अनाथांची माय पाखर संकुल

विवेक मराठी    01-Jan-2022
Total Views |
@उत्तरा मोने
 
अनाथ, निराधार मुलांना केवळ आश्रयच नव्हे, तर मायेची पाखर देणारी आणि त्यांचं योग्य प्रकारे संगोपन करणारी संस्था म्हणजे सोलापूरची ‘पाखर संकुल’. येथील शुभराय मठाच्या आध्यात्मिक वातावरणात शुभांगी बुवा यांनी ही संस्था सुरू केली. या संस्थेत एकीकडे मुलांवर योग्य संस्कार करून, चांगलं शिक्षण देऊन त्यांना घडवलं जातं, तर दुसरीकडे योग्य पालकांच्या हाती त्यांना सोपवण्याची दक्षताही घेतली जाते.

social
एखाद्या घरात नवीन बाळ जन्माला येणार म्हणजे खरं तर त्या घरात आनंदोत्सव साजरा होत असतो. त्या नव्या बाळाचे लाड केले जातात, त्याचं कोडकौतुक केलं जातं. पण काही बाळांच्या नशिबी यातलं काहीच नसतं. कारण जन्माला आलेलं मूल त्या आईवडिलांना नकोसं असतं किंवा अनेकदा त्या मुलाला किंवा मुलीला गर्भातच मारून टाकायचे प्रयत्न केलेले असतात, पण ते प्रयत्न फसतात आणि हे बाळ जन्माला येतं. अर्थात या परिस्थितीलाही अनेक कारणं असतात. मग अशी मुलं कधी उकिरड्यावर किंवा कचराकुंडीजवळ टाकून दिली जातात. खरं तर असा नवा जन्माला आलेला जीव टाकताना त्या आईला किती वेदना होत असतील, हा प्रश्न मनात येतोच. पण अशा निराधार बालकांना आईच्या मायेने वाढवण्याचं काम गेली अनेक वर्षं शुभांगी बुवा या करतायत.
 
सोलापूरमध्ये शुभराय मठात 20 वर्षांपूर्वी शुभांगीताईंनी या लेकरांना मायेची पाखर घालायची हे ठरवलं आणि अशा मुलांसाठी ‘पाखर संकुल’ ही संस्था सुरू केली. 0 ते 6 या वयोगटातील 35 मुलं सध्या या संकुलात आहेत. इथे या मुलांना सांभाळलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते आणि स्वत:चं घर हरवलेल्या या मुलांना त्यांचं हक्काचं, मायेचं घर मिळवून दिलं जातं. शुभांगीताई स्वत: महाराष्ट्रभर फिरून या मुलांसाठी घरं शोधतात. आतापर्यंत जवळजवळ 150 मुलं संस्थेत आली आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक मुलं दत्तक घरीही गेली.
 
 
social
शुभांगी बुवा
शुभांगीताईंचा जन्मही शुभराय मठातलाच. या मठातल्या आध्यात्मिक वातावरणातच त्या वाढल्या. मठातल्या घराण्याचा, संस्कारांचा वारसा, आईवडिलांची शिकवण यामुळे चडथचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अनाथ मुलांसाठी काम करायचं ठरवलं आणि अनेक अनाथ मुलांची आई बनून त्यांना घर आणि आई-बाबा मिळवून देण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं. इथे दत्तक विधान योजना राबवताना सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता तर केली जातेच, त्याचबरोबर मूल दत्तक जाण्याआधी आणि गेल्यानंतरही त्या घराची आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची सगळी माहिती घेणं या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या जातात.
पाखर संकुलमध्ये बालसंगोपन आणि विद्यादायिनी या सरकारी योजनाही राबवल्या जातात. विद्यादायिनी या योजनेअंतर्गत एका मुलाचा वार्षिक खर्च - पाच हजार रुपये समाजातल्या काही मान्यवरांकडून उचलला जातो. शिवाय या मुलांना पौष्टिक आहार, संस्कार वर्ग याही सुविधा दिल्या जातात. त्याचप्रमाणे कुटुंब सल्ला केंद्र आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्रही संस्थेत कार्यरत आहे. शिवाय किशोर-किशोरी प्रकल्प, कलाकौशल्य प्रशिक्षण वर्ग, उन्मेष प्रकल्प विद्याकोश, महिला समुपदेशन केंद्र, हितगुज केंद्र यासारखे कार्यक्रम इथे घेतले जातात. त्यामुळे इथे मुलांचा सर्वतोपरी विचार केला जातो. अगदी कृश, नाजूक असलेलं बाळही गुटगुटीत होऊन आपल्या घरी जातं आणि त्या नव्या घरात आनंद निर्माण करतं. मुळात शुभांगीताई अगदी निर्मळ मनाने हे काम करतात, त्यामुळे त्यांच्यासारखीच संस्थेतली सगळीच माणसं मनापासून हे काम करताना दिसतात.


social
 
शुभांगीताई सांगतात की “या बाळांचे इतके वेगवेगळे अनुभव येतात. एक लहान बाळ जेव्हा आमच्याकडे आलं, तेव्हा पाळण्यात नुसतं पडून राहायचं. त्याला उजवीकडे किंवा डावीकडे वळताही येत नव्हतं. मग आमच्याकडे त्याची काळजी घेतली गेली आणि ते बाळ गुटगुटीत झालं. आमच्याकडे दुधाचा रतीब घालणार्‍या दूधवाल्याला त्या बाळाचा इतका लळा लागला होता की जेव्हा हे बाळ आपल्या घरी जायला निघालं, तेव्हा आमच्या सगळ्यांसह आमच्या दूधवाल्याच्याही डोळ्यात पाणी होतं. म्हणजे आलेल्या बाळांशी सगळ्यांचाच एक स्नेह जुळून जातो. मुळातच देवाचं काम म्हणून मी हे काम सुरू केलं. जेव्हा हे काम सुरू केलं, तेव्हा असं लक्षात आलं की लहान बाळांसाठी इथे काहीच सोय नाही. त्यामुळे पाखर संकुलच्या निर्मितीने या बाळांसाठी मायेची पाखर आम्हाला निर्माण करता आली. खरं तर त्या बाळांची मी ऋणी आहे. कारण त्या बाळांनी मला एक ओळख दिली. त्यांनी मला दिलेलं आजीपण आज मी आनंदाने मिरवत आहे.”
 
ही मुलं ज्या घरात जातात, त्या घरात आनंद निर्माण करतात. त्या पालकांनाही शुभांगीताई अतिशय उत्तम रितीने समुपदेशनही करतात. त्यामुळे ज्या घरात मूल जातं, तिथलं वातावरणही उत्तम होऊन जातं. या दत्तक मुलांच्या बाबतीत हरवलेलं मातृत्व तर त्यांना बघायला मिळतंच, तसंच त्यांच्या मते पितृत्वही तितक्याच जाणिवेने पाहायला मिळतं. म्हणजे पाखर संकुलमध्ये तर एका बाळाचं बारसंही दत्तक पित्याने केलेलं आहे. म्हणजे या क्षेत्रातल्या परिवर्तनाचंही बीज पाखर संकुलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
पाखर संकुलची कार्यकर्ता टीम
social
 
 
शुभांगीताई म्हणतात, “माझ्यामागे कसलाही पाश नाही. मी सकाळी साडेसहा वाजता इकडे येते नि रात्री दहापर्यंत कामात गुंतलेली असते. शून्य ते सहा वयोगटातली सुमारे 35 मुलं एके ठिकाणी असल्यावर शांतता अपेक्षित नसतेच, पण हा कल्ला असतो तो लस द्यायला आलेल्या डॉक्टरांमुळे. सगळी बाळं इंजेक्शन घेऊन कळवळत असतात, ते पाहवत नाही, पण त्याला पर्याय नसतो. त्यांची प्रकृती ठणठणीत ठेवण्याची जबाबदारी महत्त्वाची.” ही बाळं दत्तक देईपर्यंतचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकले की पटतं - जन्मदात्या आईला मूल नकोसं झालं, तरी त्याला त्याचे आईबाबा बरोबर येऊन भेटतातच. एखाद्या बाळाने त्याच्या नियोजित आईवडिलांना चक्क नाकारल्याचेही एखाद-दोन अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं. “मागच्या वर्षी आमच्याकडे एक दिवस असा होता जेव्हा फक्त पाच मुलं आम्ही सांभाळत होतो. मला वाटलं, संकुल बंद करता येईल, आता दुसरं काही काम करू. परंतु, जसजसं गर्भलिंग निवडविरोधी वातावरण तापत गेलं, तसतशी मुलांची संख्या वाढायला लागली आणि आज ती पुन्हा 35वर जाऊन पोहोचली आहे.” या अनुभवाच्या बोलांवर उत्तर नाही. कोणतंही मूल नकोसं असणारच नाही अशी परिस्थिती जोवर निर्माण होत नाही, तोवर पाखर संकुलसारख्या संस्थांना त्यांची काळजी घ्यावीच लागणार.