गोष्ट मराठवाड्यातल्या ’रँचो’ शिक्षकाची

विवेक मराठी    06-Sep-2021   
Total Views |

@विकास पांढरे  9970452767
 संशोधन करून तंत्रस्नेही शिक्षण देण्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये क्षमता आहे, हे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश खोसे यांनी सिद्ध केले आहे. मुलांना बंजारा बोली भाषेतून शिक्षण देण्याबरोबरच इंटरनेटशिवाय वापरता येतील अशा एक नव्हे, तर तब्बल 51 शैक्षणिक अ‍ॅप्सची निर्मिती करून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेकविध संकल्पना पंखांचे बळ दिले आहे. शिक्षण क्षेत्रातल्या या विशेष योगदानाबद्दल खोसे यांना मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे मराठवाड्यातील या ‘रँचो’ने ग्रामीण शाळांची शान वाढवली आहे.

shishak_4  H x

शेती, उद्योग, आर्थिक क्षेत्रातील विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा तसा मागेच आहे, तसेच शालेय शिक्षणाबद्दलही म्हणता येईल. या भागावर स्वातंत्र्यापूर्वी निजामाचे राज्य होते. निजामाला शिक्षणाचे आणि संस्कृतीचे वावडे होते. निजामाच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर येथे शिक्षण अधिक गतिमान झाले. पण प. महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये शैक्षणिक चळवळ सुरू व्हायला खूप उशीर झाला. या भागातील शालेय शिक्षण प्रकाशाच्या झोतात पहिल्यांदा आले ते दोन दशकांपूर्वीच्या ‘लातूर पॅटर्न’मुळे. लातूरची मुले शालेय शिक्षणात सतत बाजी मारत असत. हे सकारात्मक चित्र उर्वरित जिल्ह्यात नव्हते.

आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील ‘महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील उच्चस्तरीय समिती’ने महाराष्ट्रातील शैक्षणिक असमतोलाचाही सूक्ष्मपणे अभ्यास केला होता. या समितीच्या अभ्यासानुसार पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर दहावीमध्ये पोहोचेपर्यंत मराठवाड्यातील सुमारे 50 टक्के विद्यार्थी शाळा सोडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आजही उस्मानाबाद, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतील शैक्षणिक गती संथच आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव निर्देशांक कमी असून, निती आयोगाने निवडलेल्या देशातील 115 आकांक्षित जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. या जिल्ह्याचे मागासलेपणा दूर करण्यासाठी आमूलाग्र विकास घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘शिक्षण’ हे महत्त्वाचे माध्यम आहे.

 
शाळा असून आणि त्यात शिकूनही शिक्षणापासून दूर पळणार्‍या मुलांना गरज आहे ती वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची, त्यांना अभ्यासाची गोडी लावण्याची. गेली अनेक वर्षे शैक्षणिक अ‍ॅप्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची गोडी लावणार्‍या उमेश खोसे सारख्या तंत्रस्नेही शिक्षकांची. लमाण तांड्यावरच्या मुलांना शिकवणार्‍या रँचोची महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाड्यात, पाड्यात, गरीब वस्त्यांमध्येही तेवढीच गरज आहे.

लातूर जिल्ह्यातील माटेफळ या गावापासून उमेश खोसे यांचा जीवनप्रवास सुरू झाला. उमरगा तालुक्यातील (जि.उस्मानाबाद) बेळंब येथील लमाण (बंजारा) तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून खोसे 2007मध्ये रुजू झाले. सध्या ते कडदोरा (ता. उमरगा) शाळेत कार्यरत आहेत. जेव्हा ते बेळंब तांड्यावरच्या शाळेत रुजू झाले, तेव्हा त्या तांड्यात पाचवीपर्यंत शाळा होती. पटसंख्या 50च्या आसपास होती. परंतु, उपस्थितीचा मोठा प्रश्न होता. मुलींच्या शिक्षणाबद्दल अनास्था होती. कारण शाळेत येणारे सर्व मुले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बंजारा जमातीतील होती. लोक कामासाठी बाहेरगावी स्थलांतर करायचे. ही परिस्थिती बदलण्यासाठी खोसे यांनी सहकार्‍यांच्या मदतीने गावातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कामासाठी बाहेरगावी जाताना आपली मुले आजी-आजोबांकडे ठेवायला, हंगामी वसतिगृहाची मदत घेऊन शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तांड्यावरची मुले -मुली नियमित शाळेत हजर राहू लागली.


shishak_1  H x


 
बोलीभाषेतून शिक्षण
 
उमेश खोसे यांनी राबवलेला ‘बोलीभाषेतून शिक्षण’ हा उपक्रम राज्यस्तरावर नावाजला गेला. शाळेत रुजू झाले, तेव्हा खोसे यांच्यासमोर भाषेचा मोठा प्रश्न उभा राहिला. मुख्य म्हणजे शाळाच महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेलगत असल्यामुळे मुलांवर बंजारा बोलीभाषेचा आणि मराठी-कानडी मिश्रित भाषेचा प्रभाव होता. यावर उपाय म्हणून सुरुवातीला मुलांकडूनच त्यांनी बंजारा बोलीभाषा शिकून घेतली. सहकारी शिक्षक सुभाष राठोड यांनी ही भाषा शिकण्यासाठी खोसे यांना मदत केली. त्यानंतर खोसे यांनी बंजारा बोलीभाषेतून इयत्ता पहिलीचे पुस्तक अनुवादित करून मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि गुणवत्तावाढीमध्ये याचा फायदा झाला आहे. मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळाल्याने मुले आनंददायक पद्धतीने शिकू लागले. त्यांच्या या बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमांमध्ये निवड होऊन त्यांना जवळपास लाखो शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासमोर सादरीकरणाची संधी मिळाली.
 
51 ऑफलाइन अ‍ॅप्सची निर्मिती

खोसे यांची खासियत सांगायची झाली, तर वाड्या, वस्त्या, तांडा आणि पाड्यावरच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना इंटरनेटशिवाय ऑफलाइन हाताळता येतील अशा 51 ऑफलाइन अ‍ॅप्सची निर्मिती केली आहे. इ. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खोसे यांनी ही अ‍ॅप्स बनवली आहेत.
 
ऑफलाइन अ‍ॅप्सची संकल्पना कशी सुचली? याबाबत खोसे सांगतात, “ग्रामीण भागात काम करत असताना मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे म्हणून काय करता येईल हा विचार करत होतो. परंतु आमच्या शाळेमध्ये मोबाइलला रेंज येत नव्हती. अशा शाळेत मुलांना कृतियुक्त शिक्षण कसे द्यावे? हा विचार करत असताना ‘ऑफलाइन’ शिक्षणाची कल्पना माझ्या डोक्यात आली. मुलांना मोबाइलमधील गेम खेळण्यात जास्त आवड असते. तसेच आपण काय बनवले तर मुलांना शाळेची आवड निर्माण होईल व ते नियमित शाळेत येतील म्हणून ही निर्मिती हातात घेतली. यासाठी मला यूट्यूबवर गुगल यांच्या माध्यमातून माहिती मिळवून मी निर्मिती करण्यास सुरुवात केली. यासाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फ्री प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याच्या साह्याने मुलांना शाळेत ती अ‍ॅप्स दिली व मुले शाळेत रमू लागली.
 
 
प्राण्याची, फळांची नावे, चित्रकला, एकक रूपांतरण, पक्ष्यांची माहिती, रंगांची ओळख, फुलांचे वर्गीकरण, भौमितिक आकृत्या, अंकओळख, मुळाक्षरे, गीतमंच, परिपाठ, शिक्षक डायरी, शालेय वेळापत्रक, शालेय पोषण आहाराचा हिशेब करणारे अ‍ॅप, आठवणीतील कविता, मराठी सुविचार, इंग्लिश कविता अशी एकूण 51 अ‍ॅप्स विकसित केली आहेत. ही सर्व अ‍ॅप्लिकेशन्स इंटरनेटशिवाय चालतात. विशेष म्हणजे ही अ‍ॅप्स ज्ञानरचनावादास पूरक आहेत.
 
 
प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅप्सना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही सर्व अ‍ॅप्स डाउनलोड करता येतात. या सर्व अ‍ॅप्समध्ये चित्रांचा व शब्दांचा समावेश आहे. चित्रावर क्लिक केल्यास चित्र मोठे होते. एका तांड्यावरील शाळेत कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रातला वापर किती महत्त्वाचा ठरला आहे, हे खोसे यांनी दाखवून दिले आहे.

 
संकेतस्थळ व यूट्यूब चॅनेल

खोसे यांनी 2011 साली शाळेचे संकेतस्थळ सुरू केले. या माध्यमातून त्यांनी जे साहित्य तयार केले होते, ते संकेतस्थळावर अपलोड केले. याशिवाय 2013 साली त्यांनी स्वत:ची यूट्यूब चॅनल सुरू केली. मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून त्यातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. खोसे यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या लौकिकात वाढ झाली. आज बेळंब तांडा शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांत वाढ होऊन सातवीपर्यंत इयत्ता वाढली आहे. तसेच विद्यार्थिसंख्या 50च्या आसपास होती, ती आता शंभरच्यावर गेली आहे. त्या शाळेच्या केवळ पटसंख्येतच वाढ नाही, तर गुणवत्तेतसुद्धा वाढ दिसून आली.
 
उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या काळात ज्या तांड्यावर मुली शिक्षण घेणे शक्य नव्हते, अशा तांड्यामध्ये आज मुली शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयामध्ये विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेल्या एकमेव जागेवर त्यांच्या शाळेतील सलग पाच वर्षे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होत होती. तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
 

shishak_1  H x  
 
 
शिक्षण संस्कार शिबिर व डिजिटल शाळा
 
सध्या कार्यरत असलेल्या जगदंबानगर, कडदोरा या शाळेमध्ये खोसे व त्यांचे सहकारी श्रीराम पुजारी यांनी राबवलेला शिक्षण संस्कार शिबिर हा उपक्रम राज्यस्तरावर नावाजला गेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे.

कडदोरा शाळेमध्ये शाळा बांधण्यासाठी जागा नव्हती, अशा वेळी शाळेला गावातील दानशूर व्यक्ती त्र्यंबक चौधरी यांनी दोन गुंठे जागा देऊन त्यावर ही शाळा भरलेली आहे. तसेच जय स्वामीनारायण ट्रस्ट यांनी 24 गुंठे जागा दान देऊन शाळेसाठी मैदान उभा केले आहे. गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या साह्याने शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन कट्टा’ या माध्यमातून मुलांना अवांतर वाचनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामधून मुले निसर्गरम्य वातावरणामध्ये शाळेतील अवांतर वाचनासाठी पुस्तके घेऊन ती वाचतात, त्यातून मिळालेला बोध वर्गामध्ये सांगतात. तसेच या शाळेमध्येही शाळेची पटसंख्या 14वरून आज 30 झालेली आहे. या शाळेमध्ये मुले स्वत: संगणक वापरतात. टॅबवरून, टीव्हीवरून शिक्षण घेतात. तसेच पुढे त्या त्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोय करतात. मुले स्वत: साहित्य तयार करत आहेत. तसेच कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी स्वयंअध्ययन साहित्य तयार करून मुलांना स्वयंशिक्षण देण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे नक्कीच मुलांना आनंददायक व प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळत आहे.
 
 
कोरोना काळात ऑनलाइन व ऑफलाइन शाळा
  
कोरोनाच्या काळामध्ये मुलांचे शिक्षण बंद राहू नये यासाठी 365 दिवस ऑनलाइन व ऑफलाइन शाळा सुरू ठेवून मुलांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. दोन्ही वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांचा निकाल लावणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वत: शाळेची वेबसाइट तयार करून मुलांचा दहावी आणि बारावीसारखा ऑनलाइन निकाल लागलेला आहे. कडदोरा ही ऑनलाइन निकाल लावणारी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे. आजही मुले दीक्षा अ‍ॅपच्या, तसेच इतर साधनांच्या साहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत.

shishak_3  H x


shishak_2  H x
 
लेखन व पुरस्कार
खोसे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहेत. त्यांची 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे खोसे यांनी ‘दीक्षा’ या केंद्र शासनाच्या अ‍ॅपवर ई-कंटेंट तयार केले आहे.

 
उमेश खोसे यांना आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रातील एवढ्या कमी वयामध्ये व कमी सेवेमध्ये जे शिक्षकासाठी मिळणारे सर्वोच्च दोन पुरस्कार आहेत, ते म्हणजे एक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व दुसरा राष्ट्रीय पुरस्कार हे दोन्ही मिळालेले कमी वयातील एकमेव शिक्षक आहेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (2021), राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार (2018), जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार (2017 ), महाराष्ट्र गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, राज्य तंत्रस्नेही पुरस्कारासह त्यांच्या बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमास राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
 
भविष्यातील नियोजन
 
“यापुढेही मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण, आनंददायक व कृतियुक्त शिक्षण देण्याचा निरंतर प्रयत्न करीन, याशिवाय महाराष्ट्रात एक दिशादर्शक मॉडेल स्कूल स्थापन करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्याकडून जे काही शिक्षकांना मी मार्गदर्शन करता येईल येईल ते मार्गदर्शन करत राहीन. यापूर्वीही मी ‘महाराष्ट्र अ‍ॅडमिन पॅनल’ या ग्रूपच्या माध्यमातून शिक्षकांना तंत्रस्नेही करण्यासाठी किंवा हा उपक्रम राबवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करत आलो आहे. हे कार्य आता पुढील काळातही निरंतर करत राहीन” असे खोसे यांनी सांगितले.

 
उस्मानाबादसारख्या अप्रगत जिल्ह्यात उमेश खोसे या तंत्रस्नेही शिक्षकाने राबवलेला उपक्रम शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच दिशादर्शक आहे. आतापर्यंतच्या सेवेमध्ये शाळा सिद्धिनिर्धारक, बालरक्षक (चळवळ), राज्य तंत्रस्नेही (शासकीय उपक्रम), तसेच दीक्षा अ‍ॅपवर साहित्यनिर्मिती अशा वेगवेगळ्या स्तरांवर काम केले आहे. 50च्या वर शाळाबाह्य मुले होती, अशा मुलांना त्यांनी आतापर्यंत बालरक्षक मासिकाद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. बर्‍याच मुलांना वयानुरूप प्रवेश देऊन मुलांचे शिक्षण सुरू केले आहे. इयत्ता दुसरी वर्गाच्या पाठ्यक्रम निर्मितीत त्यांचा सहभाग होता.

अशा या उपक्रमशील शिक्षकास देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षक व आयसीटी पुरस्कार मिळाल्याबद्दल खोसे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
संकेतस्थळ -

यूट्यूब चॅनल -UK TECHNO TEACHER