विलासजी - असंख्यांचा आधार, सर्वांचा मार्गदर्शक

15 Jan 2022 17:33:03
@प्रा. रवींद्र भुसारी  9594753444
2025 साली संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारतमातेच्या परमवैभवाचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्तव्यभूमीच्या ज्या पुजार्‍यांनी आपल्या समिधा राष्ट्रकार्याच्या यज्ञात समर्पित केल्या, अशा कार्यकर्त्यांच्या कार्याची ओळख करून देणार्‍या पुस्तिका सा. विवेक प्रकाशित करीत आहे. पहिल्या संचात मा. माधवराव परळकर, मा. श्रीधर नातू, मा. मधुकर (दाजी) जाधव, मा. अण्णा भोई आणि मा. विलासजी फडणवीस या कर्तव्यभूमीच्या पुजार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
 
fadanvis
 
10 जानेवारी 2022 रोजी विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील पुस्तिकेचे नागपूर येथे प्रकाशन झाले.
 
 
 
नागपूर संघपरिवारात 1977 ते 2008पर्यंत जवळपास तीन दशके ‘विलासजी’ हा परवलीचा शब्द होता. सामान्य स्वयंसेवकापासून ते मोठ्या अधिकार्‍यांपर्यंत कुणालाही काही समस्या आली - मग ती कौटुंबिक, आर्थिक, संस्थागत किंवा अगदी पती-पत्नीच्या संबंधांसंदर्भात असो, ते विलासजी फडणवीस यांच्याकडे जात. सर्वांसाठी ते केवळ विलासजी होते. विलासजींचे दार दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस उघडे असे. येणारे सर्व जण समस्येवरील हमखास उपाय घेऊन समस्यामुक्त होऊन समाधानाने जात. विलासजींजवळ असे काय होते? ते विषय शांतपणे ऐकून घेत असत.. इंग्लिशमध्ये ज्याला ‘पेशंट लिसनर’ म्हणतात, तसे ते होते. त्यावर विचार करत आणि अतिशय हळुवारपणे, दु:खावर फुंकर घालत तोडगा काढत. गरज पडली तर निर्णय घेताना शस्त्रक्रियाही करत असत, पण त्यातही समोरच्या माणसाला वेदना होत नसे.. ब्लडलेस सर्जरी!
 
 
 साधे सदस्य म्हणूनही एखाद्या संस्थेत त्यांचे नाव नसायचे. संघपरिवार म्हणून समजल्या जाणार्‍या विविध क्षेत्रांतील संस्था-संघटनांचे काम नीट चालावे, त्यांची भरभराट व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. संघात शाखा कार्यवाह ते पश्चिम क्षेत्र कार्यवाह असे दायित्व त्यांनी सांभाळले.
या काळात नागपुरात संघपरिवाराच्या शाळा-महाविद्यालय, बँका-पतपेढ्या, रक्तपेढी, नेत्रपेढी किंवा एनजीओ सुरू करण्यात विलासजींचा सिंहाचा वाटा होता. ज्या संस्था आधीच होत्या, त्यांचे संचालन उत्तम रितीने व्हावे यासाठी त्यांची प्रमुख भूमिका असे. पण ते कोठेही पदाधिकारी नव्हते. साधे सदस्य म्हणूनही एखाद्या संस्थेत त्यांचे नाव नसायचे. संघपरिवार म्हणून समजल्या जाणार्‍या विविध क्षेत्रांतील संस्था-संघटनांचे काम नीट चालावे, त्यांची भरभराट व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. संघात शाखा कार्यवाह ते पश्चिम क्षेत्र कार्यवाह असे दायित्व त्यांनी सांभाळले. पण याशिवाय अन्य कुठलेही दायित्व त्यांनी घेतले नाही. संघाशिवाय अन्य कोणत्याही संस्था-संघटनेत त्यांचे नाव नसे.
 
 
 
रेशीमबाग हे आजच्या भाषेत बोलायचे तर त्यांचे सेकंड होम. तेथील भवन निर्मितीपासून पाणीपुरवठा अशा सुविधांची आणि त्याचबरोबर निवास कार्यकर्त्यांची काळजी त्यांनी घेतली. संघ शिक्षा वर्ग, अ.भा. प्रतिनिधी सभा, हिवाळी शिबिर, विविध बैठका यानिमित्त विलासजींचा अधिकाधिक काळ निवास रेशीमबागेत असे, म्हणूनच ते त्यांचे सेकंड होम होते.
 
 
पू. डॉक्टरांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेले पाच हजार प्रचारकांचे शिबिर किंवा पू. श्रीगुरुजी जन्मशताब्दीनिमित्त झालेली भव्य सभा व त्यातील महाकाय मंच ही कल्पना विलासजींची. याच ठिकाणी संपन्न झालेला हिंदू संगम आणि असे कितीतरी भव्य कार्यक्रम उत्तम व्हावेत यासाठी विलासजी कुठल्याही मंचावर न येता, पुढे न दिसता काम करत, पण त्यात राहून कार्य यशस्वी करत.
 
 
 
विलासजींचे गांधीनगरातील ‘162, मांगल्य’ हे घर म्हणजे संघप्रचारकांचे माहेरघर. ऐंशीच्या दशकात विद्यमान सरसंघचालक मोहनजी नागपूर प्रांत प्रचारक होते, तर विलासजी प्रांत कार्यवाह होते. अशी जोडी त्या वेळी होती. मोहनजींनी नागपुरात प्रचारकांची मोठी फौज निर्माण केली व त्यांचा सांभाळ विलासजींनी केला. या कार्यात विनयावहिनींचा मोठा सहभाग असे.
 
 
 
विलासजी अशक्य ते शक्य करणारे होते. त्यांनी ‘नाही’ हा शब्द कधी उच्चारल्याचे कोणाला आठवत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 1998 साली झालेले विदर्भ प्रांताचे ‘समरसता संगम’ हे महाशिबिर! विदर्भातील 3,500 स्थानांवरून 35,000 स्वयंसेवक येतील ही कल्पनासुद्धा करणे विदर्भासाठी असंभव होते. पण ते संभव झाले. शेवटच्या क्षणापर्यंत पावसाने पिच्छा सोडला नाही. पण अशातही ठामपणे पाय रोवून उभे असलेले विलासजी सर्वांनी अनुभवले.
 
 
विलासजी पश्चिम क्षेत्र कार्यवाह असताना 2008मध्ये गुजरात प्रवासात होते. विद्यमान पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट ठरली होती. पण अचानक ब्रेन स्ट्रोक झाला व विलासजींची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या देशाचे गृहमंत्री असलेले अमित शाह त्या वेळी गुजरातचे गृहमंत्री होते. ते आठ तास तळ ठोकून रुग्णालयात थांबले होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच ते तेथून हलले. स्वत: नरेंद्रभाईंनी अनेक वेळा रुग्णालयाला भेट दिली आणि जातीने लक्ष घातले. या सार्‍याचा परिणाम असा झाला की, वैद्यकीय उपचाराचे बिल शून्य रुपये आले. विलासजींना नागपूरला नेण्यासाठी नरेंद्रभाईंनी एअर अँब्युलन्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या विमानाची व्यवस्था करून दिली. विलासजी मोठ्या आजारातून बरे झाले, पण त्यांना पुढे व्हीलचेअरवर राहावे लागले. 2008 ते 2013 अशी पाच वर्षे ते व्हीलचेअरवर होते, तरी त्यांचे सर्वत्र लक्ष होते. या काळातही ‘162, मांगल्य’मध्ये येणार्‍यांचे प्रमाण घटले नाही. हीच विलासजींच्या कार्याची पावती होती. 7 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांना देवाज्ञा झाली आणि समाजासाठी सदैव जळणारा एक नंदादीप शांत झाला.
 
 
Powered By Sangraha 9.0