शिल्पकलेतील चैतन्य हरपले

विवेक मराठी    04-Sep-2021
Total Views |
@अरुणा गर्गे 7030191869


जागतिक ख्यातीचे शिल्पकार सदाशिव दत्तात्रेय उपाख्य भाऊ साठे यांचे 30 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा श्रद्धांजली लेख.


RSS_1  H x W: 0
माझे लग्न झाल्यानंतरची गोष्ट. एक दिवस सकाळी कळले की शिल्पकार भाऊ साठे चित्रकला महाविद्यालय येथे प्रात्यक्षिकासाठी येणार आहेत. माझ्या सासूबाई म्हणाल्या, “अरुणा, जा गं! भाऊला सांग, मी भेटायला बोलावलं आहे.” मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण माई म्हणाल्या म्हणून मी गेले. भाऊंचे काम आटोपल्यावर ते हात धूत असताना माईंचा निरोप सांगितला, तर संस्थेचे इतर पदाधिकारी विरोध करू लागले; परंतु भाऊंनी त्वरित सांगितले की “मी आधी हिच्याबरोबर जाणार आणि लगेच परत येईन” त्याप्रमाणे ते आले. माझे पती कास्टिंगसाठी फाउंड्रीत गेलेले होते. माईंचे व भाऊंचे खूपच आस्थेवाईक बोलणे झाले व भाऊ परत संस्थेत गेले.

माझे सासरे गजाननराव गर्गे यांचा कधीकाळी मोठा स्टुडिओ होता. तेथे शिल्पकला, पेंटिंग्ज, टॅक्सिडर्मी, फोटोग्राफी अशी अनेकविध कामे चालू असत. तेथे तरुण वयात भाऊंनी शिल्पकला विभाग अल्पकाळ सांभाळला आहे, होता. तसे फोटोही उपलब्ध आहेत.

कालांतराने भाऊंचे स्वत: लिहिलेले ‘आकार’ हे पुस्तक हाती आले. त्यात त्यांनी आपल्या प्रदीर्घ कला कारकिर्दीबद्दल लिहिले आहे. चरित्रे खूप असतात, पण कलाकाराने स्वत: लिहिलेले हे पुस्तक कदाचित एकमेव असेल.

घरी गणपतीचा कारखाना चालवणार्‍या काकांच्या प्रोत्साहनाने मॅट्रिकनंतर भाऊंनी शासकीय शिल्पकला या विषयातला डिप्लोमा घेतला. घरचा गणपतीचा सीझन, अत्यल्प असा सिनेमा व्यवसायातील अनुभव यांनी समाधान होईना. भाऊंनी थेट दिल्ली गाठली.
नवीन सरकारचे बस्तान बसलेले नव्हते आणि संस्थाने खालसा झालेली होती. परंतु भाऊ स्वत:चे काम करत राहिले आणि अशात महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम मिळाले व कुठलाही नवखेपणा न येता आत्मविश्वासाच्या बळावर भाऊंनी ते काम उत्तमरित्या पूर्ण केले. नंतर मात्र त्यांना आपणहोऊन कामे मिळत गेली. त्यात रामनाथ गोएंका, पंडित नेहरू, वीर सावरकर, हेडगेवार, विक्रम साराभाई, लोकमान्य टिळक, वीर मुरारबाजी यांची कामे केली. 18 फूट अश्वारूढ शिवाजी महाराज मुंबईला गेटवे ऑफ इंडिया येथे, तसेच दिल्लीतही आहे. तसेच नेताजी सुभाष यांचे दिल्लीत 20 फूट शिल्पस्मारक, आसाममध्ये शीला राय (18’) लासित बारफुकन (15’) अशी असंख्य कामे केली. लंडनला थेट प्रिन्स फिलिप व लॉर्ड माउंटबॅटन यांची कामे प्रत्यक्ष समोर बसून केली.
 
भाऊंची लहानखुरी मूर्ती बघता विश्वासच बसत नाही की एवढी कामे त्यांनी केलीत, परंतु पॅशन हा एकच शब्द योग्य आहे. त्यांना काम करण्याची अनिवार ओढ होती. योग्य ते शिक्षण, घरातील पूर्ण पाठिंबा, माती लावण्याची स्वत:ची विशिष्ट पद्धत, शैली या सर्व गोष्टी त्यांना काम करण्यास पूरक ठरल्या.


RSS_1  H x W: 0
 
जबाबदारी घेतलेल्या कामांव्यतिरिक्त त्यांनी स्वत:साठी खूप काम केले व त्यांच्या कामांमागे वैचारिक बैठक खूपच मोलाची होती. पुतळा ज्याचा करायचा आहे, त्याचा विशिष्ट दर्जाचा फेटा, त्यामागचे व्यक्तिमत्त्व, कालखंड यांचा त्यांनी नेहमीच विचार केला. कुठलाही वशिला किंवा आर्थिक देवघेव या रस्त्याने न जाता आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर कामे मिळवली.
 
फक्त पुतळाच नव्हे, तर त्याचा चौथरा आणि परिसर हे पूरकच असले पाहिजेत हा त्यांचा आग्रहच असे. त्यांनी जाहीररित्या यांचा पाठपुरावादेखील केला. त्यांच्याकडे असलेल्या काही नावीन्यपूर्ण संकल्पना स्वीकारल्या गेल्या नाहीत, याची त्यांना खंत होतीच.
माझे शिल्पकार पती मदन गर्गे हयात असताना (2008मध्ये ते गेले) संध्याकाळी भाऊंचा मला फोन आला. “मी नाशिकमध्ये आलोय. मला स्टुडिओवर घेऊन चल.” तत्परतेने तशी व्यवस्था करून भाऊंना स्टुडिओवर आणले. तेथे ते आले की खूश असत. स्टुडिओ व फाउंड्री लागूनच होती, आहे. सर्वत्र कामाचा धबडगा चालू असे. सर्व कामे हिंडून स्वत: बघितली. मग मला म्हणाले, “तुझे काम दाखव.” काहीशा संकोचाने मी गर्गे (पती) यांचे केलेले हेड दाखवले. यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त समोर बसवून केले होते.. तर त्यांनी मनापासून कौतुक केले.


RSS_2  H x W: 0
आणखी इतर कुठल्या कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांचा फोन आला, “घ्यायला या.” उतरण्याची व्यवस्था अशी होती की, बाथरूममध्ये पाणी नाही. दिवे आहेत पण इलेक्ट्रिसिटी नाही. मग स्टुडिओवर गरम उप्पीट वगैरे व्यवस्था केली आणि भाऊ रिलॅक्स झाले.

आमच्या स्टुडिओत झालेल्या मोठ्या कामांच्या फायबर कॉपीजही डिस्प्ले करून ठेवल्या आहेत. तर भाऊ म्हणाले, “जागेअभावी मी फक्त हेड ठेवली. प्लॅस्टरच्या फिगर तोडून टाकल्या.” तरी नंतर फायबर ग्लासचे मटेरियल उपलब्ध झाल्यावर काही फिगर त्यांनी सांभाळल्या आहेत.

दरम्यानच्या काळात भाऊंनी दांडी गाव, गुजरात येथील एक काम स्वीकारले. 16 फूट उंचीचे महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी चालताना अशी पोझ आहे. त्याच वेळी त्यांनी जाहीर केले की, यापुढे मी नव्याने काम स्वीकारणार नाही. निवृत्तीच जाहीर केली. फाउंड्री बंद केली. स्टुडिओचे म्युझियम केले.

कोयना नगरच्या धरणापाशी होणार्‍या त्यांच्या एका शिल्पाचे मॉडेल (3/4 फूट) त्यांनी आमच्या स्टुडिओतून कास्ट करून घेतले. त्यानिमित्ताने ते आले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. स्टुडिओत/फाउंड्रीत चक्कर झाली. मग छान आमरसाचा बेत केला होता. भाऊ खूश झाले. मग म्हटले, “आता दगदगत निघू नका.” त्यांनी एक छानशी झोप काढली. त्यांच्या वयाची जाणीव आम्ही ठेवत होतो, पण ते मात्र स्टुडिओत बिनाआधाराचे लीलया वावरत.


RSS_3  H x W: 0
जुन्या आठवणी सांगत असत. कलेच्या इतिहासाचे ते जिवंत पुस्तकच होते. पण तेवढेच नाही, तर स्वत:च्या फाउंड्रीमध्ये त्यांनी स्वत: अनुभवाने काय काय डेव्हलपमेंट केल्या, त्याही मोकळ्या मनाने सांगत. ते म्हणत, “काय विचारायचे ते विचारा. मी तुम्हाला माहिती देईन.” त्यांच्यातला चांगला माणूस वेळोवेळी प्रत्ययास येत असे. मुळात माणूस चांगला असेल, तर त्याची कलाही तशीच बहरते.

एक परिपूर्ण कलाकाराचे आयुष्य भाऊ जगले. विशिष्ट वैचारिक बैठक आणि तंत्रशुद्धता या गोष्टी सहजी अंगीकारलेल्या होत्या. काम करताना व्यक्ती विशेष असेल तर त्यांचे कर्तृत्व समजून घेऊन ते कसे कामात उतरवता येईल, याचा ते विचार करीत.

माती लावण्याच्या स्वत:च्या अशा पद्धतीतून पुतळा चैतन्यमय होत असे. केवळ कलेच्या अंगानेच नव्हे, तर स्वत:ची फाउंड्री टाकल्यावर त्यांनी तंत्रात अनेक सुधारणा केल्या. संपूर्ण आयुष्य कलेसाठी झोकून दिलेले होते. केवळ पुतळाच नव्हे, तर त्याचा सुयोग्य असा चौथरा असला पाहिजे, तेव्हा ते संपूर्ण परिपूर्ण शिल्पस्मारक तयार होते, याबाबत ते आग्रही होते. परिसरही रसहानी होणार नाही असा असला पाहिजे, याचे भान राखले जावे ही अपेक्षा असे.

आजच्या काळात शिल्पकारांना कंत्राटदार समजले जाते व सर्वांच्या मनात एक अनादराची भावना असते. दांडी येथील सत्याग्रह स्मारकातील म. गांधी (सोळा फूट) हे त्यांनी स्वीकारलेले शेवटचे काम. नंतर त्यांनी जाहीर निवृत्ती घेतली. (2014)
त्यांच्या आग्रहावरून आम्ही (मी व मंदार - पुतण्या) त्यांच्या घरी गेलो होतो. आमच्या खाण्याची त्यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. आम्ही जाईपर्यंत त्यांनी खाल्ले नव्हते. मग नंतर आम्ही थोडी दूर असलेली फाउंड्री किंवा आता त्यांचे सार्‍या कलाकृतीचे केलेले म्युझियम बघायला गेलो. खूप उत्साहात ते सर्वत्र वावरत होते. मग एक हॉल खास नेत्रावहिनींच्या पेंटिंगसाठीचा होता, तेथे गेलो. त्या काळात त्या कोल्ड सिरॅमिक्सची पेंटिंग करायच्या. तेथे आठवण म्हणून ‘पॅलेट’ नावाचे नेत्रावहिनींनी लिहिलेले पुस्तक भेट दिले. तेसुद्धा अतिशय साधे सुरेख पुस्तक आहे. लग्नानंतरच वाड्यातले एकत्र कुटुंब, सासूबाई, स्वत:ची कामे यांच्यावर त्यांनी वेगळा प्रकाश टाकला आहे.
 
नेत्रावहिनी गेल्यानंतर एक प्रकारे भाऊ एकटे पडले, पण घरातील प्रत्येक जण तत्परतेने त्यांची काळजी घेत होता.

नंतर त्यांनी एकदा सांगितले की, “आता माझ्याच्याने प्रवास होणार नाही. तर तुम्हीच भेटायला येत जा.” ते सकाळच्या वेळात घरीच पेंटिंग करायचे. दुपारी जेवणानंतर विश्रांती व संध्याकाळी वाटले तर म्युझियमवर फेरफटका.
आता भाऊ तेथे भेटणार नाहीत. तेथे सर्व काही तसेच असेल, पण त्यांच्या अस्तित्वाचे चैतन्य मात्र लोपले आहे.