रेषेने संवाद साधणारा चित्रकार - बाळ ठाकूर

विवेक मराठी    10-Jan-2022
Total Views |
@ प्रा. मं.गो. राजाध्यक्ष

आठ जानेवारी. सकाळीच बातमी आली. चित्रकार बाळ ठाकूर यांचे निधन. अन मन ते ऐकून सुन्न झाले. वास्तविक हे थोडे अपेक्षितच होते. गेले काही दिवस ते आजारी होते. एक प्रवाही रेषेचा चित्रकार गेला. पण त्या रेषेच्या आधारे त्यांनी निर्माण केलेली अफाट चित्रसंपदा कायम त्यांची उणीव भरून काढण्याच्या प्रयत्न करीत राहील.

chitr

माझ्या शालेय जीवनापासून अनेक पुस्तके, मासिके, दिवाळी अंक माझ्या पाहाण्यात आले. त्यातील कथांना असलेली विविध चित्रकारांची चित्रे पाहण्यात आली. त्यांच्या वेगवेगळ्या शैली मी ओळखू लागलो. त्यामध्ये बरेचसे पारंपरिक रूढीनुसार चित्रे काढणारे होते, तसेच काही विशेष लक्षात राहणारे, आधुनिकतेने काम करणारे होते. काळाच्या पुढे जाऊन त्यांची कामे आविष्कृत होत असत. त्यापैकी काही म्हणजे चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, द.ग. गोडसे, स्वतःच्या कथांना चित्रे काढणारे व्यंकटेश माडगूळकर, शिवाय ग.ना. जाधव, शि.द. फडणीस, व्ही.एस. गुर्जर असे काही कलावंत. त्यातही आपल्या रेषेने कथाचित्रांना प्रभावित करणारे एक नाव होते, ते म्हणजे बाळ ठाकूर. आपल्या जोरकस व प्रवाही अशा रेषेने कथाविषयाचे आकलन करून देणारे एक बोधचित्रकार.
भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण समस्त जाहिरात व साहित्य क्षेत्रात ते बाळ ठाकूर या नावानेच परिचित होते. ठाकूर यांचा जन्म २४ एप्रिल १९३० रोजी कोकणातील लांजा जिल्ह्यातील भांबेड या गावी झाला. त्या वेळी शाळेत जाताना आतासारखी वह्या-पेनची सोय नव्हती. असे ती लाकडी चौकटीतील दगडी पाटी. खाली पडली की तिचे फुटून तुकडे होत असत. मग त्यातील मोठा तुकडा दप्तरात घालून शाळेत जायचे व त्याच तुकड्यावर निरनिराळे चेहरे काढायचे. कागदाची तर तेव्हा ओळखच नसे. आणि या छंदातूनच चित्रकलेची आवड वाढीला लागत गेली. कधीतरी कोल्हापूरला गेल्यावर तेथील शिवाजी पुतळ्याजवळील डॉ. काटे यांच्या दवाखान्यात लावलेली निसर्गदृश्ये पाहण्यात येत असत. ती पाहताना चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. शालेय शिक्षण आटोपल्यावर मनात विचार होता तो पुढे चित्रकलाच शिकायची. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचे शिक्षण वगैरे मिळते याचीही त्यांना फारशी कल्पना नव्हती. पुढे चौकशी करून फॉर्म मागवला व तो आल्यावर भरून पाठवला. तोही त्या काळातील कमर्शियल आर्ट विभागात. तेथे प्रवेश मिळाला आणि बाळ ठाकूरांची स्वारी कोल्हापूरमार्गे रेल्वेने मुंबईला प्रस्थान करती झाली. त्या काळात रेल्वेचा प्रवासही आतासारखा सुसह्य नव्हता. कोल्हापूरला मुंबईचे दोन डबे असायचे. मिरजेला ते हुबळी अथवा बंगळूर येथून पुण्यासाठी जाणाऱ्या गाडीला पाठी हे डबे जोडत व ही गाडी पुण्यापर्यंत जात असे, कारण बंगळूर-पुणे हा रेल्वे मार्ग मीटर गेजचा होता. त्यामुळे गाड्याही लहान असत. पुढे मुंबईच्या ब्रॉड गेजच्या प्रशस्त गाडीत बसून मुंबईचा प्रवास होत असे. अशा प्रकारे एका गृहस्थांच्या सोबतीने बाळ ठाकूर मुंबईत आले ते फणसवाडीतील त्यांचे एक घरगुती स्नेही वा.रा. ढवळे यांच्याकडे. ढवळे हे प्रकाशनातील एक मोठे नाव! तेथेच नियतीने बाळ ठाकूर व प्रकाशन यांची एक स्नेहगाठ बांधली. आणि तो काळही होता दर्जेदार मराठी मासिकांचा, पुस्तकांचा आणि तशाच दर्जेदार लेखकांचा आणि चित्रकारांचा.
 
ढवळे यांचा व ठाकूर यांच्या काकांचा राजापूरपासूनचा जुना परिचय होता. शिवाय बाळ यांचे वडीलही मुंबईला आल्यावर तेथेच उतरत असत. त्यामुळे बॅग घेऊन बाळ ठाकूरदेखील तेथेच आले आणि बाळ ठाकूर यांचा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा नवीन प्रवास सुरू झाला.
 

chitr
जे.जे.मध्ये शिकत असताना बाळ ठाकूर हे चित्रकार द.ग. गोडसे यांच्या चित्रशैलीमुळे खूप प्रभावित झाले होते. मुंबईत आल्यावर ठाकूर यांनी जे.जे.च्या अभ्यासाबरोबरच मासिकांची, पुस्तकांची कामे घेणे, प्रकाशकांना भेटणे हे प्रकारे सुरूच ठेवले होते. 'साहित्य' या नावाचे मुंबई मराठी साहित्य संघाचे नियतकालिक निघत असे. त्यातील चित्रे द.ग. गोडसे यांनी काढली होती. त्यांच्यासारखी चित्रे आपल्याला काढता यावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्यासारखी रेषा आपल्या हातातून उमटावी अशा धारणेने बाळ ठाकूर यांची तपश्चर्या सुरू होती. तसेच जे.जे. उपयोजित कला विभागात त्या वेळी त्यांना मधुकर जोमराज नावाचे प्राध्यापक शिकवायला होते. त्यांचे ड्रॉइंग खूप चांगले होते. वेगवेगळ्या शैलीत ते चित्रे काढीत असत. विशेष म्हणजे ब्रशच्या साहाय्याने ते रेषा काढीत, त्याचे आकर्षण बाळ ठाकूरांना होते. आणि बाळ ठाकूरांची रेषाही त्याच मागोव्याने पुढे जाऊ लागली. ठाकूरांनी रेषेचा रियाझ चालूच ठेवला. वर्तमानपत्रावर त्यानी रेषांनी सराव सुरू केला आणि ठाकूर यांनी आपल्या रेषेवर प्रभुत्व मिळवले. प्रवाही आणि भावस्पर्शी रंग-रेषेवर त्यांनी आपला ठसा उमटवला.
१९४८ साली बाळ ठाकूर यांनी जे.जे. स्कूल ऑफ ॲप्लाइड आर्टमधून पदविका घेतली. सुरुवातीला त्यांनी जे. वॅाल्टर थॉम्प्सन, 'ऐय्यर्स' अशा जाहिरात संस्थांमधून इलस्ट्रेटर म्हणून काम केले. मात्र पुढे ते ‘उल्का’ या जाहिरात संस्थेत बरेच रमले. विषयाचा आशय जाणून तो आपल्या रेषेतून आविष्कृत करण्याची ठाकूर यांची किमया केवळ अवर्णनीय होती. मग ते जाहिरातीमधील एखाद्या उत्पादनाविषयीचे काम असो किंवा एखाद्या कथा-कादंबरीतील लेखकाच्या कल्पनाविहारावर असो, त्यांची रेषा तितक्याच प्रभावीपणे कार्यरत होत असते. रेषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांची चित्रे एक उत्तम प्रकारे संवाद साधीत असतात. 'उल्का' या जाहिरात संस्थेत ते काम करत असताना त्यांना अनेक उत्पादनांवर काम करावे लागे. त्या वेळी 'उल्का' ही जाहिरात संस्था बोधचित्रांना प्राधान्य देत असे. झोडियॅक, नेरोलॅक पेंट्स, हिज मास्टर्स व्हॉइस अशा त्यांच्या ग्राहकांच्या जाहिराती बहुधा चित्रांनी सजलेल्या असत. बाळ ठाकूरांची चित्रे मी माझ्या विद्यार्थिदशेतच पाहत आलो आहे आणि ती स्मरणात राहिली ती त्यांच्या वेगळेपणाने. एका विशिष्ट अशा दर्जाने. नेहमीची पारंपरिक चाकोरी सोडून केल्यामुळे आणि त्यातील त्यांच्या हातातील ती प्रवाही, लयबद्ध रेषा. एखादा अवखळ झरा खळाळत, वळणे, आडवळणे घेत घेत वाहत जातो, त्याप्रमाणे त्यांची रेषा कागदावरून धावत असते आणि कोठेही न थांबता तुमची नजर संपूर्ण चित्रावरून फिरवते. त्यातून व्यक्तीचे भावदर्शन होते, विषयाचे आकलन होते, मग त्या त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा असोत वा मासिकांसाठी, पुस्तकांसाठी काढलेली कथाचित्रे. तीही आवश्यक तेवढ्या रेषांतून व्यक्त झालेली. आणि ही रेषाही ब्रशची आहे. गरजेनुसार तिला बारीक अथवा जाड करता येणारी आणि उठावदार होणारी. यासाठी ठाकूरांनी अभ्यास करून ब्रशवर हुकूमत मिळवली. त्यांनी टाकाने अथवा क्रोकविलनेदेखील कामे केली आहेत. पण त्यात त्यांना ब्रशचा आनंद मिळत नसे.


chitr

chitr

उल्कामध्ये असताना हिज मास्टर्स व्हॉइस या कंपनीची एक जाहिरात मोहीम करण्याचे काम ठाकूरांच्या हाती आले. अर्ध्या पानभराची एकेक अशी ती पाच जाहिरातींची मोहीम होती. त्यामध्ये सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर, सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान, तबलावादक उस्ताद अल्लारखां असे म्युझिक माएस्त्रो यांचा वापर करण्यात आला होता. बाळ ठाकूर यांनी आपल्या अद्भुत चित्ररेषेने त्या जाहिरात मोहिमेचा सुवर्णमध्य साधला होता. वादकांच्या हातांचा वापर करून ते एकमेकांवर वापरून त्यांच्या हालचालींमधून पं. रविशंकर यांच्या सतारीचे झंकार ऐकू येत, उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनईचे मंजुळ सूर ऐकू येत व उस्ताद अल्लारखां यांच्या तबल्याचे बोल ऐकू येत. या जाहिरात मोहिमेचा बराच बोलबाला झाला.
 
जाहिरातीची त्यांची कामे सुरूच होती, याच्या जोडीला त्यांची प्रकाशन क्षेत्रातील कामेही सुरूच असत. किंबहुना तेच त्यांचे प्रिय असे आवडते क्षेत्र होते. पण पुढे जाहिरात क्षेत्रात ते फारसे रमले नाहीत. त्यांच्या मते कथा-कादंबऱ्यांची चित्रे काढताना तो आपला विषय असतो. तिथे कोणी हुकूमत करत नाही. आपण आपल्या सवडीनुसार आपल्याला भावते ते व्यक्तिमत्त्व घेतो आणि ते व्यक्त होताना मनात अनेक गोष्टी घडत असतात. एखादी गोष्ट कमी करणे किंवा वाढवणे हे आपल्या हाती असते. त्यामुळे या क्षेत्रात मनासारखे काम करता येते. प्रकाशकाची दृष्टीही विकसित झालेली असते. जाहिरात क्षेत्रात तसे नसते. तेथे बऱ्याच गोष्टींवर तुम्ही अवलंबून असता. त्या वेळी केशव भिकाजी ढवळे यांच्याकडे ना.वि. काकतकर होते. त्यांच्यासाठी ठाकूरांनी बरेच काम केले. काही कारणामुळे तेथून काही लोक निघाले. त्यात काकतकरही होते. त्यांनी पुढे स्वतःचे प्रकाशन सुरू केले व 'रहस्यरंजन' चालवायला घेतले होते. त्यामध्ये काही काळ सदानंद रेगे हेदेखील संपादक वर्गामध्ये होते. पण नंतर ते फेलोशिप मिळवून परदेशात गेल्यामुळे अशोक शहाणे हे मुख्य संपादक म्हणून रुजू झाले. त्या वेळी चिं.त्र्यं. खानोलकर, जितेंद्र अभिषेकी असे नामवंत त्यात लिहीत असत. या 'रहस्यरंजन'साठी ठाकूरांनी खूप काम केले. उल्कामधून मधल्या सुटीत ते रहस्यरंजनमध्ये जात आणि लेख घेऊन येत असत. या रहस्यरंजनने त्यांना बरीच मोकळीक दिली होती. अशोक शहाणे यांच्यासारखे नवविचाराचे साहित्यिक कवी यांच्या संपादनाखाली बाळ ठाकूर यांनी आपल्या चित्रांनादेखील त्याच सर्जनशीलतेने सादर केले. असेच एकदा ते श्री.पु. भागवत यांच्याकडे गेलें असता भागवत म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी काम करणार का? असे विचारणारे पत्रच लिहायला घेतले होते. आता त्याच्या दोन ओळी लिहून झाल्या होत्या. यावरून बाळ ठाकूरांच्या चित्रांच्या दर्जाची जाणीव होते. श्री.पु. हे साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील एक अधिकाराचे नाव. माणसाच्या अंगातील गुण हेरून, त्यांच्यातील सर्जनशीलता स्वतः समजून घेणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. पुस्तकाच्या कागदाच्या निवडीपासून त्याचा टाइप, पृष्ठरचना, दर्जेदार लेखक, तितकेच दर्जेदार कलाकार अशा सर्वच बाबतीत त्यांची सौंदर्यदृष्टी दिसून येत असे आणि त्यांच्याकडून प्रशंसा हा ठाकूरांच्या गुणग्राहकतेचा एक मोठा सन्मान होता.
 
पुढे बाळ ठाकूर यांनी उल्का सोडली आणि संपूर्णपणे ते प्रकाशन क्षेत्राशी निगडित राहिले. रहस्यरंजन, मौज, सत्यकथा, विवेक, सामना अशा प्रकाशनांसाठी त्यांनी अपार काम केले. आजही करताहेत. मात्र त्यांचा एक नियम होता, तो म्हणजे संपूर्ण कथा वाचून, त्यातील लेखकाचा आशय समजून घेऊनच ते आपल्या चित्रांची मांडणी करतात. कोणी एखादा परिच्छेद देऊन करण्यास सांगितले तर त्यांचा नकार असतो. कथेतील कोणता भाग आपल्याला भावेल हे सांगता येत नाही, संपूर्ण लेख अथवा पुस्तक वाचल्यावरच डोक्यात येते, हे ते प्रतिपादन करतात. त्यांच्या चित्रांना दाद देणारे लेखक म्हणजे शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर असे. पूर्वी माडगूळकर स्वतःच्या कथांना अथवा कथासंग्रहांना स्वतः चित्रे काढीत असत. ते उत्तम चित्रकार होते. जेव्हा 'बनगरवाडी'ची आताची जी आवृत्ती आहे, ती काढताना व्यंकटेश माडगूळकरांनी नवीन चित्रे काढावीत असा एक विचार होता. पण माडगूळकरांनी सांगितले की त्यांना आता पूर्वीसारखी चित्रे काढता येत नाहीत. शिवाय ज्या गावाचे चित्रण केले, ते गावच आता राहिले नाही. ती माणसे, ती मेंढरे.. काहीच आता उरले नाही. त्यानंतर श्री.पु. भागवतांनी हे काम बाळ ठाकूर यांना पूर्ण करण्यास सांगितले. मग रवी मुकुल यांनी फोटो काढले व बाळ ठाकूर यांनी चित्रे काढली.


chitr
 
बाळ ठाकूर यांनी विविध विचारसरणीच्या प्रकाशनांसाठी काम केले. मात्र ती करताना त्यांना कोणाचाही तसा त्रास झाला नाही. सर्वांचेच स्वातंत्र्य होते. त्यांच्या दृष्टीने काम करताना कथा समोर असते, लेखक नसतो. त्यामुळे मनासारखे काम करता येते. ही कामे करताना ठाकूरांनी विविध प्रयोग केले. वेगवेगळ्या शैलीत काम केले. त्यामुळे प्रकाशकही त्यांच्या या वेगळ्या शैलीची वाट पाहत असत. पुढे जेव्हा तंत्रज्ञान विकसित झाले, नवीन मशीनरी आली, तेव्हा छपाईत जास्त सफाईपणा आला. पूर्वी रंग जमवणे हे प्रिंटरचे काम होते, ते सुलभ झाले. ठाकूरांनी मुखपृष्ठासाठी अनेक चित्रे काढली. कथांसाठीही त्यांनी भरपूर चित्रे काढली. पण त्या दोघांमधला फरक ते समजावून देतात. मुखपृष्ठ हे पोस्टरसारखे असते, अंगुलिनिर्देश करण्यासारखे असते आणि केवळ त्यातूनच सर्व भाव साकारावे लागतात. पण आतील कथाचित्रे अथवा इलस्ट्रेशन ही त्या कथेतील सर्व पात्रांशी, त्यातील प्रसंगाशी निगडित असतात. लेखकाच्या मनातील व्यक्तिरेखेशी त्या तादात्म्य असाव्या लागतात.

chitr 
बाळ ठाकूर यांनी आपली अनेक साहित्यप्रकारांतील कथाचित्रे अथवा मुखपृष्ठे भिन्न प्रकृतीच्या लेखकांसाठी केली आहेत. 'सत्यकथा', 'ललित', ‘मौज’ अशा दर्जेदार आणि विशिष्ट वाचकवर्गासाठी असलेल्या नियतकालिकांना त्यांनी कित्येक वर्षे चित्रे काढली आहेत. अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी आपल्या रेषेतून जिवंत अशी साकारली आहेत. ही रेषा कधी बारीक, तर हवी तेथे दाब देऊन जाडसर केलेली असते. त्यातून ते आविष्कृत केलेल्या व्यक्तीचे संपूर्ण अंतरंग दाखवीत असतात. विशेषतः पूर्वीच्या काळातील मर्यादित सुविधा असलेल्या छपाई पद्धतीला त्यांची ही टाकाने अथवा ब्रशच्या रेषेने केलेली चित्रे योग्य न्याय देत असत. अशा व्यक्तिचित्रणात बालकवी, बा.सी. मर्ढेकर, लक्ष्मीबाई टिळक, अशोक शहाणे अशा लोकांना त्यांनी साकारले आहे. महेश एलकुंचवार, ह.मो. मराठे यांच्यासाठी केलेल्या इलस्ट्रेशनमध्ये ठाकूरांनी आपल्या कल्पनांचा मुक्त वापर केला आहे. कधी आशयपूर्ण, कधी प्रतीकात्मक अशा तऱ्हेने त्यांची कथाचित्रे, मुखपृष्ठे ते साकारीत असत. साप्ताहिक विवेकसाठी व सामना या वृत्तपत्रासाठी व त्यांच्या दिवाळी अंकांसाठीही त्यांनी भरपूर काम केले आहे.


chitr

बाळ ठाकूर यांना थोर चित्रकार रवी परांजपे यांनी त्यांच्या ट्रस्टतर्फे 'कृ.रा. परांजपे गुणिजन पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान केला. ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान डोंबिवली येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये बाळ ठाकूर यांचा व डॉ. जयंत नारळीकर यांचा सत्कार करण्यात आला. एक विज्ञानकथा लेखक व दुसरा त्या कथांवर आपल्या कुंचल्याद्वारे सुवर्णालंकार चढवणारा कलाकार यांचा सत्कार हा एक दुग्धशर्करायोगच म्हणावा! मध्यंतरी आपल्या बहारदार, प्रवाही आणि रसिक वाचकांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या रेषेचा अधिपती चित्रकार बाळ ठाकूर यांचा 'संवाद' या संस्थेतर्फे त्यांच्या 'आप्तवाक्य' या उपक्रमाअंतर्गत मुक्त कथनाचा कार्यक्रम मुंबईच्या पु.ल. देशपांडे अकादमीत आयोजित करण्यात आला होता. उत्तम ग्रंथरचनेत लेखकाचा सिंहाचा वाटा असतो. पण त्याचबरोबर त्या ग्रंथाला त्यातील आशयानुसार उचित रूप देणारे त्याचे मुखपृष्ठ व आतील सजावटही तितकीच महत्त्वपूर्ण असते. येथे चित्रकार महत्त्वपूर्ण ठरतो आणि याच विषयावर ठाकूर यांनी आपले अंतरंग उलगडले. आज बाळ ठाकूर यांचे चरित्र म्हणजे एका समृद्ध आणि यशस्वी चित्रकाराची यशोगाथा मानली जाते, ज्याने आपल्या रंगरेषांनी अनेक प्रकाशने, नियतकालिके, कथासंग्रह उजळले. प्रकाशमान केले.
आज बाळ ठाकूर आपणात राहिले नाहीत. पण त्यांनी अनेक प्रकाशनांसाठी केलेली बोधचित्रे व व्यक्तिचित्रे, तसेच वयाच्या ९१व्या वर्षापर्यंत सदैव सुरू असलेला त्यांचा चित्रप्रवास आपणाला ते आपल्यातच असल्याची जाणीव सतत करून देत राहील!
 
 
(लेखासाठी संदर्भ : प्रा. दीपक घारे व श्रीराम खाडिलकर यांनी 'आप्तवाक्य'साठी घेतलेली मुलाखत.)
 
छायाचित्रे सौजन्य : कुमार गोखले व रवी मुकुल.