जोकोविच आणि लसीकरणाचा वाद

विवेक मराठी    14-Jan-2022
Total Views |
@ॠजुता लुकतुके  
  लसविरोधी भूमिकेनंतर नोवाक जोकोविच पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. या वेळी त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन किंवा त्याचा अभाव यातून वाद निर्माण झाला आहे. पण या वेळी त्याच्यावर टीका करणार्‍यांबरोबरच त्याच्या बाजूने असणार्‍यांचीही संख्या जास्त आहे. या वादाच्या निमित्ताने लसीला होणारा विरोध आणि त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन यावरही चर्चा व्हावी.

sports
नोवाक जोकोविच हे अजब रसायन आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरचा हा खेळाडू खेळता खेळता प्रेक्षकांमध्ये जाऊन आपली रॅकेट एखाद्या तरुण मुलीला देऊन टाकतो. त्याच्या या कृतीने मुलीचा आनंद गगनात मावत नाही. कधीकधी सर्बियाच्या रस्त्यांवर रात्री-बेरात्री तरुणांबरोबर फुटपाथच्या दिव्याखाली तो टेनिस खेळतो. तरुणांसाठी या आठवणी आयुष्यभरासाठीच्या होऊन जातात. थोडक्यात, तरुणांबरोबर त्याचं वागणं हे असं दिलखुलास आहे. समाजमाध्यमांमध्ये त्याचा वावर अगदी मोकळाढाकळा आहे. त्याच्या ट्विटर हँडलचं नावच मुळी ‘जोकर’ आहे. कारण, त्याला विनोद आवडतात आणि तो स्वत:वरही ते करू शकतो. जोकोविच या त्याच्या आडनावाचं ‘जोकर’ हे त्याने केलेलं हे लघुरूप आहे. म्हणजे तो विनोदी आणि खेळकर आहे. पण या वेळी या ‘जोकर’ने केलेला विनोद स्वत:वर नाही, तर कोरोना उद्रेकामुळे पिचलेल्या आणि त्यातून बाहेर येऊ इच्छिणार्‍या लोकांवर केलेला आहे आणि त्यातून विनोदनिर्मितीपेक्षा मोठा वाद मात्र तयार झालाय. 17 जानेवारीपासून या वर्षीची पहिली लॉन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा - ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी नोवाक जोकोविचची कोरोनाविरोधी लसीवरील मतं आणि लसीला असलेला विरोध हा जगभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतोय.

 
जोकोविचचं वागणं, त्याचं समर्थन आणि टीका याचं विश्लेषण करण्यापूर्वी, नेमकं काय झालं हे थोडक्यात समजून घेऊ या. अख्ख्या जगाबरोबरच ऑस्ट्रेलियातही वर्षाच्या सुरुवातीला ओमायक्रॉनमुळे येऊ घातलेल्या नव्या कोरोना लाटेचं सावट होतं आणि रुग्णसंख्या वाढत होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशात कोरोनाचे नवीन नियम लागू केले आणि यात लसीचे दोन्ही डोस झाले नसलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरायला बंदी घातली. अगदी कार्यालयीन कामासाठी किंवा रोजगारासाठीही अशा लोकांना बाहेर पडता येणार नव्हतं. ऑस्ट्रेलियात 2022मध्ये राष्ट्रीय निवडणुका आहेत आणि कोरोना परिस्थितीच्या हाताळणीवरून आधीच जनता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर नाराज आहे. अर्थात, काहींना सरकारचे हे नियम जाचकही वाटताहेत. ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जेव्हा जवळ आली, तेव्हा आयोजकांनी आणि टेनिस ऑस्ट्रेलियाने स्पर्धेसाठीची नियमावली जाहीर करताना स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्या मदतनीसांसाठीही लसीचे दोन्ही डोस अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलं. (आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशात हा नियम मागची दोन वर्षं लागू आहे आणि त्यामुळे देशातले अनेक नागरिक बाहेरच्या देशांमध्ये अडकून पडले आहेत.) नोवाक जोकोविचने सर्वप्रथम एप्रिल 2020मध्येच कोरोना लसविरोधातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘लस घेणं किंवा न घेणं हा वैयक्तिक आणि प्रत्येकाचा खाजगी निर्णय आहे, त्याची सक्ती नको’ अशीच त्याची भूमिका आहे. ही भूमिका जगजाहीर असल्यामुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेत त्याला प्रवेश मिळेल का, अपवादात्मक प्रसंगांमध्ये काही जणांना जी सूट मिळू शकते ती जोकोविचला (तो फक्त अव्वल स्थानावरील खेळाडू असल्यामुळे) लागू होईल का, याची चर्चा स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासूनच ऑस्ट्रेलियात सुरू झाली.

जर सामान्य जनता म्हणून आम्हाला लसीविषयी एक नियम लावणार असाल, तर तो स्टार टेनिसपटूसाठीही असला पाहिजे या मागणीसाठी जनतेने व्हिक्टोरिया राज्यात आंदोलनंही केली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आणि खुद्द जोकोविच ऑस्ट्रेलियात पोहोचण्याच्याही आधी तिथे त्याच्याविरोधात वातावरण तयार झालेलं होतं.


sports
जोकोविचने आपण लस घेतलीय की नाही हे कधीही उघड केलं नव्हतं. पण कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात त्याचं वागणं काहीसं बेफिकीर आणि हेकेखोर होतं. म्हणजे, जाहिरातींच्या चित्रीकरणावेळी तो हमखास मास्कही न लावता दिसायचा. लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क यासारखे नियम न पाळता फिरायचा. या सगळ्यामुळे आधीच लोकांना त्याच्याबद्दल शंका होत्या. ऑस्ट्रेलियात तर संताप व्यक्त होत होता.. आणि तशात 4 जानेवारीला नोवाक जोकोविच यांचं विमान मेलबर्न शहरात उतरलं. तिथल्या इमिग्रेशन विभागाने तातडीने त्याचा ऑस्ट्रेलियन व्हिसा रद्द केल्याचं त्याला आणि मीडियामध्येही कळवलं. इतकंच नाही, तर लस घेतलेली नसल्यामुळे कारवाई म्हणून अशा आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ठेवतात त्या डिटेन्शन सेंटरमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. जोकोविच आपल्या भूमिकेवर ठाम होता. त्याला लसीच्या नियमातून सूट हवी होती आणि डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्याबद्दल तो चिडलेला होता. त्याने झाल्या प्रकाराबद्दल कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे साधारण चार दिवस त्याचा खटला चालल्यानंतर त्याच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आणि त्याचा ऑस्ट्रेलियन व्हिसा त्याला पुन्हा बहाल करण्यात आला.

वर वर दिसायला हे प्रकरण असं आहे. पण कहानी में ट्विस्ट है। और मामला यही खत्म नही हुआ। कारण, जोकोविचच्या वकिलांनी त्याच्या बचावासाठी कोर्टात मांडलेला मुद्दा असा होता की, डिसेंबर 2021मध्ये जोकोविचला कोरोनाचा संसर्ग झालेला होता आणि संसर्ग झाल्यानंतर लगेच लस घेता येत नाही, म्हणून त्याला लसीच्या नियमातून सूट मिळावी. हा मुद्दा वैद्यकीय आणि तांत्रिकदृष्ट्या बरोबर असल्यामुळे डिटेन्शन सेंटरमधून त्याची सुटका झाली. पण कोरोना संसर्ग झालेल्या काळात जोकोविच एकदा नव्हे, तर दोनदा जाहीररित्या लोकांमध्ये फिरला होता. फोटोंमधून तसं स्पष्टपणे दिसतंय. मग ही हलगर्जी नाही का? लोकांमध्ये फिरताना त्याने मास्कही घातला नव्हता. म्हणजे कोरोनाबद्दलची आणि कोरोना लसीबद्दलची त्याची भूमिका हा वाद अजूनही उरतोच आहे. कोविड असताना लोकांमध्ये फिरल्याबद्दल आता त्याने माफी मागितली आहे. पण म्हणतात ना - बूंद से गयी, सो हौदसे नही आती। आणि इथे तर कोरोनासारख्या भयंकर संसर्गजन्य आजाराबद्दल आपण बोलतो आहोत. या आजाराबद्दल जोकोविच संवेदनशील नसल्याचं त्याच्या वागण्यातून दिसतंय, म्हणून त्याच्या वागण्याचा लोकांना राग आलाय.
 
यात एक भाग ऑस्ट्रेलियन प्रशासनाने जोकोविचच्या बाबतीत दाखवलेल्या धरसोड वृत्तीचाही आहे. कारण, त्यामुळे हे प्रकरण इतकं वाढलं. जोकोविच नंबर वन खेळाडू असल्यामुळे आयोजकांना आणि टेनिस ऑस्ट्रेलियाला तो स्पर्धेत खेळलेला हवा होता आणि त्यांनी त्याला स्पर्धेत प्रवेश देऊ केला. मेलबर्न शहर व्हिक्टोरिया राज्यात येतं. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी व्हिक्टोरिया राज्यानेही जोकोविचच्या सहभागाकडे कानाडोळाच केला. या राज्यात कोरोनासाठीचे नियम वेगळे आहेत, असं नंतर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजे राज्य आणि केंद्राच्या नियम भिन्नत्वामुळे जोकोविचला स्पर्धेत प्रवेश मिळाला असं सांगण्याचा मॉरिसन यांचा प्रयत्न होता. पण लोकांमध्ये जोकोविचविरोधात असलेल्या भावना त्यांच्यापर्यंत एव्हाना पोहोचल्या होत्या (शहरात जोकोविच विरोधात निदर्शनं झाली होती आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 2022 हे निवडणुकीचं वर्षं आहे). त्यामुळे अचानक दोन दिवसांत जेव्हा जोकोविच मेलबर्नला पोहोचला, तेव्हा त्याला अडवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जोकोविचप्रमाणेच आणखी एका पुरुष खेळाडूला पुढच्या काही दिवसांत मायदेशी परत धाडण्यात आलं. आता कोर्टाने जोकोविचचा व्हिसा पुन्हा बहाल केला असला, तरी परराष्ट्र मंत्रालय तो पुन्हा रद्द करू शकतं. कारण, आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लिहून द्यायच्या लेखी माहितीमध्ये (डिक्लेरेशनमध्ये) चूक झाल्याचं जोकोविचने मान्य केलंय आणि या चुकीवरून व्हिसा रद्द होणार की नाही हे येत्या दिवसांमध्ये ठरणार आहे.

थोडक्यात, जोकोविचवरून एवढं मोठं नाट्य घडण्यामागे ऑस्ट्रेलियन सरकारचा आणि प्रशासनाचाही हात आहे. लसीला विरोध करणारा जोकोविच हा काही एकटा खेळाडू नाहीये किंवा जगातली एकमेव व्यक्ती नाहीये. त्यामुळे कदाचित स्पर्धेपूर्वी त्याच्याशी चर्चा करून हा प्रश्न इतका मोठ्या होण्यापूर्वी टेनिस ऑस्ट्रेलियाला तो थांबवता किंवा रोखता आला असता. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिक्टोरिया प्रशासनाने त्याला स्पर्धेत प्रवेश दिला आणि नंतर ऑस्ट्रेलियन केंद्र सरकारने त्याचा व्हिसा नाकारून त्याला डिटेन्शन सेंटरमध्ये टाकलं, या दोन्ही भूमिका एकमेकांना अडचणीत टाकणार्‍या होत्या. जर व्हिसा नाकारायचा होता, तर स्पर्धेत का प्रवेश दिला? या मुद्द्याचं जोकोविचला भांडवलही करता आलं आणि पुढे कोर्टात हाच मुद्दा त्याच्या कामी आला.
 
 
आता मुख्य प्रश्नाकडे - म्हणजे जोकोविचच्या लसविरोधी भूमिकेकडे येऊ या. एप्रिल 2020मध्ये सर्बियन अ‍ॅथलीट्सबरोबरच्या एका फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात पहिल्यांदा जोकोविचने आपली लसविरोधातली भूमिका मांडली - “व्यक्तिश: माझा लसीला विरोध आहे. जगात प्रवास करता यावा यासाठी लसीकरण सक्तीचं व्हावं हे मला रुचणारं नाही. भविष्यात कधी लस घेईन की नाही हे आताच नाही सांगता येणार” असंही तेव्हा जोकोविच म्हणाला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्याने आणखी एका कार्यक्रमात भाग घेतला. वेलनेस गुरूच्या कार्यक्रमात बोलताना त्याने ‘चांगल्या आणि सकारात्मक विचारामुळे आणि भावनेमुळे प्रदूषित पाणी शुद्ध होऊ शकतं’ या सिद्धान्ताचाही पुरस्कार केला होता. त्यामुळे त्याची विचारसरणी सनातनी ख्रिश्चन समाजाशी काहीशी मिळतीजुळती आहे, असाच समज तयार झाला. वेलनेस गुरूच्या या कार्यक्रमात हजारो लोक विना मास्क सहभागी झाले आणि त्यातून अनेकांना कोविडची लागण झाली. त्यातला एक जोकोविचही होता. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला होता.
 
त्याचं हे पहिलं विधान आलं, तेव्हा स्पर्धा कोरोनामुळे थांबलेल्या होत्या. पण 2021च्या पूर्वाधापासून हळू हळू जग खुलं झालं आणि स्पर्धाही होऊ लागल्या. तोपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीही बाजारात आल्या होत्या. प्रवासासाठी लस अनिवार्य झाली, तेव्हा जोकोविचचं लशीबद्दलचं मतही थोडं सौम्य झालं असावं. कारण, ऑगस्ट महिन्यात पुन्हा या विषयावर पत्रकारांशी बोलताना त्याने आपलं आधीचं बोलणं चुकीच्या अर्थाने घेतल्याचं म्हटलं होतं. त्याचं नवं विधान असं होतं, “मी काही लसीच्या पूर्णपणे विरोधात नाही. वैद्यकशास्त्राला आव्हान देण्याची माझी पात्रताही नाही. पण सक्तीच्या लसीकरणाला माझा विरोध आहे. तुमच्या शरीरात काहीतरी कृत्रिम गोष्ट टाकली जाते, जी तुम्हाला नको आहे, तर ते चुकीचं आहे. वर तुम्ही प्रवास करणं या गोष्टीवर अवलंबून आहे, हा नियम तर मला मान्यच नाही.” या भूमिकेवर पुढे जोकोविच ठाम राहिला. ऑक्टोबर 2021मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेची नियमावली जाहीर केली. यात खेळाडूंनी लसीचे दोन्ही डोस घेतले असले पाहिजेत, असं नमूद करण्यात आलं होतं. त्यापूर्वीही एटीपी टूरमध्ये सहभागी होणार्‍या 60% खेळाडूंनी आपण लस घेतली आहे की नाही हे उघड केलं, तेव्हा जोकोविचने लस घेतलीय की नाही हे सांगायलाही नकार दिला. ही माझी अत्यंत खाजगी गोष्ट आहे, हे त्याचं म्हणणं कायम होतं. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या निमित्ताने जोकोविचची लसविरोधी भूमिका ठळकपणे समोर आली आणि त्यावर चर्चाही झाली. शास्त्रज्ञांच्या आणि तज्ज्ञांच्या मते, लसविरोधी मानसिकता ही लसीविषयीचे गैरसमज आणि चुकीच्या कल्पन यांमधून तयार झाली आहे आणि तो वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. अशा वेळी जोकोविचसारख्या स्टार खेळाडूने उघडपणे लसविरोधी घेतलेली भूमिका असे गैरसमज वाढवू शकते, असं तज्ज्ञांना वाटतं. दुसरं म्हणजे या दोन वर्षांच्या काळात जोकोविचने अनेकदा कोविड नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय आणि आता तर कोविड झालेला असताना तो सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचं समोर आलंय. याची जबाबदारी कोण घेणार? आणि काय स्पष्टीकरण तो देणार? त्याच्या वडिलांनी ऑस्ट्रेलियन प्रशासन सक्तीकरणाच्या नियमामुळे ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केलाय. पण जोकोविचच्या वागण्यामुळे अनेक जण दुखावले गेलेत, त्याचं काय?

ऑस्ट्रेलियात जोकोविचच्या समावेशावरून वादळ निर्माण झालं, तेव्हा राफेल नदाल, रॉजर फेडरर या इतर अव्वल खेळाडूंनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. “जोकोविचने लस घेतली असती तर हा प्रसंग उद्भवलाच नसता” असं नदालने म्हटलं आहे. जोकोविचच्या लसविरोधी भूमिकेवरही त्याने मधल्या काळात टीका केली आहे. टेनिस जगतातून जोकोविचवर बरीच टीका होतेय. तशी ती यापूर्वीही झालीय. टोकयो ऑलिम्पिकमधल्या पराभवानंतर त्याने एका बॉलगर्लवर आपला राग काढला होता, तर महिला आणि पुरुष व्यावसायिक खेळाडूंना समान वेतन देण्याच्या मुद्द्यावरही टोकाची मतं व्यक्त करताना महिलांना समान बक्षिसाची रक्कम देण्याच्या विरोधात त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. या दोन्ही प्रसंगांमध्ये तो सुजाण क्रीडारसिकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या टीकेचा धनी झाला. त्याची सामाजिक जाणीव आणि संवेदना यांच्याप्रतिही प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
 
आताच्या लसविरोधी भूमिकेनंतरही पुन्हा एकदा तो वादाच्या केंद्रस्थानी आहे. या वेळी त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन किंवा त्याचा अभाव यातून वाद निर्माण झाला आहे. पण या वेळी त्याच्यावर टीका करणार्‍यांबरोबरच त्याच्या बाजूने असणार्‍यांचीही संख्या जास्त आहे. कारण, लसीला विरोध करणारा जोकोविच हा एकटा नाही. जगभरात आफ्रिकेत, युरोपमध्ये आणि अमेरिकेतही असे विरोधक आहेतच. अमेरिकेत एरॉन रॉजर्स, जोशुआ किमिच, ब्रायसन डिचेंबू आणि कायरी आयर्व्हिन या बास्केटबॉल आणि अमेरिकन फुटबॉल स्टार्सनीही लसविरोधी उघड भूमिका घेतलेली आहे. कोरोनाची तिसरी, चौथी लाट जगात आलेली असताना दक्षिण आफ्रिकेत जेमतेम 30% आणि अमेरिका तसंच काही युरोपीय देशांमध्ये 50% लसीकरणच पूर्ण झालंय, यातूनच लसीला होणारा विरोध लक्षात येतो. आताही जोकोविचला व्हिसा नाकारल्यावरून त्याचा मायदेश सर्बियामध्ये आणि इतरही काही देशांमध्ये ऑस्ट्रेलियन सरकारला विरोध झाला. त्यामुळे जोकोविचवर जशी चर्चा होतेय, तशीच या वादाच्या निमित्ताने लसीला होणारा विरोध आणि त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन यावरही चर्चा व्हावी.