प्रत्येक शाळेत वेधशाळा

विवेक मराठी    25-Sep-2021
Total Views |
@रमेश परांजपे 9322964215
 शालेय विद्यार्थ्यांना हवामानासंबंधीची माहिती, नोंदणी, हवामानातील बदल यांबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने विज्ञान भारती, पुणे यांच्याद्वारे ‘प्रत्येक शाळेत वेधशाळा’ ही योजना हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालघरमधील ग्राममंगल मुक्तशाळेत नुकतेच राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे.



meteorological informatio

विज्ञान भारती, पुणेद्वारा ‘प्रयोगातून विज्ञानप्रशिक्षण’ या प्रकल्पाअंतर्गत, विलास रबडे यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून साकार झालेल्या ‘प्रत्येक शाळेत वेधशाळा’ योजनेचा शुभारंभ रविवार दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी कोकण किनारपट्टीवरील ग्राममंगल मुक्तशाळा, ग्राममंगल ऐने, तालुका डहाणू, जिल्हा पालघर या आदिवासी भागातील शाळेपासून झाला. हे हवामान केंद्र स्वनियंत्रित, सौर ऊर्जेवर चालणारे व इंटरनेटने जोडलेले आहे. साधारण दर दहा सेकंदांनी त्याची माहिती अद्ययावत होते व त्याच्या सांकेतिक स्थळावरून मोबाइल फोनमध्ये पाहता येते.
 
काय आहे हा प्रकल्प? कोणतीही संकल्पना किंवा घटना कानांनी ऐकून समजते, त्यापेक्षा डोळ्यांनी पाहून जास्त समजते आणि प्रत्यक्ष कृतीतून किंवा सहभागातून सर्वात चांगली समजते, या मूलभूत तत्त्वावर आधारित शालेय विद्यार्थ्यांना हवामानासंबंधीचे प्राथमिक ज्ञान अवगत करून देण्याच्या उद्देशाने दैनंदिन हवामानासंबंधीची माहिती, त्यात होणारे दैनंदिन व नैमित्तिक बदल यांचे निरीक्षण व नोंदी कृतींद्वारे शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, अशी ही योजना आहे. या योजनेच्या सुरुवातीची सर्व प्रक्रिया, सभा व नियोजन करण्यासाठी व सुरुवातीच्या सर्व मांडणीसाठी पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील कर्वे रोडवरील विमलाबाई गरवारे शाळेतील सर्वांचे चांगले सहकार्य लाभले. या शाळेतील मुख्याध्यापक, विद्यार्थी यांचा व अन्य संबंधितांचा उत्तम सहयोग लाभला. डिसेंबर 2020मध्ये या संदर्भातली पहिली सभा झाली. या सभेत एक संयंत्र विकसित करण्याचे ठरले. या कामासाठी निधीची अर्थातच गरज होती. त्यासाठी जनतेस आवाहन करण्याचे ठरले. रमेश वा. परांजपे यांनी तिथल्या तिथे 10,000/- रुपये देणगी देण्याचे मान्य करून त्यानुसार तत्काळ ए.टी.एम.मधून रक्कम काढून दिली. तसेच रमेश तेलंग व प्रकाश आपटे या देणगीदारांनी प्रत्येकी 50,000/- रुपये दिले, तर वामन जोगळेकर यांनी ऑसिलोस्कोप व मल्टिमीटर दिला. अशा प्रकारे आर्थिक पाठबळही मिळणे सुरू झाले. या सभेत साईनाथन अय्यर (व्ही.आय.टी. इंजीनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी), डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी (निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा), विलास रबडे (प्रकल्प संकल्पक), रमेश परांजपे (निवृत्त शिक्षक, माध्यमिक शाळा, बृहन्मुंबई महानगरपालिका), वामन जोगळेकर, चारूहास आलेगावकर आदी सदस्य उपस्थित होते.

पुण्यातील VIT इंजीनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थी साईनाथन अय्यर याने भरपूर अचूकतेच्या निकषानुसार हे हवामान संयंत्र विकसित केलेले आहे. या कामी या विद्यार्थ्याला आलेगावकर यांच्या कारखान्यातून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. शैक्षणिक संकुल व कारखानदारी एकत्र आल्यास एखादे उत्पादन अचूक व विक्रीयोग्य तयार करता येते, याची प्रचिती हे संयंत्र बनवताना आली. शिक्षणपद्धतीतील हा छोटासा बदल निश्चित स्वागतार्ह आहे, तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला पोषक असा आहे. या कृतीमुळे दहा आज्ञा वापरून अचूक उत्पादन कसे बनवावे, याची रचना तयार झाली आहे व अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी तिचा वापर करू शकतील.

meteorological informatio 
 
हवामानात वेळोवेळी होणारे तात्कालिक बदल, त्यांची कारणे याबाबतची माहिती अधिकृतरित्या शालेय विद्यार्थ्यांना त्यांनीच नियमितपणे केलेल्या निरीक्षणांच्या व नोंदींच्या साहाय्याने मिळणार आहे. या प्रकल्पाच्या कार्यवाहीतून त्यांना निष्कर्ष काढण्याची सवयही लागणार आहे. स्थानिक पातळीवरील शेतकर्‍यांनासुद्धा या प्रकल्पाच्या कार्यवाहीनंतर वादळे, हवामानात वेगाने होणारे बदल, पर्जन्य इ.ची माहिती मिळून काही वेळा होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. हे हवामान केंद्र स्वनियंत्रित व सौर ऊर्जेवर चालणारे आहे आणि त्याच्या संकेतस्थळावरून हवामानविषयक सर्व माहिती इंटरनेटद्वारा मोबाइल फोनवर जगात कोठूनही पाहता येईल. अशी आणखी चार स्वयंचलित हवामान केंद्रे महाराष्ट्रात सुरू करण्याचा विज्ञान भारतीचा मनोदय आहे.
 
https://www.wunderground.com/dashboard/pws/ID-H-N1
  
डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी हवामान विषयावर पाठ्यपुस्तक लिहीत आहेत, ज्यायोगे विद्यार्थ्यांना हवामान, पर्यावरण व शेती या विषयांचे सखोल ज्ञान मिळेल.
 
 
ग्राममंगल मुक्तशाळेत रविवारी दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुणे वेधशाळेचे माजी हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ग्राममंगल मुक्तशाळेचे प्रमुख डॉ. रमेश पानसे, विज्ञान भारतीचे ज्येष्ठ सदस्य विलास रबडे, श्याम जोशी, उद्योजक चारुहास आलेगावकर, अरविंद पिसोळकर, प्रा. विद्याधर अमृते, हवामानतज्ज्ञ विलास मुजुमदार आदी उपस्थित होते.
केंद्र सुरू केल्यानंतर अवघ्या दोन तासांत 10 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद विद्यार्थ्यांनी घेतली. त्यांची माहिती शेतकर्‍यांना दिल्यानंतर त्यावर आधारित पिकांचे नियोजन करण्याचा संकल्प गावातील शेतकर्‍यांनी व्यक्त केला.


meteorological informatio
 
कोकणातील आदिवासी भागात असलेल्या या शाळेपासून असे पहिलेच केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रामुख्याने स्वयंचलित आणि हाताने नोंदी घेणारे अशी दोन प्रकारची हवामान केंद्र बसवण्यात आली आहेत. या शाळेत मुख्यत्वे वारली, महादेव कोळी व कातकरी या आदिवासी समाजांचे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी येथे पडणार्‍या पावसाच्या नोंदी घेणार आहेत. या स्वयंचलित केंद्रामध्ये तापमान, आर्द्रता, वार्‍याचा वेग, दिशा, पावसाची तीव्रता, एकंदर पडलेला पाऊस, वार्‍याची सतत दिशा बदलणे, जाणवणारे तापमान यांचे सेन्सर बसवलेले आहेत. साधारण दर दहा सेकंदांनी त्याची माहिती अद्ययावत होते. हाताने नोंदी घेणार्‍या यंत्रामध्ये पर्जन्यमापक ठेवलेले आहे. सकाळी साडेआठ वाजता व संध्याकाळी साडेपाच वाजता विद्यार्थी त्याच्या नोंदी घेणार आहेत. पूरपरिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

 
पुणे वेधशाळेचे माजी हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची करिअरची दिशा बदलली आहे. यात हवामान हा विषय विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित होत आहे. आता हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. बदलत्या हवामानाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील सर्व विद्यार्थी हवामान दूत बनले पाहिजेत. त्यांना हवामानविषयक बहुतांश बाबी कळणार असून हेच विद्यार्थी उद्याचे हवामानतज्ज्ञ बनणार आहेत. त्यासाठी हवामान चळवळीची सुरुवात शाळेपासून होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरिता इंटरनेट हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे हवामानाची माहिती सगळ्यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे.”

 
ग्राममंगल मुक्तशाळेचे प्रमुख डॉ. रमेश पानसे म्हणाले की, “आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. आता ही शेती बेभरशाची झाली आहे. शेतकर्‍यांना अगोदरच हवामानाची माहिती मिळाली, तर होणारे नुकसान टाळता येणार आहे. या केंद्रातून शेतकर्‍यांना विविध बाबींची माहिती मिळणार असल्याने शेतकर्‍यांना फायदा होईल. ही माहिती रोज मिळणार असल्याने काय बदल होतात, याची माहिती विद्यार्थ्यांना व शेतकर्‍यांना कळणार आहे. त्यासाठी हे हवामान केंद्र सर्वांसाठी खुले राहील.”