तमसो मा ज्योतिर्गमय एक प्रवास

विवेक मराठी    07-Sep-2021
Total Views |
@अभिजीत देशपांडे

आपण आपला धर्म परत शिकायचा, म्हणजे हिंदू धर्मावरची ‘श्रद्धा’ आणि ‘विवेक’ मनात निर्माण करणं. लौकिक अर्थानं ‘श्रद्धा’ याचा अर्थ faith किंवा belief  असा होतो. पूर्णत्व आणि अपूर्णत्व यातील द्वंद्व मनात सतत सुरू असतं. एकदा सजगपणे या जाणिवेकडे पाहिलं की वेद आणि गुरू यांची मानवी आयुष्याला किती गरज आहे, हे समजतं आणि सच्चिदानंद होण्यासाठी पुढचा प्रवास सुरू होतो.


hindu_3  H x W:

या वर्षी जानेवारीमध्ये, अमेरिकेतल्या हिंदू स्वयंसेवक संघाचे यल्लोजी मिरजकर यांची ई-मेल आली. "Orientation to Hindu Studies' असा एक कोर्स Hindu University of America मध्ये सुरू होतोय आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन करा अशी ती ई-मेल होती. कोविडमुळे शाखा ऑनलाइन पद्धतीने सुरू होती आणि अशाच एका ऑनलाइन शाखा सत्रात यल्लोजींनी Hindu Universityची आणि त्यांच्या विविध कोर्सेसची माहिती दिली होती. अनायसे कोविडमुळे हातात वेळ होता आणि मुळात, युनिव्हर्सिटीत जाऊन आपल्या हिंदू धर्माबद्दल शिकायचं ही कल्पनाच मला नवीन होती. आठवड्यातून एक तास झूमवर लेक्चर, चर्चा, असाइन्मेंट आणि ग्रेड्स असा format असल्याने उत्सुकता निर्माण झाली होती. या कोर्सच्या रजिस्ट्रेशनसाठी https://hua.edu गेलो आणि मला इतर काही कोर्सेस दिसले. त्यात एक कोर्स होता, "Introduction to Bhagavad Gita' आणि फॅकल्टी म्हणून स्वामिनी आगमानंद सरस्वती! स्वामिनीजींच्या वेबपेजवर त्यांचा परिचय दिलेला होता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून संस्कृत व भारतीय विद्या विषयांमध्ये M.A., Ph.D. करून हार्वर्ड, सेंट लॉरेन्स, टेम्पल, ली-हाय अशा जगमान्य युनिव्हर्सिटींमध्ये तीसेक वर्षं प्रोफेसर म्हणून त्यांनी कार्य केलं. आर्षविद्या गुरुकुलची स्थापना करणारे स्वामी दयानंद सरस्वती हे त्यांचे गुरू! स्वामी दयानंद सरस्वती यांनी अमेरिकेत 1979-1982 या तीन वर्षात वेदान्ताचा एक पूर्णवेळ कोर्स शिकवला होता. अगदी आपण जसे तीन वर्षाचे B.A., B.Com., B.Sc.चे डिग्री कोर्सेस करतो, तसाच हा कोर्स! स्वामींनीजींनी याच कोर्समध्ये अमेरिकेत वेदान्तशास्त्र, उपनिषदं, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि अद्वैत वेदान्त संप्रदायाच्या विविध टीका/प्रकरण ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वामिनीजींना 2012च्या आसपास संन्यासाची दीक्षा दिली आणि पूर्वाश्रमीच्या प्रोफेसर मार्था डोअर्टी या स्वामिनी आगमानंद सरस्वती झाल्या.

 
आता हे सगळं समजल्यावर मी लगेचच भगवद्गीता कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केलं आणि होता होता जानेवारीमध्ये कोर्स सुरू झाला. त्या वेळी मला गीतेबद्दल अगदीच जुजबी माहिती होती. गीता म्हणजे ‘कृष्णाने महाभारताच्या युद्धप्रसंगी अर्जुनाला केलेला उपदेश’ या भारदस्त वाक्यापलीकडे काही माहीत नव्हतं. माझं महाभारतचं ज्ञान हे मृत्युंजय, युगंधर वगैरे कादंबर्‍या वाचून, टीव्हीवरचं महाभारत बघून आणि टिपिकल शहरी मध्यमवर्गीय मराठी घरी जे शिकवतात त्यावरच जे काही असू शकतं, तेच होतं. गीतेबद्दल तर ‘यदा यदा ही धर्मस्य’, ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ किंवा ‘नैनं छिन्दन्ति’सारखे दोन-तीन श्लोक अर्धवट माहीत होते, विवेकानंद म्हणतात म्हणून कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग वगैरे पोपटपंची करण्याइतपतच गीतेची ओळख! आणि संस्कृत तर फक्त आठवी ते दहावीसाठी स्कोरिंगचा विषय म्हणून, बाकी जनरल नॉलेज म्हणजे कुणीतरी ओळखीत किंवा नात्यात गीतेचे अध्याय पाठ करून पाठांतर स्पर्धा जिंकल्या हेच! मला तर कोणते अध्याय पाठ करतात हेही माहीत नव्हतं. गीता समजली पाहिजे असं खूप वाटायचं, पण आयुष्यात भगवद्गीतेला कधी प्रायॉरिटी अशी दिलीच नव्हती. कारण सरळ होतं.

 लहानपणापासून मुंजीनंतर घरी संध्या, देवाची पूजा करणारा मी, कॉलेजमध्ये पोहोचेपर्यंत पूर्ण नास्तिकतेकडे झुकलो होतो. ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक धूसर आहे’, "I am spiritual but not religious 'वगैरे चमकदार वाक्यांची मला भुरळ पडलेली होती. ‘वेदांमध्ये सगळं ज्ञान होतं, तर आपली ही इतकी अधोगती का झाली?’ छाप चर्चांमध्ये माझा आवाज वर असायचा, आणि विशेष म्हणजे यातलं काहीच न वाचता आणि समजून घेता! अर्थात मी एकटाच असा विचार करीत होतो असं नाही, बाकीचेही तसेच जरासे अलीकडे-पलीकडे. पुढे नोकरीनिमित्त मी जगभर फिरलो, जवळपास सतरा-अठरा देश. प्रत्येक ठिकाणी विविध पंथांचे, विचारांचे आणि धर्माचे लोक भेटले. रोजच्या अशा संवादातून माझी समज बदलत गेली. आपण कुठून आलो आणि आपलं या जगातलं स्थान काय हे प्रश्न प्रत्येकालाच पडतात हे समजलं. त्यातून बरेचसे आपापल्या समजांना, परंपरांना धरून त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत असतात, हेही जाणवलं.


hindu_2  H x W:
स्वामी दयानंद सरस्वती

आपला इतिहास, तंत्रज्ञान आणि आधुनिकता शिकवण्याचा एक साचा आहे - आधुनिकतेची सुरुवात युरोपातील वैचारिक क्रांतीने झाली - ‘रेनेसान्स’ आणि त्यातून आलं "Age of reasoning' आणि "Englightenment',, त्याचा परिपाक पुढे औद्योगिक क्रांती होण्यात झाला. यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य, समता, लोकशाही ही मूल्ये विकसित झाली. या आधुनिकतेने मानवी जीवनात न-भूतो असे बदल केले. कोट्यवधी लोकांचं दारिद्य्र यातून कमी झालं, सुबत्ता आली आणि ज्या मुक्तीची मानव अपेक्षा करीत होता ती मुक्ती देण्याची क्षमता केवळ आधुनिकतेत (Modernityमध्ये) आहे हाच विचार दृढ होत आहे आणि त्यात काही चुकीचं नाही. आपण सगळेच या बदलाला साक्षी आहोत आणि हे अनुभवत आहोत. या आधुनिकतेतूनच निर्माण झालेलं महत्त्वाचं मूल्य आहे सेक्युलॅरिझम! ज्या मुद्द्यावर युरोपमध्ये सेक्युलॅरिझम निर्माण झालं, मूल्य ते भारताने जसंच्या तसं स्वीकारलं नाही. आपण युरोपचं निधर्मी असलेले सेक्युलॅरिझमचा अर्थ भारताच्या संदर्भात स्वीकारताना - आपण हिंदू असल्यामुळे - सर्वधर्मसमभाव असा झाला. हा अर्थ आपल्या सनातन संस्कृतीशी आणि इतिहासाच्या सातत्याशी सुसंगत असाच आहे. अर्थात या विचाराचे धिंडवडे निघाले. हिंदू धर्माचं नाव जे सनातन धर्म असं आहे, तो धर्मविचार प्रतिगामी ठरवून त्याच्याविरोधात जे काही असेल ते पुरोगामी अशी मांडणी केली गेली आहे. त्यातून समाजकारणात आणि राजकारणात हिंदू लोकांना दुय्यम वागणूक दिली गेली आणि म्हणून हिंदू समाजात सेक्युलॅरिझम बदनाम झालं. ‘हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर’ यावरच विश्वास उडावा अशी परिस्थिती या आधुनिकतावादी विचारवंतांनी आणि पुरोगामी विचाराआड लपून आपलं संधिसाधू राजकारण करणार्‍या राजकारण्यांनी केली आहे. याचं कारण आधुनिकतेची हिंदू धर्माशी जी सांगड घातली आहे त्यात आहे. आधुनिकतेच्या दृष्टीकोनातून हिंदू धर्माच्या फक्त त्रुटीच दिसतात. हिंदू धर्म म्हणजे अंधश्रद्धा, सामाजिक असमानता, अन्यायाला खतपाणी घालणारी व्यवस्था अशी मांडणी नेहमी केली जाते. मानवाच्या मुक्तीचा मार्ग हा केवळ तर्कशुद्ध आधुनिक शास्त्रीय ज्ञानातूनच जातो, म्हणून जितकं वैचारिकदृष्ट्या मॉडर्न होता येईल तितकं आपण झालं पाहिजे, असा हट्ट धरला जातो.
आधुनिकतेचा विचार जो बुद्धिवादाच्या जोरावर उभा आहे, त्याची कास धरली पाहिजे हे खरंच; पण त्यासाठी जो जो म्हणून हिंदू धर्माचा विचार आहे, त्याचा बळी देऊनच आधुनिक असणं सिद्ध केलं जातंय आणि आपण त्यात आनंदाने सहभागी होतोय, याची जाणीव आपल्याला होत नाही. या आधुनिकतेच्या प्रवाहात वाहत असताना अधूनमधून सामाजिक अन्यायाच्या घटना समोर येतात आणि आपलं मन खंतावतं. चहूबाजूंनी हिंदूविरोधी घटना घडताना, आपल्या श्रद्धा डळमळीत होण्याची वेळ येते आणि आपण Hindu-apologetic बनत जातो.


hindu_1  H x W:
स्वामिनी आगमानंद सरस्वती

उपनिषदात सनातन हा शब्द ‘शाश्वत, स्थिर, कायम आणि नित्यनूतन’ अशा अर्थाने आलेला आहे. हिंदू धर्मविचार शाश्वत, स्थिर, कायम आणि नित्यनूतन असा आहे, तो मानव इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात चिरंतन असाच आहे आणि तो प्रतिगामी नाही. अर्थात ही समज निर्माण होण्यासाठी गरज आहे ती आपणच आपला धर्मविचार पुन्हा स्वत:ला शिकवून घेतला पाहिजे. आता आपण आपला धर्म परत शिकायचा, म्हणजे काय? याचं उत्तर आहे हिंदू धर्मावरची ‘श्रद्धा’ आणि ‘विवेक’ मनात निर्माण करणं. लौकिक अर्थाने ‘श्रद्धा’ याचा अर्थ fait किंवा belief असा होतो. पण वेदान्तात ‘श्रद्धा’ या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. ‘श्रद्धा’ म्हणजे (1) वेदवाक्यप्रमाण, (2) गुरुवाक्यप्रमाण आणि (3) स्वत:च्या बुद्धीने वेदवाक्य आणि गुरुवाक्य पडताळून अनुभवणं (श्रद्धा - pending verification). हिंदू धर्माला अपेक्षित असणारी ‘श्रद्धा’ आंधळी नाही. उपनिषदातलं महावाक्य ‘तत् त्वम असि’ हे याचं सर्वोच्च उदाहरण आहे. स्वत:ची ओळख करून देणारं हे महावाक्य स्पष्टपणे म्हणतंय, ‘ते तू (आधीच) आहेस’. इथे ‘ते’ म्हणजे ‘ब्रह्म’ - सत्य! आपल्याला लगेच प्रश्न पडतो की ‘जर मी ब्रह्म आहे, तर मला माझ्या आयुष्यात अपूर्णता का जाणवते? दु:ख र्(suffering) का भोगावं लागतं?’ योग्य गुरू या वेदप्रामाण्याची उकल करून देतो, पण केवळ वेदपठण आणि योग्य गुरू यातून ज्ञानाची निर्मिती होत नाही. त्यासाठी हे महावाक्य आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे आणि त्या बुद्धीतून ज्ञाननिर्मिती झाली पाहिजे. नेमकी इथे बुद्धीला विवेकाची गरज भासते. सत्य व असत्य यातील भेद बुद्धीला उमजला की विचार करू शकणारं बुद्धिवादी मन, जे वेदवाक्य आणि गुरुवाक्य शिकताना स्वत:शी वाद-प्रतिवाद करून स्वत:साठी प्रमाण (evidence, proof) निर्माण करेल. विचार करा, असा जगात कुठला धर्म आहे जो तुम्हाला म्हणतो की तू तुझ्या बुद्धीने विचार कर आणि तुझा मार्ग ठरव! असा हा विचार देणारा हिंदू धर्म आपण कुठल्या कोपर्‍यात ठेवलाय! गरज आहे ती डोळसपणे पुन्हा नव्याने अभ्यास करण्याची. मुंडक उपनिषद शिकताना हा खालील श्लोक आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी असलेल्यांची मन:स्थिती चपखलपणे उकलतो आणि मार्गदर्शन करतो. ‘परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्रह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृत: कृतेन। तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणि: श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् ॥मुं.1.2.12॥’ अर्थात - कर्माने निर्माण संपादन केलेली सर्व फळे अनित्य आहेत ही जाणीव झाल्यावर, मनुष्य त्या अमृततत्त्वाचे ज्ञान मिळवण्यासाठी ब्रह्मज्ञानाने युक्त अशा गुरूला हाती समिधा घेऊन शरण जातो. आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर उपनिषदात सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना ही अपूर्णत्वाची जाणीव होते. पूर्णत्व आणि अपूर्णत्व यातील द्वंद्व मनात सतत सुरू असते. एकदा सजगपणे या जाणिवेकडे पाहिले की वेद आणि गुरू यांची मानवी आयुष्याला किती गरज आहे, हे समजतं आणि सच्चिदानंद होण्यासाठी पुढचा प्रवास सुरू होतो.
‘असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्माऽमृतं गमय। (बृ.1.3.28) - मृत्यू असत् आणि अमृत सत्य आहे. अशा असत्यापासून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मर्त्यत्वापासून अमरत्वाकडे मला घेऊन चल.’ या श्लोकाद्वारे बृहदारण्यक उपनिषदाने सांगितलेलं मानवी जीवनाचं ध्येय हेच आपले ध्येय बनो, हीच प्रार्थना!
टीप - Hindu University of Americaमध्ये अद्वैत वेदान्त, Bhagavadgita West, महाभारत-शांतिपर्व, अद्वैत-विशिष्टाद्वैत-द्वैत समन्वय असे विविध कोर्सेस शिकवले जातात. जिज्ञासूंनी https://hua.edu हे संकेतस्थळ पाहावं. हे विषय शिकवणारे सर्व प्रोफेसर्स अद्वैत संप्रदायातून शिक्षण घेऊन आलेले आहेत व संन्यस्त वृत्तीने हे ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत. हा अनुभव लिहिण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल सौमित्र गोखले - विश्व विभाग संयोजक हिंदू स्वयंसेवक संघ याचे मी आभार मानतो.

abhijit.adi@gmail.com