गोर्‍या माणसाचे ओझे आणि दहशतवादी, सारखेच

विवेक मराठी    09-Sep-2021
Total Views |
जागतिक शांततेचा विचार करता जागतिक शांततेला दहशतवादी गटांपासून जितका धोका आहे, तितकाच धोका गोर्‍या माणसाच्या ओझ्यापासून आहे. या दोन्ही प्रवृत्ती असहिष्णू आहेत. दुसर्‍यावर लादवणूक करणार्‍या आहेत. आपल्या विचाराच्या विरोधात जे आहे, त्यांना जगण्याचा अधिकार नाकारणार्‍या आहेत आणि त्यांचे संघर्ष अव्याहतपणे चालू आहेत.
 

fb_1  H x W: 0
 
तालिबानींना संपविण्यासाठी वीस वर्षांपूर्वी अमेरिका अफगाणिस्तानात घुसली. वीस वर्षांनंतर त्याच तालिबानींच्या हातात अफगाणिस्तान देश देऊन अमेरिकन सैन्य परत स्वदेशी परतले आहे. अमेरिकेच्या प्रतिष्ठेवर, विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांची चर्चा चालू आहे. अमेरिकेच्या प्रतिष्ठेच्या आणि विश्वासार्हतेच्या प्रश्नांपेक्षाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे की, अमेरिका वेगवेगळ्या देशांत घुसून तेथे उच्छाद मांडण्याचा कार्यक्रम कधी सोडणार?
 
 
जागतिक शांततेची चर्चा पहिल्या महायुद्धानंतर जगभर गंभीरपणे सुरू झाली. मानवजातीने आपल्याला युद्धापासून दूर ठेवले पाहिजे... युद्धात खूप विध्वंस होतो, प्रचंड प्राणहानी होते, संपत्तीचा नाश होतो, अनेक देश अस्थिर होतात, अनेक ठिकाणी दुष्काळ पडतात, रोगराई सुरू होते आणि त्यात कोट्यवधी माणसे मरतात. हे सर्व थांबले पाहिजे. जग शांततामय करण्याचे एक स्वप्न घेऊन अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी युरोपीय देशांपुढे चौदा कलमी कार्यक्रम ठेवला. तो चार तत्त्वांवर आधारित होता. त्यात ‘लीग ऑफ नेशन्स’ म्हणजे राष्ट्रसंघ स्थापन करण्याचे कलम होते.
 
 
वुड्रो विल्सन यांचे स्वप्न भंग पावले. अमेरिकेच्या सिनेटने त्याला मान्यता दिली नाही. लीग ऑफ नेशन्स निर्माण झाले, पण त्यात अमेरिका नव्हती. 1919 साली व्हर्साइलचा तह झाला. जर्मनीवर अनेक अपमानकारक अटी लादण्यात आल्या. त्यातून हिटलरचा जन्म झाला आणि युद्ध संपण्याऐवजी पहिल्या महायुद्धापेक्षा भयानक दुसरे महायुद्ध झाले. दुसर्‍या महायुद्धाने अमेरिका आणि रशिया यांना महासत्ता केले. या दोन महासत्तांत वर्चस्वाची तीव्र स्पर्धा सुरू झाली आणि छोट्या-छोट्या देशांमध्ये युद्धे सुरू झाली.
 
 
अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्रे निर्मितीचा मोठा व्यवसाय चालतो, रशियातदेखील तो चालतो. युद्धे सुरू राहिली, तर शस्त्रास्त्रांना मागणी राहते. युद्धे संपली की शस्त्रांचे कारखाने बंद करावे लागतील. शस्त्रांचे कारखाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. अमेरिका हा कणा मोडू देणार नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र साधनसंपन्न देशातून कच्चा माल स्वस्तात मिळवायचा आणि त्या बदल्यात त्यांना शस्त्रे विकायची. आखाती देशातील सगळे देश तेलधनाने समृद्ध आहेत. हे तेलधन अमेरिकेला लागते. बहुतेक देशांतील तेलशुद्धीकरण कारखान्यांत अमेरिकन कंपन्या गुंतलेल्या आहेत. तेलविक्रीतून आखाती देशांना अफाट पैसा मिळतो. या पैशाचा मोठा भाग अमेरिकन शस्त्रे खरेदी करण्यात खर्च होतो. इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत, लिबिया इत्यादी देशांतील तेल अमेरिकेने आणि तिच्या युरोपातील दोस्त राष्ट्रांनी कैक दशके लाटलेले आहे. आज इराणशी अमेरिकेचे वाकडे आहे. परंतु खोमेनीच्या राजवटीपूर्वी इराण अमेरिकेच्या गळ्यातील ताईत होता. इराणच्या तेलाच्या बदल्यात अमेरिकेने इराणला प्रचंड शस्त्रे दिली.
 
 
वुड्रो विल्सन जेव्हा जागतिक शांततेचा आराखडा मांडत होते, तेव्हा अरबस्तानची विभागणी लहान-सहान देशात कशी करायची, याचा गुप्त करार करण्यात ब्रिटन आणि फ्रान्स गुंतले होते. या कराराचे नाव आहे ‘सायकस-पिको करार’. हे दोघे राजनीतिज्ञ होते. त्यांनी अरबस्तानाच्या भूमीवर उभ्या-आडव्या रेषा मारून इराक, जॉर्डन, सौदी अरेबिया, कुवेत, सीरिया इत्यादी देश निर्माण केले आणि नंतर त्यांना आपापसात लढत ठेवले. तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला शस्त्रे देतो, तुम्ही आम्हाला तेल द्या.
 
 
सशक्त झाल्यामुळे ज्या राजवटी अमेरिकेचे ऐकणार नाहीत, त्या अमेरिकेच्या शत्रू झाल्या. प्रथम इराण शत्रू झाला. त्यानंतर इराक शत्रू झाला. क्रमाने लिबिया आणि सीरिया शत्रू झाला. इराण सोडून इराक, लिबिया आणि सीरिया या देशांवर अमेरिकेने अग्निवर्षाव केला. इराकमधील आणि लिबियातील राजवट उलथून टाकली. सद्दाम हुसेन आणि कर्नल गडाफी यांना ठार केले. सीरियात यादवी युद्ध चालू आहे. राजवटी अस्थिर करण्यासाठी सीआयए ही अमेरिकेची गुप्तहेर संघटना अतिशय सक्रिय असते. तिचे बजेट अब्जावधी डॉलर्सचे असते. अस्थिर करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. प्रस्थापित राजवटीविरुद्ध उठाव करण्यासाठी पैशाचा पुरवठा करणे, महत्त्वाकांक्षा निर्माण करणे, जनआंदोलने उभी करणे, त्यासाठी पैसा खर्च करणे, आवश्यक असेल त्या ठिकाणी भाडोत्री सैनिक पाठविणे, बंड करणार्‍यांना शस्त्रे देणे अशी सगळी कामे सीआयए करीत राहते. दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत ठरावीक कालांतराने या गोष्टी घडत राहतात. अरबस्तानातदेखील अमेरिका हेच करीत राहते.
 
 
‘"The White Man's Burden' - म्हणजे ‘गोर्‍या माणसाचे ओझे’ हा एक वाक्प्रचार आहे. तो सर्व गोर्‍या जमातीला लागू होतो. त्याचा अर्थ असा होतो की, जगाला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी नियतीने गोर्‍या माणसाच्या खांद्यावर टाकलेली आहे. सुसंस्कृत करण्याचे त्यांचे आराखडे आहेत. 1. सर्व देशांत लोकशाही राजवट हवी आणि ही लोकशाही राजवट अमेरिका किंवा ब्रिटनप्रमाणे हवी. 2. सर्व देशांनी पाश्चात्त्य पोशाखाचा अवलंब केला पाहिजे आणि त्यांची आहार पद्धती स्वीकारली पाहिजे. 3. व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य दिले पाहिजे. 4. वेगवेगळ्या समुदायांनी पाश्चात्त्य संगीत आणि शिष्टाचार यांचा स्वीकार केला पाहिजे. असे झाले म्हणजे जगात एकसारखेपणा निर्माण होईल आणि मानव सुसंस्कृत होईल, असा या गोर्‍या माणसाच्या ओझ्याचा अर्थ होतो. या ओझे वाहण्याचेे नेतृत्व अमेरिका करीत असते.
 
 
अफगाणिस्तानात अमेरिका घुसली, तेव्हा ओसामा बिन लादेनला आणि त्याच्या दहशतवादी संघटनेला तालिबानींनी जो पाठिंबा दिला आहे, तो नाहीसा करणे हा अमेरिकेचा उद्देश होता. पहिल्या दोन वर्षांत तालिबानींची सत्ता गेली. ओसामा बिन लादेन पळाला. युद्ध चालू असताना त्याला पकडणे अमेरिकेला शक्य झाले नाही. का शक्य झाले नाही, याच्या रंजक कथा आहेत. नंतर एबटाबाद येथे त्याच्या घरावर अमेरिकन कमांडोंनी हल्ला केला आणि त्याला ठार केले. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणारा ठार झाला, अमेरिकेचा हेतू संपला. परंतु तसे झाले नाही. गोर्‍या माणसाच्या ओझ्याचे भूत तसेच होते. अमेरिकेने अफगाणिस्तानची पुनर्बांधणी सुरू केली. पाश्चात्त्य पद्धतीची लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य दिले. अफगाणिस्तानी लोकांना काय पाहिजे, याचा विचार करण्याची गरज अमेरिकन लोकांना वाटली नाही. जे नको ते लादण्याचा प्रयत्न झाला आणि तो फसला.
 
 
अफगाणिस्तानात दहशतवादी राजवट आहे, मानवी मूल्यांना पायदळी तुडवणारी आहे, इराकमध्येदेखील हेच तर्कशास्त्र सांगितले गेले. थोडे मागे जाऊन पाहिले, तर 1945-53 सालचा रशिया मानवतावादी होता काय? स्टॅलिनने तर आपल्याच देशातील दोन कोटीहून अधिक माणसे मारली. तेव्हा जगाला सुसंस्कृत करण्याचे गोर्‍या माणसाचे ओझे कोकाकोला पीत होते काय? रशियाने 1950 साली पश्चिम जर्मनीची कोंडी करून अन्न, पाणी, वीज यापासून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रशियावर बाँबवर्षाव का झाला नाही? तो गोरा आणि ख्रिश्चन असल्यामुळे अमेरिकेने वेगळा न्याय वापरला. जपान पिवळा आहे, तो शरण येत नाही, म्हणून त्याच्यावर दोन अणुबाँब टाकले. रशिया अमानवी काम करतो, मग रशियाला सुधारण्यासाठी अणुबाँबचा वापर का केला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
 
 
इराकवर हल्ला केला, त्यातून इसिसचा जन्म झाला. इसिस ही दहशतवादी संघटना म्हणून उदयास आली. दोन-तीन वर्षांपूर्वी इसिसच्या हत्याकांडाचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असत. त्यांचा नेता बगदादी याला अमेरिकेने ठार केले. अफगाणिस्तानवर हल्ला करून तलिबानी संपविता आले नाहीत. मेलेल्या तालिबानींच्या रक्तबीजातून नवीन तालिबानी जन्माला येऊ लागले. आपल्या पुराणात रक्तबीजातून असुर निर्माण होण्याच्या कथा खूप आहेत, ते प्रत्यक्षात घडताना दिसते. हे सगळे तालिबानी, इसिसचे जिहादी, इस्लामिक ब्रदरहूडचे जिहादी दिसायला इस्लामी तत्त्वज्ञानातून जन्मले असे भासते, परंतु त्यांना खर्‍या अर्थाने जन्मास घालण्याचे काम अमेरिकेनेच केलेले आहे. कुठल्याही देशाला स्थिर होऊ द्यायचे नाही, प्रमाणाबाहेर आर्थिक संपन्न होऊ द्यायचे नाही, शस्त्रसंपन्न होऊ द्यायचे नाही. तसा तो झाला तर आपल्या प्रभावक्षेत्राला धोका निर्माण होतो. म्हणून अमेरिका काही ना काही कुरापती काढून जगाला युद्धग्रस्त ठेवतच असते.
 
 
जागतिक शांततेचा विचार करता जागतिक शांततेला दहशतवादी गटांपासून जितका धोका आहे, तितकाच धोका गोर्‍या माणसाच्या ओझ्यापासून आहे. या दोन्ही प्रवृत्ती असहिष्णू आहेत. दुसर्‍यावर लादवणूक करणार्‍या आहेत. आपल्या विचाराच्या विरोधात जे आहे, त्यांना जगण्याचा अधिकार नाकारणार्‍या आहेत आणि त्यांचे संघर्ष अव्याहतपणे चालू आहेत.
 
 
यातून भारताला मार्ग काढावा लागेल. आपण कधीही जगाला सुधारण्याचे ओझे आपल्या खांद्यावर घेतलेले नाही. जगात विविधता राहणार आणि प्रत्येक मानवसमूह त्याच्या त्याच्या वैशिष्ट्याने जगावा. कुणाला राजेशाही आवडेल, कुणाला एकतंत्री शासन आवडेल, कुणाला वेगळ्या प्रकारच्या लोकशाहीत सुरक्षा वाटेल, प्रत्येक मानवसमूहाला आपापल्या पद्धतीने जगू दिले पाहिजे. ईश्वराने सृष्टी निर्माण केली, असे सर्व जण म्हणतात. त्याने जर ठरविले असते, तर एकसारख्या संस्कृतीचे मानवसमूह जगात निर्माण केले असते. पण त्याची इच्छा विविधतेत आहे. ईश्वराच्या या विविधतेवर भारतीय संस्कृती बेतलेली आहे. म्हणून आपले दायित्व भविष्यकाळात आपल्या संस्कृतीच्या आधारे जगातील मानवसमूहात भ्रातृभाव निर्माण करण्याचे आहे.