आदिवासी सेवा प्रकल्प संकल्पना ते संकल्पसिद्धी

10 Jan 2022 16:50:56
नाशिक परिसरातील आदिवासी भागात वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने श्रीगुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प समिती’ या प्रकल्पाने येथील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी एक एक पाऊल उचलले. संकल्पसिद्धीच्या या प्रवासाविषयी या प्रकल्पाचे डॉ. राजेंद्र खैरे यांच्याशी साधलेला संवाद दोन भागात देत आहोत.

RSS
कोणत्याही संकल्पनेला मूर्त रूप येण्यासाठी जिद्द, सामूहिक प्रयत्न व ध्येयनिश्चिती करण्यासाठी दुर्दम्य आशावाद यांची आवश्यकता असते. सन 2006मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या काही ध्येयवादी युवकांचा ‘संकल्प ग्रूप’ तयार झाला. त्यांनी आदिवासी क्षेत्र निवडून त्यात आपले योगदान देण्याचा संकल्प केला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून सगळे जण वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णसेवा करायला लागले. मात्र सर्वांच्या मनात दृढसंकल्प ठाम होता. त्या दृष्टीने पावले पडायला लागली व त्याला पाहता पाहता मूर्त रूप आले. कसे? ते उलगडले या समूहाचे नेतृत्व करणार्‍या डॉ. राजेंद्र खैरे यांच्याशी केलेल्या बातचितीमधून. ते नाशिकच्या श्रीगुरुजी रुग्णालयाचे अस्थिचिकित्सा विभागप्रमुख व सेवा संकल्प समिती प्रमुख आहेत.
 

RSS
 डॉ. राजेंद्र खैरे

“सन 2006मध्ये समविचारी मित्रांच्या चर्चेतून संकल्प ग्रूपची स्थापना झाली. आदिवासी क्षेत्रात काम करायचे, हेदेखील तेव्हाच निश्चित करण्यात आले” असे सुरुवातीला सांगून डॉ. खैरे पुढे म्हणाले, “आम्ही काही ध्येयधोरणे, निकष ठरवले. त्यातील महत्त्वाचा निकष म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत असू, त्याजवळ असणार्‍या आदिवासी भागातील पाड्यांवर सेवा प्रकल्प राबवला जावा. त्यात सातत्य असावे. सन 2008मध्ये नाशिकला कॅनडा कॉर्नर भागात छोट्या स्वरूपात श्रीगुरुजी रुग्णालयाला प्रारंभ झाला. मी तेथे सुरुवातीपासूनच रुजू झालो. गंगापूर रोडवर भोसला मिलिटरी स्कूलची 150 एकर जागा आहे. त्यातील मुख्य रस्त्यानजीक असलेली मोक्याची जागा मिळाली. लवकरच तेथे भव्य इमारत बांधून श्रीगुरुजी रुग्णालय प्रशस्त जागेत दिमाखाने उभे राहिले. स्थिरस्थावर झाल्यावर 2013पासून आदिवासी सेवा समितीच्या कामाला गती आली. 2008 ते 2013 या पाच वर्षांत त्र्यंबकेश्वर व पेठ या आदिवासीबहुल तालुक्यांची निवड करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तेथे सुमारे 400 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य हाच विषय प्रामुख्याने हाताळताना आदिवासींच्या अनेक समस्या, प्रश्न समोर येत गेले. अनेक ठिकााणी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी टाक्या बसवून दिल्याने महिलांचे श्रम कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे संंकल्पनेलाही बळ आले” असे डॉ. खैरे यांंनी सांगितले.
 
 
RSS
 
“सात वर्षांपूर्वी 2015मध्ये पेठ तालुक्यातील पहूची बारी या आदिवासी पाड्यावर मोठ्या प्रमाणावर गॅस्ट्रोची लागण झाली. जेमतेम 50 घरे असणार्‍या या वस्तीत 200पेक्षा जास्त रुग्णांना गॅस्ट्रो झाल्याने खळबळ उडाली. रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरून गेले. अशा वेळी आपली सेवा प्रकल्पाची टीम तेथे तातडीने धावून गेली” असे सांगून डॉ. खैरे पुढे म्हणाले, “ताबडतोब उपचार सुरू करून दिलासा देण्यात यश मिळाले. परिणामी आदिवासी बांधवांचा विश्वास मिळवता आला. या वेळी सेवाधारी वैद्यकीय तज्ज्ञांनी व कार्यकर्त्यांनी शोध घेतला असता गॅस्ट्रोच्या फैलावाचे कारण लक्षात आले. पाड्यावर असलेल्या एकमेव हँडपंपजवळून सांडपाणी वाहत होते. ते मिसळल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ बळावली व फैलावली. मग त्यावर उपाययोजना म्हणून ग्रामस्वच्छतेचे ठोस काम गावकर्‍यांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले व तडीस नेले. गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. दरम्यान मी व सहकार्‍यांनी मिळून एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केले. अमेरिकेतील लँडमार्क फोरमतर्फे विविध अभ्यासक्रम व कम्युनिटी प्रोजेक्ट डिझाइन करण्यात आले होते. त्यांचा अभ्यास करून ते जाणून घेतले. सेवा प्रकल्पात त्यांचा समावेश केला.
 
 
RSS

1 ऑक्टोबर 2016पासून आदिवासी सेवा प्रकल्पातर्फे अधिक जोमदारपणे कार्य सुरू झाले. नवीन लोक सामील झाले. या वेळी त्र्यंबकेश्वर व पेठ या निर्धारित तालुक्यांतील दुर्गम भागात आम्ही पोहोचलो. तेथील 800 कुटुंबांचे विविध स्तरांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या समस्या, खर्‍या गरजा समोर आल्या. आमच्या कामाला योग्य दिशा मिळाली” असे डॉ. खैरे यांनी नमूद केले. “आमच्याबरोबरचे डॉ. मोरेश्वर राठोड यांना वैद्यकीय ज्ञानाबरोबरच शेती, पाणी यांचे सखोल ज्ञान व दीर्घ अनुभव आहे. त्यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडीपाडा येथे स्थानिक कार्यकर्ते व श्रीगुरुजी रुग्णालयाचा चमू यांची एकत्र मोट बांधली. पालघर व गुजरातच्या सीमारेषेवर बेखळ ग्रामपंचायतीत मूलभूत सुविधांची वानवा होती. तेथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामस्थांशी मैत्रीचे नाते जोडण्यात आले. अबोल आदिवासींना बोलते करून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यातून भीषण वास्तव समोर आले. तुटपुंजी शेती, शिक्षणाचा अभाव, उत्पन्नाची मर्यादित साधने.. त्यामुळे दारिद्य्ररेषेखालील अनेकांचे वार्षिक उत्पन्न केवळ 5 ते 7 हजार असल्याचे आढळून आले. अत्यल्प शेतीमुळे शेकडो तरुणांना नाइलाजाने मजुरीसाठी स्थलांतर करावे लागते. हे सारे रोखण्यासाठी सेवा प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी 6 महत्त्वाच्या आयामांवर लक्ष केंद्रित केले. कोरोनाच्या काळात अनेक पाड्यांवर धान्याचे, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.” या सार्‍या उपक्रमांनी संकल्पनेला मूर्त रूप येण्यासाठी बळ मिळाले, याकडेही डॉ. खैरे यांनी लक्ष वेधले.
 
 
(उत्तरार्ध पुढील अंकात)
 
संकल्पातून सिद्धीकडे जोमाने वाटचाल!
आरोग्यरक्षण, संवर्धन या प्रमुख उद्दिष्टांबरोबरच शिक्षण, शेती, पाणी, महिला सबलीकरण व कौशल्य विकास यांचाही विचार सुरू झाला. कारण हे सर्व विषय एकमेकांशी निगडित आहेत. संकल्पनेला मूर्त रूप आल्यावर आता सिद्धीकडे सेवा प्रकल्पाची वेगाने वाटचाल सुरू आहे. सेवा प्रकल्पाचे कार्यकर्ते तन-मन अर्पून निष्ठेने ही सर्व कामे करतात. पण कोणत्याही कामाला अर्थशक्ती लागतेच. गेल्या 5 वर्षांत सुमारे 5 कोटींची कामे उभी राहिली आहेत. चांगल्या कार्याला पैसा कधीच कमी पडत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण कोविड काळात मदतीचा ओघ काही प्रमाणात आटला आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी, संघटनांनी शैलेंद्र डोळस यांच्याशी 9373475993 आणि 9850089848 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0