सोलापूरचे गणपती

विवेक मराठी    08-Sep-2021
Total Views |
@अरविंद जोशी 9370408926
प्रत्येक गावात जसे ग्रामदैवताचे मंदिर असते, तसेच एखादे गणेशमंदिरही असते. हा विघ्नहर्ता आपल्या गावाचे, भागाचे सर्व संकटापासून रक्षण करतो ही तेथील भाविकांची श्रद्धा असते. शेकडो वर्षांची परंपरा असलेली अनेक गणेशमंदिरे त्या स्थानिक परिसराची, पंचक्रोशीची ओळख असतात. महाराष्ट्रातील व गोव्यातील अशाच काही प्राचीन पण फारशा प्रसिद्ध नसलेल्या गणेशमंदिरांविषयी आपण या गणेश विशेष अंकात जाणून घेणार आहोत.

ganpati_1  H x
 
 
गणेशभक्तीची परंपरा मराठी भाषकांइतकीच कन्नड आणि तेलुगू भाषकांतही आहे. सोलापुरात मराठी, कन्नड आणि तेलुगू भाषा बोलणारे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. या तिन्ही भाषा बोलणार्‍या लोकांत गणेश आराधना रूढ असून ते आपापल्या पद्धतीने ती करीत असतात. सोलापुरात आजोबा गणपती, विकास नगरचा गणपती, ताता गणपती, कसबा गणपती, विश्व गणपती अशी अनेक गणेशमंदिरे आहेत. त्यांच्या दर्शनाला भक्तांच्या रांगा लागतात. पण फार पुरातन परंपरा असलेली तीन मंदिरे ही स्थापित मंदिरे म्हणून नावाजली जातात. त्यातले एक मंदिर तर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापलेले, तर दुसरे मंदिर हे नामवंत पंचागकर्ते दाते यांच्या कुटुंबाचे दैवत असलेले आहे. तिसरा मानाचा गणपती हा 400 वर्षांपासूनचा सिद्धिविनायक आहे. त्यांचा हा
थोडक्यात परिचय.
सुंदर कोरीव मूर्ती असलेला दाते गणपती

 
दक्षिण कसब्यातील दाते गणपती हासुद्धा मानाचा असून पंचांगकर्ते दाते व त्यांच्या कुटुंबीयांच्या खासगी मालकीचे हे मंदिर आहे. फाल्गुन शुद्ध त्रयोदशी, 1729 या दिवशी प्रतिष्ठापना झालेला हा गणपती आहे. या गणपतीच्या स्थापनेला यंदाच्या वर्षी (शके 1943) 214 वर्षे पूर्ण होतात. या मंदिराचा 200वा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला होता. मंदिर स्थापनेपासून या मंदिराच्या सेवेत दाते यांच्या अनेक पिढ्या झाल्या. पंचांगकर्ते स्व. धुंडिराजशास्त्री दाते यांचे आजोबा असे सांगत की, त्यांच्या पणजोबांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मूर्ती स्थापन करणारी व्यक्ती शास्त्रीजींच्या आजोबांनीही बघितलेली नाही. दाते घराण्यात ज्ञात असलेले महादेव दाते हे मूळ पुरुष. महादेव दाते हे या घराण्याच्या चौथ्या पिढीतील होते. आज ओम्कार दाते यांच्या रूपाने दाते घराण्याची बारावी पिढी आहे. अकराव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले मोहन धुंडिराजशास्त्री दाते यांनी आपल्या गणपतीची माहिती दिली. दाते गणपतीचे वैशिष्ट्य असे की ही मूर्ती अतिशय कोरीव व एकाच काळ्या पाषाणात कोरलेली आहे. अशी कोरीव मूर्ती इतरत्र दिसत नाही. बहुतेक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीचा सोंडेचा, चेहर्‍याचा आकार वेगळा दिसतो. माघ महिन्यात श्रीगणेश जयंतीच्या दरम्यान पाच दिवस दाते गणपतीचा उत्सव होतो. शके 1840मध्ये शास्त्रीजींच्या आजोबांच्या काळात या मंदिराचे सध्या दिसणारे तट, सभामंडप याचे बांधकाम झाले आहे. मंदिराचे शिखर हे प्रथमपासून आहे.
हे मंदिर संकष्ट चतुर्थीला दर्शनासाठी खुले असते, इतर वेळेस भाविकांना दर्शन घेण्यासाठी मूर्तीच्या समोरील भिंतीवर झरोका ठेवलेला आहे.
 
मानाचा सिद्धिविनायक

 
श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत असून त्यांचे मंदिर अतिशय रमणीय असून तलावाच्या मध्यभागी उभे आहे. याच तलावाच्या उत्तरेला गणपती घाट असून तिथे सोलापूरच्या मानाच्या गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर 400 वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिरातली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, असे मानले जाते.

ganpati_2  H x
 
प्रत्येक गावाला एक ग्रामदैवत असतेच, त्याशिवाय त्या गावाचा एक मानाचा गणपतीही असतो, तसा मान या गणपतीला आहे. मंदिराजवळ एक दत्तमंदिर व सच्चिदानंद स्वामींचा मठ आहे. दर संकष्ट चतुर्थीला तिथे भक्तांची दर्शनार्थ गर्दी असते. अंगारकी आणि माघ महिन्यातली गणेश जयंती अशा दोन पर्वण्यांना उत्सव साजरा होतो. महाप्रसाद असतो. अरुण जोशी हे या मंदिराचे मालक असून चैतन्य शिरसीकर हे आता पुजारी आहेत.

 
या मंदिराच्या परिसरात एकाच ठिकाणी आलेले लिंबाचे आणि पिंपळाचे झाड आहे. ही दोन झाडे मंदिराच्याही पूर्वीची आहेत. शिवाय मंदिरासमोर दोन विस्तारलेली वडाची झाडे आहेत. मंदिरात गणपतीची नित्य पूजाअर्चा व्यवस्थित केली जाते. आता आता गणेश जयंतीला धार्मिक कार्यक्रमासोबत संगीत महोत्सवही साजरा होत असून त्याला सामाजिक कार्याची जोड देत देत रक्तदान शिबिरही घेतले जात आहे. या मंदिराच्या भिंतीवर अष्टविनायकाची आरती लिहिलेली असून दररोजच्या पूजेबरोबर गणपतीच्या पाच आरत्या म्हटल्या जातात. सोलापुरातल्या अनेक भाविकांचे ते आदरस्थान असून अशा काही भक्तांनी स्वत:होऊन मंदिराचे बांधकाम करून दिले आहे. अशाच लोकांकडून उत्स्फूर्तपणे महाप्रसादाचीही सोय केली जाते. या गणपतीचा गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्या पर्वणीला या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला बाहेरगावचेही लोक येत असतात.


हिप्परग्याचा मश्रुम गणपती

 
महायोगी श्री सिद्धरामेश्वर हे बाराव्या शतकात होऊन गेलेले थोर संत असून तेच आता सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. या गावावर संकटे येऊन नयेत, म्हणून सिद्धरामेश्वरांनी शहराच्या आठ दिशांना आठ गणपतींची स्थापना केली. हे सोलापूरचे अष्टविनायक आहेत. त्यांची नावे - वीरेश गणपती, बेनक गणपती, धुळी महाकाळ गणपती, करीगण गणपती, वीरकर गणपती, वीर कोलाहल गणपती, मश्रुम गणपती, अतिथी गणपती अशी आहेत. त्यातला सातवा गणपती हा मश्रुम गणपती असून तो सोलापूर ते तुळजापूर महामार्गावर सोलापूरपासून सात कि.मी. अंतरावर हिप्परगा या गावी, विस्तीर्ण तलावाच्या काठी पण अगदी महामार्गावर आहे.


ganpati_3  H x
 
गणपतींची ही नावे कन्नड भाषेतली आहेत. मश्रुम याचा अर्थ दही असा होतो. या गणपतीला दह्याचा अभिषेक केला जातो. इ.स. 1130 या वर्षी त्याची स्थापना झाली आहे. गणपतीची मूर्ती सव्वातीन फूट उंच असून रेखीव आहे. संजय पतंगे आणि धनंजय पतंगे हे मंदिराची देखभाल आणि नित्योपचार करीत असतात. संकष्ट चतुर्थी, गणेश जयंती, गणेश चतुर्थी, अनंतचतुर्दशी, अंगारकीला या गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. तुळजापूरला जसे लाखो भक्त कोजागिरीला पायी जातात, तसे हजारो भक्त याही गणपतीच्या दर्शनासाठी पायी येतात. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भाविकांची मोठी गर्दी असते.

 
मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून पाच ते सहा हजार लोकांना बसता येईल असा सभामंडप बांधण्यात आला आहे. माघ महिन्यातील गणेश जयंतीला उत्सव असतो. त्याला भाविकांची मोठी गर्दी असते. 1961 साली दगडोबा भडंगे यांनी स्वखर्चाने बांधकाम सुरू केले. 1982 साली भोजप्पा म्हमाणे यांनी मंदिराला व्यापक स्वरूप दिले. 2001 साली सुवर्ण कळसारोहण झाले आणि आता सभामंडप झाला आहे. सोलापूरकरांचे हे मोठे श्रद्धास्थान आहे.