आदिवासी सेवा संकल्पातून सिद्धीकडे

विवेक मराठी    17-Jan-2022   
Total Views |
संकल्प आणि सिद्धी यात नेहमीच अंतर असते. ते कमी करण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आवश्यक असते. मनापासून स्वीकारलेले कार्य ध्यासपूर्वक पुढे न्यावे लागते. आदिवासी सेवा प्रकल्पाने ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे 150 टक्के ध्येयपूर्ती झाल्याचे समूहाचे नेतृत्व करणार्‍या डॉ. राजेंद्र खैरे यांनी नमूद केले. संकल्पातून सिद्धीकडे झेप घेणारी ही आदिवासी सेवा प्रेरणादायक आहे.

RSS
मागील भागात आपण संकल्प ग्रूपच्या स्थापनेपासून नाशिकजवळ सुरू असलेल्या विविध स्तरांवरील कामाचा आढावा घेतला. डॉ. खैरे म्हणाले, “आरोग्य हा महत्त्वाचा आयाम असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 5 वर्षांच्या कालावधीत आदिवासी पाड्यांवर नाममात्र 10 रुपये फी आकारून 75 हजार रुग्णांची आरोग्य तपासणी व ज्यांना जशी गरज असेल त्याप्रमाणे सेवाभावी डॉक्टरांनी उपचार केले. त्यामुळे अनेक पाड्यांशी आपुलकीचे नाते जोडले गेले. जिव्हाळ्याचे, मित्रत्वाचे ऋणानुबंध निर्माण झाले. आधी त्यांच्यामध्ये असणारे भय, शंका दूर झाली व सहकार्य मिळाले. संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याचा मार्ग त्यामुळे प्रशस्त झाला.” हे सांगताना त्यांच्या चेहर्‍यावर समाधान होते. ते पुढे म्हणाले, “आदिवासी पाड्यांवर सर्वाधिक समस्या त्वचारोगांंची असते. त्याखालोखाल संसर्गजन्य आजार बळावतात. गॅस्ट्रो, गोवर, कांजिण्या, मलेरिया यांचा प्रादुर्भाव होतो. लहान मुलांमध्ये कुपोषण सार्वत्रिक आढळते. ठिकठिकाणी रुग्णसेवा करताना आशा वर्करची मदत नेहमीच होते. त्याशिवाय पाड्यांवरच्या दहावी, बारावी उत्तीर्ण व इच्छुक विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक अभ्यासक्रम शिकवून वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. त्यातून अनेक आरोग्यरक्षक तयार झाले. त्यांना प्रमाणपत्र देऊन आरोग्यरक्षणासाठी त्यांची पगारी नेमणूक करण्यात आली. ते स्थानिक रुग्ण व सेवा संकल्प समिती यांना जोडणारा दुवा ठरतात. आजवर 525 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.” गोरगरीब आदिवासींना उपचार घेण्यासाठी नाशिकपर्यंत येणे शक्य नसते, म्हणून गाडी पाठवून रुग्णांना नाशिकला श्रीगुरुजी रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. त्यांच्यावर गरजेनुसार विनामूल्य उपचार, शस्त्रक्रिया करून त्यांना वाहनाने परत घरापर्यंत नेऊन पोहोचवले जाते, याकडेही डॉ. खैरे यांनी लक्ष वेधले.
 

RSS 
 
कर्करोग, अस्थिरोग यांचे प्रमाण कमी असले, तरी त्यासाठी तसेच महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या निवारणासाठी विविध पाड्यांवर 90पेक्षा जास्त विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यांनाही सर्व ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. महिलांमध्ये संकोच असल्याने सुरुवातीला त्या पुढे यायच्या नाहीत. पण महिला डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यातील न्यूनगंड कमी केला. सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण सुरू केले. आता त्या आपणहोऊन पुढाकार घ्यायला लागल्या आहेत. विविध प्रकारचे रोग झाल्यावर रुग्णांवर उपचार केले जातातच, पण आजार होऊच नये यासाठी सेवा प्रकल्पांतर्गत प्रतिबंधात्मक कार्यक्रम सातत्याने राबवले जातात. त्यांचा सुपरिणाम दिसून येतो.
 
RSS 
 
एका आश्रमशाळेत साधारणपणे 300 विद्यार्थी-विद्यार्थिनी असतात. त्यांना मूल्यशिक्षण, योग, प्राणायाम यांचे प्रशिक्षण देण्यात येते. डॉ. महेश भोसले हा उपक्रम राबवतात. तेथील निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी चार वाचनालये तयार करून सुमारे 1 हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी स्पर्धा घेऊन पारितोषिके देण्यात येतात. परिणामी विद्यार्थ्यांना वाचन समृद्ध करण्यास प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे आत्मविश्वास वाढला असून अवांतर वाचनाने त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारत आहे, असाही डॉ. खैरे यांनी त्यांचा अनुभव मांडला.
 

RSS
 
बर्‍याचशा आदिवासी पाड्यांवर भूजल पातळी खाली गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष असते. दूरवरून डोक्यावर पाणी वाहून आणण्यात महिलांचा जवळपास अर्धा दिवस जातो. हे गंभीर वास्तव समोर आल्यावर जवळ उपलब्ध असणार्‍या जलस्रोतांवर मोटर बसवण्यात आल्या. 38 पाड्यांवर 5 ते 10 हजार लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवल्या. याशिवाय जलपातळी वाढवण्याचे 56 प्रकल्प हाती घेण्यात आले. विविध पाड्यांवरील 70 हजारांपेक्षा जास्त जणांना त्याचा लाभ मिळतो, असेही डॉ. खैरे यांनी नमूद केले.
 




RSS
 
कोटंबी येथील बंधार्‍यात गाळ साठल्याने त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. अनेक ठिकाणी पाणीगळती होऊन पाणी वाया जात होते. त्यासाठी 600 ट्रॅक्टर्स लावून गाळ काढण्यात आला. परिणामी खोली वाढून जास्त पाणी मिळू लागले. वाया जाणारे 50 लाख लीटर पाणी वाचवण्यात यश मिळाले. शेती व पाणी या आयामांतर्गत हा प्रकल्प साकारला. आदिवासी स्वावलंबी व्हावेत, त्यांचे पाडे सक्षम व स्वयंपूर्ण व्हावेत हे उद्देश सेवा प्रकल्पात कायमच डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 791 स्त्री-पुरुषांना व युवकांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेगवेगळे प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचे प्रयत्न केले आहेत. पेंटिंग, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन, टेलरिंग, कुक्कुटपालन, ब्युटीपार्लर, तसेच आयटीआयचे विविध ट्रेड्स यांचा त्यात समावेश करण्यात आला. त्यातील उत्तम प्रकारे प्रशिक्षित झालेल्या अनेकांना श्रीगुरुजी रुग्णालयात विविध विभागांत सामावून घेतले जाते. 21 आदिवासी आरोग्यरक्षकांना रोजगार देण्यात आला आहे. 1 हजारांहून अधिक युवा आदिवासी शेतकर्‍यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी केंद्राशी जोडण्यात आले आहे. त्यांना मार्गदर्शन व वेळोवेळी सल्ला मिळतो. या माध्यमातूनदेखील आतापर्यंत 225 कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. जे शेतकरी मिळालेल्या मार्गदर्शनानुसार नेटाने यशस्वी प्रयोग करतात, त्यांच्या सरासरी उत्पन्नात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्थानिक नेतृत्व उभे करण्यासाठी ग्रामसेवक तयार केले. एका पाड्यावर विठ्ठल मंदिर उभे करण्यात आले. विविध पाड्यांवर 17 भजनी मंडळे स्थापन करून त्यांना टाळ, मृदुंग, पेटी, वीणा ही वाद्ये देण्यात आली. दररोज संध्याकाळी आरती होते. मुलांवर संस्कार केले जातात. त्यामुळे पाड्यांवर होणारे धार्मिक आक्रमण थोपवून आदिवासी बांधवांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होताना दिसतो. अशा पद्धतीने प्रारंभी ठरवण्यात आलेल्या आरोग्य तसेच शिक्षण, शेती, पाणी, महिला सबलीकरण व कौशल्य विकास या सहा आयामांवर सातत्याने काम सुरू आहे. तेच संकल्प सिद्धीस नेत आहे.
श्रीगुरुजी रुग्णालय प्रांगणात आदिवासी सबलीकरणासाठी विक्री केंद्र 

आदिवासी भागात विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने तयार होतात. त्यांना बाजारपेठ मिळून योग्य दरात त्यांची विक्री व्हावी, या उद्देशाने श्रीगुरुजी रुग्णालयाच्या प्रांगणात विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळतो. हातसडीचा तांदूळ, डाळी, तसेच वनौषधी, उपयुक्त तेले, गांडूळ खत यांना चांगली मागणी असते. आदिवासी महिलांचे बचत गट नागली पापड, नागली सत्त्व, कुरडया, पापड्या, मसाले, तसेच सीझनल उत्पादने तयार करून त्यांची विक्री करतात. होळीच्या उत्सवात दर वर्षी आदिवासी बांधव 1 लाख गोवर्‍यांंची विक्री करतात. अलीकडे 12 इंच व्यासाच्या व एक इंच जाडीच्या गोवर्‍यांंना मुंबई, पुणे व इतर मोठ्या शहरांतून मागणी असते. याशिवाय रानमेवा, रानभाज्या, सेंद्रिय भाजीपाला, कृषी उत्पादने यांचीही मोसमी विक्री केली जाते.

संजय दामोदर देवधर

  • ज्येष्ठ पत्रकार, आणि आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक.

  • नाशिक येथे दैनिक गावकरीमध्ये 34 वर्षे कलाविभाग प्रमुख, वार्ताहर, कलासमीक्षक व उपसंपादक पदावर काम करून निवृत्त. सध्या फ्रिलान्स पत्रकारिता सुरु.

  • शैक्षणिक अर्हता - जी.डी.आर्ट ( ऍप्लाईड ) 1982 साली जे जे स्कुल ऑफ आर्ट येथून अव्वल श्रेणीत उत्तीर्ण.

  • अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचे संबंध व पदाधिकारी म्हणून कार्य. विविध स्पर्धांच्या परीक्षणाचा अनुभव.

  • संशोधनपर कार्य- आदिवासी वारली चित्रशैलीविषयी विशेष संशोधन. कार्यशाळांचे आयोजन करुन अनेकांना वारली कला शिकविण्याचा उपक्रम सुरु. आत्तापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो कलाप्रेमींना वारली चित्रकलेचे मार्गदर्शन. परदेशी पर्यटक देखील येऊन वारली कलेचे धडे गिरवतात.

  • वारली चित्रकलेच्या प्रसार व प्रचारासाठी वारली चित्रसृष्टी हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या चार आवृत्त्या लोकप्रिय झाल्या आहेत. Warli Art World या इंग्लिश पुस्तकाच्या दोन आवृत्ती परदेशातही पोहोचल्या आहेत. रसिक वाचकांचा या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

  • चित्रसहल या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आदिवासी पाड्यांवर शहरी कलाप्रेमींना नेऊन वारली जीवनशैली, त्यांची कला यांचे सुरेख दर्शन घडवले जाते. आतापर्यंत अनेकजण सहकुटुंब सहलीत सहभागी झाले.

  • विश्वविक्रम - ऑगस्ट 2018 मध्ये 1100 पेक्षा अधिक स्पर्धकांची ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धा घेतली व दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रांद्वारे सामाजिक संदेश दिल्याने वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले.

  • पत्रकारितेत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने सन 2019 मध्ये वारली कलेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.