।। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी ।।

04 Sep 2021 17:55:35
 @योगेश नं. काटे
 
 पू. स्वामी वरदानंद भारती  यांच्या  पुण्यतिथीचा  दिवस, म्हणून स्वामीजींच्या ग्रंथांचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रस्तुत लेखात परामर्श घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न...
 
 
bharti_1  H x W
 
वरील अभंगाची ओळ वाचताना वा त्याचे चिंतन करत असताना काही व्यक्तिमत्त्वे माझ्या नजरेसमोर येतात - उदा., श्री ज्ञानाबोराय, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवप्रभू व लोकमान्य टिळक या युगपुरुषांचे स्मरण होते. याचबरोबर आणखी एका महान व्यक्तीचे स्मरण होते, ती व्यक्ती म्हणजे 'ब्र. स्वामी वरदानंद भारती' यांचे. होय, विसाव्या शतकातील एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे पू. स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले. सारा महाराष्ट्र त्यांना महाभारताचे गाढे अभ्यासक म्हणून तर ओळखतोच, तसेच एक कीर्तनकार व आधुनिक महिपती श्री दासगणू महाराज यांचे शिष्योत्तम म्हणूनसुद्धा ओळखतो. गेले वर्ष जसे लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष होते, तसेच पू. स्वामीजींचे जन्मशताब्दी वर्ष होते, हा विलक्षण दैवी योगच म्हणावा लागेल. हे लिहिण्याचे कारण पू. स्वामीजींच्या राष्ट्र व धर्मविचारांवर लोकमान्यांच्या विचारांचा प्रभाव प्रखरतेने जाणवतो. स्वामीजींचा आज समाराधना दिवस - म्हणजे पुण्यतिथी व संजीवन समाधी दिवस, म्हणून स्वामीजींच्या ग्रंथांचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रस्तुत लेखात परामर्श घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करतो.
 
संतांचा संघर्ष, चमत्कार यांनी, तसेच त्यांच्या प्रज्ञेने वा प्रतिभेने आपण स्तंभित होतो. पण तथाकथित बुद्धिवादी म्हणवणारे संतांच्या अलौकिकतेबद्दल संशय निर्माण करतात. मात्र स्वामीजींची अपार ग्रंथसंपदा, वैदिक जीवनपद्धतीचा अवलंब आणि संजीवन समाधी हे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित बुद्धिवाद्यांना जबर चपराकच म्हणावी लागेल.
स्वामीजींचे जीवन पू. दासगणू महाराज यांच्या सहवासात गेले. लहान असताना वडिलांचे छत्र हरवले. पू. दासगणू महाराज व स्वामीजींच्या मातोश्री यांच्या कडक शिस्तीत त्यांची वाढ झाली. पण तरुण वयात स्वामीजींचा कल नास्तिकवादाकडे झुकला होता, हे त्यांच्या चरित्रात वाचायला मिळते. तसा त्यांनी बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला आहे. मात्र पू. दासगणू महाराजांनी स्वामीजींना विष्णुसहस्रनामाची उपासना करण्यास सांगितली व म्हणाले, "किती काळ लागेल हे विचारू नकोस, फक्त ही उपासना निष्ठेने कर." ही गुरूची आज्ञा त्यांनी जीवननिष्ठेसारखी पाळली व त्यांच्या आयुष्यास कलाटणीच मिळाली. गुरु-शिष्य म्हणजे निवृत्तीनाथ व ज्ञानोबराय, श्री एकनाथ महाराज व श्री जनार्दन स्वामी, तशीच श्री दासगणू महाराज व श्री स्वामी वरदानंद भारती यांची गुरुशिष्याची जोडी होय. या साधनेच्या मार्गावर मार्गक्रमण करताना त्यांनी स्वानुभवात्मक अशी विशाल ग्रंथसंपदा निर्माण केली. सुरुवात श्रीकृष्णकथामृत ते मनुस्मृती सार्थ भाष्य, तसेच या सहस्रनामाच्या बलाने गंगोत्री येथे त्यांना साक्षात नारायणाचे दर्शन झाले.
 
ग्रंथलेखन व प्रवचन-कीर्तनाद्वारे पाखंड खंडन -

साधकांना मार्गदर्शन हा पू. स्वामीजींच्या साहित्यनिर्मितीचा उद्देश तर होताच, तसेच पाखंडाचे खंडन करणे हासुद्धा होताच.
म्हणजे सत्तरच्या दशकात भगवान् वेदव्यास लिखित ऐतिहासिक महाकाव्यावर बुद्धिवादी साहित्यिकांनी शब्दचातुर्याने, तसेच त्यांना सोईचे जाईल तेवढेच मांडले. यात खूप मोठी नावे आहेत. दुर्गाबाई भागवतांपासुन ते कुरुंदकरांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. ललित साहित्याचेसुद्धा असेच आहे.
 
अशा सर्व नामवंतांची मते कशी सोईची, अप्रामाणिक व दिशाभूल करणारी आहेत, हे त्यांनी उपलब्ध महाभारताच्या प्रतीनुसार सप्रमाण बिनतोड युक्तिवादाच्या, तसेच शास्त्रसंमत तर्काच्या आधारे 'महाभारताचे वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात' या ग्रंथातून मांडले. तसेच श्रीकृष्णाच्या चरित्राबाबतही साहित्यिक विचारवंतांनी अशीच मते मांडली, त्यांचेही 'भगवान् श्रीकृष्ण एक दर्शन' या ग्रंथाच्या माध्यमातून सडेतोड युक्तिवादाने खंडन केले आहे. हे ग्रंथ सर्वांच्या घरी असलेच पाहिजेत. असो.
त्याचबरोबर 'वाटा आपल्या हिताच्या' हा प्रश्नोत्तरावर आधारित ग्रंथ म्हणजे या आधुनिक युगातील गीता वा प्रश्नोपनिषदच म्हणावा लागेल. या ग्रंथात धर्म, हिंदुत्व म्हणजे काय, स्त्रीस्वातंत्र्य, चातुर्वर्ण्य, आंतरजातीय विवाह याबद्दल तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याला तर्काधारित उत्तरे दिली आहेत. यासाठी त्यांनी रामायण, महाभारत, उपनिषद, गीता, संतवचने यांचा आधार घेत स्वानुभवात्मक चिंतनातून प्रकटलेल्या तर्कशुद्ध प्रतिवादाची मांडणी करत समाजवादी व दांभिक हिंदुत्ववादी याबरोबरच कम्युनिस्ट विचारसरणी देशास व धर्मास कशी घातक ठरत आहे, याचे विश्लेषण या सर्व ग्रंथात आपणास वाचण्यास मिळेल.
 
पू. स्वामीजींनी जवळजवळ चाळीस ग्रंथांचे लिखाण केले, यात अनुवाद ज्ञानेश्वरी, मनोबोध, गीतेच्या सर्व अध्यायांवर गद्य भाष्य, ब्रह्मसूत्रांवर ओवीबद्ध भाष्य व उपनिषदांवर गद्य व पद्य भाष्य, याचबरोबर संघ प्रार्थना, शंकराचार्य यांच्या प्रकरण ग्रंथावरसुद्धा भाष्य केले आहे. शेवटी मनुस्मृती या ग्रंथावर भाष्य लिहिले. मनुस्मृतीचे नाव काढले तरी तो प्रतिगामी ठरतो. पण हे भाष्य वाचल्यानंतर आपल्या मनातील या ग्रंथाबद्दल असलेले बरेच अपसमज दूर होतील, एवढे मात्र नक्की.
पू. स्वामीजींचा लोकसंग्रह हा सामान्य भाविकांपासून ते समाजातील प्रत्येक क्षेत्रातील थोर व्यक्तीपर्यंत होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयासारखे उत्तुंग तर होतेच आणि आचरण स्फटिकासारखे स्वच्छ, पारदर्शक होते. प्रखर राष्ट्रभक्त, समाजहिताची तळमळ, पराकोटीची प्रसिद्धिपराङ्मुखता, चिकित्सक व्यासंग हे स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. तसे ते संन्यासी व संत असले, तरी रामदास स्वामी व तुकोबांच्या परंपरेतील असल्यामुळे, ठकास ठक व पाखंड खंडन करणे हे त्यांचे ब्रीदच होते. म्हणून तर योद्धा संन्यासी म्हणून पू. स्वामीजींना संबोधतात. अशा महान विभूतीचा प्रत्यक्ष सहवास मला अत्यल्प लाभला ही खंत आहेच. पण त्यांच्या साहित्याचा सहवास मात्र मला खूप लाभला, ही माझी फार पूर्वजन्मांची पुण्याईच म्हणावी लागेल. आणि पू. स्वामीजींचा शेवटचा

संदेश हाच होता -
मी म्हणजे ना शरीर।
मी मद्गग्रंथांचा संभार।
म्हणून मी पू. स्वामीजींच्या सहवासात आहे. आद्य शंकराचार्य यांचा ज्ञानयोग, संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे कोमल हृदय, नामदेव व तुकोबांसारखा भक्तियोगी, श्री एकनाथ महाराजांसारखी प्रासादिकता व शुचिता, तर समर्थांसारखी धर्मनिष्ठा व कठोर प्रयत्नवाद, आणि लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग आणि स्वा. सावरकरांसारखा राष्ट्रयोग असे अद्भुत रसायन आपणास त्यांच्या साहित्यातून व व्यक्तिमत्त्वातून दिसते. स्वामीजींच्या चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करत लेखास विराम देतो.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
शब्दवाही : योगेश नं. काटे
7620980880 
Powered By Sangraha 9.0