कार्यसमर्पित भुजंग लक्ष्मण वेल्हाळ उपाख्य अप्पाजी

विवेक मराठी    04-Sep-2021
Total Views |
@सुहास अंबादास पाठक  9421259386
रा.स्व.संघाचे व वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भुजंग वेल्हाळ उर्फ अप्पाजी यांचे 1 ऑगस्ट 2021 ला निधन झाले. त्यांच्या मासिक श्राद्धानिमित्त श्रद्धांजली अर्पण करणारा लेख.

appa_1  H x W:
भारताच्या ईशान्येकडचे राज्य मणिपूर. इंफाळ ह्या मणिपूरच्या राजधानीपासून 40 कि.मी. अंतरावर थोबाल जिल्ह्यातील ‘काकचिंग’ला वनवासी कल्याण आश्रमाचे मुलांचे छात्रावास आहे.

 
1989 सालचा डिसेंबर महिना. खूप थंडी होती. मणिपूरमधला माझा पहिला प्रवास. मणिपूर राज्य व येथील कार्य बघण्यासाठी मी तेथे गेलो होतो. मी जसा आश्रमात प्रवेश केला, तसे समोर ओसरीत शुभ्र दाढी व धोतर-कुडत्यामध्ये उभे असलेले प्रसन्न व्यक्तिमत्त्व दिसले. मन त्यांच्याकडे ओढ घेत होते. नमस्कार केला व बसलो.

 
परिचय आदी झाल्यानंतर मी अप्पांना विचारले की वयाच्या 66व्या वर्षी वानप्रस्थी जीवन स्वीकारून तुम्ही ह्या सुदूर क्षेत्रात - जिथले खानपान, भाषा, पेहराव, हवामान महाराष्ट्रापेक्षा खूपच भिन्न आहे, तिथे कसे आगमन झाले?”
 
कृष्णा नदीच्या तिरावर वसलेल्या उंब्रज गावात अप्पांचा जन्म झाला. समर्थ रामदास स्वामीनी शक्तीची उपासना करण्यासाठी आपल्या कारकिर्दीत 11 मारुतींची स्थापना केली होती, त्यापैकी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज ह्या गावी एक मारुती आहे. अप्पा 8 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. घरात वडील, दोन भाऊ, एक बहीण व ते स्वत: असे पाच जणांचे कुटुंब. घरची परिस्थिती गरिबीची होती. जेवणखाण यात काटकसर करून वडिलांनी शाळा शिकवली. हायस्कूलसाठी त्यांनी कराड येथील टिळक विद्यालयात प्रवेश घेतला. 1936-37 ह्या एक वर्षात पाचवी-सहावी-सातवीचा इंग्लिश अभ्यास पूर्ण केला. आता शिष्यवृत्ती 6 रुपये मिळू लागली. 1936 ते 1941पर्यंत शिष्यवृत्ती मिळत होती. घर त्यावरच चालत होते. शिकवण्यासुद्धा घेत होते. लहानपणापासूनच अप्पांना घराकरता आर्थिक मदत करावी लागली.

 
1935 साली कराडमध्ये शाखा लागायला सुरुवात झाली. अप्पा खानावळीत जेवायला जात होते, तेथे सातार्‍याचे स्वयंसेवक रामभाऊ पवार यांच्याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश झाला व समाजाचे काम करण्याचा श्रीगणेशा झाला.
 
 
1938 ते 1941 या कालावधीत ते कराड शाखेचे बौद्धिक प्रमुख होते. तालुक्यातील गावात आठवड्यातून एकदा 15 ते 30 कि.मी. सायकलवर जाऊन शाखा संपर्क करत होते.
1936 साली परमपूज्य डॉक्टर हेडगेवार कराड शाखेत आले होते, तेव्हा प्रथम त्या युगपुरुषाचे दर्शन झाले व त्यांचे बौद्धिक ऐकले. रात्रीच्या बैठकीत अप्पा गेले होते. डॉक्टरांच्या स्नेहपूर्ण वागण्याचा प्रभाव अप्पाजींवर पडला.
1941 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर अप्पाजी पुढील कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांनी पुण्याच्या डेक्कन जिमखान्याच्या वैदिकाश्रम शाखेत प्रवेश घेतला. त्याच काळात 1941-42 मंडल बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मंडलात चार शाखा होत्या. त्या वेळी आठवड्यातून एकदा कोथरूड ह्या गावात शाखेच्या कामासाठी संपर्काला जात होते.
त्याच वेळी महात्मा गांधींचे ‘अंग्रेज भारत छोडो’ हे आंदोलन चालू झाले. मोठ्या भावाने आंदोलनात भाग घेतल्याने त्याला तुरुंगामध्ये जावे लागले. त्यामुळे अप्पांनी 1942मध्ये कॉलेज सोडून मिलिटरी अकाउंटमध्ये नोकरी केली. बंधू 1945मध्ये सुटून आल्यावर परत पुण्याच्या एस.पी. कॉलेजला प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज व संध्याकाळी नोकरी चालू ठेवावी लागली.अप्पाजी गरिबीमुळे मितव्ययी होते. स्वत:ला थोडे पैसे ठेवून पाऊण भाग घरी पाठवत.
1943मध्ये त्यांचे संघ शिक्षा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाले. 1947 साली अप्पा बी.ए. पास झाल्यावर नोकरी सोडून संघप्रचारक म्हणून कुलाबा - आताच्या रायगड जिल्ह्यात पेण ह्या गावी त्यांची नेमणूक झाली.
1948 सालाच्या सुरुवातीलाच महात्मा गांधींची हत्या झाली. त्या संधीचा फायदा घेऊन सरकारने संघावर बंदी घातली. अप्पांना पकडून ठाणे कारागृहामध्ये 3 महिने कारावास झाला.
परिस्थितीचे गांभीर्य बघून प्रचारकांना शक्य असेल तर घरी जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अप्पा पुण्यात परत आले. त्याच वेळी दैनिक भारत है वृत्तपत्र सुरू करण्याचे ठरले. सुरुवातीला अप्पा बातमीदार होते, नंतर संपादक विभागात नियुक्त झाले. पण 6 महिन्यांच्या आतच संघाने सत्याग्रहाचा निर्णय घेतल्याने प्रचारकांना आपापल्या कार्यक्षेत्रात जाण्यास सांगितले, म्हणून अप्पा पुनश्च पेणमध्ये गेले. तेथे भूमिगत राहून आपल्या कार्याची माहिती देणारी पत्रके व बुलेटिन काढण्याचे काम अप्पांकडे देण्यात आले. संघबंदी उठेपर्यंत अप्पा पेणमध्येच होते.
बंदिकाळात भूमिगत राहून, जंगलात राहून काम केल्यामुळे त्यांना मलेरिया झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने नाशिक जिल्ह्यातील येवला व चांदवड येथे प्रचारक म्हणून अप्पांची नियुक्ती झाली.1947 ते 1952 संघाचा प्रचारक म्हणून काम केल्यावर घरच्या बिकट परिस्थितीमुळे प्रचारक म्हणून अप्पांना थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला.
अप्पांच्या जीवनातील तिसर्‍या पर्वाला सुरुवात झाली. 1952 ते 1953 या काळात त्यांनी कर्जत जि. रायगड येथील अभिनव ज्ञानमंदिर येथे नोकरी केली, पण काही कारणामुळे नोकरी सोडली व ते कोपरगाव येथे शाळेत नोकरीला लागले. 2 ते 3 महिने झाल्यावर संघाशी संबंध ठेवण्यास मनाई केल्याने नोकरी सोडली.अप्पांबरोबर हेमंत सोमण व अन्य तीन जण नोकरी सोडून गोव्यात गेले. पुढे त्यांनी पणजीला नोकरी केली. अप्पांनी कोपरगावातच 2-3 वर्षे शिकवण्यांचे क्लास घेतले.
राजाभाऊ झरकर व माणिकराव यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी 1956 साली इंग्लिश शिकवण्याचे क्लास सुरू केले ते 1988पर्यंत चालू होते. 1956 ते 1957 अप्पांवर संघशाखेची जबाबदारी देण्यात आली, परंतु व्यवसायामुळे ते दायित्वमुक्त झाले. नगरच्या वास्तव्यात विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर समाजातील विविध मतांच्या लोकांना भेटणे, संघटन करणे, कार्यकारिणी गठन, माणूस घडवणे व त्यांना जबाबदारी देणे असे 12 वर्षे काम केल्यावर अप्पांनी दुसर्‍यांवर जबाबदारी देऊन ते मुक्त झाले.
याच काळात ‘संघयुग’ नावाचे साप्ताहिक सुरू करण्यात आले. त्याचे संपादक म्हणूनही अप्पांनी काम बघितले. नगरच्या वास्तव्यातच एकता मासिकात शेषाद्री नावाने ‘वाटचाल पारतंत्र्यातून वैभवाकडे’ अशी 3 वर्षे लेखमाला चालवली. अटलबिहारी वाजपेयी व जगन्नाथराव जोशी यांच्या हीरकमहोत्सवानिमित्त एक विशेषांकाची जबाबदारी अप्पांनी पार पडली. ते नगरच्या संघकार्याचे आधारस्तंभच होते.
1975 साली देशात आणीबाणी लावण्यात आली. अप्पा 13 महिने ‘मिसा’ कायद्याअंतर्गत नाशिक कारागृहात होते. अप्पांनी घरी काम करणार्‍या बाईला सांगितले की, “मी जेलमध्ये चाललो आहे. तू आता कामावर येऊ नको. मी तुला पैसे देऊ शकणार नाही.” ती बाई म्हणाली, “अप्पा, मला पैसे नको. मी तुमच्या पुतण्या-पुतणी-मुलांकडे लक्ष देईन” व शेवटपर्यंत तिने ते निभावले.
‘समाजवादावर प्रकाशझोत’ व ‘आपली भावी अर्थनीती’ ह्या विषयांवरही त्यांनी लेखमाला लिहिली. अप्पांचा प्रसिद्धीकडे कल नव्हता. ते वाचन, लेखन, मनन, चिंतन करत होते ते स्वत:च्या ज्ञानपिपासेसाठी. लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी लेख लिहिले. अप्पा म्हणत, “माझी ती योग्यता नाही.” असा विनम्र भाव त्यांच्या ठिकाणी होता.
अप्पा स्वत: अविवाहित होते. परंतु सांपत्तिक स्थिती ठीक नसल्याने त्यांनी प्रचारक म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला, नाहीतर आजन्म प्रचारक म्हणूनच त्याना राहायचे होते. त्यांनी पुतणीचे लग्न करून दिले. पुतण्यांना आपल्या पायावर उभे केले. अप्पांना विविध विषयांची आवड होती. ज्योतिषाचा अभ्यास होता. कुंडली बनविणे, गरजू लोकांना ज्योतिष मार्गदर्शन करणे हा त्यांचा छंद होता. अप्पा जेवण व त्यात विविध पदार्थ बनवण्यात माहीर होते.
 
आपली घराची नैतिक जबाबदारी पार पाडल्यानंतर जराही विलंब न करता नगरचे क्लास बंद करण्याचा निर्णय घेतला. ‘त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्’ - पुनश्च भारतमातेची सेवा करण्याचा निर्णय घेतला. 1988 साली ईशान्य भारताचे क्षेत्र संगठन मंत्री श्रद्धेय वसंतराव भट नगरला आले होते. तेथे त्यांनी नगरच्या सभेत वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य व ईशान्य भारताला तन-मन-धनाची आवश्यकता आहे, कार्य करण्यासाठी युवकांची, वानप्रस्थी मंडळींची आवश्यकता आहे असे अपील केले.
सभा संपल्यावर आप्पांचा परिचय करून देण्यात आला. दोघांच्या गोष्टी झाल्या. आप्पांनी सांगितले, “आपण सांगाल तेथे सांगाल ते काम करण्यास मी तयार आहे.” श्रद्धेय वसंतरावांनी मणिपूरला येण्यास सुचवले व तेथे काकचिंग छात्रावासाच्या कार्याची जबाबदारी सोपविली.
मणिपूरला जायचा निर्णय झाल्यावर अप्पांनी आपली पूंजी नातेवाइकांना, काम करणार्‍या लोकांना वाटली. अप्पांचे विद्यार्थी अप्पांना म्हणाले, “तुम्ही इतक्या दूर जाणार आहात, पैसे ठेवा.तुमची तब्येत बिघडली तर असावे.” त्यावर अप्पा म्हणाले, “माझी काळजी घेणारे तेथे आहेत. आपण चिंता करू नका. मला काहीही होणार नाही. मी आजारी पडणार नाही, मी 100 वर्षे जगणार आहे.” आणि खरोखरच अप्पा आजारी पडले नाहीत व 99 वर्षे 7 महिने जगले.
अप्पांनी मणिपूरला प्रस्थान करताना नातेवाईक-मित्र-आप्तेष्टांना सांगितले, “मी दर चार वर्षांनंतर येणार. ते फक्त एक ते दीड महिनाच राहणार”, त्याप्रमाणे तसे राहिले. अपवाद फक्त भावाचे निधन झाले, तेव्हा पुतण्या मुकुंद मागे लागला, विमानाचे तिकीट पाठवले, अडून बसला म्हणून आले व कार्य झाल्यावर पुन: कार्यक्षेत्रात हजर झाले.
 
अप्पा 1988ला मणिपूरला मे काकचिंग छात्रावासात पोहोचले.अप्पांना मराठी व इंग्लिश उत्तम बोलता येत होते. अप्पांनी हिंदी शिकून घेतले. आश्रमात नागा जनजातीमध्ये उपजाती - उदाहरणार्थ काकचिंग छात्रावासात मरींग नागा, चिरू नागा, रोगमई नागा, तांखुल नागा.. एक-दुसर्‍या नागाची भाषा वेगळी, लिंक लँग्वेज मणिपुरी होती. अप्पा हिंदीत, इंग्लिशमध्ये व नंतर थोड्या मणिपुरी भाषेत संवाद साधत होते. भाषेची कसरत करत मुलांना शिकव होते. शिक्षण हा अप्पांचा आवडता विषय, त्यामुळे त्यावर त्यांचा जोर होता.
अप्पा कृष्णेच्या काठी राहत असल्याने सकाळी पोहणे व स्नान करणे याची सवय होती. काकचिंगला थंडी खूप असल्याने अप्पा गरम पाण्याने स्नान करत होते. अप्पांना स्वत:चे काम स्वत: करण्याची सवय असल्याने रोज आश्रमात पुखरी - म्हणजे तलाव - तेथून पाणी आणणे, त्याला तुरटी लावणे व मग पाणी दुसर्‍या दिवशी पिण्यासाठी वापरणे हे ते स्वत: करत.

 
आश्रमातील जेवणाचा मेनू वरण, भात, भाजी, इरोंबा म्हणजे चटणी असायची. सकाळ-दुपार-संध्याकाळ भातच आवडायचा.अप्पांना दातामुळे जेवायला मऊ पदार्थ आवडायचे, त्यामुळे अप्पा मऊ भात, पोळी, भाजी बनवायचे. अप्पांना जेवण करणे, चहा बनविणे याचा कंटाळा नव्हता.

 
अप्पाची दिनचर्या - पहाटे 3:30ला उठायचे. शौचमुखमार्जन झाले की चहा घेऊन इंग्लिश पेपर वाचीत. पहाटे 4:30ला मुलांना उठवत. मणिपूरला लवकर उजाडते. त्यानंतर एकात्मता स्तोत्र होते. मरिंग नागा मुले होती, त्यांना सकाळी एकात्मता स्तोत्र शिकवण्यासाठी एक शब्द 50 वेळा म्हणून घ्यायचे. त्यानंतर मुलांचा व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार करवून घेत. त्यानंतर अप्पा स्वत: तेथे उभे राहून जलपान व अभ्यास करून घेत असत.
14 वर्षे अप्पाजी ईशान्य भारतामध्ये राहिले. ही फार मोठी साधनाच होती. बंडखोर लोकांचे 48 तास, 72 तास बंद असायचे. त्यामुळे ठरलेले कार्यक्रम रद्द करावे लागत. हिंदी, मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळायची नाहीत. दळणवळण बंद. परंतु आपण स्वीकारलेले कार्य करत राहायचे, हे अप्पांनी ठरवले होते.
80 वय झाल्याने नातेवाईक म्हणाले, ‘आपण आता महाराष्ट्रात परत या. जवळपास कार्य करा.’ याचा विचार करून 2002 साली अप्पा केंद्रशासित प्रदेश दादरा-नगरहवेलीत आले.
शिक्षण हा अप्पांचा आवडता विषय होता. योगायोगाने मणिपूरमध्ये छात्रावासाची व्यवस्था, संस्कार, अभ्यासाचा आग्रह, शिस्त, स्वच्छता ह्याचे काटेकोरपणे पालन करत व मुलांना करायला सांगत. अप्पांची ठरलेली दिनचर्या कधीही बदलत नसे.
 
सूर्यनिकेतन मोटारांधा येथे मुलांचे छात्रावास होते. श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांनी छात्रावासातून वनवासी समाजाचे नेतृत्व करणारे, संस्कारित, स्वाभिमानी, भारतमातेची सेवा करणारे, आपल्या परंपरा, संस्कृतीचे रक्षण करणारे, लीडरशिप देणारे हजारो युवक तयार करणे - थोडक्यात मनुष्य घडविण्याचे काम छात्रावासातून होणे हा मुख्य उद्देश घेऊन छात्रावास प्रारंभ केला.
 
 
अप्पा म्हणत, “वनवासी मुले ही अभ्यासात कुठेही कमी नाहीत, फक्त एका जागी स्थिरपणे बसणे हे त्यांना जड जाते.” रांध्याला इंग्लिशच्या क्लासला बसायला मुले कंटाळा करत. भाषा वेगळी, त्यामुळे ती प्रयत्नपूर्वकच शिकवायला लागते. श्रद्धेय रामभाऊ गोडबोले रांध्याला देवभूमी म्हणायचे, त्यामुळे रांध्याच्या मोठ्या परिसरात अप्पांचा सगळ्यांना आधार वाटायचा. त्यांचे वास्तव्य प्रेरणा देणारे होते..
 
 
वयाची 90 वर्षे पूर्ण केल्यानंतर अप्पा वृद्धावस्थेमुळे कर्जतला पुतणी श्रीमती अरुणाताईंकडे सन 2011पासून शेवटपर्यंत राहू लागले.
 
 
अप्पांच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा इथे पूर्ण झाला. आता खर्‍या अर्थाने अप्पा कार्यमुक्त होऊनही नियमित दिनचर्येचे पालन वाचन, मनन करत आनंदाने अरुणाताईंकडे कर्जतला राहत होते.
अप्पांचा स्वभाव तापट होता, पण सामाजिक कार्यात तो त्यांनी बदलला. अप्पा अत्यंत निर्भय होते. भीती हा शब्द त्यांच्या कोशात नव्हता. अप्पा 1988मध्ये मणिपूरला गेले. मी 1989मध्ये पोहोचलो, तो काळ अशांत होता. बंडखोरांचे उपद्रव वाढू लागले होते. मी 1995मध्ये मणिपूर येथून बस्तरला आलो. मणिपूरमध्ये बंद, दहशतवाद वाढत होता. बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना मारहाण हाकलून देणे असे प्रकार चालू होते. त्यामुळे इंफाळच्या संघकार्यकर्त्यांनी त्यांना इंफाळला आणायचे ठरवले.

 
आश्रमातली मुलेही घरी गेली होती. अप्पा त्या मोठ्या परिसरात एकटेच, म्हणून त्यांना सांगितले, “तुम्ही इंफाळला चला.” अप्पांनी ते नाकारले. “मला काहीही होणार नाही. मी इथेच राहणार.” ते गेले नाहीत. निर्भयता हा त्यांचा गुण होता. आपली संघाची राखी अप्पा काँग्रेसच्या नेत्यांना बांधत, ते नकार देत व सांगत, “संघाचा स्वयंसेवक राखी बांधल्याशिवाय जाणार नाही” व राखी बांधूनच येत. कुणावरही अन्याय झालेला त्यांना सहन होत नसे. त्यासाठी पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभे राहत.
स्वत:च्या बाबतीत कठोर, पण दुसर्‍याच्या सोयी-गैरसोयीचा विचार करत. सगळ्यांना मार्गदर्शन करणे, मदत करणे हा गुण होता.वाचन अफाट होते. नोट्स काढायचे. मणिपूरमध्ये अन्य प्रांतांतले कार्यकर्ते येतील, त्यांच्यासाठी मणिपुरी-मराठी-हिंदी असा शब्दकोश तयार केला.
 
15 जुलै 2021 रोजी ते घरात पडले व त्यंच्या मांडीचे हाड मोडले. त्यामुळे पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.ऑपरेशननंतर 21 जुलै 2021ला परत घरी कर्जतला गेले. आपले दुसर्‍याला करावे लागते हे मन स्वीकारत नव्हते. पुतणा-पुतणी पूर्ण श्रद्धेने सेवा करत होते, पण त्यांनी मनोमन अनंताच्या यात्रेला जायचे ठरवले होते.
 
1 ऑगस्ट 2021 ला वयाची 99 वर्षे 7 महिने पूर्ण करून त्यांची प्राणज्योत मालवली. अप्पांनी अनंताच्या प्रवासाला प्रारंभ केला.

वनवासी कल्याण आश्रम
पश्चिम क्षेत्र छात्रावास प्रमुख