अविरत कार्यमग्न व्यक्तिमत्त्व हरपले

विवेक मराठी    01-Jan-2022
Total Views |
@महेश काळे 
वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख आणि संघाचे प्रचारक प्रकाशजी काळे यांचे नुकतेच कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. या अविरत कार्यमग्न व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली अर्पण करणारा लेख.

prakash
तब्बल दीड महिना कर्करोगाशी चालू असलेली प्रकाशजींची झुंज अखेर संपुष्टात आली.
कर्करोग इतका भयंकर असतो?
 
 
एका धडाडीच्या, कल्पनेपलीकडील झपाटा असलेल्या, संघटनेच्या योजना बेभान होऊन आखणार्‍या आणि त्याहीपेक्षा कितीतरी बेभान होऊन अंमलात आणणार्‍या एका कल्पक आणि समर्पित प्रचारकाला कुठलीही संधी न देता आपल्यातून खेचून नेऊ शकतो?
 
 
कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख आणि संघाचे प्रचारक प्रकाशजी काळे आता आपल्यात नाहीत, ही भयंकर बातमी आहे. ही दु:खद वार्ता येणार, हे महिन्यापूर्वीच स्पष्ट होऊनदेखील ते पचवणे खूप जड जातेय.
 
 
प्रकाश काळे म्हणजे तसे म्हटले तर झुंजार व्यक्तिमत्त्व. कुठलीही संकटे अंगावर घेणे आणि त्या संकटातून लीलया बाहेर पडणे किंवा बाहेर काढणे हे शिकावे तर प्रकाशजींकडून! पण कर्करोगाने प्रकाशजींना झुंजण्याचीदेखील संधी दिली नाही. दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधीच नागपूरला रेशीमबागेत भेट झाली होती. नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये तपासण्या चालू असल्याने स्वादुपिंडात बारीकशी गाठ असल्याने ती ऑपरेशन करून काढून टाकण्याचा निर्णय झाला होता. अत्यंत उत्साहाने आणि सकारात्मक पद्धतीने ते म्हणालेदेखील की “ऑपरेशन झाल्यावर सात-आठ दिवस हॉस्पिटलमध्ये आणि मग पुढच्या महिन्यापासून प्रवास सुरू झाल्यानंतर आपण नक्की भेटू.” या भेटीत काय करायचे हेदेखील ठरले होते.
 
 
तास-दीड तासाच्या भेटीत तोच मोकळेपणा, विनोदी कोट्या इतके सारे सहजपणे चालू होते की, कुठेही पुसटशी शंकादेखील नव्हती की प्रकाशजींची ही अखेरची भेट असणार आहे. संकट जरी गंभीर असले, तरी आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे इच्छाशक्तीच्या बळावर ते सहजपणे यातून बाहेर पडतील अशी सर्वांचीच खात्री होती.
 
 
पण प्रत्यक्षात ऑपरेशन झाल्यानंतर कर्करोगाने शरीरात चांगलेच बस्तान बसवल्याचे लक्षात आले. 9 नोव्हेंबरला ऑपरेशन झाल्यानंतर वर्ष निघेल का दोन वर्ष ही चर्चा क्रमश: महिन्यावर, दिवसांवर आणि शेवटी तासांवर व नंतर तर क्षणांवर येऊन पोहोचली. अवघ्या आठ-दहा दिवसांत कॅन्सरने पाहता पाहता सारा खेळ बिघडवला. नाही म्हणायला शेवटच्या वीस-बावीस दिवसांत प्रकाशजींमधील लढवय्या जागृत झाला होता, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तशी गेली अनेक वर्षे प्रकाशजी मधुमेहासोबत राहतच होते. दिवसेंदिवस दोघांची मैत्री घट्ट होत असल्याने बॅगमध्ये औषधांची भरच पडत होती. सर्वांनी सर्व प्रकारे तब्येतीबाबत आणि पथ्यपाण्याबद्दल सांगून झाले होते. समोर काही गोड खाताना दिसले की त्यांना कायम टोकायचो. यावर त्यांचे खास वैदर्भीय उत्तर ठरलेले असे, “जाऊ दे बे, कधीतरी मरायचंच आहे नं?” तसे सर्वांनीच त्यांच्यापुढे हात टेकले होते.
 
 
अर्थात झुंजार वृत्ती त्यांच्या रक्तातच असल्याने काहीही झाले तरी मृत्यूसमोर ते लगेच हार मानतील असे बिलकुल वाटत नव्हते. कॅन्सरचे ऑपरेशन झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच त्यांची तब्येत प्रचंड खालावली. दवा आणि दुवा संपल्यानंतर पुढचा तब्बल एक महिना प्रकाशजींनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर काढला, असे म्हणावे लागेल. त्यांच्यासारख्या धडाडीच्या कार्यकर्त्याचे अवघ्या साठाव्या वर्षी हे जग सोडून जाणे तसे म्हटले तर अनपेक्षित आहे. पण परमेश्वरी इच्छा वेगळीच होती, असे म्हणावे लागेल.
 
 
नागपूरमधून साधारण 1983मध्ये संघ प्रचारक निघाल्यानंतर तालुका, जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. कल्याण आश्रमात 1999मध्ये आल्यानंतर त्यांनी प्रांत संघटनमंत्री ते अखिल भारतीय अशा विविध जबाबदार्‍या पार पाडल्या. त्यांच्यावर सोपविलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांच्या बळावर एक वेगळे परिमाण मिळवून दिले होते. नित्यनूतनता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य! कुठलीही नवीन योजना नवी कल्पना शोधून काढावी ती प्रकाशजींनी. सुरुवातीला अगदीच अव्यवहार्य वाटणारी योजना वा कल्पना प्रत्यक्ष बैठक संपल्यानंतर ‘अरे, किती सोपी आहे आणि किती महत्त्वाची आहे’ या निर्णयावर येऊन थांबायची. एखादी योजना प्रभावीपणे मांडून सर्वांच्या गळी उतरविण्याचे एक अद्भुत कौशल्य त्यांच्याकडे होते. केवळ गळी न उतरवता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीदेखील ते खंबीरपणे पाठीशी उभे राहायचे - मग ती विदर्भातील कुपोषणमुक्तीसाठी केलेली मेडिकल कँपची योजना असो वा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धांचे भव्य आयोजन असो, राष्ट्रीय स्तरावरील एखादी बैठक वा शबरी कुंभासारखे एखादे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन असो. या सार्‍यांच्या यशासाठी जी मेहनत ते घ्यायचे, त्याला खरोखरच तोड नसायची. एखाद्या भव्य आयोजनासाठी भीत भीत लाखांमध्ये चालणार्‍या गोष्टी प्रत्यक्षात कोटीपर्यंत कशा पोहोचायच्या, हे कळायचेदेखील नाही. अर्थात त्यामागे प्रकाशजींची कल्पकता आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारी भूमिकाच कारणीभूत असे.
 
 
आपल्या सदतीस वर्षांच्या प्रचारकी जीवनामध्ये त्यांनी अक्षरश: शेकडो कुटुंबे जोडली. माणसे जोडण्याचे व त्यांच्याशी संबंध जपण्याचे त्यांचे कौशल्य जबरदस्त होते. कित्येक परिवारांना प्रकाशजी म्हणजे एक हक्काचा आधार होता. संघाशी व कल्याण आश्रमाशी ज्यांचा कुठलाही संबंध नाही, अशी शेकडो माणसे प्रकाशजींनी घट्टपणे धरून ठेवली होती. केवळ धरूनच ठेवली नाही, तर वनवासी विकासाच्या कामात त्यांचे योगदानदेखील मिळवून दिले. अर्थात माणसे जोडण्याची व त्यांच्याशी संपर्क करण्याची योजना फक्त कार्यकर्ता वा त्यांच्या परिवारापुरतीच मर्यादित नसे, तर मुख्यमंत्र्यांपासून सर्व शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांशी त्यांनी उत्तम संबंध निर्माण केले होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री यांच्याशी त्यांचे ज्या सलोख्याचे संबंध होते, ते त्यांच्या संघटनकौशल्याचे दृश्य स्वरूप होते. या सर्वांचे ते केवळ मार्गदर्शकच नव्हते, तर तर जनजाती क्षेत्राबाबत या सर्वांची एक वैचारिक बैठक पक्की करण्यामध्येदेखील प्रकाशजींचे खूप मोठे योगदान होते. एका अर्थाने वैचारिक दिशादर्शक म्हणून त्यांची भूमिका असे. या सर्वांशी निखळ मैत्रीच्या आधारावर त्यांनी समाजासाठी या सर्व यंत्रणेचे खूप मोठे योगदान प्राप्त करून घेतले.
 
 
एकंदरीतच मोठमोठी स्वप्न बघणे आणि ती प्रत्यक्षात उतरविणे हा त्यांचा एक प्रकारे छंद होता. किंबहुना हा त्यांच्या आनंदाचादेखील विषय होता. मध्यंतरी भोपाळला गेलो असताना त्यांनी आवर्जून मध्य प्रदेश सरकारचे जनजाती संग्रहालय पाहण्यासाठी पाठविले. अशा प्रकारचे म्युझियम आपल्यालादेखील बनवायचे आहे, अशी भव्य कल्पना त्यांच्या डोळ्यापुढे होती. ‘प्रकाश काळे यांच्या मनात आले आहे ना! मग ते नक्की पूर्ण होणार’ असा एक प्रकारचा प्रचंड विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केला होता. प्रचारक असल्याने जनसंपर्क हा त्यांच्या असाच आवडीचा विषय. मुख्य म्हणजे सर्व स्तरांवरील मान्यवर व्यक्तींशी त्यांचा संपर्क होता. गेल्या काही वर्षांमध्ये एवढ्या व्यक्तींशी संपर्क निर्माण झाला आहे की, ही सारी नावे तुझ्याशी जोडावीत असे माझ्या कल्पनेत असल्याचे ते मध्यंतरी म्हणाले होते. “एकदा हे दवाखाना पुराण संपल्यानंतर तू कधीतरी आठ-दहा दिवस वेळ काढून भोपाळला आलास तर या सार्‍यांच्या भेटी मी तुला करून देतो” असे आश्वासन त्यांनी दिले होते. ते असे का म्हणाले असावेत हे त्या वेळीदेखील नाही आणि आजही कळलेले नाही.
 
 
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने 75 जनजाती महापुरुषांच्या जीवनावर आधारित एक संग्राह्य पुस्तक बनविण्याची कल्पना त्यांचीच. याच पुस्तकाच्या आधारावर पुढील अनेक योजना त्यांच्या डोक्यात पक्क्या ठरल्या होत्या. त्याबाबत त्यांनी काही जणांशी चर्चादेखील केली होती. हे पुस्तक काही काळानंतर प्रकाशित होईलदेखील, पण ते बघण्यासाठी प्रकाशजी नसतील याची खंत मात्र राहणार आहेच.
 
 
खरे तर आमच्यात नऊ-दहा वर्षांचे अंतर. मात्र असे असूनदेखील तब्बल सतरा-अठरा वर्षे अधिकार्‍यापेक्षा घनिष्ठ मित्र राहिलेला आणि अखेरपर्यंत मैत्री जपणारा एक धडाडीचा प्रचारक प्रकाशजींच्या रूपाने सोडून गेला. कितीतरी भव्य योजना, कल्पना अर्ध्यावर सोडून त्यांचे असे जाणे माझ्यासह कित्येक जणांना खूपच वेदनादायक आहे. सामाजिक कामाची झिंग काय असते हे प्रकाशजींच्या व्यक्तिमत्त्वातून अनुभवायला मिळाले, धडाडी काय असते आणि स्वीकारलेल्या ध्येयासाठी प्रकृतीची तमा न बाळगता किती परिश्रम घ्यावे लागतात हे प्रकाशजींनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविले. कुठल्याही संघटनेत चौकट सांभाळून काम करणारे जसे कार्यकर्ते असतात, तसेच चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता असणार्‍या कार्यकर्त्यांचीदेखील आवश्यकता असते. प्रकाशजी या दुसर्‍या गटातील होते. संस्थेची वैचारिक चौकट सांभाळून त्यांनी या सर्व कामाला आपल्या कर्तृत्वातून एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले, असे निश्चितपणे म्हणता येईल.
 
 
सर्व वैद्यकीय उपाय संपुष्टात आल्यानंतर तीन-चार दिवसांपूर्वीच पू. सरसंघचालक मोहनजी भागवत प्रकाशजींच्या भेटीसाठी रुग्णालयात गेले होते. हा देह सोडून नवीन जन्मात पुन्हा प्रचारक म्हणून काम करण्याची त्यांनी प्रकाशजींना आज्ञा केली होती. त्यानुसार आज हजारो कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या मनात परिश्रमशीलतेची, कल्पकतेची आणि धडाडीची एक वेगळी छाप सोडून प्रकाश काळे नावाचा एक प्रचारक देहरूपाने आपल्यातून निघून गेला आहे.
 
 
समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण करून हजारो जणांच्या मनात समाजकार्याची ज्योत निर्माण करणारे प्रकाश काळे यांच्यासारखे कार्यकर्ते कुठल्या न कुठल्या रूपाने पुन्हा पुन्हा जन्माला येत असतातच. प्रकाशजीदेखील पुन्हा कधीतरी वेगळ्या रूपात या सगळ्या कामात सहभागी होतीलच.
 
 
अर्थात तात्त्विकदृष्ट्या हे सगळे ठीक आहे.. पण मनाला खूप मोठी हुरहुर लावून अफाट ताकदीचा हा कार्यकर्ता आज आपल्याला सोडून गेला आहे.
 
 
प्रकाशजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मन धजावत नाहीये... त्याची आवश्यकतादेखील वाटत नाहीये..
 
 कारण ...प्रकाश मरा नहीं!   प्रकाश मरते नहीं!!