अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराची प्राचीनता

विवेक मराठी    13-Jan-2022
Total Views |
 
@मनीषा पुराणिक  9890446522

book
रामजन्मभूमी हा तमाम हिंदूंच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तितकाच विवादास्पदही. शेकडो वर्षे हिंदूंसाठी पवित्र आणि पूजनीय असणार्‍या अयोध्येतील या जागी बाबराने मंदिर उद्ध्वस्त करून मशीद बांधली. त्यानंतर ही जागा ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न हिंदूंकडून केले गेले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. 1992 साली मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केल्यानंतर 2019 साली सर्वोच्च न्यायालयाकडून ही जागा मंदिर बांधण्यासाठी पुन्हा हिंदूंच्या ताब्यात आली, या सर्व घटना आपल्याला माहीत आहेतच. मात्र रामजन्मभूमीची प्राचीनता, त्या जागेचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर प्रा. दीनबंधू पाण्डेय लिखित ‘अयोध्येतील राम-जन्मभूमी मंदिराची प्राचीनता’ हे पुस्तक वाचलेच पाहिजे. प्रा. पाण्डेय यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयात ‘प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व’ या विषयात शिक्षण घेतले असून भारतीय इतिहास, कला-स्थापत्य, संस्कृती या विषयांचे अनेक वर्षे अध्यापन केले आहे. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. शिलालेखांच्या आणि पुरातत्त्वीय उत्खननाच्या प्रमाणांवर आधारित हे पुस्तक त्यामुळेच वाचनीय झाले आहे. श्रीमती प्रमिला गुज्जेवार यांनी या मूळच्या हिंदी पुस्तकाचा सरल मराठी भाषेत अनुवाद केला आहे.

 
लेखकाने वैदिक काळापासून अयोध्येचे मिळणारे पुरावे, कालिदासाच्या साहित्यातील अयोध्या, तुलसीदासांच्या दोह्यातील अयोध्या अशी अयोध्येची निरनिराळी रूपे आपल्यासमोर सप्रमाण मांडली आहेत. अयोध्येत आणि रामजन्मभूमीच्या जागेवर निरनिराळ्या वेळी उत्खनने झाली आहेत. त्यात मिळालेल्या अवशेषांवरून या जागी पूर्वी मंदिरच होते, हे प्रा. पाण्डेय यांनी सिद्ध करून दाखवले आहे. यातील महत्त्वाचे पुरावे म्हणजे गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याचे नाणे आणि गाहडवाल राजा गोविंदचंद्र याच्या काळातील प्रतिष्ठा शिलालेख. याचबरोबर गुप्तकालीन वास्तू, शिल्पे आणि मातीच्या मूर्ती यावरून या जागेची प्राचीनता गुप्तकाळापर्यंत (इ.स. 4-5वे शतक) जाते. जयपूरचा सवाई राजा जयसिंह ह्याने मुगल बादशाह फर्रूखशियर याच्याकडून रामजन्मभूमीची 983 इलाही वर्ग गज भूमी मिळवली होती आणि त्यावर पुन्हा नव्याने मंदिर बांधले होते. या संबंधातील अनेक कागदपत्रे आणि नकाशे जयपूर संग्रहालयात आहेत. रामजन्मभूमीवर केलेल्या उत्खननांत ज्या विष्णुहरीमंदिराचे उद्ध्वस्त अवशेष सापडले आहेत, त्याची प्राचीनता 10व्या शतकापर्यंत मागे जाते आणि त्याचे पुराभिलेखीय पुरावे मिळाले आहेत. या सर्वांचा अभ्यास करून प्रा. पाण्डेय यांनी ठामपणे वस्तुस्थिती मांडली आहे की, या पवित्र ठिकाणी पूर्वी विष्णुमंदिर होते, जिथे बाबराचा हस्तक मीरबांकी याने बाबरी मशीद बांधली आणि नंतर 17व्या शतकात इथे सवाई जयसिंह दुसरा याने तीन शिखर असलेले रामपंचायतन मंदिर बांधले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ही जागा मुस्लीम धर्मीयांच्या ताब्यात गेली आणि या वास्तूत बदल करून पुन्हा मशीद उभारली गेली. हे सर्व मांडताना लेखकाने डॉ. बुद्धरश्मी मणी, यज्ञदत्त शर्मा यांसारख्या पुरातत्त्वज्ञांचे अहवाल, तसेच शिलालेखाचा पाठ, नकाशे, छायाचित्रे या सर्वांची जोड या लेखनाला दिली आहे, त्यामुळेच या लेखनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरविंद जामखेडकर यांची या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. पुण्यातील अपरांत प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक धार्मिक तसेच अभ्यासू वाचकांसाठीही तितकेच उपयुक्त आहे.
 
पुस्तकाचे नाव - अयोध्येतील राम-जन्मभूमी मंदिराची प्राचीनता
 
• मूळ लेखक - प्रा. दीनबंधू पाण्डेय
 
• मराठी अनुवाद - प्रमिला गुज्जेवार
 
• प्रकाशक - अपरांत प्रकाशन, पुणे
 
• पृष्ठे - 96 • मूल्य - रु. 200/-