क्रांतिकारक व कृषी संशोधक - डॉ. पांडुरंग खानखोजे

विवेक मराठी    27-Sep-2021
Total Views |
@ डॉ. क.कृ. (नाना) क्षीरसागर 9422080865

krushi_2  H x W
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी क्रांतिकारक जीवनासाठी सैनिकी शिक्षणही घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. असे असूनही जीवनप्रवासात त्यांची कृषी विषयक ज्ञानलालसाही सतत जागृत होती. मात्र त्यांच्या देशभक्तीच्या अतीव ओढीमुळे त्यांच्या कृषितज्ज्ञ व्यक्तिमत्त्वाची बाजू काहीशी अज्ञातच राहिली आहे. तरीही कृषिक्षेत्रातील त्याच्या उपलब्ध योगदानाची जास्तीत जास्त नोंद या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची खरी ओळख काय? प्रखर क्रांतिकारक की बुद्धिमान कृषिशास्त्रज्ञ? खरं पाहिलं तर दोन्ही ओळखी योग्यच ठरतात. मात्र त्यांच्या देशभक्तीच्या अतीव ओढीमुळे त्यांच्या कृषितज्ज्ञ व्यक्तिमत्त्वाची बाजू काहीशी अज्ञातच राहिली आहे. कृषितज्ज्ञ म्हणून त्यांचं चित्र रेखाटताना त्याला पूर्णत्व देता येत नाही, कारण एक तर त्यांनी स्वत:विषयी लिखित स्वरूपात ठेवलेलं फारसं काही हाती लागत नाही. त्यांच्या काही चरित्रलेखकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांनीसुद्धा ती खंत नोंदवून ठेवली आहे. तरीही कृषिक्षेत्रातील त्याच्या उपलब्ध योगदानाची जास्तीत जास्त नोंद या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्रुटी राहणं अपरिहार्य आहे. त्यांची ओळख होण्यासाठी त्यांच्या देशभक्त मनोवृत्तीची पार्श्वभूमीही विचारात घ्यायला हवी.

 
बालपण

पांडुरंग खानखोजे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 रोजी वर्धा येथील पालकवाडी या ठिकाणी झाला. त्यांचे वडील सदाशिव व्यंकटेश खानखोजे यांचा व्यवसाय न्यायखात्यातील ‘पिटिशन रायटर’ (अर्जीनवीस) म्हणजे अर्ज लिहिण्याचा होता. पैसे घेऊन दुसर्‍यांचे अर्ज लिहिण्याच्या कामासाठीसुद्धा तत्कालीन सरकारी प्रमाणपत्राची आवश्यकता असे, म्हणून कायद्याचा अभ्यास मराठीतून करावा लागे व परीक्षा द्यावी लागे. त्यांचं मुसलमानी वळणाचं आडनाव ‘खानखोजे’ हे आपल्या फारसं परिचयाचं नाही. पण त्यांच्या पूर्वजांनी गोंड लोकांना बाटवणार्‍या एका अज्ञात खानाची ‘खोज’ (शोध) केली, त्यावरून हे नाव पडल्याचं सांगतात. नागपूरकर भोसल्यांना या त्यांच्या कामगिरीचा उपयोग खानाचा बंदोबस्त करण्यासाठी झाला. पांडुरंग यांचे आजोबाही 1857च्या सशस्त्र क्रांतीमध्ये सामील झाले होते. हीच त्यांच्या क्रांतिकारक आयुष्याची पायाभरणी असावी. पांडुरंग हा सदाशिव यांचा पहिला मुलगा. वडील कटोलहून पालकवाडी (वर्धा) येथे स्थलांतरित झाले. तिथेच पांडुरंगाचं प्राथमिक मराठी शिक्षण झालं. त्यानंतरचं माध्यमिक शाळेतलं इंग्रजी चौथ्या वर्षाचं शिक्षण पूर्ण करून तो नागपूरला नील सिटी हायस्कूलमध्ये दाखल झाला. त्याच्या माध्यमिक शाळेतील शिक्षणाबरोबरच त्याने देशभक्तीचे धडे गिरवले. थोडा मोठा झाल्यावर ‘बांधव समाज’ या देशभक्तांच्या संघटनेने लोकजागृतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळात त्यांनी शेतकर्‍यांचे मेळावे घेतले. क्रांतीसाठी सैनिकी शिक्षणाप्रमाणेच आपण शेतीशास्त्रही शिकलं पाहिजे असा महत्त्वाचा विचार त्यांच्या मनावर कायमचा ठसला. पांडुरंग अल्पवयीन असतानाच, पूर्वीच्या रितीप्रमाणे वडिलांनी त्यांच्या लग्नाचा घाट घातला, पण दोन्ही वेळी तो फसला आणि त्यांनी घरच सोडलं. पांडुरंग जणू हातातूनच निसटला. लोकमान्य टिळक आणि देशातील इतर जहाल क्रांतिकारक, त्याचप्रमाणे जगभर विखुरलेले क्रांतिकारक यांच्याशी त्यांचा सतत संबंध आला आणि क्रांतिकारक जीवनासाठी सैनिकी शिक्षणही घेण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला. जगभरच्या भटकंतीमुळे अनेक लोकांशी त्यांचा परिचय झाला. अनेक भाषांची ओळख झाली.
 
 
कृषिकार्याची पार्श्वभूमी
 
 
अशा या जीवनप्रवासात त्यांची कृषीविषयक ज्ञानलालसाही सतत जागृत होती. 1911मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या आरेगॉन येथील अ‍ॅग्रिकल्चरल कॉलेजातून त्यांनी कृषिशास्त्राची बी.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी ते पंचवीस वर्षांचे होते. या पदवीमुळे त्यांना वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात नोकरी मिळाली. तेथूनच 1913मध्ये त्यांनी पुढची एम.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी त्यांनी शेतावर काम करून आपली आर्थिक गरज भागवली. हा पदवी अभ्यास करताना सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी त्यांचा खूप जवळून संबंध आला. त्यामुळे शेतकरी समाजाला उपयुक्त अशा कृषिकार्याचं महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं. म्हणून पुढचं शेतीविषयक शिक्षण त्यांनी चालूच ठेवलं. मिनेसोटा विद्यापीठातून 1914 साली त्यांना डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळाली. या पीएच.डी. पदवीसाठी त्यांनी गव्हावर सखोल संशोधन केलं होतं.
कृषिसंशोधन व अध्यापन
 
या वेळी डॉ. खानखोजेंची आर्थिक परिस्थिती दयनीय होती. परंतु मेक्सिकोत गणराज्याचे कृषिमंत्री व खानखोजेंचे पूर्वीचे मित्र रामोन पी. देनेग्री यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांना नोकरीची संधी मिळाली. मेक्सिकोमधील राष्ट्रीय कृषी विद्यापीठ जवळच्या चापिंगो गावी स्थलांतरित झालं. त्यामधील कृषी रसायन प्रयोगशाळेत त्यांना काम मिळालं. त्याआधी खानखोजेंनी स्पॅनिश ही स्थानिक भाषा अवगत करून घेतली होती. या प्रयोगशाळेत काम करतानाच त्यांनी आपलं संशोधनाचं कामही सुरू केलं. कृषी महाविद्यालयाची हजारो हेक्टर शेती होती. त्यामुळे कोणतीच अडचण नव्हती. काही दिवसांनी नियोजित ठिकाणचं स्थलांतरित महाविद्यालय व प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी राष्ट्राध्यक्ष ओब्रेगान आले होते. खानखोज्यांच्या प्रयोगशाळेची पाहणी करताना ते तेथील सुव्यवस्थेवर खूश झाले. परंतु बाहेरच्या घाणेरड्या पत्र्याच्या डब्यातील मक्यांच्या रोपांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत चौकशी केली, तेव्हा रामोन पी. देनेग्री यांनी ते प्रयोग या हिंदू प्राध्यापकाचे आहेत असं सांगितलं. मग डॉ. खानखोजे यांनी या प्रयोगांची - म्हणजे मका पीक सुधारण्यासाठीच्या प्रयोगांबद्दलची साद्यंत माहिती सांगितली. मात्र या प्रयोगाचे निष्कर्ष मोठ्या प्रमाणात सोनोरा कृषिसंशोधन क्षेत्रात सिद्ध करून दाखवावेत असं आव्हान त्यांना दिलं गेलं. ही संधी डॉक्टरांनी अचूकपणे साधली आणि राष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या कणसांना पहिलं पारितोषिक मिळालं.
 
 
याचा परिणाम म्हणून त्यांना वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मक्याबद्दल शिकवण्यासाठी प्राध्यापकपद दिलं गेलं. त्यांचे त्या वेळचे विद्यार्थी आणि पुढे कृषितज्ज्ञ झालेल्या एमिलिनो अलानिस पॅटिना यांनी त्यांच्या शिकवण्याची खूप प्रशंसा केली आहे. तरीही प्रा. खानखोजे यांना काही महिने घरी बिनपगारी बसून राहावं लागलं. नंतर सरकारी कृषी महाविद्यालयात प्राध्यापकपदी त्यांची नेमणूक झाली.
 
 
त्यांच्या अध्यापनाचा लौकिक वाढला. जमीन आणि पिकं, अनुवंशशास्त्र हे त्यांचे हातोटीचे विषय. कृषिक्षेत्रात त्यांचा लौकिक दूरवर अमेरिकेतल्या भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. त्यांच्या ‘हिंदुस्थानी स्टुडंट्स’ या मासिकात 1926मध्ये त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. मासिकाचे संपादक होते ना.भि. परुळेकर, एन.जे. भोळे, गुर्जर वगैरे. त्यात त्यांनी भारताला डॉ. खानखोजे यांच्या कामगिरीची आवश्यकता आहे असं लिहिलं होतं.

 
अध्यापनाबरोबरच त्यांनी गव्हावरचं आपलं संशोधनही चालू ठेवलं. गव्हाचं सुधारित वाण तयार करण्यावर त्यांचा भर होता. त्यामध्ये पावसाळी व उन्हाळी अधिक उत्पादक वाण, तांबेर्‍याला प्रतिबंध करणारं वाण, बर्फाळ प्रदेशातही टिकून राहणारं कणखर वाण, कोरडवाहू जमिनीत टिकणारं वाण, उंच डोंगरातल्या शेतात पिकू शकणारं वाण अशा विविध गुणधर्माची वाणं त्यांनी संशोधित केली. या यशस्वी संशोधनामुळे त्यांना 1929च्या कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या राष्ट्रीय प्रदर्शनात एक हजार मेक्सिकन पेसो रकमेचा पहिला पुरस्कार आणि राष्ट्रीय सन्मान पदविका देण्यात आली.
 
 
या यशस्वी कार्याची दखल घेऊन मेक्सिकोच्या सरकारने एक कृषिसुधारप्रकल्प त्यांच्याकडे सोपवला. आधुनिक शास्त्रीय कृषितंत्र सहकारी तत्त्वावर उपयोगात आणण्यासाठी कृषी अधिकारी व शेतकरी यांना याविषयी प्रशिक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यासाठी एका विशेष कृषिशाळेची स्थापना झाली. तत्पूर्वी डॉ. खानखोजे यांनी संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यासदौरा करून ठिकठिकाणच्या कृषिसंस्था, संशोधन केंद्रं व शेतकरी यांच्या भेटी घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा प्रथम घेतला.

 
त्यासाठी त्यांनी प्रथम मेक्सिको, पुएब्ला व व्हेराक्रूझ आणि मागोमाग उर्वरित मेक्सिको गणराज्याचा दौरा केला. त्यांनी सामान्य शेतकरी, इतर अल्पभूधारक आणि शेतमजूर यांच्या भेटीतून त्यांची पारंपरिक शेतीपद्धती आणि समस्या जाणून घेतल्या. सहकारी तत्त्व व आधुनिक तंत्र याविषयी त्यांचं प्रबोधन केलं. अनेक स्थानिक कृषिवलसंघ निर्माण केले व एका मध्यवर्ती महासंघाशी त्यांची बांधणी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना या कामी बढती मिळून ते डायरेक्टर झाले. या यशस्वी दौर्‍यानंतर त्यांनी मका सुधार प्रकल्पावर आपलं लक्ष केंद्रित केलं. स्वत:च्या प्रयोगशाळेत आणि शेतकर्‍यांच्या शेतात प्रयोग केले. या संशोधनात महत्त्वाचा प्रयोग होता ‘टिओ सिंट’ या एका जंगली गवताचा मक्याशी संकर घडवून आणण्याचा. तेवो-मका असं या संकरित वाणाचं नाव रूढ झालं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकेका ताटावर तिसावर पूर्ण भरलेली टपोर्‍या दाण्यांची कणसं लागायची. अशा बहारदार पिकात उभ्या असलेल्या डॉक्टरांची छायाचित्रं अनेक वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली. शीर्षकात त्यांचा उल्लेख होता - ‘हिंदू जादूगार शेतीत चमत्कार करीत आहे’ असा. या त्यांच्या देदीप्यमान यशामुळे मेक्सिकन सरकारने हे तंत्रज्ञान प्रसारित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचारसाहित्य निर्माण करून शेतकर्‍यांना ते नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रेरणा दिली. मेक्सिकोचं मक्याचं दर्जेदार उत्पादन झपाट्याने वाढलं.
 
 
लगेच 1930 साली या कार्याबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. या विषयावरचे त्यांचे दोन संशोधन प्रबंध Nuevas Variedades de maize मक्याच्या नव्या जाती, Maize Granada Zea Mays Digitata या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. मेक्सिकोच्या विज्ञानसंस्थेच्या सूचीत त्यांचा समावेश झाला. मका लोकप्रिय झाला.

 
केवळ मक्याचं उत्पादन वाढवून न थांबता त्यांनी मक्याची कणसं अधिक ताजी व आकर्षक दिसतील व बाजारात दीर्घकाळ टिकून राहतील या दृष्टीने पॅकिंग आणि इतर उचित तंत्रज्ञान यावर संशोधन केलं. सतत बर्फवृष्टी होणार्‍या कडक थंडीतसुद्धा अमेरिकन लोकांना हिरवीगार ताजी कणसं खाण्यासाठी भरपूर प्रमाणात मिळू लागली. शेवटी मेक्सिकोच्या शेतकर्‍यांना त्याचा फायदा मिळू लागला.
गहू आणि मक्याच्या पाठोपाठ डॉक्टरांनी तूर आणि चवळी या पिकांकडे आपलं संशोधन वळवलं. त्याचप्रमाणे सोयाबीन व वाल यावरही त्यांनी प्रयोग केले. आजवर माहीत नसलेलं ‘सोयाबीन’ हे पीक स्थानिक शेतकर्‍यांना माहीत करून दिलं. त्याची लोकप्रियता वाढवली. सोयाप्रमाणेच शेवगा या पिकाची वैविध्यपूर्ण उपयुक्तता शेतकर्‍यांना व नागरिकांना दाखवून दिली. पाला, शेंगा, बिया, बियांचं सुगंधी तेल अशा विविध गुणांचा परिचय त्यातून झाला. रताळी आणि सोनताग यांची फायदेशीर शेती कशी करता येईल यावर संशोधन करून ते शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवलं.
 
टोमॅटोवरचे रोग, लिंबूवर्गीय फळं, त्यावरील रोग, पशुखाद्य सुधारणा, निवडुंगाचा उपयोग या विषयांवर अभ्यास त्यांनी करून त्यांच्या माहितीचं प्रसारसाहित्य निर्माण केलं. कृषी व पशुसंवर्धन खात्याने राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या गौरवी कार्याची दखल घेऊन पुन: एकदा त्यांचा सन्मान केला. त्यांनी लिहिलेली पुस्तकं व प्रचारसाहित्य थेट तळातल्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी मोहीम शासनाने यशस्वी केली.

 
तत्कालीन थोर कृषिशास्त्रज्ञ व समाजसेवक डॉ. खानखोजे यांचे प्रमुख प्रेरणास्रोत ठरले. त्यामध्ये त्यांच्या शिक्षणकाळातील (1907-1908) थोर संशोधक ल्यूथर बरबँक हे होते. बरबँक हे वनस्पती-अनुवंशशास्त्रज्ञ होते. त्यांनी अडीच हजारावर नवी वनस्पती-वाणं निर्माण केलं. त्यांच्या प्रेरणेनेच खानखोजे कृषिसंशोधनाकडे मोठ्या ओढीने वळले. पुढे 1913मध्ये डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या टस्कगी शिक्षण संस्थेत त्यांची भेट झाली. या प्रेरणांमुळेच डॉ. खानखोजे यांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात भारतासाठी कृषिक्षेत्रातच कार्य करण्याचा विचार पक्का झाला.
 
 
याच वृत्तीतून त्यांनी आपल्या खाजगी मिळकतीतून प्रथम मेक्सिकोत जमिनी खरेदी करायच्या आणि त्या गरजू शेतकर्‍यांना वाटून टाकायचा सपाटा चालवला. स्वत: काटकसरीने राहून ही रक्कम त्यांनी जमा केली होती. काही जमीन त्यांनी स्वत:च्या प्रयोगांसाठीही वापरली. हे पाहून मेक्सिकोच्या शासनाने त्यांना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीसाठी दिली. शेतकर्‍यांच्या सहकार्याने त्यांनी हे आव्हानात्मक काम यशस्वी केलं. ग्रामोद्योग आणि यांत्रिक शेतीचा उपयोग केला. 1930मध्ये त्यांनी जेनेटिक्स म्हणजे स्पॅनिश भाषेतील ‘हेनेतिका’ हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला. मेक्सिकोच्या व अमेरिकेच्या अनुवंशशास्त्र विषयाच्या संस्थांनी त्यांचे या विषयाचे शोधनिबंध व कार्य यांची दखल घेतली आणि त्यांना त्या संस्थांचं सन्माननीय सदस्यत्व बहाल केलं.

 
गरिबांच्या कुपोषणावर प्रभावी इलाज
मेक्सिकोच्या गरीब नागरिकांना पोषक आहार मिळत नसल्याने कुपोषण होत होतं. ते कसं दूर करावं, म्हणून तेथील सरकारने डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने अभ्यास करून रेल्वे लाइनच्या मोकळ्या जागेत व सार्वजनिक रस्त्याच्या कडेने त्या त्या भागात येणारी फळझाडं लावण्याचा सल्ला दिला. डॉ. खानखोजे यांनीच ही योजना पूर्ण केली. लावलेल्या झाडांना फळं येताच जवळपास राहणार्‍या गरिबांना ती फळं खाण्यास मिळू लागली. त्यामुळे लवकरच त्यांच्या पोषणविषयक उणिवा दूर होऊन त्यांचं आरोग्य सुधारल्याचा प्रत्यय आला. डॉ. खानखोजे यांची ही योजना सर्वच अविकसित देशांत सुरू करावी, अशी युनेस्कोने शिफारस केली. मात्र मेक्सिकोखेरीज कुणीच ती प्रत्यक्षात आणली नाही.
 
 
1929 साली डॉ. खानखोजे यांच्या भारतीय शेतकर्‍यांसाठी काम करण्याच्या इच्छेचा विचार करून मेक्सिकोच्या सरकारने तेथील उष्ण कटिबंधीय शेतीशाळांना भेट देता यावी म्हणून ब्रिटिश सरकारकडे तशी विचारणा केली. दुर्दैवाने खानखोजे यांचं क्रांतिकार्य आडवं आलं आणि ब्रिटिशांनी त्या अर्जावर नकारात्मक शेरा मारला. Not a fit person to receive any such facilities. मात्र नंतर एक चांगली घटना घडली. डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली मेक्सिकन सरकारचं एक कृषिमंडळ 1931 साली युरोप दौर्‍यावर धाडण्यात आलं. तेथील फ्रान्स, स्पेन, हॉलंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये मेक्सिकोच्या कृषी-अर्थव्यवस्थेवर व्याख्यानं देण्यासाठी व तेथील कृषिसंशोधनाचा अभ्यास करण्यासाठी हे मंडळ ऑगस्ट 1931मध्ये गेलं.
 
एवढं झालं, तरी ब्रिटिश सरकारचा त्यांच्यामागचा ससेमिरा सुटला नाही. तेथून डॉ. खानखोजे यांचा काबुलला जाण्याचा बेत होता. ते युरोप दौर्‍यावर मेक्सिकन पासपोर्टच्या आधारे गेले. तेथून त्यांनी बर्लिनच्या लीग अगेन्स्ट इंपिरिअ‍ॅलिझम (साम्राज्यवादविरोधी संघटना) या संस्थेशी संपर्क साधला. 1931च्या नोव्हेंबरमध्ये भारतातील फ्रेंचांच्या पाँडिचेरीमध्ये जाऊन नंतर काबुलमधील ‘कृषितज्ज्ञ’ पदावर रुजू व्हावं, अशी ही योजना होती. परंतु पॅरिसमधील अफगाण वकिलाने हा परवाना नाकारला. नंतर बेल्जियममध्ये असताना 1931च्या डिसेंबरमध्ये भारतातील त्यांच्या वडिलांच्या निधनाच्या वार्तेमुळे ते आजारी पडले. संकटं एकामागोमाग कोसळतात त्याप्रमाणे डॉक्टरसाहेबांचं पैशाचं पाकीटच चोरीला गेलं. या निर्धनावस्थेत तेथील मेक्सिकन वकिलातीतील प्रतिनिधी रिकोई यांनी त्यांना मदत केली. पुढे मार्च 1932मध्ये ते हिंदुस्थानी असोसिएशनच्या सभेला हजर राहून ऑगस्टमध्ये मेक्सिकोला परतले.
 
 
वाढत्या जबाबदार्‍या

 
परतल्यावर त्यांच्यावर व्हेराक्रूझ राज्यात नवीन प्रकारच्या कृषी-योजनेची जबाबदारी सोपवण्यात आली. तेथील शेती उत्पादनाचा फायदा स्थानिक शेतकर्‍यांना मिळत नव्हता. केळी, कॉफी, व्हॅनिला इत्यादी पिकांचं उत्पादन निर्यात करणारे मध्यस्थ मात्र श्रीमंत होत होते.
 
यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान, पिकांची निगराणी, नवे कृषी-उद्योग आणि मुख्यत: खरेदी-विक्री आणि निर्यात व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षित करण्याची ही योजना होती. नव्या कृषिशाळांचा त्यासाठी व्यापक उपयोग करायचा होता. मात्र या योजनेत डॉ. खानखोजे यांची मिळकत वाढणार नव्हती. तरीही हे काम त्यांनी नि:स्वार्थीपणे यशस्वी करून दाखवलं. गव्हर्नर कर्नल तेखेदा यांनी त्यांच्या याही कार्याची दखल घेऊन त्यांना व्हेराक्रूझ राज्याचं प्रतिनिधित्व दिलं आणि मेक्सिकोतील सल्लागार समितीवर पाठवलं. यामुळे त्यांचा इतर ज्येष्ठ कृषितज्ज्ञांशी राष्ट्रीय पातळीवर संपर्क आला व लौकिक वाढला. या संबंधामुळे त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या ‘बायोटेक्निक इन्स्टिट्यूट’ची निर्मिती केली. ते स्वत: अनुवंशशास्त्र परिस्थितिकीचे आणि वनस्पतिशास्त्र या संशोधन विभागाचे प्रमुख झाले. हा काळ होता 1931-32चा. त्याच दरम्यान त्यांना मेक्सिको गणराज्याचं नागरिकत्व मिळून त्यांचा बहुमान झाला.
 
पुढे 1936मध्ये त्यांना त्यांच्या मका-संशोधनासंबंधीचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत मांडण्याची सुसंधी मिळाली. जगातील मक्याची मूळ उत्पत्ती आणि उत्क्रमण या विषयावर त्यांचं सादरीकरण होतं. त्यांनी निर्माण केलेल्या मक्याच्या नव्या वाणाला व Zea Mays Digitata या त्याच्या नावाला शास्त्रीय मान्यता मिळाली.
 
 
1936च्या नोव्हेंबरात मेक्सिकोत भरलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनातही त्यांचा गौरव झाला. तेव्हा जगप्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार दिएगो रिव्हेय यांनी त्यांचं एक भित्तिशिल्प (म्युरल) तयार केलं. त्यामध्ये टेबलामागे खुर्चीवर बसलेल्या खानखोजे यांचं हे चित्र आहे. मागे एक शेतकरी मुलगी फळांनी भरलेली टोपली घेऊन उभी आहे, समोर ग्रामीण लोक बसले आहेत आणि चित्राचं शीर्षक स्पॅनिश काव्यपंक्तीत आहे, याचा अर्थ आहे ‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल!’ हे भित्तिचित्र मेक्सिकोतील शिक्षणखात्याच्या संग्रहालयात बसवलं आहे. याच वेळी 1936 साली त्यांच्या आयुष्यात एक शुभघटना घडली. त्यांचे हितचिंतक रिकोई यांची मेव्हणी जान सिंडिक हिच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला आणि तिचं नाव जानकी खानखोजे झालं.

 
या घटनेमागोमाग 1937मध्ये त्यांच्यावर मेक्सिकोच्या सदर्न पॅसिफिक रेल रोड कंपनीने रेलमार्गाभोवतालच्या पडीक शेतजमिनीत कृषी उत्पादन वाढवण्याची जबाबदारी सोपवली. त्यासाठी अ‍ॅग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल डिपार्टमेंट या नव्या खात्याचे कृषी व्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. नवीन प्रशस्त बंगला, सुंदर बगिचा व मुबलक जमीन, नोकर-चाकर या सुविधांमुळे हे काम करणं त्यांना सुकर झालं. नवीन पिकं व त्यांचं व्यवस्थापनतंत्र याचं प्रशिक्षण भोवतालच्या हजारो शेतकर्‍यांना देता आलं. यामुळे वाढलेलं उत्पादन शेतकर्‍यांना फायद्याचं ठरलं, तर त्याची वाढलेली वाहतूक रेल्वेला आर्थिक फायदा वाढवून देणारी ठरली.
 
 
या काळात त्यांनी रबर उत्पादनाचा अभ्यास केला. रबरी चिकापासून मेणकापड, रेनकोट बनवणं व वाहतुकीच्या साधनांसाठी रबरी धावा व इतर उपयुक्त वस्तू यांची वाढती गरज भागवण्यासाठी त्यांच्या संशोधनाचा खूप उपयोग झाला. कारण 1943च्या दुसर्‍या महायुद्धात या वस्तूंची मलेशियातून होणारी आयात बंद झाली होती. ती उणीव यामुळे भरून काढता आली. अमेरिकेची जीवरक्षक नावासारख्या रबरी वस्तूंची टंचाई दूर करण्यासाठीसुद्धा डॉ. खानखोजे यांनी तेथील रबरपैदास वाढवण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांचा उपयोग झाला. 1942 ते 1945 या काळात दक्षिण मेक्सिकोतलं व ग्वाटेमालातलं रबराचं उत्पादन खूप वाढलं. रबर विषयावर त्यांनी स्पॅनिशमध्ये पुस्तकही लिहिलं. सर्व कामगिरीसाठी अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स संस्थेने त्यांना सन्मानित केलं. त्याचप्रमाणे येथील ‘डिक्शनरी ऑफ रिसर्च सायंटिस्ट’ या थोर वैज्ञानिकांच्या सूचीत त्यांच्या नावाची नोंद झाली. अमेरिकेत रबर लागवडीला चालना देण्याच्या व वनस्पतिजन्य वितंचक (हार्मोन्स) तयार करून त्यांच्या मदतीने मानवी गरज भागवण्याच्या या कामगिरीचा उल्लेख त्यात आहे.
 
नपुंसकत्वावर मात करणं व स्त्रियांच्या व्याधी दूर करणं यासाठी माकडांच्या हार्मोन्सचा उपयोग होत असे. खानखोजे यांनी त्याऐवजी मध्वालु (Doscorea) या जंगली वनस्पतीच्या कांद्यापासून ही हार्मोन्स तयार केली व माकडांची निर्घृण हत्या थांबवली.
डॉ. खानखोजे यांनी केलेल्या व्यापक संशोधनात मसाला वनस्पतींच्या प्रयोगांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे वनस्पतिजन्य ‘प्रोजेस्टिरीन’ व ‘रेस्टोस्टिरीन’ ही द्रव्यं मिळवण्यासाठीही त्यांनी बोरानी-मॅक्स नावाची कंपनी सुरू केली, पण व्यापारी स्पर्धेत ती टिकली नाही.
 
त्यांना 1938 साली पहिली मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी सावित्री असं ठेवलं. नंतर 1942मध्ये धाकटी माया जन्मली. ते खर्‍या अर्थाने गृहस्थ झाले आणि त्यांनी आयुष्यभर संसाराची जबाबदारी कर्तव्यबुद्धीने पार पाडली. त्यांनी मुलींनाही आपल्या शेतीविषयक प्रयोगांचा परिचय करून दिला. ते जगभर फिरले. त्या त्या ठिकाणची भाषा, इतिहास, भूगोल, संस्कृती, कला आणि मुख्यत: शेती यांचा त्यांनी अभ्यास केला. पुरातत्त्वशास्त्राचीही त्यांना आवड होती. त्यांना अमेरिकेत कोलंबसपूर्व काळातील एक मोठा शिलास्तंभ सापडला. तो प्राचीन अ‍ॅझटेक संस्कृतीच्या पर्जन्यदेवतेचा आहे, असं त्यांचं मत सर्वमान्य झालं.

 
प्रा. खानखोजे यांनी 1906 साली प्रथम भारतभूमी सोडली. 1947नंतरच्या स्वतंत्र भारतात परतण्याची त्यांची ओढ तीव्र होती. मात्र येथील अस्थिर धोकादायक परिस्थितीत त्यांनी येऊ नये असं त्यांना पंतप्रधान पं. नेहरूंतर्फे सांगण्यात आलं.
 
दरम्यान त्यांनी मेक्सिकोतील नदीकाठच्या बंद पडलेल्या सोन्याच्या व इतर धातूंच्या स्रोतांचा अभ्यास केला व त्यांच्या उत्पादनाचा यशस्वी व्यवसाय सुरू केला. पुढे 1 जानेवारी 1949 रोजी त्यांचे स्नेही जी. अनंतन (अनंत गणेश देवकुळे) यांना पत्र लिहून भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. जी. अनंतन हे ‘आपली शेती’ या मासिकाचे संपादक होते. मध्य प्रदेशचे तत्कालीन कृषी मंत्री रा.कृ. पाटील यांना त्यांची ही इच्छा समजली. काही अटींवर त्यांनी कृषिसुधार समितीचं काम करण्यासाठी खानखोजेंना निमंत्रित केलं. मात्र एप्रिल 1949मध्ये परतल्यावरही त्यांना मुंबईच्या पोलिसांनी अटक केली, कारण ब्रिटिशांनी तयार केलेल्या काळ्या यादीत त्यांचं नाव अजूनही होतं. परंतु योग्य शासकीय छाननी होऊन त्यांना मुक्त केलं गेलं. 30 एप्रिल 1949 रोजी ते नागपुरात पोहोचले. भारतात त्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत झालं. पुण्यालाही त्यांची भेट झाली.

 
5 मे 1942 रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली शेतीसुधार कमिटीची स्थापना झाली. दीर्घ स्वानुभवाच्या आधारे त्यांनी शेती परिस्थितीचं व्यापक सर्वेक्षण करून उपाययोजनांचा आराखडा सादर केला. पुढे केंद्र सरकारने फूड कमिशनरपदी त्यांची नेमणूक केली. त्यांच्या शेतीसुधार कमिटीने जुलै 1951मध्ये 434 पानी अहवाल सादर केला. यांत्रिकी व सामूहिक अद्ययावत शेती, कृषी शिक्षण, संशोधन संस्थांचं आधुनिकीकरण अशा विविध सुधारणा त्यात सुचवल्या होत्या. मात्र दप्तरदिरंगाईमुळे त्यांच्या पदरी निराशाच आली. मातीच्या ओढीने मायदेशी आलेले देशभक्त खानखोजे मेक्सिकोला परतले आणि आजारी पडले. मिळकतीचं काहीही साधन नव्हतं. पण सुदैवाने एका शर्करा-संशोधन केंद्रात रसायनतज्ज्ञ म्हणून त्यांना नोकरी मिळाली. ते थोडे स्थिरावले.
 
मात्र त्यांना भारताच्या ग्रामसुधाराची ओढ तीव्र होती, म्हणून त्यांनी ‘मुक्तग्राम’ चळवळीचा एक आराखडा तयार केला. मेक्सिकोत मन रमेना, म्हणून कुटुंबाची सर्व व्यवस्था लावून ते 23 सप्टेंबर 1955 रोजी जहाजाने भारतात येण्यासाठी निघाले व नोव्हेंबर 1955मध्ये मुंबईला पोहोचले. नागपुरात 29 जानेवारी 1956 रोजी त्यांचा सन्मान झाला. फेब्रुवारी 1956मध्ये दिल्लीमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत त्यांनी मेक्सिको सरकारचं प्रतिनिधित्व केलं आणि नागपूरला परतले.
 
नागपुरामध्ये संत्रे बागाईतदार (NOGA) या सहकारी संस्थेने त्यांना सल्लागार म्हणून घेतलं. पण शासकीय लालफितीमुळे त्यांचा संत्रा संशोधन प्रकल्प बारगळला. पुन: निराशा पदरी आली. केंद्र सरकारने त्यांना आकाशवाणीवरून शेती मंडळीसाठी दरमहा व्याख्यानं देण्यासाठी कामगिरी दिली. 1956 ते 1964पर्यंत त्यांनी ऐंशी व्याख्यानं दिली. ‘ग्रामहित’ या नागपूरच्या शासकीय मासिकात आणि इतर अनेक वृत्तपत्रांतून कृषिलेख लिहिले. मात्र त्यांनी व्याख्यानांतून व लेखांतून मांडलेल्या विचारांकडे बहुतांशी दुर्लक्षच झालं. अशा पदरी निराशा आलेल्या या प्रखर देशभक्ताची ऐंशी वर्षं मागे पडली आणि 18 जानेवारी 1967 रोजी नागपूर येथे झोपेतच त्याचं जीवन संपलं. त्यांच्या कृषिकार्याचा हा अर्धवट आलेख कोणाला पूर्ण करता येईल का?
 
 
प्रमुख संदर्भ
 
1. डॉ. खानखोजे, नाही चिरा (1997), वीणा गवाणकर (राजहंस प्रकाशन, पुणे)

2. रण झुंझार, डॉ. पां.स. कानखोजे यांचे चरित्र (1966) ग.वि. केतकर (काळ प्रकाशन)
 
3. देशभक्त कृषिसंशोधक - डॉ. खानखोजे (बळीराजा पडसाद लेख) श्री. सुधीर सेवेकर

4. अर्वाचीन चरित्रकोश, सी.व्ही. चित्तराव, भारतवर्षीय चरित्र-कोश मंडळ, प्रकाशन (1946)
डॉ. क.कृ. (नाना) क्षीरसागर
9422080865