हिंदू तेजा, जाग रे...

विवेक मराठी    09-Sep-2021   
Total Views |
 हिंदुत्ववादी विचारसरणी म्हणजे फक्त रा.स्व. संघ असा गैरसमज पसरवण्याच्या उद्देशालाही हरताळ फासला गेला आहे. कारण संघपरीघाबाहेरच्या, पण हिंदू विचारसरणी अनुसरणार्‍या अनेकांनी या परिषदेला विरोध केला आहे. आयोजकांना हे अनपेक्षित असावे. हिंदू तेजाला जाग आली आहे आणि असे अनेक कट उधळून लावण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. हे सामर्थ्य आहे सकारात्मक ऊर्जेचे... छोटी रेष पुसण्याऐवजी, मोठी रेघ निर्माण करण्याचे.
 
hindu_1  H x W:
 
सारे जग वाढत्या मुस्लीम मूलतत्त्ववादाच्या समस्येने चिंताग्रस्त असताना आणि या संदर्भात भारताने दिशादर्शक भूमिका घ्यावी अशा अपेक्षेत असताना, ‘"Dismantling global Hindutva' या नावाने, जागतिक कीर्तीच्या विद्यापीठातील प्राध्यापकांना हाताशी धरत द्वेषमूलक डाव्यांनी अमेरिकेत तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. परिषद भरवण्यामागचा एक हेतू त्याच्या शीर्षकातच नमूद असून, दुसरा हेतू परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या लोगोच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे.

 सर्वसमावेशक, सहिष्णू असलेली हजारो वर्षांची हिंदू विचारधारा आणि या विचारधारेच्या प्रकाशात आपल्या कार्याची मांडणी करत विश्वव्यापी झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विश्वव्यापी संघटना, या दोहोंना उद्ध्वस्त करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी ही परिषद भरवली जाते आहे. या दोन्ही गोष्टी साध्य होणे हे केवळ अवघड नाही, तर अशक्यप्राय आहे, याची जाणीव आयोजकांना नसावी. रा.स्व. संघ ही हिंदूंची संघटना असली, तरी त्यापलीकडेही हिंदू विचारसरणी अनुसरणारा खूप मोठा वर्ग भारतात आणि भारताबाहेर आहे, ज्याला आपल्या धर्माविषयी सार्थ अभिमान आहे. अलीकडेच जावेद अख्तर यांनी तालिबानी दहशतवादी व रा.स्व. संघ यांची केलेली तुलना आणि त्यावर सर्व स्तरांतून उमटलेली तीव्र प्रतिक्रिया हे नुकतेच घडलेले उदाहरण समोर आहेच.

 
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेला कब्जा, त्यातून उद्भवलेले आणि पुढे उद्भवणारे प्रश्न कसे सोडवावेत, अफगाणिस्तानातील सर्वसामान्य निरपराध नागरिकांचे रक्षण कसे करावे, वाढत्या मुस्लीम मूलतत्त्ववादाला कशी वेसण घालावी या चिंतेत आज अवघे जग आहे. त्यातच तालिबानी सरकारने सत्ताग्रहणासाठी 11 सप्टेंबरचा दिवस निश्चित केला आहे. अमेरिकेतील ट्विन टॉवरला, पर्यायाने महासत्तेच्या सामर्थ्याला मुस्लीम दहशतवाद्यांकडून धक्का पोहोचवला गेला, तो हा दिवस. यंदा या घटनेला 20 वर्षे पूर्ण होताहेत. तो दिवस सत्ताग्रहणासाठी निवडणे हा अपघात नाही. तसेच, ज्या 11 सप्टेंबरने मुस्लीम दहशतवादाच्या उग्रभीषणतेची जाणीव करून दिली, तो दिवस परिषदेसाठी निवडणे हाही योगायोग नाही. हे जाणीवपूर्वक आखण्यात आलेले - हिंदू धर्माला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी रचण्यात आलेले कारस्थान आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाच झाली ती हिंदूंना संघटित करण्यासाठी आणि या संघटनेच्या माध्यमातून मातृभूमीच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी अनेकांना कार्यप्रवण करण्यासाठी. या उत्थानाच्या, प्रगतीच्या हजार वाटा आहेत. वैचारिक प्रबोधन, सेवा कार्ये, रचनात्मक प्रकल्प या माध्यमांतून भारतातल्या आणि जगभरातल्या हिंदूंना जोडण्याचे कार्य गेली 97 वर्षे ही संघटना करत आली आहे. बुद्धिभेदावर नव्हे, तर प्रबोधनावर, मनुष्यामधल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारी, समाजहितासाठी सर्वसामान्यांना कार्यप्रवृत्त करणारी ही संघटना आहे. याचे दाखले थोडथोडके नव्हे, तर लाखो-करोडोंच्या संख्येत आहेत. या संघटनेला दहशतवादी ठरवणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे.
आनंद पटवर्धन, कविता कृष्णन, आयेशा किडवाई, मोहम्मद जुनैद, पी. शिवकाशी आणि याच विचारधारेतले आणखी काही भारतीय या परिषदेसाठी निमंत्रित आहेत. नक्षलवादाला तसेच भारताच्या अखंडतेला ज्या घटकांपासून धोका आहे अशा घटकांना समर्थन देणे हे यांचे जीवितकार्य आणि हीच यांची परिषदेसाठीची योग्यता.
 
याबरोबरच हाताशी धरले आहे ते जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांतल्या प्राध्यापकांना. विद्यापीठांतले प्राध्यापक का? तर त्यांच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये विखारी विचार पसरवणे, त्यांची मते प्रभावित करणे आणि हळूहळू सर्व समाजात हे विष पसरवण्याची योजना करणे अशी ही कार्यपद्धती आहे.
मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वगुरू बनण्याच्या दिशेने होत असलेली भारताची वाटचाल, त्यातून जगभरातल्या डाव्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता याचे ही परिषद द्योतक आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसली, तरी केवळ मूर्खपणा समजून दुर्लक्ष करण्याजोगी ही बाब नाही. कारण अशाने जागतिक शांततेच्या मुळावर उठलेल्या शक्ती सोकावतात, याची जाण मोदीनेतृत्वाखाली वाटचाल करणार्‍या, स्वसामर्थ्याची जाणीव झालेल्या नव्या रूपातल्या तेजस्वी भारताला आहे. आणि इथून जगाच्या विविध भागांत जाऊन राहिलेल्या अनिवासी भारतीयांनाही त्याची जाणीव झाली आहे. या परिषदेविरोधात जी पावले उचलली जात आहेत, त्यावरून हे नक्की म्हणता येईल. ज्या विचारसरणीने, जगण्यातल्या - सर्व प्रकारच्या विचारधारांतल्या वैविध्याला कायम सामावून घेतले, विश्वशांतीच्या विचारापासून जी कदापि दूर झाली नाही, अशा विचारसरणीवर दहशतवादी असल्याचा शिक्का मारण्याचे आणि त्याला मुस्लीम मूलतत्त्ववादाच्या रांगेत नेऊन बसवण्याचे नीच कारस्थान सर्वशक्तीनिशी उलथून टाकले जायला हवे, याची जाणीव सर्व स्तरांतून व्यक्त होते आहे.
म्हणूनच ज्या विद्यापीठांतल्या प्राध्यापकांना हाताशी धरले आहे, त्याच विद्यापीठात शिकणारे हिंदू भारतीय विद्यार्थी या परिषदेविरोधात एकवटले आहेत. आजवरच्या अनुभवावरून आयोजकांना अशा प्रकारची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची अपेक्षा नसावी. पण ती उमटली आणि त्यामुळे, सह आयोजक म्हणून ज्या विद्यापीठांची नावे घालण्यात आली होती, ती नावे मागे घ्यावी लागली. हिंदू विचारसरणीचा अपप्रचार येथून पुढे खपवून घेतला जाणार नाही, याची चुणूक या कृतीतून आयोजकांना दिसली असावी. सहिष्णू असणे म्हणजे दुबळे असणे नव्हे, याची उदाहरणे गेल्या 7 वर्षांत भारताने जगासमोर ठेवली आहेत आणि जगभरातल्या हिंदूंनीही त्याप्रमाणे योग्य वेळी कणखरपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. या परिषदेविरोधात अमेरिकेतच एकत्र आलेल्या अनिवासी भारतीयांच्या विविध संस्था/संघटना ही त्याचीच उदाहरणे. विरोध कशा प्रकारे करायचा याबाबत एकत्र आलेल्यांमध्ये अद्याप मतमतांतरे असली, तरी ठाम विरोध करायचा यावर सगळ्यांचे एकमत आहे. तेव्हा भले ही परिषद होवो, तिला विधायक मार्गाने होत असलेला विरोध स्वागतार्ह आहे.

 
हिंदुत्ववादी विचारसरणी म्हणजे फक्त रा.स्व. संघ असा गैरसमज पसरवण्याच्या उद्देशालाही हरताळ फासला गेला आहे. कारण संघपरीघाबाहेरच्या, पण हिंदू विचारसरणी अनुसरणार्‍या अनेकांनी या परिषदेला विरोध केला आहे. आयोजकांना हे अनपेक्षित असावे. हिंदू तेजाला जाग आली आहे आणि असे अनेक कट उधळून लावण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. हे सामर्थ्य आहे सकारात्मक ऊर्जेचे... छोटी रेष पुसण्याऐवजी, मोठी रेघ निर्माण करण्याचे.