सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे पुरस्कार प्रदान

विवेक मराठी    17-Jan-2022
Total Views |
@डॉ. दिवाकर कुलकर्णी 9882243531
 
 
समाजात अनेक संस्था आणि व्यक्ती त्यासाठी उत्स्फूर्तपणे आपले अतुलनीय योगदान देत समाजाची सेवा करीत असतात. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे असते. अशा संस्थांना आणि व्यक्तींना विनम्र अभिवादन करावे, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित डॉ. हेडगेवार रुग्णालयाअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून दोन पुरस्कार देते आहे. संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, लातूर या संस्थेच्या संस्थापक संचालिका दीपा सुरेश पाटील यांना या वर्षीचा डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चैतन्य महिला मंडळच्या संस्थापक संचालिका ज्योती दिग्विजयसिंह पठानिया यांना डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

RSS 
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने नुकतीच 25 वर्षे पूर्ण केली आहेत. परमपूजनीय डॉक्टरजींच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित डॉ. हेडगेवार रुग्णालयाअंतर्गत सेवा वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात सुरू झालेल्या या कामाचा व्याप मोठा झाला आहे. आता संभाजीनगर आणि जालना शहरांतील 68 सेवा वस्त्यांपर्यंत आणि नंदुरबार, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या पाच जिल्ह्यांतील 270 गावांपर्यंत संस्थेचा व्याप विस्तार पावला आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वावलंबन, शिक्षण, संस्कार, कृषी आणि ग्रामविकास या माध्यमांतून हे काम होते आहे. लोकसहभाग आणि स्वेच्छेने समाजसेवा करणारे हजारो कार्यकर्ते ही संस्थेची मोठी बलस्थाने आहेत. एका एका व्यक्तीस सक्षम बनण्यासाठी साहाय्यभूत होत सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे. या कमी स्थायी आणि शाश्वत सामाजिक परिवर्तनासाठी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून या कामाचा प्रारंभ झाला. याबरोबरच बालशिक्षणात भारतीय जीवनमूल्य रुजविण्याचे कार्य संस्था ओम्कार बालवाडीच्या माध्यमातून करीत आहे. तसेच दिव्यांग आणि विशेष बालकांसाठी ही संस्था काम करीत आहे.
 
 
आपल्या समाजाच्या गरजा आणि समस्याही खूप व्यापक आहेत. त्या जशा व्यापक आहेत, तशा त्या गुंतागुंतीच्याही आहेत. शासन-प्रशासन आपल्या परीने या गरजा आणि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु ते प्रयत्न पुरे पडत नाहीत. समाजात अनेक संस्था आणि व्यक्ती त्यासाठी उत्स्फूर्तपणे आपले अतुलनीय योगदान देत समाजाची सेवा करीत असतात. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे असते.
 
 
अशा संस्थांना आणि व्यक्तींना विनम्र अभिवादन करावे, म्हणून संस्था गेल्या तीन वर्षांपासून दोन पुरस्कार देते आहे. 19व्या शतकात ‘द हिंदू लेडी’ या नावाने लंडन टाइम्समध्ये बालविवाह प्रतिबंध, महिला हक्क याविषयी लिहून आवाज बुलंद करणार्‍या, भारतात पहिल्या दीर्घकाळ वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉ. रखमाबाई राऊत यांच्या प्रेरक स्मृतीत ‘डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार’, तर भटके विमुक्त बेरड रामोशी आणि देवदासींच्या पुनरुत्थानासाठी आपले जीवन वेचणारे समरसता चळवळीचे भाष्यकार, अध्वर्यू डॉ. भीमराव गस्ती यांच्या नावाने ‘डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार’ संस्था प्रदान करते. हे या पुरस्कारांचे चौथे वर्ष आहे.
 
 
संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, लातूर या संस्थेच्या संस्थापक संचालिका दीपा सुरेश पाटील यांना या वर्षीचा डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीपाताईंनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ काम केले. सुरेशदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या लातूर येथे आल्या. ज्यांच्याकडे विशेष आणि अलौकिक मातृत्वक्षमता आहे, अशाच व्यक्तींना निसर्ग किंवा परमेश्वर विशेष बालकांचे पालकत्व देत असावा. दीपाताईंनी ही जबाबदारी सहर्ष स्वीकारली. ती व्यवस्थित पार पाडता यावी, म्हणून आवश्यक असलेले औपचारिक प्रशिक्षण मुंबईत राहून घेतले. आधी स्वत:स सिद्ध केले. हरंगुळ, जि. लातूर येथे 2006 साली पद्मभूषण डॉ. काका कुकडे यांच्या मार्गदर्शनात ‘संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र’ हा प्रकल्प सुरू झाला. आज संपूर्ण लातूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या या शाळेत आता 60 दिव्यांग विद्यार्थी आहेत. ते श्रीमती दीपाताईंच्या आभाळभर खंबीर मातृत्वाचा दरवळ अनुभवत आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत हजारो विशेष बालके आणि त्यांचे कुटुंबीय नवउमेदीने सक्षमपणे आपल्या जगण्याला आनंदित करीत आहेत. हा प्रकल्प आता दिव्यांग पुनवर्सन या विषयात राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शक प्रकल्प म्हणून भूमिका निभावत आहे.
 
 
RSS
 
चैतन्य महिला मंडळच्या संस्थापक संचालिका ज्योती दिग्विजयसिंह पठानिया यांना या वर्षीचा डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजपर्यंत ज्योतीताई सुमारे दीड लाख विस्थापित आणि पीडित महिला-भगिनींच्या सन्मानाने जगण्याचा आधार ठरल्या आहेत. मुंबईत राहणारी एक धाडसी तरुणी पुण्यात बी.एस्सी. अ‍ॅग्री.चे शिक्षण घेते. परत मुंबईत जाते, दिग्विजयसिंह पठानिया यांच्याशी विवाहबद्ध होऊन परत पुण्यात येते; मुळात धाडस आणि कार्यकर्तृत्व सिद्ध करण्याचा स्वभाव असल्यामुळे भोसरी पुणे येथील औद्योगिक वसाहतीत स्वत:चा कारखाना सुरू करते, तो धडाडीने यशस्वी करते.. हे करीत असताना स्वत:तील नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी म्हणून भाजपा या राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ती म्हणून सामाजिक कार्यास प्रारंभ करते; भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची जाहीर सभा ऐकून, मुळात संवेदनशील असलेल्या ज्योतीताई “भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एक तरी अ-राजकीय सामाजिक कार्य प्रारंभ करावे” या त्यांनी केलेल्या आवाहनास कृतिरूप देण्याचे ठरवितात आणि चैतन्य महिला मंडळाची स्थापना करतात.. हा येथपर्यंतचा प्रवास साधा आणि सरळच म्हणावा लागेल. पुढे जे घडत गेले, ते विलक्षण आहे. भोसरी आणि परिसरातील शोषित पीडित भगिनींना चैतन्य महिला मंडळ हा एक आशेचा किरण सापडतो. अशा शेकडो भगिनी मग या संस्थेत आपले दु:ख मांडायला लागतात. या सार्‍या व्यथांच्या कोलाहलात ज्योतीताई भाजपा, त्यातील उज्ज्वल भविष्य, राजकारण, भविष्यातील येणारी सत्तापदे हे सारे विसरून जातात. अशा दु:खी, शोषित, पीडित भगिनींच्या पाठराखीण सखी होतात. मग पोलीस स्टेशन, कोर्टकज्जे यास सामोरे जात असताना त्यांच्या लक्षात येते की आपणाकडे या संदर्भातील कायद्याचा अभ्यास कुठे आहे? मग त्या एलएल.बी.च्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन वकिलीची सनद मिळवितात. आता असंवेदनशील निगरगट्ट पोलीस खाते, आंधळी न्यायव्यवस्था यांच्याशी लढाई सुरू होते. दीड लाख शोषित पीडित भगिनींचे पाठराखण ज्योतीताईंच्या माध्यमातून होते. हा सेवा यज्ञ इथेच संपत नाही. ज्योतीताईंचा संपर्क पुण्यातील रेडलाइट वसाहतीतील भगिनींशी येतो. रात्रीस चालणार्‍या शरीरविक्रय व्यवसायाच्या वेळी त्यांच्या बालकांचे काय होत असेल असा प्रश्न त्यांच्या संवेदनशील मनाला पडतो. मग ज्योतीताई बुधवार पेठेत एक सदनिका विकत घेऊन तिथे सायंकाळी 7 ते पहाटे 7 वाजेपर्यंत चालणारे जगातील पहिले अनोखे पाळणाघर सुरू करतात. या संघर्षमय सेवा यज्ञाची कहाणी मोठी आहे. समाजाविषयीची तळमळ मोठी आहे.
 
 
या दोन्ही सेवा कार्यकर्त्यांना, त्यांच्या कार्याला नमन करताना उपस्थित सर्वच भारावून गेले होते.
 
 
अशा दोन समाजसेवी तपस्वींना मा. रमेशजी (भाईश्री) पटेल (ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते) यांच्या हस्ते शनिवार, दि. 8 जानेवारी 2022 रोजी दामुअण्णा दाते सभागृह, डॉ. हेडगेवार रुग्णालय येथे सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांनी गौरविण्यात आले. प्रत्येकी 21 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्रमास समाजमाध्यमाद्वारे आभासी (ऑनलाइन) पद्धतीने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
या सत्कारास उत्तर देताना डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कारार्थी ज्योतीताई म्हणाल्या की, “महिलांवर होणार्‍या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात वेळीच तक्रार करायला हवी, तरच प्रश्न सुटतील. बाई अडचणीत असेल तर तिला पाठिंबा द्यावा. एकदा लैंगिक शोषणाला बळी पडली अन विरोध नाही केला, तर ते सातत्याने चालू राहते. त्यानंतर त्या बाजारू लैंगिक शोषणाला बळी पडतात. त्यामुळे महिलांनी योग्य वेळी तक्रार करायला हवी. किशोरी प्रशिक्षणाबरोबरच किशोरांचेही प्रशिक्षण करायला हवे.” त्या पुढे म्हणाल्या की “महिलांना मुबलक प्रमाणात सांगून झाले आहे. आता पुरुषवर्गालाही महिलांच्या शोषणाच्या विरोधात उभे करण्याची गरज आहे. लैंगिक अत्याचार करून शिक्षा झाली, तर त्याही व्यक्तीचे आयुष्य बरबादच होणार आहे. हे टाळायचे असेल, तर सच्छील पुरुषवर्ग निर्माण करण्यासाठी भरीव कार्य व्हायला हवे.”
 
 
डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कारार्थी दीपाताई सुरेश पाटील पुरस्काराला उत्तर देताना म्हणल्या की, “प्रत्येक दिव्यांग मूल वेगळे असून त्याचा अभ्यास, उपचार आणि पुनर्वसन प्रक्रिया वेगवेगळी आहे. अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी व्यक्तीने, कुटुंबाने आणि समाजाने त्याचा स्वीकार करायला हवा. तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीचा किमान एक दिव्यांग मित्र असावा.”
 
 
 
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य, मा. सुरेशराव कुलकर्णी म्हणाले की, “ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे, त्यांचे कार्य समाजाचे परिवर्तन घडवून आणणारे आहे. तशाच प्रकारचे काम या पुरस्कारार्थींनी केले आहे. समाजात होणारी उपेक्षा, अन्याय, अत्याचार यासारख्या समस्या दूर करण्यासाठी समाज जागृत व्हायला हवा. समाजातील सर्व भेदभाव नष्ट होऊन सर्व समाजघटकांचा समतोल विकास साध्य व्हायला हवा. तसेच सकारात्मक परिवर्तन आणि अराष्ट्रीय कारवायांना प्रतिबंध होणे आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, “समाजाच्या जटिल समस्या सोडविण्यासाठी संवेदनशील सेवा कार्याच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न होणे गरजेचे आहे.”
 
 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, भाईश्री फाउंडेशनचे संस्थापक, आसाम टी कंपनीचे संचालक रमेशभाई पटेल यांनी दोन्ही पुरस्कारार्थींचे कौतुक केले. त्यांचे कार्य फार मोठे असून त्यांच्या गौरवाने हे दोन्ही पुरस्कार मोठे झाले असल्याचे प्रतिपादित केले. या वेळी मुंबई येथील ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती शैलाताई गोखले यांना रमेशभाई पटेल यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
या वेळी व्यासपीठावर मा. कन्हैयालालजी शहा (मा. शहर संघचालक रा.स्व. संघ), ज्येष्ठ प्रचारक मा. सुरेशराव कुलकर्णी, मा. रमेशजी (भाईश्री) पटेल (ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते), संस्थेच्या विश्वस्त श्रीमती सपना गोयल हे उपस्थित होते.
 
 
कृत्तिका तुपकरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सविता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पुरस्कार योजनेची भूमिका विशद केली. वर्षा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्योती शितोळे आणि क्षमा खोब्रागडे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. प्रतिभा फाटक यांनी आभार मानले.
 
 
या वेळी उद्योजक राम भोगले, ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी, पुखराजजी पगारिया, देवगिरी प्रांत कार्यवाह हरीश कुलकर्णी, ह.भ.प. श्री नवनाथ महाराज आंधळे, ह.भ.प. श्री अरुण महाराज पिंपळे, किशोर शितोळे, प्रा. संजय गायकवाड, पूज्य भदंत सुदत्तबोधी, मा. शैलाताई गोखले, संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिवाकर कुलकर्णी, कार्यवाह डॉ. सुहास आजगावकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.