'वरन भात लोनचा, कोन नाय कोंचा' ट्रेलर - दिशाभूलीच्या दिशेने चाललेला युवक...

विवेक मराठी    13-Jan-2022
Total Views |
@मल्हार पांडे

इंटरनेटवर असलेल्या 'वरन भात लोनचा, कोन नाय कोंचा' अशा चित्रपटांच्या ट्रेलरमुळे आपण आपल्या संस्कारांपासून दूर चाललो आहोत. त्या ट्रेलरवर कारवाई होईल किंवा होणार नाही, हा चित्रपट रिलीज होईल की नाही होणार हे माहीत नाही. पण असे ट्रेलर बघू नयेत आणि अशा चित्रपटांसाठी आपण मुलांचे उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आपला कष्टाचा पैसा घालवू नये.
 
chitrapat
स्वामी विवेकानंदांनी भारतीय समाजाला त्यांच्या विविध भाषणांमधून 'युवक कसा असावा' याची अनेक उदाहरणे दिली होती. युवक तेजस्वी, ओजस्वी, ध्येयप्राप्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारा, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणारा असे विविध गुण त्याच्या अंगी असावेत, असे त्यांचे म्हणणे होते. पण आजच्या युवा पिढीकडे आपण पहिले, तर स्वामी विवेकानंदांच्या मनातील युवक कुठच्या कुठे गायब झाला आहे असेच वाटते आणि या सगळ्यात युवा पिढीची दिशाभूल करण्याचे काम आपल्या समाजातील सर्वात प्रभावी माध्यमातून - अर्थात चित्रपटातून होत असते. नुकतेच, महेश मांजरेकर यांच्या 'वरन भात लोनचा, कोन नाय कोंचा' या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाला. तो ट्रेलर पाहिल्यावर, काही क्षणासाठी मी एक तरुण म्हणून अचंबित झालो. अभद्रपणाची, विकृतीकरणाची परिसीमा म्हणजे हा ट्रेलर. पण याहून भयानक गोष्ट म्हणजे त्या ट्रेलरच्या कॉमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रतिक्रिया. ट्रेलरचा उद्देश काय आहे ते ट्रेलरच्या शेवटपर्यंत कळत नाही, पण दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला, केवळ आणि केवळ चित्रपट गाजवायचा होता म्हणून त्यांनी 'बाल्यांचा' वापर करून स्वतःची पोळी भाजून घ्यायचे पातक केले आहे. आता ट्रेलरमध्ये नेमके काय होते? साधारण १४-१५ वर्षांचा मुलगा, मोठ्या स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवून व्यभिचारी जीवनाच्या दृष्टीने सुसाट सुटलेला दाखवला आहे. तोच मुलगा, पैशासाठी कोणाचे खून, धमक्या देताना दाखवला आहे. व्यभिचारीपणाच्या सगळ्या सीमा ओलांडून दिग्दर्शकाने आणि निर्मात्याने स्वतःचा निर्लज्जपणा दाखवलेला आहे! असे चित्रपट अथवा चित्रफिती येऊ लागल्या, तर आपण देशातल्या तरुणांसमोर काय आदर्श ठेवत आहोत? याआधीदेखील असे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत, ज्याचे विपरीत परिणाम आजच्या युवा पिढीवर झालेले दिसतात.
 
 
 
एकीकडे आपला देश विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना, जिथे देशातील तरुण पिढीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, त्या ठिकाणी असे चित्रपट आल्यामुळे युवकांना दिशाहीन करायचे काम केले जात आहे. मी जेव्हा अनेक तरुणांशी अशा विषयांवर संभाषण करतो, तेव्हा ते अमेरिकन सिरीजने अथवा पाश्चिमात्य संस्कृतीने प्रभावित झालेले दिसून येतात. मुळात, भारतीय संस्कृती आणि वेस्टर्न इन्फ्लुएन्स यांची तुलना कधीही होऊ शकत नाही, हे आपल्या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनीदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. 'वरन भात लोनचा, कोन नाय कोंचा', बालक पालक, सैराट, टकाटक यांसारखे चित्रपट पाहणारा वर्ग हा १५-२४ या वयोगटातील असतो. या वयात स्वतंत्रपणे विचार करावा इतकी बुद्धी प्रगल्भ झालेली नसते आणि ज्यांची झालेले असते, ते अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. पण लक्ष न देणारा वर्ग हा अगदी हातावर मोजण्याइतकाच! या वयोगटातील मुले, असे चित्रपट पाहून त्यांच्या जीवनातदेखील चित्रपटातील नायकाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मग त्याबरोबरच त्या नायकाने दिलेल्या शिव्या, घाणेरडे डायलॉग, त्याचे मुलींशी असलेले गैरवर्तन अशा अनेक गोष्टींचे अनुकरण केल्यामुळे तरुणांमध्ये हळूहळू गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता वाढते. असे चित्रपट पाहून मुले काही काळासाठी 'इन्फ्लुएन्स' होतात, परंतु याचे दूरगामी परिणाम किती भयाण आहेत, याची त्यांना व त्यांच्या पालकांना कल्पना नसते. व्यसनाधीनता, डिप्रेशन, शारीरिक संबंध ठेवण्याची लालसा आणि त्यातून मोठा अपराध घडण्याची शक्यता! चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक दोन-अडीच तासांचा चित्रपट निर्माण करून लाखो रुपये कमवून जातात, पण त्याच्यामुळे तुमच्या पाल्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. छत्रपती शिवाजी महाराज घडावेत असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. सावरकर, टिळक, आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले प्रत्येकाच्याच घरी जन्माला यावेत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण त्यासाठी तसे प्रयत्न घडणे गरजेचे आहे! आपण आपल्या मुलाला काय बघायला शिकवतो हे आपल्या हातात आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे! एकीकडे इंटरनेटवर लाखो पुस्तके मोफत उपलब्ध आहेत, तर दुसरीकडे व्यभिचाराने भरलेली दुनियादेखील आहे. एकीकडे इंटरनेट सबंध जगाला जवळ आणत आहे, तर दुसरीकडे इंटरनेटवर असलेल्या 'वरन भात लोनचा, कोन नाय कोंचा' अशा चित्रपटांच्या ट्रेलरमुळे आपण आपल्या संस्कारांपासून दूर चाललो आहोत. त्या ट्रेलरवर कारवाई होईल किंवा होणार नाही, हा चित्रपट रिलीज होईल की नाही होणार हे माहीत नाही. पण असे ट्रेलर बघू नयेत आणि अशा चित्रपटांसाठी आपण मुलांचे उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आपला कष्टाचा पैसा घालवू नये. संस्कारच इतके सक्षम करा की तरुण वर्गच अशा अभद्र चित्रपटांना नाकारेल आणि कालांतराने असे चित्रपट काढण्यापासून दिग्दर्शक आणि निर्माते स्वतःचे आर्थिक नुकसान होईल म्हणून घाबरतील! असे संस्कार घडवण्यासाठी मुलांसमोर शिवाजी महाराज, टिळक, सावरकर, आंबेडकर यांसारख्या महानुभावांचे, तसेच रामायण-महाभारतासारख्या कथांचे आदर्श ठेवणे गरजेचे.