पर्याय उत्सव - पर्वकाळाची 500 वर्षे!

विवेक मराठी    18-Jan-2022
Total Views |
@वादिराज विनायक लिमये
आचार्यांच्या व वादिराजस्वामींच्या दिव्य-दूरदृष्टीतून प्रारंभ झालेला असा हा मंदिराच्या मठा-मठांमधील अधिकार हस्तांतरणाचा सोहळा, गेली 500 वर्षे अखंडितपणे सुरू आहे. या वर्षी शिक्षणक्षेत्रात विशेष योगदान असलेल्या अदमार मठाचा पर्याय संपून कृष्णापूर मठाचे श्रीविद्यासागरतीर्थ चौथ्यांदा पर्यायपीठावर विराजमान होणार आहेत. प्रसिद्धिपराङ्मुख व ज्ञानवृद्ध-तपोवृद्ध असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

DEV
 
श्रीमध्वाचार्य स्थापित श्रीकृष्णाची मूर्ती कर्नाटकातील उडुपी येथे आहे. या मूर्तीला अलौकिक असा इतिहास असून श्रीकृष्णाच्या बालरूपातील ही मूर्ती रुक्मिणी पूजत असल्याचा सांप्रदायिक इतिहास आहे. उडुपीजवळील समुद्राच्या तळाशी रुतून बसलेल्या, द्वारेकहून आलेल्या जहाजातून आचार्यांना ही मूर्ती प्राप्त झाली अशी संप्रदायिक रूढ कथा आहे. आचार्यांचे वास्तव्य असलेल्या उडुपीतील मठातच त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्तीच्या पूजेसाठी आचार्यांनी त्यांच्या संन्यासी शिष्यांपैकी आठ संन्यासी शिष्यांना नेमले. प्रत्येक संन्यासी दोन महिने श्रीकृष्णाची पूजा करील व मठाचे-मंदिराचे व्यवस्थापनही सांभाळील, अशी व्यवस्था आचार्यांनी रूढ केली.
श्रीकृष्ण मठ-मंदिराच्या आधीपासून अनंतेश्वर देवाचे मंदिर उडुपीत होते. परशुराम क्षेत्रातील सप्तमहाक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या भूमीत रामभोज राजाने वाजपेय यज्ञावेळी भगवान परशुरामांना रजतपीठावर (चांदीच्या पाटावर) बसवून त्यांची पूजा केली, त्यावरूनच त्या क्षेत्रास ‘रजतपीठ’ अथवा ‘रौप्यपीठ’ असे नाव प्राप्त झाले, तसेच चंद्राने तेथे भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले, असे तेथील स्थळपुराण सांगते. रजतपीठपुरीचे तुळू भाषेतील नाव ओडिपू, जे कन्नड भाषेत उडुपी म्हणून प्रचलित झाले. आचार्यांचा जन्म होण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी अनंतेश्वराची सेवा केली होती. अनंतेश्वर हे तुळू (शिवळ्ळी) ब्राह्मणांचे कुलदैवत व उडुपीचे ग्रामदैवत असल्यासारखेच. आचार्यांनंतर साधारण 200 वर्षे दोन-दोन महिने प्रत्येक मठाने श्रीकृष्णमठाची व्यवस्था पाहणे तसेच सुरू होते. पण दोन महिन्यांचा काळ लवकर संपत असल्याने धर्मप्रचारासाठी संन्याशांना भारतभ्रमण करता येत नसे.


DEV
 
15-16व्या शतकातील श्रीवादिराजस्वामींच्या काळात स्वामींनी उडुपीत अनेक बदल घडवले. सरोवराचे बांधकाम, उडुपीतील श्रीकृष्ण, अनंतेश्वर, चंद्रमौळीश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तसेच सर्व संन्यासी कृष्ण मठातच वास्तव्यास असायचे व ती जागा अपुरी असल्याचे स्वामींच्या लक्षात आले. अनंतेश्वराच्या रथयात्रेसाठी मंदिरासमोरचा गोलाकार प्राकार होता व कृष्णमंदिर स्थापन झाल्यावर तोच प्राकार कृष्णाच्या रथयात्रेसाठी वापरला जाऊ लागला, ज्यास ‘रथबिदी’ म्हणजे रथासाठीचा पथ-मार्ग असे म्हणतात. त्या रथबिदीच्या सभोवतीच स्वामींनी आठ संन्यासी शिष्यपरंपरांच्या स्वतंत्र मठ-इमारती बांधल्या. तसेच भव्य रथांची निर्मिती हीदेखील स्वामींचीच अभिनव कल्पना!
 
आचार्यांनी 13व्या शतकात वसवलेल्या एका क्षेत्राचा क्षेत्रविकास करत असतानाच, स्वामींनी पर्यायाचा दोन महिन्यांचा कालावधी बदलून दोन वर्षे केला, जेणेकरून इतर संन्याशांना भारतभ्रमण करून धर्मप्रचार करणे सुकर होईल. याबरोबरच तत्कालीन परकीय आक्रमणाला, धर्मांतरणाला अप्रत्यक्षरित्या उत्तर देण्यासाठी पर्यायास एका भव्य-दिव्य उत्सवाचेच रूप देण्यात आले. पर्याय म्हणजे केवळ मठ-मठांमधील अधिकाराचे हस्तांतरण एवढाच तो विषय मर्यादित न ठेवता त्यास अधिक व्यापक केले ते वादिराजस्वामींनी! इसवीसन 1522मध्ये प्रथमत: दोन वर्षांचा पर्याय रूढ केला गेला व तेव्हापासून गेली 500 वर्षे ती पर्याय उत्सवाची, अधिकार हस्तांतरणाची परंपरा अविच्छिन्नपणे सुरू आहे.


DEV
 
आचार्यांच्या शिष्यपरंपरेतील संन्यासी शिष्यांना जसजसा राजाश्रय मिळत गेला, त्यानुसार उडुपीच्या आसपासच्या गावात त्यांच्या मठ-इमारती बांधल्या गेल्या. शिष्यपरंपरेची इमारत ज्या गावी असेल, त्या गावच्या नावावरून मठांची नावे रूढ झाली, ती खालीलप्रमाणे -
1. हृषीकेशतीर्थ परंपरा - पलिमार मठ
 
2. नरसिंहतीर्थ परंपरा - अदमार मठ
 
3. जनार्दनतीर्थ परंपरा - कृष्णापूर मठ
 
4. उपेंद्रतीर्थ परंपरा - पुत्तिगे मठ
5. वामनतीर्थ परंपरा - शिरूर मठ
 
6. विष्णुतीर्थ परंपरा - सोदे मठ
 
7. रामतीर्थ परंपरा - काणियूर मठ
8. अधोक्षजतीर्थ परंपरा - पेजावर मठ.
हे मठ-शिष्यपरंपरा जेव्हा आपला श्रीकृष्ण मंदिरातील पूजा-व्यवस्थापनाचा कार्यकाळ संपवतात आणि दुसर्‍या मठावर ती जबाबदारी सोपवतात, तेव्हा त्या उत्सवास ‘पर्याय’ असे म्हणतात. हे एक प्रकारचे अधिकार हस्तांतरणच असते. पलिमार मठापासून हे चक्र सुरू होते, ते पेजावर मठापर्यंत संपते, मग पुन्हा पलिमार मठापासून सुरू होते. या दोन वर्षांच्या कार्यकाळात ज्या मठाचा पर्याय असतो, तो मठ-मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळतो. त्या विशिष्ट मठास ‘पर्याय मठ’ असे म्हटले जाते व त्या मठाच्या संन्याशांना - मठाधिपतींना ’पर्याय स्वामी’ असे म्हणतात.

उडुपी श्रीकृष्णाला रोज एकूण 18 पूजा-सेवा अर्पण केल्या जातात. यात पहाटेपासून रात्रीपर्यंत अनेक पूजा-सेवांचा समावेश असतो. त्यातील काही पूजा व सेवा पर्याय स्वामींशिवाय कोणीही सादर करू शकत नाही, असा दंडक आहे. त्यापैकी काही म्हणजे गो पूजा, अक्षयपात्र पूजा, अवसर सनकादि पूजा, महापूजा, चामर सेवा इत्यादी. आचार्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जर पर्याय स्वामींना कारभार पाहणे किंवा वरील सेवा, पूजा करणे शक्य नसेल, तर त्यांच्या अनुपस्थितीत मंदिराचा कारभार पाहण्यासाठी, पूजा करण्यासाठी दोन-दोन मठांच्या जोड्या केल्या आहेत, ज्यांना ‘द्वंद्व मठ’ असे म्हणतात. अशा वेळी द्वंद्व मठातील मठ-शिष्यपरंपरा मंदिराचा कारभार सांभाळते. उदा. पलिमार मठाच्या स्वामींना पर्याय करणे शक्य नसेल, तर अदमार मठाचे संन्यासी पर्यायाची जबाबदारी घेतात.
 
 
पर्यायाची सुरुवात एक वर्ष आधीच होते. त्या एका वर्षाच्या काळात ठरावीक कालांतराने विशिष्ट मुहूर्त केले जातात. त्यात पर्यायात पुढील दोन वर्षे लागणार्‍या गोष्टींची तरतूद केली जाते. त्यामध्ये केळी, तुळशींची लागवड केली जाते. तसेच नैवेद्यासाठी अन्न-धान्य, लाकूडफाटा इत्यादीची सोय केली जाते. भावी पर्याय स्वामी पर्यायाच्या आधी काही महिने महत्त्वाच्या स्थानदेवतांचे दर्शन-आशीर्वाद घेतात. ही यात्रा शक्यतो बद्री ते कन्याकुमारीमधील महत्त्वाच्या स्थानदेवतांची असते. या यात्रेनंतर साधारणत: पाच ते दहा दिवस आधी पर्याय स्वामी उडुपीत प्रवेश करतात. त्यानंतर पुढील दोन वर्षे पर्याय स्वामी उडुपीची वेस ओलांडून जात नाहीत.
भावी पर्याय स्वामी पर्यायाच्या दिवशी - म्हणजे मकर संक्रांतीपासून चौथ्या-पाचव्या दिवशी पहाटे 3 वाजता उडुपीजवळील दंडतीर्थ येथे स्नानासाठी जातात. तिथून जोडूकट्टे या ठिकाणी येतात. तिथे इतर संन्यासी भावी पर्याय स्वामींच्या स्वागतार्ह आलेले असतात. त्या ठिकाणाहून उरलेल्या सात संन्याशांची मिरवणूक निघते व ते उडुपीत प्रवेशतात. उडुपीतील पर्याय स्वामी या सर्वांचे स्वागत करतात. पुढील दोन वर्षे निर्विघ्नपणे पार पडावीत यासाठी भावी पर्याय स्वामी उडुपीतील सर्व देवतांचे आणि मध्वाचार्यांचे आशीर्वाद घेतात, तसेच श्रीकृष्णाचेही दर्शन घेतात. त्यानंतर पूजेचे सर्व अधिकार माजी पर्याय स्वामींकडून भावी पर्याय स्वामींना हस्तांतरित केले जातात. उडुपीला आचार्यांच्या आदेशानुसार 365 दिवस मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. उडुपीला अक्षय पात्र आहे अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच उडुपीस ‘अन्नब्रह्म’ असेही म्हणतात. त्या अक्षय पात्राचेही हस्तांतरण होते व त्यानंतर माजी पर्याय स्वामी भावी पर्याय स्वामींना सर्वज्ञपीठावर बसण्याची विनंती करतात. उडुपीला कृष्णमंदिरात आचार्य प्रवचनाला बसत, ती एक शिळा होती, त्यावरच एक संन्यासपीठ बांधले गेले. आचार्यांना सर्वज्ञाचार्य ही पदवी असल्याने त्या पीठास ‘सर्वज्ञपीठ’ असे म्हणतात. हे उडुपी कृष्ण मठातच आहे. पर्याय स्वामी याच सर्वज्ञपीठावर विराजमान होतात. त्याच वेळी आधीच्या स्वामींचा पर्याय संपून नवीन स्वामींचा पर्यायकाळ सुरू होतो. त्यानंतर आठही मठांचा दरबार भरवला जातो, ज्यास ‘पर्याय दरबार’ असे म्हणतात. त्यामध्ये पंडितांचा व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो, तसेच व्यवस्थापन पाहण्यासाठी मठातील सदस्यांची नेमणूक केली जाते. भावी पर्याय स्वामी दोन वर्षांच्या काळात कोणते उपक्रम हाती घेणार आहेत याची घोषणा करतात व अशा प्रकारे पर्याय सोहळा संपन्न होतो.
 
या वर्षी शिक्षणक्षेत्रात विशेष योगदान असलेल्या अदमार मठाचा पर्याय संपून कृष्णापूर मठाचे श्रीविद्यासागरतीर्थ चौथ्यांदा पर्यायपीठावर विराजमान होणार आहेत. प्रसिद्धिपराङ्मुख व ज्ञानवृद्ध-तपोवृद्ध असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
 
आचार्यांच्या व वादिराजस्वामींच्या दिव्य-दूरदृष्टीतून प्रारंभ झालेला असा हा मंदिराच्या मठा-मठांमधील अधिकार हस्तांतरणाचा सोहळा, गेली 500 वर्षे अखंडितपणे सुरू आहे. सत्ता, पद-प्रतिष्ठा, अधिकार सहजासहजी सोडता न येणार्या आजच्या काळात नि:स्पृहपणे कर्तव्य-अधिकारांच्या पालनाचा व हस्तांतरणाचा असा हा पर्याय उत्सव आपल्या देशातील अनेकांसाठी व येणार्‍या पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे.
 
 
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
भ्रमणध्वनी - 9762744407