प्रसववेळांच्या गोष्टी!

विवेक मराठी    12-Jan-2022
Total Views |
@विक्रम भागवत7045192548
  
मिलिंद म्हणतो, “काही वेळा ह्या प्रसवाच्या असतात. अनेक प्रवाह वाहत असतात आपल्यामधून. धमन्या तट्ट फुगून असतात. हे आणि हेच खरे असते.” मी त्याच्या वाक्यातल्या ‘काही वेळा’ पुढे काही वेळाच असा ‘च’ जोडू इच्छितो!...
छायाचित्रकार मिलिंद ढेरे यांची छायाचित्रे आणि ती छायाचित्रे उलगडून दाखवणारे त्यांचे ललितलेखन यांनी साकारलेल्या ‘दृष्यभान’ या कॉफीटेबल स्वरूपातील पुस्तकाचा ज्येष्ठ साहित्यिक विक्रम भागवत यांनी त्यांच्या खास शैलीत घेतलेला वेध.

book
 
एक वाक्य आले वाचनात - Photography is the story I fail to put into words. मिलिंदचे ‘दृष्यभान’ जेव्हा वाचतो, तेव्हा लक्षात येते - नाही रे राजा, शब्द आणि दृश्य हे एकत्र नांदू शकतातच. मी ‘दृष्यभान’ उघडले आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी मिलिंदच्या शब्द-निसर्गात हरवून गेलो. तो अंतर्मनी पारदर्शक आहे आणि पहिल्या वाक्यापासून हे पारदर्शकत्व ओथंबून वाहू लागते. त्याचे शब्दातले कविमन हे दृश्याशी लगटून लडिवाळपणे आपल्याला सामोरे येते.
 
सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर चौकार मारून गोलंदाजाला गोंधळवून टाकायचा, तशी सुरुवातीची वाक्ये सुसाट वेगाने आपल्या मनावर आरूढ होतात - अर्थात, माणूस म्हणून मी वाचनातून घडू लागलो आणि फोटोग्राफीमागच्या दृष्टीतही ते हळूहळू उमटत गेले, कलावंतांच्या मनातला माणूस महत्त्वाचा वाटायला लागला, सरत्या उन्हातला चंद्र मिळाला, संवेदना योग्य वेळी जाग्या होणं किती महत्त्वाचं असतं, त्या पहाटवेळा माझ्या झाल्या, त्या वेळा तुमच्या करण्यासाठी, आपल्याला त्या देणार्‍यांशी संवादी व्हावं लागतं, कोरड्या गवतावर त्याचा पडलेला संथ, हलकासा स्पर्श, मातीतून त्याचा येणारा वास, श्वास गंधाळून आत जाणं त्याचं, उजेडाची रांगोळी, पहाटेचे ढगांचे आकार-विकार इतके वाचले की ह्या शब्दांची नशा चढते, तिच्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही.

 
The metaphors are photographer's metaphor and so have a poetic touch to them.
 
आपला वर्तमान हा आपल्या भूतकाळाचा दृश्य परिणाम असतो असे म्हणतात. म्हणजेच आपल्या आठवणी आपल्या आजवर कळत-नकळत संस्कार करीत असतात. ह्या जाणिवेतून जेव्हा आपण मिलिंदच्या एका वाक्याकडे पाहतो, प्रत्येकाच्या सावलीचा स्वत:चा एक असा विशेष आहे, कधी मध्यम ताल, तर कधी द्रुत ताल, ते तसेच असणार आहेत. कधीतरी परत या सावल्यांकडे पाहताना लक्षात आले आणि ध्यानात येते, आज तो त्या आठवणींकडे एक आपुलकीचे अंतर ठेवून पाहू शकतो आहे. त्या आठवणींमधील जे घ्यायचे आहे ते घेऊन बाकीचे सोडून देण्याची नीरक्षीर वृत्ती त्याच्यामध्ये आली आहे. छायाचित्रकार आपण टिपत असलेल्या दृश्यापासून काही अंतर का ठेवतात, ह्याचे मर्म ह्यात आहे.
 


book
 
मी नेहमीच असे म्हणतो की निर्मिती ही एक भावावस्था असते. कोणी मला सांगितले की ह्या ह्या विषयावर लिही, तर मी कोरड्या मनाने त्या व्यक्तीकडे पाहतो. हे असे बरहुकूम कसे लिहितात ते ईश्वर जाणे. मिलिंद म्हणतो, “काही वेळा ह्या प्रसवाच्या असतात. अनेक प्रवाह वाहत असतात आपल्यामधून, धमन्या तट्ट फुगून असतात. हे आणि हेच खरे असते.” मी त्याच्या वाक्यातल्या ‘काही वेळा’ पुढे काही वेळाच असा ‘च’ जोडू इच्छितो! ह्या प्रसववेळा ओळखून त्यांना प्रतिसाद देणे, त्यासाठी एकांत जपणे हे प्रत्येक कलाकाराला अनिवार्य असते. त्यात एक अंतर्गत संघर्ष असतो, कलाकार आणि माणूस, माणूस म्हणून त्याच्यावर अनेक जबाबदार्‍या असतात, त्याच्याकडून काही व्यावहारिक अपेक्षा असतात. मला एकदा माझे वरिष्ठ श्री. दास म्हणाले होते, ""Bhagwat you cannot marry two women and expect to keep both of them happy''.. तसे काहीसे कलाकाराच्या दोन विश्वांमधील संघर्षाचे असते. त्याची ओढाताण फक्त तोच समजू शकतो. इतरांना ती समजणे किंवा त्यांच्याकडून त्याची अपेक्षा ठेवणे हे व्यर्थ असते. म्हणून या ‘च’चे माहात्म्य.
 
ह्या छायाचित्रांबरोबर मिलिंदने प्रत्येक छायाचित्र टिपताना त्याच्या मनात जे विचारतरंग उमटले होते त्यांचे शब्दांकन केले आहे. त्याचे कविमन म्हणणे चूक ठरेल, कारण त्यात कल्पना नाहीये, तर विचारांचे वास्तव आहे. जरा ह्याचा विचार करू या.

book 
 
त्याचे हे लेखन आणि त्याची छायाचित्रे ही त्या प्रसववेळांमधील आहेत हे लक्षात घेतलेत, तर त्यांचे मोल भौतिक नसून अलौकिक आहे हेसुद्धा लक्षात येईल. पुस्तक वाचताना आणखी एक लक्षात आले, मिलिंदला गूढतेचे वेड आहे. एक अज्ञाताचा प्रदेश असतो, त्याचे आकर्षण असते. मनात भीती असते, काय असेल बरे त्या प्रांतात? ती भीती किंवा ते ज्ञात नसण्याने निर्माण होणारे आकर्षण कलाकाराला छळत असते. तसा तो अंगावरून गेलेल्या साधूबाबाच्या मागे जातो आणि एक अजोड छायाचित्र टिपतो. कृष्णधवल. आणि ते कृष्णधवलच असावे असे वाटत राहते. ते रंगीत असूच शकत नाही. हीच ती प्रसववेळा. इथे जमिनीवर पाय रोवून, आयुष्याचे मोल पैशात करणार्‍या माणसांचे काहीच काम नाही.

मग ते मोरोक्कोच्या वाळवंटात भल्या पहाटे दिसलेले टिटव्यांच्या पावलांचे ठसे असोत, वाळूच्या टेपावर बसलेला कबुतरांचा थवा असो, एका गावाचे पुनरुज्जीवन (restoration) होत असतानाची वेळ असो, पिवळ्याशार दगडांच्या थरामध्ये असलेले एक भगदाड आणि त्यातून दिसणारे घर असो आणि तेसुद्धा निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवरचे आणि दगडांच्या थरापाशी सुखेनैव वसलेले एक हिरवेगार झाड, एकुलते एक. विचार करा, ही फ्रेम अशीच टिपायचे त्याच्या मनात कसे आले असेल? ते हिरवेगार झाड आणि भगदाडातून दिसणारे ते घर ह्यांचे काय नाते असेल? मिलिंद ह्याची उत्तरे आपल्याला शोधायला सांगतो. प्रत्येकाची ती स्वतंत्र असणार. कारण तो फोटो म्हणजे एक कविता असते. कवितेशी आपले फारसे कधी जमले नाही असे सुरुवातीला म्हणणारा मिलिंद फोटोतून कथा आणि कविता या दोन्ही प्रांतांत मुशाफिरी करीत असतो. अगदी अलीकडचे एक उदाहरण देतो -

 
पिवळसर सोनेरी उन्हात न्हालेली पाने.. छायचित्र उत्तमच! पण त्याबरोबर त्याचे ललित लेखन वाचू या -
 
 
काहीही मिळतं...नं.....
 
रसरशीत..

ताजं..

रंगभरं....

नवं जन्माच्या कथाच या.......

परत एकदा मन स्वच्छ होतं.....

उसळी घेत नव्या उमेदीनं फुलतं.....
 
हे ललित लेखन मला स्तंभित करते. पण लक्षात येते त्याचे घर, विदिशा, ललितच आहे. सतत साहित्यरसात आणि संशोधनात गढलेले. आण्णा, वर्षाताई आणि अरुणाताई सर्वच एका ललित धाग्याने ऋणानुबंधात बांधले गेले आहेत. तो स्रोत आदरणीय रा.चिं. ढेरे ह्यांच्यापासून सुरू होत असला, तरी प्रत्येकाने आपली स्वतंत्र वाट तयार केली, तिच्यावर आपले नाव कोरले आणि तेच नेमके मिलिंदने केले आहे. प्रत्येक छायाचित्रावरचे त्याचे ललित लेखन वाचणे हा एक स्वतंत्र अनुभव आहे. एक नक्की - ह्याचे श्रेय मिलिंदची आई आणि आत्या ह्यांनासुद्धा जातेच. ह्या दोघींनी घरातले वातावरण कलासक्त मनोवृत्तीला, संशोधन वृत्तीला पोषक ठेवले. श्रीमंती मोजायची नवी व्याख्या आपल्या मुलांना दिली.


book
 
त्याच्या छायाचित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्याची छायाचित्रे युनिडायमेन्शनल नसतात. त्यात अनेक स्तर असतात. ते सुस्पष्ट असतात. तो दगडांचा थर आहे, त्याचा एक स्तर आहे, त्याच्या भगदाडातून दिसणार्‍या घराचा एक स्तर आहे, पाठच्या निळ्या आकाशाचा एक स्तर आहे, थराच्या वर दिसणार्‍या निळ्या आकाशातील पांढर्‍या ढगांचा एक स्तर आहे, आणि शेवटी थराच्या पायथ्याशी असलेल्या हिरव्यागार झाडाचा एक स्तर आहे. हे सर्व मंत्रमुग्ध करते.

 
मिलिंदची छायाचित्रे अगदी समोरून पाहून समाधान होत नाही. ती अनेक कोनांतून पाहायची असतात, कारण प्रत्येक कोनातून त्या छायाचित्रातल्या अनेक सूक्ष्म गंमतीजमती उलगडू लागतात. त्याच्या छाया-प्रकाशाच्या खेळातली अंत:स्थ ऊर्मी समजू लागते. मी ही छायाचित्रे पाहत राहतो आणि मला वाटते, मिलिंदची छायाचित्रे, त्यांची ठेवण, त्यांचा पोत हा रंगचित्रांशी, पेंटिंग्जशी खूप जवळचे नाते सांगतात, किंबहुना ती रंगचित्रेच वाटतात. त्याची आत्ताची black and white छायाचित्रे पाहतानासुद्धा मला हा अनुभव आला, हे विशेष.


book
 
मिलिंदला रस्त्यांचे वेड आहे. त्याने हिमालयात टिपलेल्या पाऊलवाटा असोत, युरोपमध्ये फिरताना टिपलेले रस्ते असोत.. ते आपल्याला आत बोलावतात. त्यांच्या पल्याड आहे अज्ञाताचा प्रदेश, जो प्रेक्षकाला खुणावत राहतो. ये आत, चाल माझ्यासोबत, बघ तुला एक गोष्ट सापडते का? चेसबोर्ड ह्या त्याच्या प्रदर्शनात असे अनेक रस्ते खुणावत होते.
मला एकदा मिलिंद म्हणाला होता, “तुम्ही कॅमेरा कुठला वापरता, लेन्स कुठली वापरता, तुम्हाला प्रकाशाची जाणीव किती आहे हे सर्व महत्त्वाचे आहेच, पण त्याहीपेक्षा तुम्ही दृश्य काय टिपता आहात, त्यात काय संचित आहे, त्यात कुठली गोष्ट आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.” त्याची ह्या पुस्तकातील सर्व छायाचित्रे पाहताना ह्याची प्रचंड जाणीव होते. प्रत्येक दृश्याला आपल्याला काही सांगायचे आहे. मिलिंद त्यांचे सांगणे आपल्यापर्यंत सशक्तपणे पोहोचवतो.
book

हे एकदा वाचून बाजूला ठेवण्याचे पुस्तक नाही. ते रुजवण्याचे पुस्तक आहे. आपल्यातल्या निर्मितीला आव्हान आहे. अशासाठी की ह्या पुस्तकाबरोबर आपल्यालाही त्याची निर्मिती करावी लागते. गंगेत डुबल्याशिवाय गंगेचा स्पर्श काय कळणार? कलाकाराच्या अंतरंगात खोलवर सूर मारल्याशिवाय कलाकार हाताशी लागणार नाही. तो व्यवहार नाही लोकहो.
तात्यासाहेबांचे शब्द उधार घेऊन म्हणतो, ‘कला अशी असते राजा, कलाकार असा असतो.’

 
हे वाचल्यावर तुम्हाला पुस्तक घ्यावेसे वाटेलच. त्यासाठी मिलिंदचा संपर्क क्रमांक देत आहे.
मिलिंद ढेरे : +91 9822282590, +91 9860582590