ती...आर्मीतील डॉक्टर

विवेक मराठी    04-Sep-2021
Total Views |
आर्मी म्हणजे केवळ शौर्य, शिस्त आणि युद्ध, इतका साचेबद्ध विचार आपण करतो आणि या क्षेत्रातील अमर्याद संधींकडे दुर्लक्ष करतो. मेजर आश्लेषा तावडे लष्करामध्ये ‘मेजर’ म्हणून गेली चार वर्षं अतिशय उत्तम प्रकारे जबाबदारी निभावत आहे. स्त्री कोणत्याही आव्हानांचा धैर्याने सामना करते, हा विचार तिच्या आई-वडिलांनी आणि विशेेषत: आजीने तिच्यात रुजवला आणि तिने तो स्वकर्तृत्वाने सिद्ध करून दाखवला. या प्रवासात आज ती एका पदावर पोहोचली असली, तरी याहून पुढचा प्रवास अधिक जिद्दीने करण्याची ईर्षा तिच्या डोळ्यात दिसते. गेली चार वर्षं तिने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. जिद्द, धैर्य, देशप्रेम आणि अभिमान यांचं प्रतीक बनलेली, आर्मी युनिफॉर्ममधील मेजर आश्लेषा आज स्त्रीशक्तीचा एक आदर्श आविष्कार ठरली आहे. डॉक्टर आश्लेषा ते मेजर आश्लेषा आणि मग मेजर आश्लेषा तावडे-केळकर इथपर्यंतचा तिचा हा प्रवास प्रेरणादायी आहे...


dr_2  H x W: 0
आश्लेषाचं लग्न दहा दिवसांवर आलं असतानादेखील ती भारताच्या उत्तर सीमेवर आपल्या जवानांना वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत होती. हजारो फूट उंचावर जवानांवर उपचार करत होती. त्यांच्या जखमांवर मलमपट्टी करत होती. घायाळ जवानांच्या पायातील गोळी काढत असताना, तिच्या कामात गढलेली असताना तिची आई फोनवरून तिला तिच्या लग्नाच्या तयारीचे ‘अपडेट्स’ द्यायची. एखाद्या कथा-कादंबरीत किंवा चित्रपटात शोभावी अशी परिस्थिती होती. युद्धात पायाला गोळी लागलेला घायाळ जवान तिला म्हणाला, ‘‘मॅडम बीस दिन के बाद मेरी शादी है। कैसे भी करके मुझे शादी मे खडा होना है।’’ तेव्हा तिचंही लग्न दहा दिवसावर येऊन ठेपल्याचं तिने सांगितलं. त्या वेळी वेदना होत असतानाही त्याच्या चेहर्‍यावर हसू उमटलं. त्या जवानाला त्याच्या या लहानशा मेडिकल ऑफिसरचं कौतुक वाटलं. लग्नाच्या आधी ब्युटी पार्लर, दागिने, साड्या-शालू, मेकअप या सगळ्यात मुली व्यस्त असतात. ही मात्र लढाऊ मोहिमा, शस्त्रास्त्र, घायाळ जवान, गोळ्या, शस्त्रक्रिया या सगळ्यात रमलेली... लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. मात्र आयुष्याच्या अशा हळव्या, नाजूक क्षणीही ती आपलं कर्तव्य विसरली नाही.

आज आपल्या समाजात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना, सीमेवर हजारो जवानांसोबत एकटी महिला डॉक्टर म्हणून काम करते. हजारो जवानांमध्येही तिला कधी असुरक्षित वाटत नाही. उलट त्यांच्यासोबत तिला खूप सुरक्षित वाटतं. कारण एक डॉक्टर या नात्याने ती त्यांचा जीव वाचवणार, यावर जवानांचा विश्वास असतो. तिच्या जिवाला जीव द्यायला ते तयार असतात. जवानांवर उपचार करण्यासाठी ती सज्ज असते. तिचा हा अनुभव खरोखरच सकारात्मक वाटतो. आजच्या चिंताजनक परिस्थितीत मनाला उभारी देणारा ठरतो.

लहानपणापासूनच खूप मोकळ्या आणि उत्साही वातावरणात वाढलेली ती... एकुलती एक मुलगी असूनही उगाचाच खूप जास्त लाड करणं, सांभाळणं, जपणं असं कधीच झालं नाही. या उलट, ‘तू एकुलती एक आहेस, त्यामुळे सगळे तुझे लाड करणार नाहीत, तर पुढे जाऊन तुला एकटीला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे’ असं सांगण्यात आलं. चौथीत असल्यापासूनच वर्सोवा ते अंधेरी असा शाळेपर्यंतचा प्रवास एकटी करायची. त्यामुळेे आपोआपच धीटपणा अंगी आला. घरानंतर आपलं दुसरं कुटुंब म्हणजे आपली शाळा... आपल्या या यशस्वी वाटचालीत ती आपल्या शाळेचं नाव घ्यायला विसरत नाही. पार्ले टिळक विद्यालयाच्या मराठी माध्यमात तिचं शिक्षण झालं. शाळेपासूनच वक्तृत्व, नाटक अशा विविध स्पर्धांमध्ये ती भाग घेत होती. त्यामुळे नेतृत्व, सभाधीटपणा हे गुण शालेय काळातच तिच्या अंगी बाणले गेले.

dr_1  H x W: 0
 
अकरावी-बारावीचं शिक्षण तिने साठे महाविद्यालयात घेतलं. लहानपणापासून असलेली नाट्याभिनयाची हौस पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन व्यासपीठ तिच्यासाठी खुलं होतं. ती कॉलेजमधल्या प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हायची. आपण अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करावं का? असाही विचार त्या वेळी तिच्या मनात होता. या विचारांबरोबरच ‘काहीतरी वेगळं’ करण्याची इच्छाही मनात होती. परंतु अनेक आव्हानं असलेलं मेडिकलचं क्षेत्रही तिला खुणावत होतं. तिनं वैद्यकीय प्रवेशाकरिता असलेली एमएचसीइटी परीक्षा दिली. गुणवत्ता यादीत तिचं नाव आल्याने त्यानंतर लोणीच्या ‘रूरल मेडिकल कॉलेज, प्रवरा’मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला. त्या वेळी कॉलेजमध्ये लष्कराच्या मेडिकल कोअरमधील अनेक प्रोफेसर होते. लष्करातील त्यांचे अनुभव तिच्यासाठी स्फूर्तिदायक ठरले. त्या क्षेत्राकडे ती अधिकच ओढली गेली. एमबीबीएस पूर्ण झाल्यावर मुंबईच्या एलटीएमजी (सायन) हॉस्पिटल येथे इंटर्नशिप चालू असताना अऋचड - ईाशव ऋिीलशी चशवळलरश्र डर्शीींळलशीची जाहिरात वृत्तपत्रात आली होती. तिने जाहिरात पाहिली. त्या पदासाठी अर्ज भरण्याचा तिने निर्णय घेतला आणि तो निर्णय तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याच दिशेने आपला पुढचा प्रवास करण्याचा तिने निश्चय केला.

त्याच कालावधीत तिचं वैयक्तिक आयुष्यही सुंदर वळण घेत होतं. तिच्या मित्राशी - आदित्य केळकर यांच्याशी तिचं लग्न ठरलं होतं. करिअर आणि लग्न या दोन वेगळ्या गोेष्टी आहेत असे मानणारे ते दोघे आहेत. म्हणूनच आपापल्या क्षेत्रात उत्तम करिअर करण्याबाबत दोघेही ठाम होते. तिला मुलाखतीसाठी दिल्लीला बोलवण्यात आलं होतं. ही मुलाखत सोपी नक्कीच नव्हती. त्यासाठी खूप तयारी करावी लागली. मुलाखतीच्या तयारीत तिला कॅप्टन वंजारी यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मुलाखतीमध्ये निवड झाल्यानंतर शारीरिक क्षमता तपासणारी तिची फिजिकल फिटनेस टेस्टही झाली. त्यानंतर भारतीय आर्मी मेडिकल कोअरमध्ये कॅप्टन या पदावर आश्लेषाची नेमणूक झाली. लग्न झाल्यावर अमेरिकेला जाऊन उच्चशिक्षणाची संधी होती. परंतु चारचौघांसारखी आरामदायी जीवनशैली तिने निवडली नाही. सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या आश्लेषाने लष्करातील नोकरी निवडली. तिच्या या निर्णयात तिची आई अदिती, वडील अशोक तावडे आणि पती आदित्य केळकर हे खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले.

कमांड हॉस्पिटल, सदर्न कमांड, पुणे इथून तिच्या आर्मीतील करिअरची सुरुवात झाली. तिने भारतीय आर्मीत अनेक वर्षे चालत आलेल्या रीती, गणवेश व त्यातील विशिष्ट खुणा, वेगवेगळ्या पलटणींच्या कवायतीतील वैशिष्ट्यं, शौर्यपदकं, मानचिन्हांचा वापर व आदर करण्याची रीत, एक डॉक्टर म्हणून काम करताना जवानांचं मनोविश्व कसं समजून घ्यायचं, याबरोबरच शस्त्र चालविण्याचं खडतर प्रशिक्षण (6 महिने) लखनऊला घेतलं. स्वत: निवडलेल्या वाटेवरून ती यशस्वीपणे वाटचाल करत होती .

आर्मी म्हणजे केवळ शौर्य, शिस्त आणि युद्ध, इतका साचेबद्ध विचार आपण करतो आणि या क्षेत्रातील अमर्याद संधींकडे दुर्लक्ष करतो. आर्मी ‘मेजर’ म्हणून गेली चार वर्षं ती अतिशय उत्तम प्रकारे जबाबदारी निभावत आहे. स्त्री कोणत्याही आव्हानांचा धैर्याने सामना करते, हा विचार तिच्या आई-वडिलांनी आणि विशेेषत: आजीने तिच्यात रुजवला आणि तिने तो स्वकर्तृत्वाने सिद्ध करून दाखवला. या प्रवासात आज ती एका पदावर पोहोचली असली, तरी याहून पुढचा प्रवास अधिक जिद्दीने करण्याची ईर्षा तिच्या डोळ्यात दिसते. गेली चार वर्षं तिने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. जिद्द, धैर्य, देशप्रेम आणि अभिमान यांचं प्रतीक बनलेली आर्मी युनिफॉर्ममधील मेजर आश्लेषा आज स्त्रीशक्तीचा एक आदर्श आविष्कार ठरली आहे.


- ग्रीष्मा सबनीस
Armed Force is not just a career, it is a lifestyle

आयुष्यात वेगळं करण्याच्या इच्छेनेच मला वेगळी वाट निवडण्यासाठी प्रवृत्त केलं. मी जरी डॉक्टर असले तरी त्यातही मला नुसताच पदवी घेऊन पुस्तकांमध्ये अडकून पडायचं नव्हतं. रात्रंदिवस मला अभ्यासाची पुस्तकं आणि पेशंट असं चौकटबद्ध आयुष्य नको होतं. मला वेगळी वाट निवडायची होती.


Armed Force is not just a career, it is a lifestyle.. लष्करामध्ये तुम्ही येता, तेव्हा ‘मी 10 तेे 5 काम करीन आणि मग स्वत:चं आयुष्य जगेन’ असं तुम्हाला म्हणता येत नाही. इथे तुमची चोवीस तासांची बांधिलकी असते. ही फक्त नोकरी राहत नाही. ही आपली जीवनशैली बनते. कारण तुम्हाला अशा ठिकाणी जावं लागतं, जिथे नागरी जीवनाशी तुमचा संबंध येत नाही. आपण प्रवेश घेतो तेव्हा तारुण्याच्या जोशात असतो. देशासाठी काहीतरी करायचंय ही भावना असते. तुमचा हाच उत्साह, देशप्रेम कायम राहणं महत्त्वाचं असतं. विशेषतः मुलींनी तर या क्षेत्राकडे वळावंच. मात्र त्यासाठी आपल्या मनाची तयारी करणं अतिशय गरजेचं असतं. कारण मुलींना आपलं घर आणि संसार या गोष्टीही सांभाळाव्या लागतात. याकरिता घरच्यांच्या सहकार्याची नितांत गरज असते. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या क्षेत्रात तुम्ही फक्तपैसे कमविण्यासाठी येत नाही. ही नोकरी तुम्हाला देशसेवेचं समाधान देते. आदर देतेे. घरातल्यांना अभिमान देते. नोकरी म्हणूनही इथे खूप चांगला पगार, सोयीसुविधा आहेत. तुम्ही असाल-नसाल तरी पुढे तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते. प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला तावून सुलाखून तयार केलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी देशसेवेचं हे व्रत घ्यावं, असं मला मनापासून वाटतं.

- डॉ. आश्लेषा तावडे-केळकर
मेजर - आर्मी