‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी’

विवेक मराठी    13-Jan-2022   
Total Views |
 
@अ‍ॅड. विभावरी बिडवे 9822671110  
 
भारतमाता आणि भूमाता ह्यांच्याबद्दल द्वेषकारक वक्तव्य हे कलम 295 अन्वये धार्मिक भावनांचा अवमान म्हणून फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरते, असा निकाल नुकताच मद्रास उच्च न्यायालयाने दिला. जॉर्ज पोनिआह ह्यांनी ह्या अपराधांखाली नोंद केलेली एफआयआर रद्द करावी, म्हणून मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर हा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निकाल आहे. कोणताही सेक्युलर अंधविश्वास न बाळगता न्यायालयाने परखडपणे दिलेला हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचा आढावा घेणारा लेख.

bhart mata
“जजमेंट डे’च्या वेळेस ‘ईश्वर त्यांची नक्कीच ह्या गैरख्रिश्चन कृत्याबद्दल कानउघडणी करेल” असे विधान नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या ‘जजमेंट’मध्ये ख्रिश्चन धर्मगुरू जॉर्ज पोनिआह ह्यांच्यासंदर्भात म्हटले आहे. भारतमाता आणि भूमाता ह्यांच्याबद्दल द्वेषकारक वक्तव्य हे कलम 295 अन्वये धार्मिक भावनांचा अवमान म्हणून फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरते, असा निकाल नुकताच मद्रास उच्च न्यायालयाने दिला. जॉर्ज पोनिआह ह्यांनी ह्या अपराधांखाली नोंद केलेली एफआयआर रद्द करावी, म्हणून मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर हा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निकाल आहे.
 
 
18 जुलै 2021 रोजी कन्याकुमारी येथे माओवादी कार्यकर्ता फादर स्टॅन स्वामीच्या श्रद्धांजली सभेत अवमानकारक आणि चिथावणीकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. न्यायमूर्ती जी.आर. स्वामिनाथन म्हणतात, “भूमातेच्या श्रद्धेखातर जे अनवाणी पायांनी फिरतात, त्यांची याचिकाकर्त्याने खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले की खरूज होऊ नये म्हणून ख्रिश्चन शूज घालतात. त्याने भूमा देवी आणि भारतमाता यांना संसर्गाचे आणि घाणीचे स्रोत म्हणून रंगवले. हिंदूंच्या भावनांना अवमानकारक आणखी काही असू शकत नाही.”
 
 
भारतमाता हिंदूंमध्ये अंत:करणापासून पूज्यभाव जागृत करते. तिला अनेकदा राष्ट्रध्वज घेऊन सिंहारूढ असल्याचे चित्रित केले जाते. अनेक हिंदूंसाठी ती स्वत: देवी आहे. भारत माता आणि भूमा देवी यांचा द्वेषकारक उल्लेख करून याचिकाकर्त्याने प्रथमदर्शनी भारतीय दंडविधानाच्या कलम 295 अ अंतर्गत गुन्हा केला आहे, असेही न्यायमूर्तींनी निकालात नमूद केले आहे.
याचिकाकर्ते कॅथलिक धर्मगुरू पोनिआह ह्यांनी आपल्या समर्थनार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. बाबासाहेबांनीही हिंदू धर्माची चिकित्सा केली आहे असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने धर्मप्रचारक हे व्यंगचित्रकार, कलाकार, विचारवंत, धर्माची चिकित्सा करणारे बुद्धिवादी ह्यांहून वेगळे असतात असे म्हणून ते चिकित्सा करत होते हे म्हणणे फेटाळून लावले. जी व्यक्ती दुसर्‍या धर्माचा प्रचार करते, त्याने केलेले एखादे विखारी विधान हे चिकित्सक, बुद्धिवादी किंवा कलाकारांच्या विधानांहून वेगळे होते. जेव्हा एखादा विनोदी कलाकार काही बोलतो तेव्हा तो इतरांची खिल्ली उडवण्याचा मूलभूत हक्क वापरत असतो. त्यामुळे तो कोण आहे? त्याची धार्मिक ओळख काय आहे हे महत्त्वाचे नसते. त्यामुळे तेव्हा 295 अ विचारात येत नाही, कारण इथे ‘द्वेष’ ही भावना अस्तित्वात नसते.
 
 
न्यायालयाने पुढे सखोल भाष्य केले आहे, उलटपक्षी याचिकाकर्त्यासारखा धर्मप्रचारक भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संरक्षणाचा करू शकत नाही. तो इतरांच्या धर्माचा किंवा त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान करू शकत नाही किंवा द्वेष निर्माण करू शकत नाही. असे करायचे आणि तरीही भारतीय दंडविधानाच्या कलम 295 अ, 153 अ, 505(2) ह्याखालील गुन्ह्यांपासून माफीचा दावा करायचा असे होऊ शकत नाही. याचे कारण असे की तो इतर धर्मीय समूहांची शिकार करण्यासाठी त्यांना आपली हक्काची जागा मानतो. त्याला अनास्था असलेला किंवा तटस्थ भाष्यकार म्हणता येणार नाही. ज्यांना लक्ष्य केले आहे अशा धार्मिक समूहांना, ते गुन्हा किंवा आक्षेपार्ह वाटते, कारण त्यांच्या हितसंबंधांना आणि कल्याणास ती संभाव्य हानी आहे अशी त्यांना भीती वाटते. अशा वातावरणात, ‘प्रत्येक क्रियेची समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते’ हा न्यूटनचा तिसरा नियम कार्य करू लागतो. अशा परिस्थितीत राज्याला मूक प्रेक्षक राहून चालणार नाही. राज्यघटनेचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी, जातीय शांतता आणि सौहार्द भंग करू पाहणार्‍यांवर कायद्याचा भक्कम हात उगारावा लागेल.
 

bhart mata 
 
कॅथलिक धर्मगुरू पोनिआह
 
निकालामध्ये धर्मगुरूं पोनिआह ह्यांनी, दोन समूहांची धार्मिक आधारावर विभागणी केली असे म्हटले आहे. त्यांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले. एका बाजूला ख्रिश्चन आणि मुस्लीम तर दुसर्‍या बाजूला हिंदूंना ठेवले आणि स्पष्टपणे एका समूहाला दुसर्‍याविरुद्ध उभे केले. त्यामुळे त्यांचे हे विधान हिंदू कल्याणासाठी वा धर्मसुधारणेसाठी नसून विद्वेष पसरवणे आणि आपली कन्व्हर्जन्सचे हेतू साध्य करणे, हेच होते हे स्पष्ट आहे.
 
 
न्या. स्वामिनाथन ह्यांनी निकालात नमूद केले की, याचिकाकर्त्याने उच्चारलेले शब्द पुरेसे प्रक्षोभक आहेत. त्यांच्यात द्वेषाची आणि वर्चस्ववादाची भावना आहे. राज्य अशा भडकाऊ विधानांकडे दुर्लक्ष करू शकते का, असा प्रश्न आहे. उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. याचिकाकर्ता प्रभावी कॅथोलिक धर्मगुरू आहे.
 
 
याचिकाकर्त्याने आपल्या समर्थनार्थ ‘फ्री स्पीच’ अर्थात भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेतला. भारतमाता आणि भूमी देवी ह्या ‘कायदेशीर व्यक्ती’ नाहीत असेही म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने पूर्वीच द्वेषकारक वक्तव्याची व्याख्या केली होती. असे वक्तव्य म्हणजे ज्याने बोलणार्‍याचा उद्देश हा इतरांना बदनाम करणे, अपमानित करणे किंवा द्वेष भडकवणे हाच असतो. अशा विधानांची अभिव्यक्ती, भाषा आणि त्यातील संदेश काय आहे हे बघितले पाहिजे. तो बदनामी, अपमान आणि भडकवणे किंवा शारीरिक हिंसेला प्रवृत्त करणे असाच असतो. त्यामुळे संदर्भ तपासण्यासाठी कोण? काय? आणि कुठे? ही चाचणी लावावी लागते. अशीच चाचणी लावून न्यायालयाने बुद्धिवादी आणि धर्मप्रचारक ह्यांच्यामध्ये भेद केला. आणि अशा विधानांचा उद्देश लक्षात आला की अशा त्यांना संविधानाने भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण मिळू शकत नाही.
 
 
भारतमाता कायदेशीर व्यक्ती नाही हे पोनिआह ह्यांचे म्हणणेही चूक आहे. हजारो वर्षांपासून आपण पंचमहाभूतांना वंदन करतो. पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू आणि वरुण ह्यापैकी पृथ्वी ही भूमाता किंवा भूमा देवी म्हणून मानली जाते. पुण्यभूमी असे आपण तिचे वर्णन करतो. बंकीम चंद्र चट्टोपाध्यायांनी आपल्या आनंदमठ कादंबरीत ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले, जे स्वातंत्र्यचळवळीचे राष्ट्रगान झाले. पुढे पूर्ण देश त्या गीताने प्रेरित होऊन लढला. आपण राष्ट्राला दुर्गेच्या किंवा कालीच्या स्वरूपात बघतो. अबनींद्रनाथ टागोरांनीही तिला भगवी वस्त्र परिधान केलेल्या साध्वीच्या रूपात चित्रित केले. महात्मा गांधींनी 1936 साली वाराणसीमध्ये भारतमाता मंदिर उभारले. रामायणात भगवान राम म्हणतात, ‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी’। दिवसाच्या सुरुवातीला भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी आपण ‘समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले। विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे॥’ ही प्रार्थना म्हणतो, इतकी ही भूमी पुण्य आहे, पूज्य आहे. ती देवताच आहे आणि जसे ह्यापूर्वीच्या अयोध्या निकालासह अनेक निकालांमध्ये देवाला वा मूर्तीला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे, त्याप्रमाणे भूमाता ही देवीच आहे.
 

bhart mata
 
मात्र हिंदूंच्या श्रद्धांवर हल्ले करून आपला धर्मप्रसार करायचा हे कार्य अव्याहत चालू आहे. तो मिशनरी कामाचा एक भाग असतो. पोनिआह यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच अशी केली की, ‘मी हिंदू कुटुंबात जन्मलो होतो. माझे आजोबा हिंदू होते. पण आपल्या मुलीने हे गटार सोडावे असे वाटल्याने त्यांनी माझ्या ख्रिश्चन वडिलांबरोबर तिचे लग्न लावून दिले..” त्यांचा पूर्ण उद्देशच हिंदूंबद्दल प्रचंड द्वेषाने बोलणे हा होता. त्रावणकोर भागातील अनेक मंदिरांमध्ये पुरुषांनी फक्त वेष्टी परिधान करून जाण्याची पद्धत आहे, त्यावरही त्यांनी अश्लाघ्य भाषेत टिपण्णी केली.
 
 
पोनिआह ह्यांच्या ह्या भाषणातील आणखी एका विधानामुळे न्यायालयाचे एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले गेले आहे आणि त्याचे धोरणात्मक निर्णय तसेच त्यासंदर्भातील कायद्याच्या आवश्यकतेसह अनेक बाबींवर परिणाम होऊ शकतो. काय म्हणतात धर्मगुरू? ते हिंदूंना पुढे ताकीद देतात, आम्ही आता (जिल्ह्यात) 42 टक्क्यांवरून बहुसंख्य होत 62 टक्के पार केले आहेत. लवकरच आम्ही 70 टक्के होऊ. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. मी हा हिंदू बांधवांना इशारा देत म्हणत आहे. ह्यानंतर त्यांनी मा. मोदीजी आणि अमित शाह ह्यांच्याबद्दलही गलिच्छ भाषेत वक्तव्य केले.
 
 
 
न्यायालयाने ह्या विधानाचीही गंभीर दाखल घेतली आहे. न्या. स्वामिनाथन म्हणतात, ‘विवेकाचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्तपणे आचरण आणि प्रचार व प्रसार हा मूलभूत अधिकार केला गेला आहे. पण जर भारतीय समाजाचे बहुसांस्कृतिक वैशिष्ट्य कायम राहिले, तरच नियतीचा हा प्रयत्न साध्य होऊ शकतो. दुसर्‍या शब्दात, धार्मिक डेमोग्राफी (लोकसंख्या) जैसे थे राहिली गेली पाहिजे. जर ही जैसे थे परिस्थिती विरुद्ध झाली, तर त्याचे आपत्तिजनक परिणाम होऊ शकतात. राज्याला कायदा व सुव्यवस्था राखावी लागते. पण जर हे असंतुलन शिगेला पोहोचले तर ते अपरिवर्तनीय होईल. हेच न्या. वेणुगोपाल आयोगाचे सार आहे.’
 
 
कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत. जरी 2011च्या डेटानुसार हिंदू 48.5% आहेत असे दिसत असले, तरी खरी परिस्थिती तशी नाही. अनुसूचित जातीतील ज्या हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे ते आरक्षण आदी फायद्यासाठी स्वत:ला हिंदूच म्हणून घेतात. न्यायमूर्ती स्वामिनाथन ह्यांनी आपल्या निकालात अशा एका क्रिप्टो ख्रिश्चन असलेल्या न्यायमूर्तींचाही नाव न घेता संदर्भ दिला आहे. त्यांच्यावर एक याचिकाही दाखल असल्याचे नमूद केले आहे. ते गेले तेव्हा त्यांचे ख्रिश्चन पद्धतीने दफन झाले. त्यामुळे सेन्सस फिगरकडे फारसे लक्ष न देता जमिनीवरची परिस्थितीही बघायला हवी आहे. असे असतानाही धर्मगुरू गर्वाने म्हणतात, कन्याकुमारी जिल्ह्यात ख्रिश्चनांनी 62% पार केले आहेत आणि लवकरच ते 72% होतील. आणि ते हिंदूंना इशारा देतात की त्यांची वाढ कोणी रोखू शकत नाही.
 
 
निकालात ह्या संदर्भात त्यांनी आणखी एक महत्त्वाचे तत्त्व अधोरेखित केले आहे. ते म्हणतात, अनेक जण धर्मांतर करतात आणि संविधानानेच तसा अधिकार त्यांना दिला आहे. जसे दिलीप कुमार ए.आर. रेहमान झाला. हे समजून घेण्यासारखे आहे. मात्र धार्मिक कन्व्हर्जन्स हा ग्रूप अजेंडा असू शकत नाही. आपले संविधान मिश्र संस्कृतीची भाषा करते. ते वैशिष्ट्य जपले पाहिजे. इतिहासाचे काटे परत उलटे फिरवता येऊ शकत नाहीत. 2022मधील धार्मिक लोकसंख्येची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवली गेली पाहिजे.
 
 
निकालामध्ये मूळ कन्याकुमारीचे असलेले लेखक अरविंदन नीलकंदन ह्यांनी जिल्ह्याबद्दल लिहिलेले निरीक्षण नमूद केले आहे. त्रावणकोरच्या राजांनी मिशनरी कामास आपल्या राजकीय फायद्यासाठी परवानगी दिली आणि त्यांचे स्वत्व हरवून गेले. लेखक इथे महात्मा गांधींना आणि वीर सावरकरांना उद्धृत करतात. हरलेली भूमी परत मिळवता येऊ शकते, मात्र शत्रूला समर्पित केलेले स्वत्व-आत्मा परत मिळणे कठीण आहे. जे कन्व्हर्ट झाले, त्यांची आत्मीय राष्ट्रीय मूल्ये हरवली. धर्मविविधतेसाठीचा सन्मान आणि परमोच्च आदर संपला. त्यांना इतरांवर आपली विस्तारवादी एकेश्वरवादी जागतिक विचारधारा थोपवायची होती. जे कन्व्हर्जन्सच्या विरोधात लढतात त्यांना जिझस हा काही परकीय किंवा खोटा देव वाटत नाही. ते खरे तर एकेश्वरवादाविरोधात - म्हणजे जे फक्त एक देव मानतात आणि इतर सर्व देव-देवता खोट्या आहेत मानतात ह्या विचारधारेविरोधात लढत असतात. हा एकेश्वरवाद ही खरी समस्या आहे, अध्यात्म ही समस्या नाही. त्यामुळे ही समस्या धर्माविषयक नाही, तर ती धर्मविविधतेसंदर्भातील आहे. हिंदूंनी बहुसंख्य असणे हे सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण आहे. जगाने कॅथलिक-प्रोटेस्टंटचा इतिहास बघावा, सुन्नी प्रभावी पाकिस्तानमधील अहमदियांची अवस्था बघावी. प्रोटेस्टंट्सची कॅथलिकबहुल समाजामध्ये कल्पना करावी. जर मूर्तिपूजक धर्म आणि संस्कृती नष्ट केल्याच्या विकृत आनंदासाठी तुम्ही डेमोग्राफी उद्ध्वस्त केलीत, तर तुम्ही तुमचे खरे संरक्षण, तुमचे शाश्वत संरक्षण उद्ध्वस्त करत आहात आणि तुम्ही ज्या फांदीवर बसला आहात ती फांदीच कापून टाकत आहात.’ लेखकाचे हेच विचार न्या. वेणुगोपाल आयोगाने आपल्या निरीक्षणात आणि सूचनांमध्ये नमूद केले आहेत.
 
 
मद्रास उच्च न्यायालयाने धार्मिक भावनांचा अवमान, धार्मिक आधारावर विविध समूहांमध्ये तेढ निर्माण करणे आणि त्याद्वारे समाजातील शांतता बिघडवून टाकणे, विविध वर्गांमध्ये धार्मिक आधारवर कलह पेटवून देणे ह्यासाठी धर्मगुरूंवर दाखल झालेल्या गुन्हांच्या विरुद्ध संरक्षण देण्यास नकार दिला. त्यांच्यावरील कारवाई चालू राहील. बेकायदेशीर सभा, धमकीचा आरोप, साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे असे निष्काळजी कृत्य आणि साथीच्या आजारात दिलेल्या सरकारी आदेशाची अवज्ञा अशा आरोपांमधून वगळण्यात यावे, असे आपल्या निकालात म्हटलं आहे.
 
 
ह्या निकालाने दोन महत्त्वाच्या विषयांना अधोरेखित केले आहे. एक म्हणजे फ्री स्पीच ह्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण हिंदूंच्या श्रद्धा कोणीही आणि कशाही तुडवण्यासाठी लाभणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विभूतीने हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना हिंदू समाजाबद्दल प्रेम, आस्था वाटत होती म्हणूनच धर्माची चिकित्सा करणारे प्रखर विचार मांडले. एखाद्या धर्मप्रचाराकाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. आपला कन्व्हर्जन्सचा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही संविधानातील भाषण आणि अभिव्यकिस्वातंत्र्याच्या संरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही.
 
 
दुसरी महत्त्वाच्या गोष्टीकडे न्यायमूर्तींनी लक्ष वेधले ते म्हणजे, ‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति’ आणि एकेश्वरवाद ह्या विचारधारेतील हा प्रमुख वाद आहे. जो हिंदू समाज हे धर्मवैविध्य मानतो, त्याचे लोकसंख्येतील प्रमाण कमी होणे म्हणजे अनेकच अल्पसंख्याकांचा नाश होणे आहे. त्यासाठी जैसे थे स्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदू संस्कृतीत कधीही ब्लास्फेमी अर्थात ईशनिंदा हा नीतिनियम वा कायदा नव्हता. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ ह्या विचाराने हिंदूंचे संप्रदाय विकसित होत गेले. मात्र एकेश्वरवादाने त्या मूळ मूल्यावरच आघात केल्याने सहिष्णू राहून चालणार नाही, कायदेशीर पावले उचलावीच लागतील. कोणताही सेक्युलर अंधविश्वास न बाळगता न्यायालयाने परखडपणे दिलेला हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
 
 

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.