पटवर्धन संस्थानिकांच्या गणेशभक्तीची साक्ष देणारी गणेशमंदिरे

08 Sep 2021 16:06:02
पेशवेकालीन सरदार घराण्यांपैकी एक प्रमुख घराणे म्हणजे पटवर्धन घराणे आहे. या मिरजेच्या पटवर्धन घराण्याची गणेशावर श्रद्धा होती. या श्रद्धेतूनच त्यांनी सांगली, मिरज, तासगाव, हरिपूर, इचलकरंजी, कुरुंदवाड, जमखंडी येथे गणेशमंदिरे बांधली होती. आज या मंदिरांत गणेशोत्सवासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.


ganpati_1  H x
पेशवेकालीन सरदार घराण्यांपैकी एक प्रमुख घराणे म्हणजे पटवर्धन घराणे. या घराण्याचे मूळपुरुष हरभटबुवा पटवर्धन. त्यांचा कालखंड 1650पासूनचा. ते निस्सीम गणेशभक्त. दूर्वांकुराचा रस प्राशन करून त्यांनी अनेक वर्षे गणेशव्रत केले होते. अशा पटवर्धन घराण्यातील पुढच्या सर्व वंशजांनी जिथे जिथे म्हणून जहागीर सांभाळली, तिथे त्यांनी गणेशमंदिरे उभी केली. आजही सांगली, मिरज, तासगाव, हरिपूर, इचलकरंजी, कुरुंदवाड, जमखंडी येथे ही गणेशमंदिरे अस्तित्वात आहेत. पटवर्धनांच्या गणेशभक्तीची साक्ष देत आहेत. आजही सर्वच मंदिरे त्या त्या परिसराची श्रद्धेची, भक्तीची तीर्थस्थळे आहेत.
 
मिरजेतील गणेशमंदिरे
 
मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावासमोरील संस्थानकालीन गणेशमंदिर प्रसिद्ध असून मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव गोविंद पटवर्धन उर्फ बाळासाहेब पटवर्धन (पहिले) यांनी सन 1799मध्ये हे मंदिर बांधले. या मंदिराच्या स्थापनेसंदर्भातील कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहालयात आहेत. मिरजेतील गणेश तलावासमोरील गणेशमंदिर हे मिरजेतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गंगाधरराव हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी मिरजेत कृष्णा नदीवर प्रेक्षणीय असा घाट आणि मार्कंडेश्वराचे मंदिर बांधले. मिरजेत पाण्याची चांगली सोय व्हावी, म्हणून गणेश तलाव बांधला.
श्रीगणेश हे त्यांचे आराध्य दैवत असल्याने त्यांनी त्याचे मंदिर बांधण्याचे ठरविले. गंगाधरराव पटवर्धनांनी हे मंदिर बांधून त्याची पूजाअर्चा करण्याचे अधिकार गोपाळभट रघुनाथभट आच्यारी (मांजरेकर) यांना सनदेद्वारे दिले होते. त्यामध्ये मंदिरस्थापनेचा कालोल्लेख आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात ही सनद आहे.
तळ्यावरील हे गणेशमंदिर बंदिस्त असून आतमध्ये मोठा लाकडी सभामंडप, अंतराळ आणि गाभारा आहे. मंदिरातील गणेशमूर्ती काळ्या पाषाणातील असून अतिशय रेखीव आहे. संस्थानकालात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सातत्याने होत. मिरजेच्या सर्वच पटवर्धन संस्थानिकांची या मंदिरावर श्रद्धा होती. हे मंदिर मिरजेतील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार आहे. गणेशमंदिरासमोर असणार्‍या विस्तीर्ण तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन होते. तलावासमोर हे मंदिर हे बांधण्यात आल्याने त्याला ‘तळ्यावरील गणेशमंदिर’ या नावाने संबोधण्यात येते. सात वर्षांपासून या मंदिरात पटवर्धन संस्थानिकांच्या सध्याच्या वंशजांमार्फत गणेशोत्सव करण्यात येत आहे. मंदिरात होणार्‍या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
 
सांगलीकर संस्थानिकांनीच मिरजेतील सांगलीकर मळ्यात स्वतंत्र गणेशमंदिर बांधले. आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. रंगरंगोटी करून ते सजविण्यात आले आहे.
सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिर
 
सांगलीचे अधिपती चिंतामणराव पटवर्धनांनी कृष्णा नदीकाठी 1814मध्ये सांगलीतील मंदिराची उभारणी सुरू केली. पुढे तीस वर्षे ते काम सुरू होते. मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा हा नमुना आहे. मिरज संस्थानचे अधिपती सरदार गंगाधरराव पटवर्धन आणि सांगलीचे पहिले अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांच्यात 1799मध्ये जहागिरीच्या वाटण्या झाल्या. चिंतामणराव मिरजेच्या किल्ल्यातून बाहेर पडून सांगलीत स्थायिक झाले. तिथून सांगलीची संस्थानची राजधानी म्हणून सांगलीचा विकास झाला. आज जिथे मंदिर आहे, त्या सभोवती चिंतामणरावांनी गाव-पेठा वसविल्या. सांगलीला गणेशदुर्ग या भुईकोटाची उभारणी केली.
 
पूर्वजांप्रमाणेच चिंतामणराव पटवर्धनांची गणेशावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे राजधानी म्हणून सांगलीची उभारणी करताना त्यांनी गणेशमंदिराच्या उभारणीला प्राधान्य दिले. प्रवेशद्वाराला लाल दगड वापरला, तर मुख्य गाभार्‍यासाठी आणि पंचायतनच्या मंदिरासाठी काळा घडीव दगड वापरला. या लाल संगमरवरी दगडाच्या आतील काळा बेसाल्ट दगड त्यांनी सांगलीतील तसेच जयसिंगपूर येथी खाणीतून आणले. या दोन्ही शहरांत या खाणी आजही आहेत. सुमारे तीस वर्षे शेकडो मजूर रात्रंदिवस या मंदिराच्या उभारणीत कार्यरत होते. वेगळ्या धाटणीच्या या मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर 1845मध्ये चैत्र शुद्ध दशमीला या मंदिरात पूजाअर्चा सुरू झाली.
मंदिरातील पंचायतनच्या पाच मूर्ती भीमण्णा आणि मुकुंदा पाथरवट या स्थानिक कारागिरांकडून बनवून घेण्यात आल्या. यानंतर दोन वर्षांनी - म्हणजे 1847मध्ये मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आले. 1847मधील मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
गणपती पंचायतनच्या नैमित्तिक खर्चासाठी संस्थानाच्या विविध गावांतील जमिनी इनाम दिल्या होत्या. गणेशमंदिराच्या आसपासचा परिसर यामुळे गेल्या 150 वर्षांपासून विकास पावत गेला. याच गणेशाच्या नावाने सांगलीची गणपती पेठ बाजारपेठ वसलेली. 1952मध्ये या गणेशमंदिरासमोर लाल रंगातील दगडाची कमान उभारण्यात आली. त्यासाठी दुसर्‍या चिंतामणरावांच्या काळात या मंदिराची उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली.
 
मुख्य मंदिरात संगमरवरातील ऋद्धी-सिद्धीसह असलेल्या गणेशाची मूर्ती सुबक आहे. गणपती पेठेच्या प्रशस्त रस्त्यावरूनही ही मूर्ती दिसते. सध्याच्या कोरोना काळातही लोक रस्त्यावरून या मूर्तीचे मनोभावे दर्शन घ्यायचे. मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर हे महादेवाचे, चिंतामणेश्वरी हे देवीचे, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत. ही चार व एक मुख्य मंदिर असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते.
 
येथे दर वर्षी भाद्रपद महिन्यात पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात कीर्तन, प्रवचने असे कार्यक्रम होतात. संस्थानकाळात गणेशोत्सवाचे स्वरूप उत्सवी होते. नामांकित हरदासांचे, गवयांचे अणि नृत्यांगनांचे कार्यक्रम व्हायचे. सांगलीच्या भुईकोट किल्ल्यातील दरबार हॉलमध्ये हे कार्यक्रम व्हायचे. अलीकडे विद्यमान राजेसाहेब विजयसिंहराजे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे विशेष लक्ष दिले आहे. मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले असले, तरी मंदिराची मूळची सजावट कायम ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवालाही त्यांनी शाही रूप दिले आहे. उत्सवात पाचव्या दिवशी अवघी सांगली पंचक्रोशी सांगलीत येते. लोकप्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी अशी सारी मंडळी हजर असतात. राजेसाहेबांच्या कुटुंबातील राजकन्या भाग्यश्री पटवर्धन यांच्यासह सर्वांची उत्सवाला आवर्जून हजेरी असते. पूर्वी मिरवणुकीत हत्ती, घोडे असा लवाजमा असे. संस्थानचा लाडका हत्ती सुंदर गजराज आणि बबलू यांचीही मोठी कारकिर्द राहिली. ते मिरवणुकीत अग्रभागी असायचे. या मिरवणुकीवर गणेशभक्तांकडून पेढे-खोबर्‍याची उधळण होत असते. आता शहरातील अनेक मंडळांचे कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील होतात, तसेच साहसी खेळाची प्रात्यक्षिके होतात. संस्कार भारतीची पथके रांगोळ्या काढत मिरवणूक मार्ग सजवतात.
इथे असतो ‘चोरगणपती’
 
गणेशदुर्गातील दरबार हॉलमध्येही गणेशाची स्थापना करण्यात येते. ही प्रथा गेल्या 200 वर्षांपासून जपण्यात आली आहे. गणेशमंदिराची उभारणी केल्यानंतर चिंतामणरावांनी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सव सुरू केला. या उत्सवासाठी लाकूड, भुसा आणि कागदाचा लगदा वापरून गणेशमूर्ती तयार करण्यात येते. याला अलीकडील काळात ‘चोरगणपती’ असे म्हटले जात असले, तरी तसा ऐतिहासिक कागदपत्रांत संदर्भ सापडत नाही. मात्र उत्सवच्या आधीच हा गणपती गुपचुप, चोरीछुपे बसवला जातो. उत्सवादिवशी तो सर्वांच्या नजरेत येतो.
 
 
तासगावचे गोपुर मंदिर
तासगाव ही मिरजेच्या पटवर्धनांचीच जहागीर. मिरजेतील दोन गणेशमंदिरांनंतर पटवर्धनांनी बांधलेले मंदिर म्हणजे तासगावचे सात मजली गोपुरांचे मंदिर. गेली 241 वर्षे या मंदिराची रथयात्रेची परंपरा आहे. मराठ्यांचे सरसेनापती आणि टिपू सुलतान, हैदर खान यांच्याशी लढाया करणारे परशुरामभाऊ पटवर्धन यांनी या मंदिराची पायाभरणी केली, तर त्यांचे पुत्र अप्पा पटवर्धन यांनी कलशारोहण केले.
 
परशुरामभाऊ पटवर्धन यांना तासगावचा सुभा मिळाला. त्यांनीही तिथे गणेशमंदिर उभारले. तासगावचे गणेशमंदिर हे दाक्षिणात्य स्थापत्यकलेचा नमुना आहे. दक्षिण स्वार्‍या करणार्‍या परशुरामभाऊंनी दक्षिणेप्रमाणेच तासगावमध्ये असे मंदिर उभारण्याचा संकल्प केला आणि तडीस नेला. त्यामुळे अशी मंदिरे महाराष्ट्रात कुठेही आढळत नाहीत. असे गोपुर दक्षिण भारतातच दिसते. या मंदिरात उजव्या सोंडेचा गणेश आहे. हेदेखील वेगळेपण आहे.
 
 
तासगावचे गणेशमंदिर तीन टप्प्यांत पाहण्यास मिळते. सात मजली 96 फूट उंचीचे गोपुर, भव्य सभामंडप आणि गाभारा. 9.4478.83 मीटर आकाराचे मुख्य मंदिर, तर सभामंडप 13.710.36 मीटर आकाराचा आहे. मंदिरात प्रवेश करीत असताना लागणारे गोपुर सात मजली असून यासाठी कर्नाटकातील गदगहून आणलेल्या दगडांचा वापर करण्यात आला. कर्नाटकातील वडार समाजातील कारागीरांकडून या मंदिराची उभारणी केली. सुमारे 20 वर्षे काम सुरू होते. 1779मध्ये सुरू झालेले मंदिर उभारणीचे काम 1799मध्ये परशुराम यांचे पुत्र अप्पाजी पटवर्धन यांनी पूर्ण केले. गणेशोत्सवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी - म्हणजे दीड दिवसात या गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. 1785मध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरू करण्यात आली. यासाठी पाच मजली खास रथ तयार करण्यात आला असून प्रारंभी हा रथ लोखंडाचा करण्यात आला होता. मात्र दुसर्‍या वर्षापासून सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला.
कापूर ओढ्याकाठी सातशे मीटर अंतरावर असलेल्या कार्तिकस्वामींना भेटण्यास गणेश रथातून जातो. 30 फूट लांब आणि पाच मजली रथ गणेशभक्त दोरखंडाच्या साहाय्याने ओढत नेतात. या वेळी रथातून गणेशभक्तांवर फुले, गुलाल, पेढे यांची बरसात करण्यात येते. तसेच दर संकष्टीला सायंकाळी पाच वाजता गणेशाची पालखी पश्चिमेस असलेल्या काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येते.
 
माहिती आधार - मानसिंग कुमठेकर,

मिरज इतिहास संशोधन मंडळ
Powered By Sangraha 9.0