ध्वज विजयाचा उंच धरा रे!

विवेक मराठी    06-Sep-2021
Total Views |
@अनुजा केदार देवस्थळी
पॅरालिम्पिक आता अंतिम टप्प्यावर पोहोचत आलं होतं. भारताची कामगिरी दिवसेंदिवस अधिकाधिक चांगली होत होती. पदक जिंकूनच परत जायचं असा जणू निर्धार करूनच खेळाडू आले होते. पदकसंख्या १०पर्यंत तरी पोहोचावी अशी माफक अपेक्षा ठेवणार्‍या क्रीडारसिकांना ह्या वर्षी संख्येचा पुनर्विचार करायला त्यांनी अक्षरशः भाग पाडलंय. आणि हा बदल खूपच सकारात्मक आहे.
olyampic_1  H x
आता पाहू या उर्वरित पदकांबद्दल.
३ सप्टेंबर
पदक क्रमांक १३
हे दिवसातलं तिसरं पदक होतं.


olyampic_1  H x
पहिलंच पॅरालिम्पिक खेळणाऱ्या हरविंदर सिंगने आर्चरीचं कांस्यपदक जिंकून एक सुखद धक्का दिला. जागतिक मानांकन २३ असणार्‍या ह्या खेळाडूने अत्यंत शांत डोक्याने खेळत एक एक फेरी पार केली. दिवसभरात एकूण पाच सामने तो खेळला आणि त्यापैकी तीन वेळा सामना shoot off खेळून जिंकला. पाच सेट्सनंतर सामना बरोबरीत राहिला असेल, तर एक निर्णायक बाण खेळावा लागतो. अशा वेळी दडपण येऊ शकतं, पण शांत आणि संयमी खेळ करणार्‍या हरविंदरने कांस्यपदकही ह्याच प्रकारे जिंकलं.

४ सप्टेंबर
पदक क्रमांक १४ आणि १५


olyampic_1  H x
पुन्हा एकदा दोन भारतीय पदकाच्या शर्यतीत होते. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात आलेलं अपयश मागे टाकत २० वर्षीय मनीष नरवालने ५० मीटर एअर पिस्तूल एसएच-१ प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. सिंघराज अदाना ह्यांना स्पर्धेतलं दुसरं पदक मिळालं. ह्या वेळी मनीषच्या खालोखाल स्थान मिळवत रौप्यपदकावर कब्जा केला.
अशा प्रकारे पुन्हा एकदा ह्या स्पर्धेत दोन भारतीय एकाच वेळी पोडियमवर बघता आले.
पुढचं यश मिळालं ते बॅडमिंटन खेळात. पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या ह्या खेळात आपल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन केलं.
गौरव खन्ना हे भारताच्या पॅराबॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक आहेत. गेली अनेक वर्षं सातत्याने कर्णबधिर, अंध आणि दिव्यांग खेळाडूंना ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या आणि खेळाडूंच्या मेहनतीचं फळ ह्या स्पर्धेत मिळालं.

पदक क्रमांक १६ आणि १७


olyampic_1  H x
बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएल-३ प्रकारात विश्वविजेता खेळाडू प्रमोद भगतने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवत सुवर्णपदक मिळवलं. ह्याच प्रकारात मनोज सरकारला कांस्यपदक मिळालं.

५ सप्टेंबर
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारत एकूण ४ सामने खेळणार होता. दोन लढती अंतिम फेरीच्या आणि उर्वरित दोन सामने कांस्यपदकासाठी. कांस्यसाठी झालेले दोन्ही सामने आपण गमावले. पण हे सामने अत्यंत चुरशीचे झाले होते. त्यामुळे खेळाचा आनंद खेळाडूंना नक्कीच मिळाला असेल.

पदक क्रमांक १८
बॅडमिंटन एसएल-४ प्रकारात पहिल्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या अग्रमानांकित खेळाडूविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतरही पुढे सुहास यथिराज पराभूत झाले. पण भारताच्या खात्यात आणखी एक रौप्यपदक जमा झालं.
पदक क्रमांक १९


olyampic_1  H x 
एसएच-६ प्रकारात खेळणार्‍या क्रिष्णा नागरने सुवर्णपदक मिळवलं. हे भारताचं पाचवं सुवर्णपदक होतं. ४३ मिनिटं आणि शेवटच्या गेमपर्यंत रंगलेल्या ह्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी सर्वोत्तम खेळ दाखवला.
अशा प्रकारे शेवटच्या दिवशी टोकियोमध्ये पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रगीताची धून वाजली.
 
ह्या स्पर्धेत आपले ५ खेळाडू चौथ्या स्थानी, तर ४ खेळाडू पाचव्या स्थानी राहिले. पदक मिळवण्यात अपयश आलं असलं, तरी एवढ्या मोठ्या स्पर्धेतली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. हे अपयश त्यांना पुढे आणखी चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा देईल, हे नक्की.
 
५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १९ पदकं मिळवून भारत २४व्या स्थानी राहिला. पॅरालिम्पिक इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सर्वच खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. हे टोकियो पॅरालिम्पिक भारताच्या भविष्यातील क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग भरारीची नांदी ठरो! २०२४ पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा सतत फडकत राहावा आणि आपल्या राष्ट्रगीताची धून वाजत राहावी, ह्याच सदिच्छा.
 
- अनुजा केदार देवस्थळी