकाश गोयल, दामुअण्णा टोकेकर, झमटमलजी वध्वानी या सर्वांचा बाबूजींशी जवळून संबंध होता. त्यांच्या सूचनेनुसार बाबूजी साहाय्य करीत असत. रत्नागिरी जिल्ह्यात श्रीगुरुजी गोळवलकर ग्रामोत्थान प्रकल्प, माधवराव मुळ्ये शैक्षणिक संकुल, चिपळूण येथील माध्यमिक शाळा व कॉलेज तसेच श्रीविंध्ववासिनी, श्रीपरशुराम देवस्थान इ. संस्थांना त्यांनी भरीव आर्थिक मदत केली. आणीबाणीत त्यांच्या घरी मा. रज्जुभैय्याजी गुप्तपणे नाव बदलून राहत होते. पुढे ते सरसंघचालक झाल्यावरही बाबूजींकडे येत असत.
पन्नालाल नरुला यांचे दि. 7 जून रोजी वयाच्या 96व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. संसार सांभाळून संघ प्रचारकांप्रमाणेच सातत्याने काही वर्षे संघाचे कार्य करणारे बाबूजींसारखे अनेक कार्यकर्ते होते, आजही आहेत. देशविभाजनाच्या वेळची एकूण परिस्थिती अतिशय भयानक होती. त्या भागातील हिंदू बांधवही सुरक्षित नव्हते. त्यात कुटुंबाची वाताहत, भीषण आर्थिक परिस्थिती होती, पण या सर्व आपत्तीला तोंड देऊन आपल्या जीवनात यशस्वी झालेली अनेक व्यक्तिमत्त्वे आहेत. ते सर्व आपल्यात नसले, तरी सदैव त्यांचे संस्मरण सर्वांनाच प्रेरणादायक ठरत असते. नवीन पिढीला पूर्वेतिहास ज्ञात व्हावा, म्हणून प्रारंभी थोडे विस्ताराने विवेचन केले आहे. या सर्वच दिवंगतांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.