“हडप्पा संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृतीच” - डॉ. वसंत शिंदे

विवेक मराठी    12-Jan-2022
Total Views |
 @मिलिंद कांबळे 
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आणि ‘भारतीय वारसा - परिचय आणि संवर्धन’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सांस्कृतिक वारशाविषयी चर्चा आणि चिंतन करणार्‍या या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तान्त.

RSS
स्थान - पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथील प्रांगण, कै. मोरोपंत पिंगळे सभामंडप.
 
मनुज बदल दे, विश्व बदल दे।
धरती और आकाश बदल दे।
आओ हम इतिहास बदल दे।
 
या गीतांच्या ओळी समरसता गुरुकुलम पाठशाळेतील विद्यार्थी गाताना संपूर्ण सभामंडपातील ज्या कार्यशाळेसाठी आपण सहभागी झालो आहोत, तो इतिहास समजून घेऊन या भारतीय वारसा-परंपरेचे संवर्धन करावे, हाच भाव उपस्थित सर्व जण मनी व्यक्त करत होते.
 
 
दि. 29 व 30 डिसेंबर रोजी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सेंटर फॉर सिटिझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आणि ‘भारतीय वारसा - परिचय आणि संवर्धन’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनापूर्वी मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
 
 
उद्घाटनप्रसंगी भाषणात कोश्यारीजी म्हणाले की “भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गिरीश प्रभुणे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. या सामाजिक कार्याचा वटवृक्ष व्हावा. या सर्जनात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी नागरिकांच्या उपस्थितीतून मिळालेला प्रतिसाद हे त्यांच्या तपस्येचे फळ आहे.”
 
 
कोश्यारीजी पुढे म्हणाले की “साधना कधीही वाया जात नाही, याचा प्रत्यय गिरीश प्रभुणे यांचे काम पाहिले की दिसून येतो. प्रभुणे यांनी पन्नास वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या कार्याचा वटवृक्ष व्हावा आणि भटक्या-विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी सुरू झालेले हे कार्य निरंतर चालत राहावे. या ठिकाणी निर्माण केलेल्या कारागिरीतून अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या कलात्मक वस्तू आपण विकत घेऊन त्याला अधिक हातभार लावला पाहिजे.”
 
 
 
उद्घाटन समारंभास इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे (आयसीसीआरचे) अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, महापौर उषा ढोरे, समितीचे कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या आयोजनाविषयी आपली भूमिका विशद करताना प्रभुणे म्हणाले की “भारतीय संस्कृतीचा उगम कधी आणि कसा झाला, भारतीयांचे मूळ भारतात आहे की भारताबाहेर याविषयीचे वास्तव समोर आणणारे वैज्ञानिक पुरावे गेल्या काही वर्षांत जगासमोर आले. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय गटाने राखीगढी या हरियाणातील पुरास्थळाचे उत्खनन करून तिथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांचे डीएनए विश्लेषण केले. त्या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीनुसार राखीगढी येथे राहणारी माणसे आणि आजचे भारतीय यांच्या डीएनएमध्ये समानता असून, राखीगढी आणि आजचे भारतीय या दोघांचेही मूळ प्राचीन काळापासून भारतातच आहे. यापूर्वी सापडलेल्या पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यांना आता डीएनए अभ्यासाची जोड मिळाल्याने भारतीयांचे मूळ भारताबाहेर असल्याचा सिद्धान्त आता कालबाह्य झाला असल्याचे वैज्ञानिक जगताने मान्य केले.”
 

RSS 
 
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, भारतीय परंपरा व वारसा जतन करणारे संग्रहालय या ठिकाणी उभे राहत आहे.
 
 
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले की “गिरीश प्रभुणे यांच्या सामाजिक कार्याची व्यापकता मोठी आहे. ते भटक्या विमुक्त लोकांना शिक्षणाच्या आणि विद्येच्या प्रवाहात आणण्याचे काम करीत आहेत. सामाजिक जाणिवेच्या अधिष्ठानाचे मूर्त रूप म्हणजेच हे गुरुकुलम उभे राहिले आहे. प्रभुणे यांच्या कामाचे कौतुक होत आहे, ही गोष्ट समाधानकारक असून मुख्य प्रवाह या शब्दाचा अर्थ व्यापक व्हावा. क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मांडणीतील विचारांचा धागा ते पुढे घेऊन जाणारे कार्य प्रभुणे करीत आहे.”
 
 
‘भारतीय वारसा - परिचय आणि संवर्धन’ या कार्यशाळेतील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी राखीगढी येथील उत्खननाविषयी अत्यंत सखोल संशोधन केले, ते ऐकण्यासाठी उपस्थित सर्व अभ्यासकही त्यांच्या या व्याख्यानाची आतुरतेने वाट पाहत होते. हे व्याख्यान दोन भागांत झाले. पहिल्या दिवशी ‘राखीगढी संशोधन - भाग पहिला’ यावर विस्तृत विवेचन करताना ते म्हणाले की “याअगोदरचा इतिहास जो मांडला गेला आहे, तो घटनांच्या आधारे सांगितला जात आहे; परंतु त्यात भारतीय संस्कृतीचे योगदान काय आहे? हे कधीही मांडले गेले नाही.
 
 
भारतीयांनी सुरू केलेला स्थिर जीवनाचा प्रारंभ हा सर्वात प्राचीन - अर्थात सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वीपासून असल्याचे राखीगढी येथे पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातून आढळून आले आहे. इ.स.पूर्व वीस लाख वर्षांपूर्वी भारतीय समाज भटक्या स्वरूपात अस्तित्वात होता” असे नमूद करताना ते म्हणाले की “हडप्पन संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती आहे. हडप्पन संस्कृतीमध्ये राष्ट्राची कल्पना मांडली आहे. या लोकांनी आखीव-रेखीव अशी शहरे निर्माण केली. शहराचे नियोजन कसे असावे? शहरात सांडपाण्याची व्यवस्था, घरे बांधणीचे नियोजन, स्नानगृहे, त्या काळातील खानपान व्यवस्थेचे साम्य आजही आपल्या भारतीयांप्रमाणेच दिसून येते. त्या काळात केलेली शेतीचे आजही राखीगढी उत्खननातून इथल्या शेतीप्रमाणेच साम्य दिसून येते.”
डॉ. वसंत शिंदे यांचे दुसर्‍याही दिवशी ‘राखीगढी संशोधन - भाग दुसरा’ हे व्याख्यान झाले. आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की “राखीगढी आणि आजचे भारतीय या दोघांचे मूळ प्राचीन काळापासून भारतातच आहे.
 
 
गुजरातमधील लोथल हे जगातील पहिले बंदर आहे. ही संकल्पना हडप्पा संस्कृतीत जगात सर्वांत पहिल्यांदा अस्तित्वात होती.”
हरियाणा येथील राखीगढी येथे उत्खननात सापडलेल्या मानवी सांगड्यांचे डीएनए विश्लेषण करताना घेण्यात येणारी काळजी, तसेच त्याचे संशोधन करताना आलेल्या अडचणी या व्याख्यानातून सांगताना उपस्थित सर्व जण भारावून गेले. डॉ. शिंदे यांनी संपूर्ण संशोधन सचित्र सादर केले.
 
 
‘मंदिरे’ या विषयावर डॉ. प्रमोद दंडवते म्हणाले की “भारतात सर्वात जुने मंदिर चौथ्या शतकात उभारले गेले. सांची, विदिशा, जबलपूर, कानपूर, कोटा, नालंदा येथील मंदिरे प्राचीन मानली जातात. महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेर’ नदीच्या काठावरचे चौथ्या शतकातील मंदिर हे सर्वात प्राचीन मानले जाते.”
 
 
‘लेणी’ या विषयावर डॉ. श्रीकांत गणवीर म्हणाले की “देशात अठराशेपेक्षा जास्त लेणी आहेत, त्यातील 75 टक्के लेणी महाराष्ट्रात आहेत. इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत लेणी कोरण्याची परंपरा सुरू होती.”
 
 
‘पारंपरिक जलव्यवस्थापन’ विषयावर डॉ. अरुणचंद्र पाठक म्हणाले की “पारंपरिक जलव्यवस्थापनाचा अतिशय उत्तम नमुना कान्हेरी लेणी येथे पाहायला मिळतो. गड-किल्ल्यांवर पारंपरिक जलव्यवस्थापनाची उत्कृष्ट व्यवस्था आढळून येते.”
 
 
कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबविण्यात आला. चिंचवड पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथून पेशवेकालीन मंगलमूर्ती वाडा, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, क्रांतितीर्थ चापेकर वाडा, सुमारे 362 वर्षे जुने असलेले मोरया गोसावी मंदिर आणि धनेश्वर हे प्राचीन शिवमंदिर या स्थळांविषयी श्रीकांत चौगुले, किरण कलमदानी आणि अंजली कलमदानी यांनी विस्तृत माहिती दिली.
 
 
‘वारसा जनजागृती’ या विषयावर दै. महाराष्ट्र टाइम्सचे नाशिक प्रतिनिधी पत्रकार रमेश पडवळ यांनी गोवर्धन अर्थात नाशिक शहराचा सुमारे साठ हजार वर्षांचा इतिहास कथन केला. नाशिक येथील प्राचीन मातीची गडी ही काही लाख वर्षांपूर्वीची असून ती सातवाहन काळातील मानली जाते. नाशिक जिल्ह्यात 80 किल्ले आहेत. 15 लेण्या, वाडा संस्कृती असलेले साडेतीनशे वाडे व जवळपास 450 मंदिरे नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
 
 
 
‘लिखित वारसा - जतन संवर्धन’ या विषयावर डॉ. श्रीनंद बापट यांनी विवेचन केले. ‘लोकसहभागातून वारसा संवर्धन’ या विषयावर मयुरेश प्रभुणे यांनी गंगा नदीतील सूक्ष्मजीव ग्रहणातील पदार्थांची वैज्ञानिक कसोटीवर पडताळणी आणि मेघदूत प्रकल्पातून भारतीय माणसांचा अभ्यास या संदर्भात माहिती दिली.
 
 
‘वारसा कौशल्य’ या विषयावर गिरीश प्रभुणे यांनी बेलदार, पाथरवट, वडार अशा भारतीय जनजातींचे पारंपरिक आणि मौखिक ज्ञानकौशल्य सोदाहरण स्पष्टपणे उलगडून दाखविले. प्रा. दिगंबर गोखले व श्रीकांत चौगुले यांनी या कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. डॉ. सतीश गोरडे यांनी आभारप्रदर्शन केले.
 
 
दोन दिवस चालणार्‍या या कार्यशाळांतून अनेक अभ्यासकांना भारतीय वारसा संवर्धनासाठी नक्कीच प्रेरणा मिळाली. आपण या प्राचीन भारतीय संस्कृतीचे घटक आहोत, त्याचे संवर्धन करणे ही आता काळाची गरज आहे हे प्रत्येकाच्या मनात घर करून राहिले. त्यामुळे यापुढे होणार्‍या कार्यशाळांमध्ये मी नक्कीच सहभागी होणार असा मनोदय उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातून 150 अभ्यासक या कार्यशाळेत सहभागी झाले. विशेषता तरुण अभ्यासकांची संख्या लक्षणीय होती.
 
 
जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असणार्‍या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक स्थळे, रचना, कलाकृती, लिखित- मौखिक साहित्य, पारंपरिक कौशल्ये देशाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या या सर्व घटकांविषयीच्या शास्त्रीय नोंदी लोकसहभागातून जमा करून त्यांची सद्य:स्थिती नोंदवणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठीची ही पहिली कार्यशाळा होती.
 
 
पारंपरिक धातुकाम (डोकरा कास्टिंग) - इंद्रजीत उईके यांनी कार्यशाळेच्या ठिकाणी दोन दिवस पारंपरिक कौशल्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
 
 
लेखक मुक्त पत्रकार व विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आहेत.