शिवसृष्टीचं संकल्पनाचित्र आणि राजसभा

विवेक मराठी    10-Jan-2022
Total Views |
@वास्तुविशारद  राहुल चेंबूरकर 9322956442
वास्तुविशारदाच्या दृष्टीने शिवसृष्टीची संकल्पना कागदावर आणि नंतर प्रत्यक्ष साइटवर उतरण्याचा प्रवास कशा प्रकारे झाला, तसंच यातील मुख्य वास्तू असलेली राजसभा कशा प्रकारे साकारण्यात येत आहे हे मांडणारा लेख.
शिवसृष्टीबद्दल बोलायचं झालं, तर ‘इतिहासाची पुनर्भेट’ असं तिचं वर्णन करता येईल. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की शिवसृष्टीची संकल्पना खूप वर्षांपासून बाबासाहेबांच्या मनात होती. वेगवेगळ्या माध्यमांतून ती लोकांसमोर आणण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. 1975 साली दादरला शिवाजी पार्क येथे त्यांनी उभारलेल्या शिवसृष्टीमध्ये आता तयार होत असलेल्या शिवसृष्टीचं छोटेखानी मूर्त रूप लोकांना पाहायला मिळालं. शिवसृष्टी पाहायला येणार्‍या पर्यटकांना सोळाव्या-सतराव्या शतकाच्या काळाची अनुभूती मिळावी, त्या काळातील इतिहास, संस्कृती त्यांना अनुभवता यावी असा विचार या संकल्पनेमागे होता. बाबासाहेबांनी हा दृष्टीकोन जेव्हा माझ्यासमोर मांडला, तेव्हा सुरुवात झाली ती एका रेखाचित्राने.
 
shivsrushati
 
शिवसृष्टी कशी असावी याचं बाबासाहेबांनी त्या वेळी जे वर्णन केलं, त्याला कोलाज हा शब्द समर्पक आहे. शिवकालाशी आणि मराठी काळाशी निगडित ठळक वैशिष्ट्यं तिथे प्रदर्शित होणार आहेत. बाबासाहेबांनी जे एक-दोन तास विश्लेषण केलं, त्याच्यावरून मी त्याचं पहिलं रेखाचित्र तयार केलं. आपण शिवसृष्टीच्या वेबसाइटवरील त्याचा साइट प्लॅन पाहिला, तर ती उत्तर ते दक्षिण अशी पसरलेली दिसते. त्याचा दक्षिणेकडील भाग आंबेगावच्या हायवेला स्पर्श करणारा आहे आणि तो भाग चढ असलेला आहे. त्याची जी नैसर्गिक टेकडीसदृश रचना होती, ती रेखाचित्र तयार करताना माझ्या नजरेसमोर होतीच. त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं याबाबत बाबासाहेबांनी विश्लेषण केलं होतं. सुरुवात कशी करायची? तर आर्किटेक्चरमध्ये आम्ही कोणताही प्रकल्प तयार करत असताना सर्वप्रथम त्याचं कॉन्सेप्ट डिझायनिंग करतो. जे साकारायचं आहे त्याचा परिसर कसा आहे, हे लक्षात घेऊन त्याचा वापर करताना त्याला न्याय देता यावा या दृष्टीने त्याची ओळख झाली पाहिजे. शिवसृष्टीच्या बाबतीत कॉन्सेप्ट डिझाइन करताना, आत गेल्यानंतर कोणत्या गोष्टी ठळकपणे दिसल्या पाहिजेत याबाबत विचार करता करता कागदावर त्याचं रेखांकन सुरू केलं. त्या वेळी कॉम्प्युटर कमी वापरले जात होते. आणि असंही कोणतंही डिझाइन सुरुवातीला कागदावर पेन्सिलीने आणि पेनाने केलं जातं. मी शिवसृष्टीचं संकल्पनाचित्र रेखाटत गेलो. त्यात दोन वाडे आले, रायगडावरची भारद्वारी म्हणजेच मनोरे आले, राजसभा त्यात कुठे येऊ शकते, राजसभेजवळूनच बाजारपेठ येऊ शकते, भवानी माता मंदिर येऊ शकतं, ग्रामजीवन कशा प्रकारचं दाखवता येऊ शकतं, माची कशी येऊ शकते, विविध प्रकारच्या तटबंदी करताना त्यांच्या दरवाजांमध्ये वैविध्य कसं दाखवता येऊ शकतं, अश्वशाळा असेल, बारा बलुतेदारांचं दर्शन, सागरी देखावा असेल, सागरी देखाव्यात एखादं गलबत, सिंधुदुर्गासारखा एखादा पाणकोट किंवा भुईकोट असं कोलाज तयार केलं. मी मुंबईत होतो, पुण्यात बाबासाहेबांना मी ते पाहायला पाठवलं. मी घरी नसताना बाबासाहेबांचा दूरध्वनी आला. ते म्हणाले, “हे उत्कृष्ट झालंय. राहुलरावांना सांगा लगेच येऊन भेटायला.” ही सुरुवातीची चित्रं अजूनही माझ्याकडे आहेत. अभिमानाची बाब अशी की शिवसृष्टीची टीम वाढल्यानंतरही सुरुवातीचा साइट प्लॅनचा बाज ढळू दिला नव्हता. बाबासाहेबांच्या सहवासातून जी आशीर्वादरूपी ऊर्जा मिळाली, ती कायमच उपयोगी पडत राहिली. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा प्रकल्प आता एक टीमवर्क म्हणून पुढे नेला जात आहे. त्यात इतर विविध क्षेत्रांतील मंडळी सहभागी आहेत. अन्य काही वास्तुविशारद त्यातील तांत्रिक बाजू सांभाळतात. वास्तुविशारद, लॅण्डस्केप कन्सल्टंट, पर्यावरणतज्ज्ञ आदी सगळ्याचं मिळून एक टीमवर्क म्हणून हे काम पुढे जात आहे.


shivsrushati
 
 
राजसभा साकारताना
 
 
बाबासाहेब, गोनीदा यांनी पूर्वी जी भ्रमंती केली आणि नंतर आमच्यासारख्या तरुणांबरोबर जी भ्रमंती केली, त्यात अनेक किल्ल्यांचे भग्नावशेष पाहिले. ते सर्वच भग्नावशेष पुन्हा मूर्त स्वरूपात बांधणं शक्य नाही. त्याला कायद्याच्या काही चौकटी आहेत. शिवसृष्टीच्या मास्टर प्लॅनचा मुख्य गाभा आहे राजसभा. राजसभा हा आपला मानबिंदू होता. तिथूनच आपली स्वराज्याची मूहूर्तमेढ झाली. ही राजसभा आता भग्नावस्थेत आहे. पण ती जशी आहे तशी उभारून त्याचा अनुभव लोकांना देऊ शकतो का? सुरुवातीपासूनच हा विषय झाला की राजसभा जशी आहे तशी उभारायची. त्याच्या बरोबरीने इतिहासाचे जे थेट साक्षीदार असतील अशा गोष्टींचं किल्ल्यांवर जाऊन फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन करून आणि शक्य असेल तिथे त्यांची मापं घेऊन काम सुरू केलं. यातून इतिहासातील जे मूर्त वारसा आहेत - यात किल्ले असतील, वाडे असतील, घाट असतील, मंदिरं असतील, दीपमाळा असतील, कडीकोयंडे असतील, दरवाजे असतील, देवड्या असती, बुरूज असतील... या सर्वांचं फोटो डॉक्युमेंटेशन झालं. या सगळ्यांंची हाती काढलेली रेखाचित्रं मी तयार केली. त्याचाही एक दस्तऐवज तयार झाला. मापं घेऊन त्याची चित्रं तयार करण्यात आली. भग्नावशेषातील वास्तूंची चित्रं तयार केली. त्यानंतर इतिहासकारांची समिती स्थापन करण्यात आली. त्यात बलकवडे सर, डेक्कन कॉलेजचे सचिन जोशी, घाणेकर सर, राजदत्त आदींचा समावेश होता. राजसभा कशी असेल? तांत्रिकदृष्ट्या ती कशी असेल आणि कलात्मकदृष्ट्या कशी असेल याचा सुवर्णमध्य साधून राजसभा उभारायची, असं उद्दिष्ट होतं आणि ते साध्य झालं. तेव्हाच्या जेम्स डग्लसच्या नोंदी किंवा अन्य नोंदी यांचा संदर्भ घेऊन त्या शिवकालीन वास्तूंचा अभ्यास करण्यात आला. पूर्वी आपल्याकडे बंदिस्त जागेत राजदरबार भरत नसत. पटांगण असायचं, त्याला पुढे कनात किंवा तंबूवजा रचना असायची. या सगळ्या माहितीतून आपण शिवसृष्टीमधील राजसभेचं संकल्पचित्र तयार केलं, मॉडेल्स तयार केली. त्यात आवश्यक सुधारणा केल्या. इतिहासाला धरून काही कलात्मक स्वातंत्र्यही घेतलं. राजसभेचे भग्नावशेष पाहिलेल्या शिवप्रेमींसाठी, आता जी राजसभा तिथे साकारत आहे ती एक सुखद धक्का असेल. तसंच आताच्या तरुण पिढीपैकी ज्यांनी रायगड पाहिला नसेल, त्यांना रायगड पाहण्याची इच्छा होईल. तिसरं म्हणजे इथे येणार्‍या पर्यटकांनाही महाराष्ट्रातील किल्ले बघण्याची इच्छा होईल.

 
 
वास्तु विधान प्रोजेक्टस्
 
प्रिन्सिपल कॉन्सेप्ट आर्किटेक्ट, शिवसृष्टी