जावेद अख्तर, माफी मागा!

विवेक मराठी    06-Sep-2021
Total Views |
@रवींद्र मुळे
या मंडळींना पुरस्कार मिळतात, आंतरराष्ट्रीय परिषदांची निमंत्रणे मिळतात, कारण हे त्या टोळीत सामील होतात, जी टोळी हिंदू समाज, भारत देश यांच्या बदनामीचे कट रचतात. यांना तालिबानचे समर्थन करता येत नाही आणि निषेध नोंदवला तर पाकिस्तानात यांचे बसलेले पतपुरवठादार यांना सोडणार नाहीत, म्हणून तालिबानवरून लक्ष हटवून संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची नावे घेऊन जावेद गॅंगचा जो अश्लाघ्य प्रयत्न चालला आहे, त्याचा जेवढा निषेध करू, तेवढा थोडा आहे.
 
RSS_1  H x W: 0
आज जावेद अख्तर ट्विटरच्या माध्यमातून बडबडले!
 
वास्तविक तालिबानी मंडळींच्या हालचाली, त्यांची वक्तव्ये, महिलांचा बाबतीतील त्यांचा घृणास्पद व्यवहार, मध्ययुगीन काळातील त्यांची कायद्यांची संकल्पना यामुळे जगातली आणि विशेषतः भारतातील डावे आणि धर्मनिरपेक्षतावादी मंडळी चांगलीच उघड्यावर पडली आहेत, तोंडावर आपटली आहेत. यांचे आवडते तत्त्वज्ञान म्हणजे 'दहशतवादाला कुठलाच धर्म नसतो'. पण अफगाणिस्तानात शरियत नावाचा धार्मिक कायदा आणि दहशतवाद हातात हात घालून जो धिंगाणा घालत आहेत, त्याकडे सर्व विचारी मंडळी चिंताग्रस्त होऊन बघत असताना भारतात मात्र डाव्यांची आणि पुरोगाम्यांची दातखीळ बसली आहे. दहशतवादाला धर्म असतो आणि तो बहुतांश वेळा इस्लाम असतो, हे तालिबान्यांनी सिद्ध केले आहे. हे मान्य करणे या तथाकथित पुरोगाम्यांना शक्य नाही, कारण त्यासाठीसुद्धा हिम्मत लागते.
 
आमच्याकडे चित्र-तारे आणि तारकांची एक अशीच जमात आहे, जी स्वतःला पुरोगामी समजते, धर्मनिरपेक्षतावादी समजते. यांच्या सगळ्या भूमिका सोयीस्कर असतात. पालघरमधील साधूंचे खून यांच्या निषेधाचे विषय कधीच नसतात. काश्मिरी पंडितांना स्वतंत्र भारतात परागंदा व्हावे लागले, त्या काळात हे कधी बोलले नाही. मुंबई बोंबस्फोट किंवा २६/११बद्दल यांना कधी फार काही चिंता वाटली नाही. फाळणीच्या काळातील अत्याचाराबद्दल हे कधी बोलणार नाहीत. बुरहान वाणी आणि टायगर मेनन यांच्या दृष्टीने निष्पाप! कर्नल पुरोहित किंवा प्रज्ञासिंह ठाकूर यांना दहशतवादी म्हणून हेच घोषित करून टाकणार!
चित्रपटातील दृश्यात किंवा संवादात अन्याय करणारा हा हिंदू, मंदिरातील पुजारी आणि कनवाळू व्यक्ती मात्र चर्चचा फादर किंवा मौलवी असे चित्रीकरण हे आतापर्यंत करत आले आणि याचा मानसिक परिणाम अनेक पिढ्यांवर झाला, तरीही यांना हिंदू समाजाने डोक्यावर घेतले. यांना कीर्ती, पैसा, प्रतिष्ठा हिंदूंनीच मिळवून दिली. यांनी किती लग्ने केली, किती महिलांवर अत्याचार केले हे कधी जाब म्हणून विचारले नाही. यांनी अत्याचारी तैमूर आणि जहांगीर यांची नावे आपल्या मुलांना दिली, पण आमची न्यूज चॅनल्स त्यांचे बारसे, डोहाळे गात राहिले.

यात नसिरुद्दीन शहा, आमिर खानपासून अनेक आहेत. शबाना आझमी आहे. जया भादुरी आहे. अमोल पालेकरसुद्धा आहे. अलीकडे या ब्रिगेडमध्ये स्वरा भास्कर नावाची एक तारका सामील झाली आहे. पण या सगळ्यांचे शिरोमणी आहेत जावेद अख्तर! NSD आणि फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे या मंडळींनी ५० वर्षांत हिंदूविरोधी अजेंड्याचा कारखाना बनवला. एकेकाळी हॉलीवूड सिनेमाच्या कथा उचलून त्या हिंदी निर्मात्यांच्या गळी उतरवण्याचा धंदा करणारे हे बहाद्दर जणू स्वतःला पुरोगामी आणि डाव्या चळवळीचे म्होरके समजू लागले. यांनी ट्वीट करायचे आणि लुटियन्स मीडियाने त्याला प्रसिद्धी द्यायची! मग तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींनी, राजकीय पक्षांनी ते उचलून धरायचे आणि भारताची बदनामी होत असेल तरी खोटेनाटे बोलत राहायचे! अशी एक इकोसिस्टिम विकसित करण्याचा गोरखधंदा या जावेद अख्तरच्या नेतृत्वात सुरू झाला आहे आणि या धंद्यात आपले वैचारिक आणि सिनेसृष्टीतील तथाकथित सेलिब्रेटिक भांडवल या लोकांनी गुंतवण्यामागे पुरस्कारातून खाल्लेल्या मिठाला जागणे आहे.

या मंडळींना पुरस्कार मिळतात, आंतरराष्ट्रीय परिषदांची निमंत्रणे मिळतात, कारण हे त्या टोळीत सामील होतात, जी टोळी हिंदू समाज, भारत देश यांच्या बदनामीचे कट रचतात. यांना तालिबानचे समर्थन करता येत नाही आणि निषेध नोंदवला तर पाकिस्तानात यांचे बसलेले पतपुरवठादार यांना सोडणार नाहीत, म्हणून तालिबानवरून लक्ष हटवून संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची नावे घेऊन जावेद गॅंगचा जो अश्लाघ्य प्रयत्न चालला आहे, त्याचा जेवढा निषेध करू, तेवढा थोडा आहे.

ही मंडळी अशी बडबड करू शकतात, कारण अजून तरी येथे हिंदू बहुसंख्याक आहे. या हिंदूंना बहुसंख्याक ठेवण्यासाठी जागृत करणारा संघच आहे. विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे. हरियाणामध्ये सौदी विमान कोसळले, तेव्हा धावून जाणारे, त्यांचे दफन करणारे संघाचे स्वयंसेवक कुठे आणि आपलेच बंधू, स्वधर्मीय विमानातून एखाद्या कागदाप्रमाणे पडताना बघून आनंद व्यक्त करणारे क्रूर तालिबानी कुठे!

जावेद मियाँ बोलताना, ट्वीट करताना शुद्धीवर होता ना? देशासाठी व्यक्तिनिर्माणाचा वसा घेऊन अहोरात्र ९६ वर्षे काम करणाऱ्या संघटनेची तुलना करताना तुम्ही ताळतंत्र सोडून दिले आहे. येथे तुमचाच गब्बरचा संवाद म्हणावा वाटतो - 'इस की सजा मिलेगी, जरूर मिलेगी!'

पण मियाँ, थांबा. गुन्हेगारीचे उदात्तीकरण तुम्ही कितीही सिनेमात केले असले, व्यवस्थेविरुद्ध कायदा हातात घेण्याची भाषा तुम्ही तुमच्या कथेत कितीही मांडली असली, तरी आम्ही कायद्याच्या चौकटीत घटनेच्या तरतुदीनुसार जाब विचारू आणि जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही, तोपर्यंत सनदशीर मार्गाने तुमच्या या बेजबादार वक्तव्याचा योग्य पद्धतीने निषेध करत राहू.


भ्रमणध्वनी : ९४२२२२१५७०